---पल्लवी यरनाळकर--- आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवशी लाखोंच्या संख्येने भक्त मंडळी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमतात. या वर्षी आपल्या मंडळाने बेंगळुरूच्या भक्त मंडळींसाठी भक्त मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन केले आणि पंढरीच्या वारीच्या वातावरण निर्मितीचा आनंद दिला. भक्त मेळाव्याची सुरुवात, अभंग संध्या "विठ्ठल गीती गावा" याने झाली. व्हॉइस ऑफ बेंगळुरूचे हे ४ थे पुष्प होते. जे बेंगळुरूमधील सुप्रसिद्ध मराठी गायक आणि वादक यांनी सादर केले होते. सर्व अभंग एक से बढकर एक होते. प्रत्येक अभंगाचा आणि त्यात वापरलेले शब्द याचा सुंदर खुलासा देखील निवेदनामधून होत होता. त्यामुळे आधीच्या माहितीमध्ये पण भर पडली. विशेष कौतुक "मोगरा फुलाला" या वेगळ्या सादरीकरणाचे वाटले. हा अभंग म्हणताना मधले निवेदन आणि गाताना केलेला गिटारचा प्रयोग खूपच सुंदर होता. वाद्यवृंदामध्ये एक चिमुरडा वादक, ईशान मात्वणकर देखील छोटा वारकरी बनून सुंदर साथ देत होता. त्याचे देखील खूप कौतुक वाटले. लहान मुले ते वृद्ध माणसे यांनी रवींद्र कलाक्षेत्रचे सभागृह फुलून गेले होते. प्रत्येक जण विठ्ठलाचे नाव घेण्यात आणि त्या गजरात मग्न झाला होता. सभागृहाबाहेर पावसाचा शिडकावा आणि आत विठ्ठल नामाचा गजर याने एक वेगळाच माहोल तयार झाला होता. कार्यक्रमाची सांगता नृत्यनाटिका “तुका म्हणे ” याने झाली. पुण्याच्या सुप्रसिद्ध नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे-चापेकर निर्मित "कलावर्धिनी" संस्था, यांनी सादर केलेले हे नृत्य नाट्य होते. सुरुवातीला सगुण विठ्ठलाची भक्ती पूजा नंतर विठ्ठलाने बोलावे किंवा दर्शन द्यावे, यासाठी केलेली आर्जवे, रुसणे, रागावणे आणि अखेरी चराचरी विठ्ठल दिसणे, त्याचा साक्षात्कार होणे हे अतिशय उत्तम नृत्य आणि अभिनयाने सादर झाले. या नृत्यनाटिकेमध्ये विशेष उल्लेख करावासा वाटतो तो प्रकाश योजनेचा. त्यामुळे त्या नृत्याला वेगळीच रंगत आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी प्रेषकांनी उभे राहून केलेल्या टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दुमदुमले होते. यावर्षी बेंगळुरूमध्ये राहून महाराष्ट्र मंडळामुळे पंढरपूरचा अनुभव घेता आला, त्याबद्दल मंडळाचे आणि सर्व कलाकाराचे खूप आभार. त्याबरोबर आयोजक कमिटीचे सुद्धा खूप खूप आभार. पुढच्या वर्षी देखील हा भक्त मेळावा व्हावा अशी इच्छा ..
अभिप्राय – विठ्ठल गीती गावा आणि तुका म्हणे
Categories: