— सौ.अनुराधा भागवत —
संपादक
सनविवि,
सादर नमस्कार.
अंक नेहमीप्रमाणेच छान निघाला आहे. पाडव्याच्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेने आपण मंडळाच्या कार्यक्रमाची सुरवात केलीत, त्यामुळे पुढील वर्षभर कार्यक्रम छानच होणार यांत कांही शंकाच नाही आणि सनविविच्या अंकाचं प्रकाशन, हे ही यांत आलंच.
यावेळेस विषय आपणच दिल्यामुळे सर्व लेख”सुट्टी ” या विषयाभोवतीच गुंफलेले होते. शाळेच्या परिक्षेत निबंध लिहावा तसं कांहीसं लेख लिहताना वाटत होतं. वैविध्य प्रवासाबद्दल लिहलेल्या लेखात आढळले. रोजचा विरार लोकलचा प्रवास… नोकरीमुळे पाचवीलाच पूजलेला, पण त्यावरच आपला लेख लिहिण्याचा विचार स्तुत्य आहे. या रोजच्या प्रवासापासून ते पार अश्मयुगापासून आजपर्यंत आलेला देहातीत प्रवास यांत आहे. अमेरिकेतील ड्राईव्ह अवे योजनेमुळे कुणाची स्वप्नं साकार झाली आहेत आणि ही माहिती नवीनच कळली. तसंच अंदमानातील एका टोकाच्या बेटावर, जिथे सहसा कोणी जात नाही तो प्रवास लहान मुलांना घेऊन करणे, आईला किती अवघड जाते ते लेखात बरोबर दाखवले आहे.
सुट्टीबद्दल व छंदवर्गाबद्दल व्यक्त होणाऱ्या विचारात पुष्कळच साधर्म्य आहे आणि ते साहजिकच आहे म्हणा, कारण यांत एकाच विषयावरचे विचार आहेत. अंकाबद्दल जितकी उत्सुकता होती तितकंच किंवा त्याहून जास्त समाधान अंक वाचून झालं. असो.
अंकाबद्दल माझ्या सर्व लेखक मित्रांचे व संपादकांचे अभिनंदन व सर्वांना शुभेच्छा!