आघाडा…..

अत्यंत उपयुक्त पण तितकीच दुर्लक्षित वनस्पती म्हणजे आघाडा. खरंतर आघाड्यासारख्या छोट्या पण औषोधोपयोगी वनस्पतीकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून धार्मिक आचार विचार व व्रतवैकल्यातून मान देऊन त्यांचे विशेष गुणधर्म व महत्त्व लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आपल्या पूर्वजांनी केलेला आहे. 

आपल्याकडे मंगळागौरीला  तसेच गणपती व गौरीला आघाडा वाहतात. काही ठिकाणी तर आघाड्याची रोपं मुळासकट उपटून त्यांची जुडी बांधतात व त्यावर गौरीचा मुखवटा ठेवतात. गुरूजी पूजेच्या वेळी सर्व पत्र समर्पयामी– म्हणताना तुळस, बिल्वपत्र, दुर्वा, केना, आघाडा, केवडा ह्या व असल्या अनेक औषधोपयोगी वनस्पतींची नावे घेत असतात. आज आपण त्या पत्री का पूजेत आल्या आहेत याचा विचारच करत नाही. नव्हे ती कारण मीमांसा जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाही.  मग उपयोग तर दूरच राहिला. खरंतर अनेक वनस्पतींच्या विविध औषधीगुणधर्मांची माहिती मला आत्ता ह्या मालिकेमधून लेख लिहीत असताना होते आहे. उदाहरणार्थ आंब्याच्या कोयींचे, पानांचे औषधीगुण वाचल्यावर त्यांचे पूजेतील महत्त्व लक्षात आले. आपण कलश पाण्याने भरून त्यात आंब्याची पाच पाने धुवून पुसून देठाकडून बुडवून ठेवतो. त्याच्याही मागे पुन्हा शरीरशास्त्राचाच विचार केलेला दिसतो. कुठलीही पत्री, आंब्याची पाने, का स्वच्छ धुवून पुसून वाहायची व वापरायची ह्याची कारणं कळायला लागली. आंब्याची ताजी पाने देठासकट पाण्यात ठेवली तर त्यातील एक द्रव पाण्यात उतरतो जो औषधी असतो. असो.

पावसाळा सुरू झाला की सर्वत्र तणाप्रमाणे सहज उगवणाऱ्या आघाडा  ह्या  वनस्पतीची श्रावण-भाद्रपद महिन्यात पूर्ण वाढ होते. संस्कृतमधे आघाडा वनस्पतीला अपामार्ग म्हणतात.  तसेच खरमंजिरी, अपांग, चिचरा मयुरक अशा विविध नावाने आघाडा ही वनस्पती ओळखली जाते. 

आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया ह्या देशातही ऊष्ण भागात आघाडा दिसून येतो. भारतात तर सर्वत्र मिळतो. आघाड्याचे, हिरवा व लाल असे दोन प्रकार आहेत. लाल रंगाच्या आघाड्याच्या शाखा व पानावर लाल ठिपके असतात.  

आघाडा साधारणतः तीन फुट  वाढतो. ह्याचे खोड ताठ व फांद्या थोड्याच पण लहान असतात. पाने एक ते दोन इंच लांब व जवळपास एक इंच रुंद आणि लंबगोलाकार असतात. मागच्या बाजूने ही पाने मऊ व पांढरट असतात. ह्या झाडाच्या फुलांचा दांडा एक ते दीड फूट वाढतो. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात ह्या दांड्यावर फुलं आणि फळं येतात. ह्याची फुलं फिकट हिरव्या रंगाची असतात. फळांवर बारिक काटे असतात. त्यामुळे फळं  गुरावासरांच्या अंगाला चिकटतात व सर्वदूर पसरतात व वाढतात.  

आयुर्वेदात, आघाड्याचे औषधी गुण बरेच सांगितले आहेत.  कफ-वात शामक असलेला आघाडा खोकला, सर्दी, दमा, विषमज्वर ह्यावर उपयोगात आणतात. पचनक्रियेस पूरक अशा ह्या रोपाची पाने धुवून चावून खाल्ल्यास किंवा त्या पानांचा काढा घेतल्यास, पाचन सुधारते. जेवणापूर्वी काढा घेतला तर पोटातील पाचक रस वाढतो व जेवणानंतर घेतला तर पित्त किंवा आम्ल कमी करतो. पोटदुखीवर पानांचा रस देतात किंवा आघाडा मुळासकट उपटून तो जाळतात व ती राख मधासोबत मिसळून ते चाटण देतात.  आघाड्याच्या पंचांगाचा काढा किंवा मुळाचे जाळून केलेल्या चूर्णाचे मधासोबत चाटण दिल्यास खोकला, दमा जातो. वामक असल्यामुळे कफ पातळ होऊन बाहेर पडतो. मूतखडा व इतर मुत्रविकार ह्यावर पानांचा रस देतात. विनासायास खडा बाहेर पडतो. तसेच आमवाताचा जोर ह्या रसाने कमी होतो.  विषमज्वरात आघाड्याची राख किंवा मुळाचे चूर्ण, खायच्या पानाच्या रसातून देतात. 

दातदुखी असेल तर पानांचा रस कापसाच्या बोळ्याने दातांमधे लावतात. आघाड्याच्या काडीने दात घासतात. त्यामुळे दात स्वच्छ होऊन मुखदुर्गंधी जाते. मस्तकशूल, बहिरेपण, कानातून पू वाहत असेल तर, कानात आवाज येत असल्यास, त्वचाविकार, मूळव्याध, आमवात, अतिसार, यकृताचे विकार, रात आंधळेपण, अंगावरील चरबी कमी होण्यास आघाड्याच्या पानाचा रस किंवा पंचांगाचा काढा, किंवा मुळांची राख उपयोगी ठरते. पायात काटा गेला असला तर पानाचा रस चोळतात वा आघाड्याच्या पानाचे पोटीस बांधले की काटा वर येतो. हळद व आघाड्याचा रस ह्याचे पोटीस गळव्यावर बांधतात. 

मज्जातंतूच्या आजारात आघाड्याचा अंगरस देतात. आघाड्याच्या रोपाची राख बाह्य व्रणांवर उपयुक्त ठरते. अतिसारात मध घालून पानांचा रस देतात.  आघाडा विष नाशक आहे. उंदराच्या विषावर रस देतात तर विंचू दंशावर पाला वाटून लेप लावतात. तसेच आघाडा /अपामार्ग  हृदयरक्त- शोधक, रक्तवर्धक, कृमिघ्न व पित्त सारक आहे. पानाच्या रसाने हाडे मजबूत होतात. वेदना होत असतील तर पानांचा रस देतात. अंगाची खाज कमी होण्यास मदत होते.  आघाड्याच्या मूळाचा लेप, नाभी व बस्तीप्रदेश या भागावर लावल्यास प्रसूती वेदना कमी होतात. प्रसव कळा सुरू होण्यापूर्वी आघाड्याची मूळे दोऱ्याने कमरेवर बांधल्यास फायदा होतो. पण प्रसूतीनंतर हे मूळ लगेच काढून टाकतात.

 थोडीशी तिखट चव असणाऱ्या आघाड्याच्या पानाच्या रसाचा, रेचक म्हणून उपयोग होतो. म्हणजे काय की मुळासकट संपूर्ण रोप औषधी आहे. पंचांगाचा (मूळ, दांड्या, पानं, फुलं व  फळं) रस किंवा जाळून केलेली राख औषध म्हणून उपयोगात आणतात.  

 ह्या आणि अशा अनेक शरीरोपयोगी गुणधर्मामुळेच आघाडा ही  वनस्पती धर्मकार्यात समाविष्ट करून, आपल्या आयुर्वेदाचार्यांनी तिला महत्त्व प्राप्त करून दिले आहे.  खरं तर सारेच पूजाविधी आरोग्य सूचक आहेत. आपण मात्र आंधळेपणाने त्या धार्मिक कृत्यांचे अनुसरण करतो. आपल्या दृष्टीने क्षुल्लक असलेल्या ह्या वनस्पतींचे धार्मिक दृष्ट्या महत्त्व वाढवण्यामागची कारणे मात्र आम्ही शोधून काढली नाहीत. सध्या अनेक वनस्पतींवर संशोधने  सुरू आहेत. त्यातून निघणाऱ्या निष्कर्षाने  जुन्या ज्ञान-भांडारातील माहितीला पुष्टी मिळते आहे. 

अशी ही उपयुक्त वनस्पती आपल्या बागेत लावता येते. मोठ्या लांबोळ्या किंवा गोलाकार कुंडीत माती घालून त्यात आघाड्याचे रोप किंवा बी पेरले की सहज रुजते व वाढते. खत टाकायलाच हवे असे नाही. तसेच पाणी पण कमी लागते. फक्त कुंडीतील पाण्याचा निचरा होईल ह्याची काळजी घ्यायला हवी. 

 अशा ह्या आघाड्याची, डाळीचे पीठ पेरून भाजी करतात. पौष्टिक असते. परंतु ह्या वनस्पतींचा वापर आयुर्वेदाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली करवा हे महत्वाचे व उत्तम.

केना ….. 

अति परिचयाची पण तरीही अनोळखी अशी ही वनस्पती. कुठेही म्हणजे जलाशयाच्या काठावर,  ओसाड जमिनीवर,  गवताळ प्रदेशात, रस्त्याच्या कडेने, पानथळ किंवा कोरड्या जमिनीत अशी कुठेही तणाप्रमाणे वाढते. भातशेत गहू, अशा पिकात किंवा चहा काॅफीच्या मळ्यात हे तण त्रासदायक ठरते. ह्या सुसाट वाढणा-या वनस्पतीचे निर्मूलन करणे फार जिकरीचे होते.

 केना जमिनीवर रांगत वाढतो.  बियांपासूनही वाढतो. ही वनस्पती जगभरातील ऊष्ण प्रदेशात दिसून येते. भारताव्यतिरिक्त आशिया व आफ्रिका, जपान, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, चीन ह्या देशातही दिसून येते. 

ह्या वनस्पतीचेही पूजेत मानाचे स्थान आहे. श्रावण-भाद्रपद महिन्यात येणार्‍या मंगळागौर व गणपती-गौरीला ही वनस्पती वाहतात.  पुन्हा असेच म्हणता येईल की आयुर्वेदाचार्यांना ह्या वनस्पतीचे गुणधर्म माहीत होते. अशा रूप लहान पण गुणाने महान असलेल्या वनस्पतींचे संरक्षण व संवर्धन व्हावे म्हणून देवघरात ह्या वनस्पतींना मानाचे स्थान दिले.  

 केना ह्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव commelina benghalensis आहे तर बंगाल डे फ्लाॅवर, कंचारा कांकू, कंचट, महाकेना, कोशपुष्प अशी नावे आहेत. हिंदीत कृष्णघास, तर कन्नड भाषेत हिट्टीगन्नी म्हणतात. ह्या वनस्पतीवर जांभळ्या रंगाची फुले येतात. ही रानफुलं खूप सुंदर दिसतात. ह्याच्या बिया काळ्या असतात. बिया पेरल्या की रोप लागते. हे रोप जमिनीतून रांगत पसरते. ह्याची पाने लांबट व हिरवी असतात. आपल्या बागेत लावता येईल. पावसाळ्यात तर केना खूप वाढतो. केना ही श्रावणातील  प्रमुख भाजी. ह्यात micronutrients प्रचूर मात्रेत उपलब्ध आहेत.  त्यामुळे केना ही वनस्पती आदिवासी क्षेत्रात, शेतकरीवर्गात  Immunity Booster म्हणून वापरली जाते. केन्याच्या हिरव्या पानांची भाजी करतात.  तसेच पालकाचे करतो तसे भजे पण करतात. 

 ही पाने वाळवून नंतर त्याचे चूर्ण करतात.  ह्या चूर्णाचा उपयोग पोटातील विकारांवर, बद्धकोष्ठतेवर, मूत्रसमस्येवर, कानाच्या विकारांवर,  पचन तक्रारीवर, हमखास करतात.  ताजी पाने धुवून त्याचा रसही पाण्यातून किंवा मधासोबत देतात.  ह्या रसाने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.  

त्वचा विकारांवर, खाज, गजकर्ण,  खरूज, इसब ह्यावर केन्याची ताजी पाने वाटून लेप लावतात.  ह्या पानांच्या लेपाने अंगावरील सूज कमी होवून वेदना कमी होण्यास मदत होते. पानांच्या चूर्णाने तापही उतरतो. 

 केना ह्या वनस्पतीच्या पंचांगाचे (म्हणजे मूळ, काड्या, पानं फुलं व फळं) चूर्ण, मूतखडा, रक्तपित्त, व तापावर वापरतात. केरळच्या डाॅक्टर श्रीलक्ष्मी ह्यांनीही केन्याच्या ह्या औषधीगुणांची माहिती  दिली आहे. 

 केना ही वनस्पती जलशुद्धी करते. प्लास्टिकच्या बाटल्यांमधे रोपं लावून ती मुंबईच्या पोईसर नदीत सोडली आहेत. जलशुद्धीकरणाला पोषक असणारी वनस्पती सोडण्याचा प्रयोग प्रथमच मुंबईच्या नद्यांमधून करण्यात आला आहे. त्यामुळे नदीतील दुषित घटक नष्ट होऊन जल शुद्ध होण्यास मदत होईल असे जाणकारांचे मत आहे. 

 ह्या व असल्या अनेक वनस्पती आपल्या आरोग्यास पूरक असल्या तरीही तज्ज्ञांकडून सल्ला घेतल्याशिवाय त्यांचा वापर करू नये हे मात्र निश्चित.  

सौ. विद्या चिडले

बेंगळुरू

१३|११|२०२२.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *