सनविवि अनुभव ओळख मायबोलीची – वृत्तांत

ओळख मायबोलीची – वृत्तांत

महाराष्ट्र प्रतिष्ठान बेंगळुरू आयोजित ओळख मायबोलीचे ह्या ऑनलाईन मराठी शाळेच्या पाचव्या पर्वाचे उदघाटन २० नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूच्या सभागृहात अतिशय उत्साहात संपन्न झाले. 

श्रीगणेश आणि विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष माणिक पटवर्धन उपस्थित होत्या. त्याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरुवात झाली. शाळा जरी ऑनलाईन होत असली तरी प्रत्येक वर्गाची सुरुवात प्रार्थनेने होते.  आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा “हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ ह्या प्रार्थनेने झाली. सगळ्यांनी मिळून प्रार्थना म्हणताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. 

वाईटातून चांगले निष्पन्न होते असे म्हणतात, आमची शाळा ही त्याचे उत्तम उदाहरण आहे. करोनाच्या हल्ल्याने ऑनलाईन शाळा हा पर्याय जगाला मिळाला आणि मराठी प्रतिष्ठान बेंगळूरुने त्याचा उपयोग मायबोली संवर्धनासाठी करायचा ठरविले आणि “ओळख मायबोलीची ” ह्या संकल्पनेचा जन्म झाला. जरी कल्पना सुचली तरी ती अंमलात आणणे कठीण होते. शिकविणार कोण? अभ्यासक्रम काय असावा? ह्या बद्दल काहीच माहिती पदाधिकाऱ्यांना नव्हती. 

मग सोशल मिडीयाचा उपयोग करून ‘शाळा सुरू करीत आहोत.’ असा संदेश पोस्ट केला आणि म्हणतात ना चांगल्या कामाला देव मदत करतो, त्याप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थी दोन्हीचा उत्तम प्रतिसाद मिळाला. शिक्षक म्हणून ज्यांनी होकार दर्शविला, ते पेशाने शिक्षक नव्हते तर हौसेने शिकवायला तयार होते. सगळे शून्यातून सुरु करायचे होते.  शिक्षकांनी वारंवार मिटिंग घेऊन अभ्यासक्रम तयार केला. लॉकडाऊन असल्याने हाती असलेल्या साहित्यातून शिकवायचे होते. सगळ्या दृष्टीने विचार करून, गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधून ५ जुलै २०२० ला “ओळख मायबोलीची” ही ऑनलाईन मराठी शाळा सुरू झाली. पहिल्या पर्वात जपान आणि अमेरिकेतून विद्यार्थी दाखल झालेले पाहून आपल्या भाषेची ओढ काय असते, ह्याची जाणीव झाली. तीन महिने शाळा चालवून बघू असा विचार करणारे आयोजक आणि शिक्षक शाळा सुरूच ठेवू , ह्या निर्णयापर्यंत येऊन पोहचले. 

भाषेबरोबरच आपले सणवार, संस्कृती, गाणी गोष्टी, श्लोक ह्यामध्ये मुले रमत होती. 

महाराष्ट्र दिन, मराठी भाषा गौरव दिन, पंढरीची वारी, १५ऑगस्ट, २६ जानेवारी, आणखी बरेच काही ……सगळे ऑनलाईन साजरे केले. दरम्यान बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी घेतल्या जाणाऱ्या मराठी निबंध स्पर्धा आणि मराठी भाषा, संस्कृती ज्ञान परीक्षा ह्या  जागतिक पातळीवर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेविषयी माहिती मिळाली आणि आम्ही विद्यार्थ्यांना ह्या संधीचा लाभ मिळवून द्यायचे ठरविले. ह्या दोन्ही परीक्षा वयोगटानुसार घेतल्या जातात. प्रत्येक वयोगटातील पहिल्या पाच क्रमांकाना रोख पारितोषिक देण्यात येते. सर्व सहभागींना प्रशस्तीपत्रक देण्यात येते. ऑक्टोबर २०२१ पासून मराठी प्रतिष्ठान हे बेंगळूरु मधील केंद्र सुरू झाले. मागच्या वर्षी २५ मुले परिचय (पहिली परीक्षा ) परीक्षेला बसली. त्यापैकी विहान जगताप ह्याला जागतिक पातळीवर दुसरे आणि ओवी शिंदे हिला जागतिक पातळीवर उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. 

तसेच १२ स्पर्धकांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला. 

ह्या वर्षी १३ मुलांनी प्राज्ञ (दुसरी परीक्षा)  आणि एका मुलीने परिचय ही परीक्षा दिली.

परीक्षेची तयारी ओळख मायबोली तर्फे करून घेतली. 

ह्या परिक्षेमुळे “सुलभ भारती” ही महाराष्ट्र शासनाची पुस्तके समजली. पुस्तक समोर असेल की मुले जास्त रमतात, हे लक्षात आल्याने पाचव्या पर्वापासून वयोगटानुसार पुस्तके नेमायची असे ठरविण्यात आले. शाळा निःशुल्क असल्याने पुस्तके  पालकांना घ्यायला सांगायची असे ठरले. पण बेंगळुरूमध्ये मराठी पुस्तके, ती सुद्धा शासनाची मिळणे अशक्यच होते. त्यामुळे पुस्तके पुण्याहून मागवून ती उद्घाटनदिवशी सशुल्क द्यायची असे ठरले. पण चांगल्या उपक्रमात आपलाही सहभाग असावा म्हणून श्रीधर धावड यांनी सगळी पुस्तके त्यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना भेट दिली. 

समारंभानंतर मुलांना पुस्तकं वितरीत करण्यात आली. नवीन कोरं पुस्तक ते ही मातृभाषेचे….मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  

शाळा ऑनलाईन असल्याने शिक्षक आणि विद्यार्थी यांची प्रत्यक्ष भेट झालीच नव्हती. पाचव्या पर्वाच्या निमित्ताने सगळे एकत्र जमले होते. मुलांच्या चिवचिवाटाने सभागृह भरून गेले होते. 

आजपर्यंत जवळ जवळ ४५० मुलांनी ह्या शाळेचा लाभ घेतला आहे. बेंगळूरु मधील मुलांबरोबरच पुणे, हैदराबाद, जपान, सौदी, स्पेन, लंडन आणि अमेरिकेतून मुले सहभागी झाली आहेत. मराठीचे आपल्या मायबोलीचे भविष्य उज्ज्वल आहे, ह्याची खातरी वाटत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *