कर्म फळ

–मनिषा जोशी —

|| जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर||

हे गाणे आपणा सर्वांना खूप चांगले माहिती आहे. त्याचा अर्थही आपल्याला माहित आहे आणि रोजच्या जीवनातही आपण हे मानतो की जो जसे कर्म करतो त्याला तसेच फळ मिळते. चांगले कर्म करणाऱ्याला चांगले फळ मिळते. दुसऱ्याचे वाईट करणाऱ्याला किंवा वाईट कर्म करणाऱ्याला वाईट फळ मिळते. कर्माची सूत्रे अतिशय गहन असतात. आपण केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ हे आपल्याला लगेचच मिळत नसते .पण आज ना उद्या आपली चांगली किंवा वाईट कर्म आपल्यासमोर फिरून उभी राहतात…. 

कोणास दिलेला अथवा घेतलेला एक रुपयासुद्धा चुकविण्यासाठी पुढील जन्म घ्यावा लागतो, म्हणून शक्यतो कोणाचेही ऋण आपल्यावर ठेवू नये. आपली ही सत्कर्मे किंवा दुष्कर्मेच पुढे संचितरुपाने आपले प्रारब्ध ठरत जातात.

आपल्या चांगल्या वाईट कर्मांपासून आपली सूटका कधीही नसते, म्हणून हातून घडणारे प्रत्येक कर्म जागृतपणे, परमेश्वराला समर्पित, स्वार्थविरहित, मनास पटणारे, सत्याच्या आधारावर असलेलेच करावे. मनाविरुद्ध वाईट कर्म करु नये किंवा केवळ जगाला दाखवायला, वाहवा मिळविण्यासाठीही दिखावा करणारी 

कर्म करु नये . ह्रदय साथ देत नसलेले कोणतेही कर्म कधीही करु नये ते यासाठी कि हीच कर्मे तुमचे प्रारब्ध बनत जातात. आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा प्रत्येक जीवाशी या जन्मात घडलेली इथली भेट ही आपल्या कर्माचा हिशोब पुर्ण करण्यासाठी झालेली असते. कधीकधी आयुष्यात येणारी चांगली किंवा वाईट माणसे आपल्या मागील आयुष्यातील आपण केलेल्या कर्माचे फळ देण्यासाठी येतात .आपल्या प्रत्येक जन्मातील चांगली किंवा वाईट कर्मे संचित रूपाने प्रत्येक जन्मात आपल्या समोर येतात. त्यामुळे चांगले कर्म करणे आणि वाईट कर्मा पासून मुक्ती मिळवण्यासाठी सद्गुरूंची शिकवण लक्षात ठेऊन सन्मार्गावर चालणेच योग्य.. 

ऋणानुबंधाशिवाय एखादे रोपही आपल्या अंगणात फुलत नाही. कित्येक जन्मांत प्रत्येक जीवाशी होत असलेला ऋणानुबंध पुनःपुनः भेटी घडवण्यास कारणीभूत ठरत असतो.

पण गुरुकृपा असेल तर मन चांगल्या किंवा वाईट कर्माप्रती जागृत होत जाते. म्हणून एकदा गुरु आयुष्यात आल्यानंतर विवेकी जीव सहसा वाईट विचार व वाईट कर्मांच्या जवळ भरकटत नाही. उलट सगळी सद्विवेक बुद्धि ज्याच्या अंकित आहे अशा सद्गुरुंना संपूर्णतः शरण जातो…. 

आणि सत्कर्म करण्याचे मार्गदर्शन गुरु करतात ते आपण मनोभावे ग्रहण करतो. 

आणि मग सत्कर्मांची वाढ झाली की आपल्या नित्य जवळच असलेले गुरुतत्त्वं अनुभवास यायला सुरूवात होते. आपले गुरु जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात! पण आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं. 

एकदा सद्गुरुंचा अनुग्रह प्राप्त झाला, की आपण आपल्या प्रत्येक कर्मास सद्गुरुस अर्पण करावयास शिकतो. मी जे करतोय ते कोणती तरी शक्ती माझ्याकडून करवून घेतेय ही विनम्रता अंगी रुजते आणि मग अर्थातच कर्तेपणाचा अहंकार गळून पडल्याने हातून घडणारे प्रत्येक कर्म घडून कर्मबंधनातून हळुहळू मुक्त होण्यास आरंभ होतो. गुरुतत्व जवळ असल्याने आपल्याकडून वाईट कर्म घडू नये हा प्रयत्न आपोआप होऊ लागतो. 

म्हणूनच सद्गुरुकृपेचे महत्त्वं अनन्य साधारण आहे. 

तरी माणसाचे प्रारब्धभोग टळत नाहीत, गुरुकृपेने सौम्य प्रकारचे प्रारब्ध टळू शकते, पण तीव्र प्रारब्धकर्म भोगावेच लागते. 

गुरु ते सोसण्यासाठी बळ देतात. कठिण काळात देखील शिष्याच्या मुखावर प्रसन्नता आणि आत्मिक समाधान कमी होऊ देत नाहीत. भिंतीवर मारलेला चेंडू जसा परत आपल्याजवळ येणारच तसेच आपले 

चांगले – वाईट कर्म फिरुन येणारच, 

फक्त त्यांची , त्या कर्मांची आपल्यावर येऊन आपटण्याची तीव्रता गुरुकृपेने कमी होते. 

गुरुं ची कृपा सर्वांवर एकसारखी असते पण ज्याची जशी चित्तशुध्दी असेल तशी त्याला

 ती कळते आणि आपली कर्म फळे आपल्याला मिळणार ह्याचा बोध होतो… 

||राम राम||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *