सनविवि ललित,साहित्योन्मेष उन्हाळ्याची सुट्टी आणि कुल्फी (सुट्टीची खादाडी)

उन्हाळ्याची सुट्टी आणि कुल्फी (सुट्टीची खादाडी)

वैशाली चौधरी —

परवा शनिवार होता. सुट्टीचा दिवस, म्हणून मग दुपारी काही कामानिमित्त मी घराबाहेर पडले. तशी दुचाकी घेऊन एकटीच बाहेर पडण्याची संधी आजकाल मला क्वचितच मिळते. काम संपवून घराच्या दिशेने मी निघाले. भर दुपारची वेळ, साधारण २ वाजले असावेत. सूर्यनारायण फारच तापलेले दिसत होते. कधी एकदा घरी पोहोचून मी फ्रिजमधील पाण्याची बाटली घेऊन, पंख्याखाली बसेन अशी माझी अवस्था झाली होती. तोच माझी नजर एका दुकानावर गेली – “बॉम्बे कुल्फी”. मनात एक विचार आला. मी लगेचच गाडीला ब्रेक लावला आणि गाडी त्या दुकानाकडे वळवली. तशी मी अजिबातच कुल्फी प्रेमी नाही. पण त्या दिवशी का कुणास ठाऊक, ज्यूस, आईस्क्रीम पेक्षा ती बॉम्बे कुल्फी खाण्याची मला तीव्र इच्छा झाली. दुकानात शिरताच, कुल्फीमध्ये पण असंख्य प्रकार असतात हे समजले. उन्हाळ्यात गुलकंद खाणे चांगले असते, शरीरातील उष्णता कमी होते, म्हणून मग मी कुल्फीवाले भैय्याला, “१ गुलकंद कुल्फी” अशी ऑर्डर दिली. कुल्फी हातात आली, तोच माझा फोन वाजला, “मातोश्री कॉलिंग” असे दिसले. एका हातात कुल्फी आणि दुसऱ्या हातात मातोश्री विडिओ कॉल वर. माझ्या आईला आम्ही मुले काहीतरी खाताना पहिले कि, किती अत्यानंद होतो म्हणून सांगू. तसे प्रत्येक आईला आनंद होतो पण माझ्या आईला थोडा जास्तच होतो असे म्हणायला काही हरकत नाही. कुल्फीचा आस्वाद घेत आम्हा मायलेकींच्या गप्पा रंगल्या. अर्थात कुल्फीचा आस्वाद फक्त मी घेत होते, पण मला तसे खाताना पाहून माझ्या आईला सुद्धा ती कुल्फी खात असल्याचा आस्वाद घेत असावी असेच कुणालाही वाटले असते, इतका आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. असो. तर मग अशा प्रकारे त्या दिवशी मी माझी कुल्फी संपवून आईचा फोन ठेवून आणि माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांसाठी (यात माझे पतिदेवही आहेत कारण असे पदार्थ खाण्याच्या बाबतीत ते काही लहान मुलांपेक्षा कमी नाहीत.) पार्सल घेतले. गाडी सुरु केली आणि घराच्या दिशेने निघाले. गाडी पुढे पुढे जात होती पण का कुणास ठाऊक, माझे मन मात्र भुर्रकन बरीच वर्षे मागे गेले, अगदी माझ्या लहानपणी.

वार्षिक परीक्षा संपली कि उन्हाळ्याची सुट्टी सुरु व्हायची. मग काय, अगदी आनंदी आनंद गडे! आम्ही सगळी मुले मुली दिवसभर खेळातच असायचो. दुपारच्या वेळेस खूप जास्त ऊन पडले कि आई घरी बोलवायची. जेवण करून  , सुस्त होऊन आम्ही पंख्याखाली लोळत पडणार तोच “टनटनटनटन” असा आवाज यायचा….

आमच्या कॉलनीत गाडा घेऊन घंटी वाजवत एक कुल्फी वाला यायचा. आमची जेवण संपवायची आणि त्याची यायची वेळ एकाच. त्यामुळे आम्हाला जेवणानंतर आपोआपच थंडगार, गोड, स्वादिष्ट अशी कुल्फी खायला मिळायची. उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवसच असे होते.  बाबा कधी शहाळे घेऊन यायचे, कधी रसाळ फणस, कधी  टरबूज तर कधी मोठं मोठी आतून लालभडक अशी कलिंगडे. आणि त्यानंतर आपला फळांचा राजा आहेच, “आंबा”, त्याच्याशिवाय तर आपली उन्हाळ्याची सुट्टी जणू अपूर्णच आहे. कधी दुपारच्या वेळेस बाहेर पडावे लागले तर कॉलेज कोपऱ्यावरच्या दुकानात जाऊन, उसाचा रस, कधी दूध कोल्ड्रिंक, कोल्ड कॉफी तर कधी ड्राय फ्रुट्स घालून केलेली दाट लस्सी पिल्याशिवाय तहानच भागत नसे. 

आता या सगळ्यांमध्ये, आपल्या खास उन्हाळ्यात केले जाणार साल पापड, शेवया, कुरवड्या, साबुदाणा पापड, बटाटा चिप्स हे सगळे मी कसे विसरेन बरे?? या वेगवेगळ्या पापडांशिवाय का आपले जेवण पूर्ण होत असे??

अजून काय काय आपण उन्हाळ्यात खात असू बरे, या विचारात माझी गाडी दारात पोचली. पण कुल्फी खाल्ल्यापासून ते घरी पोचेपर्यंतच्या या प्रवासात आपली उन्हाळ्याची सुट्टी कशी खादाडी सुट्टी होती कि सुट्टीची खादाडी होती, याचा मला पुरेपूर प्रत्यय आला. चला मग, तुम्ही पण खाल ना या उन्हाळ्यात बॉम्बे कुल्फी? नक्की खा, आणि तुमच्या पण अशा काही आठवणी ताज्या करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *