कलाटणी

—पुरुदत्त रत्नाकर—

“आपल्या सनविवि वाहिनीवरच्या ‘कलाटणी’ या कार्यक्रमात आपल्याशी बोलणार आहेत नुकतेच सहस्त्र चंद्रदर्शन केलेले, उत्तुंग व्यक्तिमत्वाचे सामाजिक कार्यकर्ते श्री. जगत्पाळ चेट्टिचौधरी उर्फ जेसीसी आणि आयुष्याच्या हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेले प्रसिद्ध पत्रकार श्री. रघुत्तम मालशे. दोघांचं मी मनापासून स्वागत करतो.” सूत्रसंचालक म्हणून मी स्वागत केलं आणि पुढे बोलू लागलो.

“या कार्यक्रमात आपण पाहुण्यांच्या आयुष्याला कलाटणी देणार्‍या प्रसंगाविषयी जाणून घेत असतो. मूळचे कोट्यधीश हिरेव्यापारी जगत्पाळ चेट्टिचौधरी; नंतर ३ दशकं भूमिगत नक्षलवादी नेता जेसीसी आणि आता सामाजिक कार्याचा महामेरू; हा जगत्पाळजींचा प्रवास रोमांचक आहे. हिंसक नक्षलचळवळीने २५-३० वर्षं अनेक नेते, शासकीय अधिकारी, पत्रकार, पोलिस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना यमसदनी पाठवलं. मग जगत्पाळजी सरकारशी तह करून हिंसक चळवळ थांबवून मुख्य प्रवाहात सामील झाले आणि आता वनवासी, आदिवासींसाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगार योजनांमध्ये त्यांनी स्वतःला श्री. मालशेंसह झोकून दिलं आहे. जगत्पाळजी, ही स्थित्यंतरं अचानक होत नसतात. तरीही तुमच्या आयुष्याला ही कलाटणी मिळायला कारणीभूत ठरलेली एक घटना सांगायची तर कोणती सांगाल? आमचे प्रेक्षक त्याचं सविस्तर वर्णन ऐकायला उत्सुक आहेत.” 

“नमस्कार. तुम्ही म्हणालात त्यात तथ्य आहे. आयुष्याला कलाटणी मिळायला अनेक घटना, माणसं, विचार कारणीभूत ठरतात. मला वाल्याचा वाल्मिकी बनवायला कारणीभूत अशी एक घटना निवडायची तर ती म्हणजे मी रघुत्तम मालशेंना दिलेलं जीवदान.” सगळे कान देऊन ऐकत होते. 

“बीजापुर, गडचिरोली ते दिंडोरी पर्यन्तचा प्रदेश माझ्या प्रभावाखाली होता. या परिसरातल्या ५५० गाव, पाडे, वस्त्यांमध्ये खुटुक झालं तरी मला जंगलात खबर मिळत होती. शासन, प्रशासनाला माझा ठावठिकाणा नव्हता. कसा असणार? माझी सम्मती नसेल तर नेमणूक झालेला अधिकारी त्या प्रदेशात रुजुच होत नसे आणि रुजू झालेला अधिकारी माझ्या शब्दाबाहेर नसे.” चेट्टिचौधरींच्या आवाजात जरब जाणवत होती. समोर बसलेले कोणीही श्रोते हूं की चू करत नव्हते. दूरचित्रवाणी वाहिनीवर पाहणार्‍यांचीही गत वेगळी नसावी.

“अशा परस्थितीत माझा माग काढायला सरकारने ८ वेगवेगळ्या गावांमद्धे ८ पत्रकार पेरले. ते हळूहळू माझ्यापर्यन्त पोहोचायचा प्रयत्न करणार. त्यांच्यातल्या कोणामार्फत माझ्या ठिकाणाची खबर सैन्यदलांना मिळाली की ते माझं काम तमाम करणार; असा डाव होता. पण अशा दुर्गम भागात येणारी प्रत्येक आगंतुक व्यक्ति सहज कळून येते हे ते विसरले. अशा व्यक्ति आल्याक्षणापासून माझ्या माणसांच्या नजरेत असायच्या. त्यांच्या हेतूची खात्री झाली की धरपकड व्हायची.”

त्यांनी आवंढा गिळला आणि  मी त्यांना प्यायला पाणी दिलं.  “मग तुम्ही या आठ पत्रकारांना पकडलं…” 

“हो. माझ्या माणसांनी त्यांना पकडून, डोळे बांधून जंगलात आणलं. त्यांना मला, म्हणजे जेसीसीला भेटायचं होतं. तेव्हा त्यातल्या कोणालाच जेसीसी म्हणजेच जगत्पाळ चेट्टिचौधरी हे माहिती नव्हतं. कारण जगाच्या दृष्टीने जगत्पाळ २० वर्षांपूर्वीच मेला होता! माझी एक पद्धत होती. वेशांतर करून, एक साधा गटप्रमुख म्हणून, माझीच भेट घालून द्यायसाठी, मी मला भेटायच्या इच्छेने आलेल्या लोकांबरोबर काही दिवस घालवत असे. या आठ जणांबरोबर मी तीन दिवस घालवले. आम्ही सतत जागा बदलत असू. तीन दिवस यांना अन्नपाण्यापासून वंचित ठेवलेलं होतं. ही सरकारी माणसं आहेत अशी मला खात्री झाल्यावर मी त्यांना मारण्याचा निर्णय घेतला.” श्रोते, प्रेक्षकांचा श्वास अडकला.

“त्या परिस्थितीत तहान-भूक भागणं हीच इच्छा असणार म्हणून ती शेवटची मानून मी अशा सरकारी बांडगुळांना भरपूर खाऊ-पिऊ  घालून मग अंतिम आदेश देत असे. या ८ जणांची जेवणं वाढून मी सगळ्यांच्या डोळ्यावरच्या पट्ट्या काढल्या आणि ते रांगेने जेवायच्या जागेकडे निघाले. त्यात हे मालशे सहाव्या क्रमांकावर होते. माझ्या समोरून जातांना ते ‘अन्नदाता सुखी भव’ असं पुटपुटले आणि माझ्या पाया पडले.” श्रोते अवाक झाले होते.

“या प्रसंगाने मी द्रवलो. त्यांनी केला म्हणून त्यांच्या मागच्या दोघांनीही नमस्कार केला. त्यांची जेवणं झाल्यावर काही वेळाने माझ्या सहकार्‍यांनी पहिल्या ५ लोकांना यमसदनी धाडलं. शेवटच्या दोघांनी जुलमाचा का होईना रामराम केला म्हणून त्यांना परत या भागात न फिरकण्याच्या अटीवर जंगलाबाहेर सोडून दिलं आणि स्वतः मरणाच्या दारात असतांना मारणार्‍याच्या सुखाची कामना करणार्‍या मालशेंना त्यांना हवी असलेली मुलाखत घ्यायसाठी ठेवून घेतलं.”

“मालशेसाहेब, वेशांतर करून समोर असलेलेच  टोळीप्रमुख जेसीसी आहेत हे तुम्हाला कळलं होतं का?”

“नाही. बिलकुल नाही. ते मला काही महिन्यांनी आमच्या ५-६ भेटींनंतर कळलं.”

“तुम्ही ते वाक्य का म्हणालात? वैयक्तिक जीवनदान मिळवण्याच्या आशेने तुम्ही हा प्रयत्न केलात का? हे फसलं असतं तर तुमची पुढची योजना काय होती?”

“मुलाखतीऐवजी जाहीर चौकशी लावली आहे असं वाटतंय.” चेट्टीचौधरींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. 

“असो. … अनेक कुटुंबांमध्ये प्रत्येक अन्नग्रहणावेळी ‘अन्नदाता सुखी भव’ असं म्हणायची प्रथा असते. माझे उद्गार कोणत्या योजनेचा भाग नव्हते. मी मनापासून प्रार्थना केली म्हणून न फसता सफल झाली असावी. डोळ्यावरची पट्टी सोडल्यावर समोर दिसणारा माणूस जेवू घालणार होता. सलग ३ दिवस उपास घडल्यावर अन्नदात्याबद्दल कृतज्ञता वाटण्यात काही गैर आहे का? तुम्हीच सांगा. ते २०-२५ वर्षं ज्येष्ठ दिसत होते, म्हणून मी आईवडिलांना स्मरून त्यांच्या पायाही पडलो.”

“माझ्या प्रश्नाने आपण दुखावले गेलात. मला माफ करा. …जगत्पाळजी, मालशेंना जीवदान मिळालं खरं, पण तुमच्या आयुष्याला या प्रसंगामुळे कशी कलाटणी मिळाली?”

“मी मालशेंना माझ्या तळावर घेऊन गेलो. त्यांना अनेक अटी घातल्या. माझा ठावठिकाणा, सुगावा ते सरकारला सांगणार नाहीत असं वचन घेतलं आणि त्यांना मुलाखत दिली. कालपरत्वे माझा त्यांच्यावर विश्वास दृढ झाला. ते, सरकार आणि माझ्यामधलं माध्यम बनले. सरकारने माझ्यावर हिरेव्यवसायात करचुकवेगिरीचा खोटा आळ घेतला हे तात्कालिक कारण असलं तरीही खरं तर वनवासी, आदिवासींप्रती सरकारी अनास्था पाहवत नव्हती म्हणून मी त्या चळवळीत सामील झालो होतो. पण आता माझा बहुतेक वेळ आणि संपत्ति स्वसंरक्षणात खर्च होत होती. उत्थानाचं मूळ उद्दीष्ट कधीच मागे पडलं होतं. आदिवासी आधी जगत तरी होते; आता दोन्हीकडली प्राणहानी होते, हे मालशेंनी मला  हळूहळू पटवलं. जवळपास ८-१० वर्षं आमची वैचारिक देवाणघेवाण चालू होती. व्यवस्थेविरुद्ध लढण्यापेक्षा माझ्या सर्व क्षमता वापरत व्यवस्थेत सामील झाल्यावर उद्दीष्ट साध्य होण्याची शक्यता जास्त आहे; हे मला पटलं आणि मी न्यायव्यवस्थेला शरण गेलो. मला मामुली शिक्षा देऊन अभय देण्यात आलं. … आता उभा राहिलेला कामाचा डोंगर तुम्ही बघता आहातच. हे सगळं मालशेंमुळे, त्यांच्या कृतज्ञतेमुळेच शक्य झालं.”

“तर प्रेक्षकहो श्री. रघुत्तम मालशे यांच्या ‘अन्नदाता सुखी भव’ या प्रार्थनेमध्ये खरोखरच ताकद होती. त्या शब्दांनी जेसीसींमधल्या जगत्पाळ चेट्टीचौधरींचा पुनर्जन्म झाला, मालशे आणि आणखी दोघांना जीवदान मिळालं आणि हिंसक चळवळ बंद पडून त्या प्रदेशातल्या शेकडो आदिवासींच्या जीवनाला कलाटणी मिळाली. शेती शिकून ते आता आपले अन्नदाते बनले आहेत, स्वतःही सुखी होत आहेत. आपण श्री. मालशे आणि श्री. चेट्टीचौधरी यांचं अभिनंदन करूया आणि त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करूया. मालशेंप्रमाणेच आपणही सभोवतालाबद्दल कृतज्ञ होऊ या. आजची ‘कलाटणी’ तुम्हाला कशी वाटली ते आमच्या सनविवि वाहिनीला जरूर कळवा आणि पुढच्या ‘कलाटणी’साठी सज्ज रहा. तोपर्यंत मी पुरुदत्त रत्नाकर आपला निरोप घेतो. नमस्कार!”   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *