— निवेदिता शिरवटकर —
वेळ सकाळची . रोजच्या विरारहून चर्चगेटसाठी सुटणाऱ्या ६.३० च्या लोकलची वाट पा हत होते. मीनल धापा टाकत प्लॅटफॉर्मवर आली आणि नेहमी प्रमाणे माझ्या कानापाशी किंचाळली ,
” ए नि वेss … उद्याच्या इव्हेंटचे प्लॅनिंग अभिला मेल केलेस ? “
” हो s ग!…चील! केलं केव्हाच.”
मी देखील सवयीने जोरात ओरडले. ऑफिसची वेळ असल्यामुळे वसई स्टेंशनवर चाकरमान्यांची ही तोबा गर्दी ! त्या मुळे लोकल सुटायला काही मिनिटांचा अवकाश असताना आपोआपच अंगात संचारते.
मुंबईची ‘ लाईफ लाईन ‘ म्हणजे आमची लोकल पुरणपोळीत गोडाचे सारण जसे ठासून भरावे तसे माणसांच्या झुंडीच्या झुंडी डब्यात कोंबून अविरत धावत असते आणि खूप काही शिकवून जाते.
उगा नाही मुंबईला नाव मिळाले आहे ‘ कधीही न झोपणारे शहर ‘ म्हणून ! ….आमची मुंबई स्वतः न झोपता तिच्या लाखो लेकरांच्या डोळ्यात मात्र किती तरी स्वप्ने रंगवते.
मी सुद्धा एक ‘ टीपिकल मुंबईकर ‘ बरका ! त्याच धकाधकीत वाढले. सतत एक नजर घड्याळ्याच्या काट्यावर अन् डोक्यात मिनिटा मिनिटांचा हिशोब.
पण तरीही ते धावत, पळत, धडपडणारे आयुष्य खूप आवडायचं मला . अजूनही
आठवतं जेव्हा पहिल्यांदा वसईसारख्या उपनगरातून मुंबईकडे झेपावणाऱ्या ‘ विरार लोकलच ‘ दर्शन झालं.
स्टेशनवर येणारी प्रत्येक लोकल ही नऊ महिन्याच्या गरोदर बाईप्रमाणे टच्च ! त्यात किमान चार पाच जण प्रत्येक डब्यातून लोंबकळत प्रवास करणारे ! …..
म्हणजे रोजचेच द्वंद्व ….’ कसा काय टिकाव लागायचा आपला ? ‘ विचार करून धडकी भरली होती .
निव्वळ एक बोट व एका पावलाचा आधार अन् ‘आपण चिरंजीवी आहोत ‘ अशी अपार श्रद्धा ठेवून रोज जीवावर उदारहोणारे पाहायला मिळत होते.
अर्थात काही जण नाईलाजा स्तव तर काही हौस म्हणून ! सुरुवातीला त्यांचे शौर्य पाहून उर भरून येत असे. आपण मात्रअसा निष्काळजीपणा करायचा नाही असं बजावायची स्वतःला .
पण म्हणतात ना ! . …’पाण्या त पडल्या वर पोहता येतं’ तसं ‘ विरार लोकलमध्ये शिरल्यावर लटकता येत ‘ ह्या म्हणी चा उगम तर केव्हाच झाला होता अन् मी ती म्हण लवकरच सार्थ केली .
विशेषतः एकमेकांना धरून दरवाजात लटकणाऱ्या बा यकांचे मेकअप आणि ब्रँडेड कपडे पाहून त्यांच्या धाडसचे भारी कौतुक वाटू लागले. अन् मग काय ! विरार लोकलच्या डब्यात पहिले पाऊल टाकले आणि पुढील काही वर्षे त्या सर्व शूरवीरांच्या परंपरा चालू ठेवण्यास हातभार लावला .
तुडुंब भरलेल्या डब्यात आपले कपडे…..विशेष करून ओढणी ( गर्दीत गळफास लागू नये म्हणून ),
पर्स ( स्टेशन येईस्तोवर तिने साथ द्यावी म्हणून ), वेणी ( नवऱ्याशी सकाळी सकाळी भांडून निघालेल्या बा ईने रागाने खेचू नये म्हणून ) सावरत आवरत हळूच गर्दीतून आपले शरीर कसेतरी निसटवत डब्यात शिरण्याचे कसब अंगीकारले. लवकरच आपण कोणी लवचिक शरीराची कसलेली जिमनॅस्ट असल्याची भावना बळावली .
पुढचे ध्येय म्हणजे म्हणजे ‘ चौथी सीट ‘ पटका वणे….
आता ही ‘ चौथी सीट ‘ म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल .
तीन जणी बसू शकतील अश्या सीटवर आपल्या पायाचा आधार घेऊन पार्श्वभागाला जेमतेम टेकवणे म्हणजे ‘चौथी सीट’ होय! त्यासाठी तुमच्या पायाचे स्नायू अतिशय मजबूत पाहिजेत . …..
विरार लोकलचा प्रवास ज्याने केला त्याचे शरीर आणि मन दोन्ही चांगलेच खंबीर होतात असा सर्वसाधारण समज आहे.
डब्यातले आतले काही नियम आहेत की जे त्याला कारणीभूत आहेत. प्रत्येक प्रवाश्याला ते नियम आपसुकच लागू पडतात. त्या अधोरेखित नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे मोठे धाडसाचे काम !
उदाहरणा र्थ ….
१.पाहिले स्टेशन म्हणजे जिथून विरार लोकल सुरू होते तिथे रिकाम्या डब्यात शिरल्यावर चपळाईने अन् चतुराईने संगीतखुर्चीचा खेळ खेळून सीट पकडणे.
२.शक्य असल्यास प्रतिस्पर्ध्यांना ढकलून पुढे जाण्याची कला अवगत असली पाहिजे.
३.सर्व जागा भरल्यावर ज्यांना सीट मिळाली नाही आहे अश्या अभागी बायकांनी ‘सीटसाठी नंबर लावणे.
४. ‘ को णत्या स्टेशनवर उतरणार’ हे बसलेल्यांना वि चारण्याचा त्या बायकांना ‘जन्मसिद्ध अधिकार ‘ आहे. त्यासाठी त्यांनी कितीही भांडावून सोडले तरी चेहऱ्यावर राग न दाखवता योग्य उत्तर अपेक्षित.
५. प्रश्नोत्तरे जर चुकली आणि त्यामुळे कोणाची सीट हुकली तर ज्या व्यक्तीला कधी आयुष्यात पाहिले नाही आणि कदाचित पुन्हा भेटण्याचा योग शक्य नाही अश्या व्यक्तीकडून आपल्या आप्तस्वकियांचा उद्धार स्वि कारण्याची मानसिक तयारी असावी .
६.कधी कधी डब्यात परिस्थि ती एवढी आव्हानात्मक होऊ शकते की ‘ तुमचे ‘ हात किंवा पाय ‘ तुमचे ‘ राहत नाहीत. ते त्या गर्दीत साखर जशी पाकात विरघळते तसे विरघळून जातात. त्यांची जाणीव होत असते …पण तुमच्या मेंदूने दिलेले सर्व आदेश धुडकावून ते असतील त्या जागी राहून निमूटपणे तुमच्यासोबत प्रवास करतात.७. जर वेदना होत असतील तर तुम्ही नजरेने आक्षेप दाखवू शकता . चेहऱ्यावरील सात्विक भावाचे रूपांतर तामसी भावात क्षणार्धात करता आले तर उत्तम !
८.जर कंठस्थ ध्वनीचा वापर करायचा असेल तर समोर ठाकलेल्या प्रतिस्पर्ध्याला तोंड देण्यास तयार राहावे. सौम्य, तीव्र किंवा कधी कधी कर्कश्य अश्या आवाजात वाद प्रतिवाद करता आले पाहिजेत.
९. एकदा रणांगणात उतरलो की युद्ध टाळणे अशक्य !
त्यासाठी मुंबईची खास भाषा वापरणे आवश्यक. आपली काहीही चूक नाही हे डब्याती ल प्रत्येक बाईला पटवून देण्याची ताकद आपल्या युक्तिवादात असली पाहिजे.
१०. वादाचा मूळ उद्देश बसायला जागा मिळवणे, शरीराला बसलेला पिळ सोडवणे, स्वतःच्या ‘ दोन ‘ पायांचा वापर करून उभे राहणे किंवा दुसऱ्याचा आधार ना घेता ‘ एका ‘ पायावर उभे राहणे हा नाहीच आहे मुळी !
वादाचा मूळ उद्देश प्रतिस्पर्ध्यांचे मानसिक संतुलन बिघडवणे हा आहे.
तर एकदा अश्याच एका सामन्यात एकीचा ताबा सुटला आणि ‘ तेरा पाव तोडके हात मे दे दूंगी ‘ ची जागा ‘ तेरा हात तोडके पाव मे दे दूँगी ‘ ने घेतली . एक सेकंद पूर्ण डब्यात निरव शांतता पसरली आणि दुसऱ्या क्षणी एकच हश्या पिकला !
त्या मुलीला कळेना काय झा ले… ती काही क्षण भांबावली ….पण तरीही शस्त्रे न टाकता तिने युद्ध तसेच निधड्या छातीने पुढे चालू ठेवले.
अशी अनेक युद्धे पहिली . काही अनुभवली सुद्धा .
आजचा दिवस मात्र थोडा वेगळा होता .
रोजच्या प्रमणे मी आणि माझ्या लोकलच्या सख्या डब्यात शिरलो . काही रोजचे चेहरे तर काही नवीन.
पण सर्व अगदी ताजेतवाने. सकाळची वेळ होती ना ! फर्स्ट क्लासचा डबा असल्याने गर्दी थोडी कमी होती . मी आणि माझ्या मैत्रिणी दाराशी उभे राहून गप्पात दंग झालो होतो .
लोकल सुटणार … एवढ्यात आतल्या सीटवर बसलेल्या बायकांचा एकच गलका सुरू झाला . एक बाई किंचाळली ,
” एs…ए चैन खीच ! जलदी से !! ‘
कळेना काय गडबड झाली . कोणी तरी चैन खेचली . गाडी स्टेशनवर थांबली . आतल्या सीटवरील बायकांनी आम्हाला खाली उतरवले. कारण का य ? हैराण व्हाल ऐकल्यावर … …
आत एक बाई चक्क एका जीवाला जन्म देत होती !
काही अनुभवी बायका आत थांबल्या . ही बातमी सर्व डब्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरली .
काही प्रवासी डब्यात बसून होते तर काही खाली प्लॅटफॉर्मवर उतरले….सुमारे अर्धा तास लोकल स्टेशनवर उभी होती .आज कदाचित कोणाला ऑफिसला पोहोचण्याची तेवढी घाई नव्हती . सर्वजण फक्त वाट पाहत होते ….
एका नव्या जीवाची … कोण कुठचा माहीत नाही !
आणि एकदाची अडलेली बाई सुटली ….घो षणा झाली ‘ मुलगी झाली हो ! ‘ …. आणि चक्क सर्व डब्यात अन् प्लॅटफॉर्मवर
उभ्या असलेल्या प्रवाशांनी टाळ्या वाजवत त्या बाळाचे स्वागत केले. रुग्णवाहिका तयारच होती . बाळ बाळंतिणीला
लागलीच सुखरूप इस्पितळात पोहचवण्यात आले. सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि आपला रोजचा प्रवास सुरू केला ….
त्या दिवशी पुन्हा एकदा मुंबईचा एक ‘ वेगळा चेहरा ‘ सर्वांना दिसला .
