छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभलेल्या महाराष्ट्राला गडकिल्ल्यांची मोठी देणगी मिळाली आहे. शिवकालीन किल्ले काळानुसार झालेली पडझड सोडल्यास आजही दिमाखात उभे आहेत. “किल्ला” हा मराठी माणसाचा जिव्हाळयाचा विषय आहे. दिवाळीत घरोघरी किल्ला तयार करण्याची परंपरा चालत आलेली दिसून येते. किल्ल्यांबद्दलची हीच परंपरा आणि आवड लक्षात घेऊन महाराष्ट्र मंडळ बेंगळुरू गेल्या काही वर्षांपासून किल्ले स्पर्धा आयोजित करत आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मंडळाला स्पर्धेसाठी उत्तम प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली होती आणि यात वयाची कुठलीही अट नव्हती. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून आणि बेंगळुरूमधून एकूण दहा स्पर्धक गटांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. सिंहगड, शिवनेरी, रामशेज किल्ला, विशाळगड, पन्हाळगड ह्यांच्यासह पावनखिंड, प्रतापगड, रोहिडा, सुधागड अशा विविध किल्ल्यांचे व्हिडीओ स्पर्धकांकडून पाठवण्यात आले. सर्वच किल्ल्यांच्या तयारीत लहान मुलांचाही सहभाग आढळून आला हे उल्लेखनीय आहे.
किल्ल्याची संकल्पना, किल्लेबांधणीसाठी वापरलेले साहित्य, किल्ल्याची विस्तारपूर्वक माहिती, किल्ल्याची दारे, बुरुज, तोफखाना ह्यासारख्या सर्वच गोष्टींचे बारकाव्याने केलेले सादरीकरण, किल्ल्याचे सौंदर्य आणि तयार केलेल्या किल्ल्याचा एकंदरीत प्रभाव ह्या बाबींच्या जोरावर कोल्हापूरच्या शिवतेज मित्रमंडळाच्या ‘ रोहिडा ‘ किल्ल्याने प्रथम येण्याचा मान पटकावला. द्वितीय क्रमांक कोल्हापूरच्याच संतोष सूर्यवंशी ह्यांच्या ‘ रामशेज ‘ किल्ल्याला मिळाला. बेंगळुरूच्या निखिल बेलमकर आणि संघ ह्यांनी सादर केलेल्या ‘ शिवनेरी ‘ किल्ल्याला तृतीय क्रमांक देण्यात आला. महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूतर्फे प्रथम विजेत्यास रोख रक्कम रु.२००० आणि चषक, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास रोख रक्कम रु. १५०० आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास रोख रक्कम रु. १२०० देऊन सन्मानित करण्यात आले. किल्ले स्पर्धा २०२२ च्या परिक्षणाची जबाबदारी मुंबईच्या श्री. प्रांजल वाघ आणि श्री. केतन कमलाकर चव्हाण ह्यांनी पार पाडली. स्पर्धेचे परीक्षण केल्याबद्दल मंडळातर्फे दोन्ही परीक्षकांचे आभार व्यक्त करण्यात आले.
ह्या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वच वयोगटातील लोकांना विशेषतः लहान मुलांना शिवछत्रपतींच्या उज्वल इतिहासाची गोडी लागेल आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या किल्ल्यांची माहिती कळेल. तसेच किल्ल्यांच्या रूपाने ऐतिहासिक स्थाने जतन करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल.
महत्वाची सूचना : किल्ले स्पर्धा २०२२ चे सगळे व्हिडीओ महाराष्ट्र मंडळाच्या यु ट्युब चॅनेलवर पाहायला मिळतील.
सौ. ऋचिता दवंडे.
