अभिप्राय: साहित्योन्मेष

–रसिका राजीव हिंगे, अकोला —

रूप वेगळे अन मनमोहक

झाला अतिरंजक सनविवी

लेखाचे शीर्षकच वाटे मेजवानी

किती वाचू आनंदे सारे मनभावी

     प्रथम दर्शनी पाहता जे जाणवले अन लगेच सुचले ते सांगितले. एकेक लेख  शांतपणे वाचत गेले अन आपण खरंच किती मोठी मजल मारली आहे ,हे लक्षात आले.

     नियमित सदरे तर अप्रतिमच, रणांगण कादंबरीचे परीक्षण वाचल्यावर पुन्हा नव्याने ह्या कादंबरीचे आकलन झाले. काव्यफुलें , रामदास स्वामींची शिकवण म्हणजे तर परिजातकाचा दरवळ भासावा इतके अप्रतिम शब्द. इथून पुढे वळसा घेतला तर नवे किरण प्रखर असले तरी आल्हादक वाटले, यावर श्रद्धा ठेवायला हवीच तरच काही पुण्य गाठी जमा होईल. अन शक्ती वाढेल. नाही का?  म्हणजे चित्तथरारक जपान वाचतांना मन स्थिर राहील. विनोदी शैलीत असले तरी थरारक आहेच न. पण चला यावेळी हवीहवीशी वाटत असली तरी ही थरथर थांबली असे वाटले अन पुढच्या पानावर चौसष्ट कलांचे दालन उघडले आणि त्यात पटविणे  ही कला. खरच आहे बरं ज्याला जमेल त्यालाच जमतं पटविणे. पटवतांना अंतर नको पडायला एकमेकात म्हणजे मिळविले. निसर्गाच्या सानिध्यात केलेली सहल असो की आपल्या आवडत्या हिरोचं वर्णन असो मन रंगून जातं वाचता वाचता. संवाद साधत केलं की आपोआपच माणुसकी पण जपली जाते. फास्ट फूड च्या या काळात स्वयंपाक करतांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल याची काही आशा नसते. येईल ते स्वीकारणे. मानस सरोवराच्या सहवासात गुजगोष्टी रंगायला लागतात पण मन किती वेडं न नको तेच करायला भाग पाडतं. आणि शिक्कामोर्तब करून वेगळं होतं.  दैवी शक्ती की चकवा याचा संभ्रमात थोडे डोकावून पाहिले तर शाळा दिसली राव. असं काही गुंतून पडले, तेव्हढ्यात “वसंत आला वसंत आला” असं कुणीतरी  तालासुरात सांगतंय का हा विचार आला अन कोण येणार असे कानात कुजबुज करायला असं वाटतच होत तर अरे ही दैवी शक्ती तर नसेल न बा? असा विचार आला अन हसून हसून पुरेवाट लागली, मूठभर मास चढलं अंगावर.

     सनविवी जर असेच इतके भव्य दिव्य अंक दर महिन्याला प्रकाशित करत राहिली तर नक्कीच  मी एखादी साहित्यिक वगैरे होऊ शकेल का?  एक साधा भाबडा प्रश्न!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *