सनविवि ललित,साहित्योन्मेष केवळ तुमच्यामुळे

केवळ तुमच्यामुळे

---वर्षा सबनीस---

 मी आजच्या युगातली स्त्री . शिकलेली. दहा हातांनी, घराबरोबरच बाहेराच्याही जगात आपली पावले रोवणारी, आत्मविश्वासाने आपली जागा बनवणारी .
            विधात्याने एका खास साच्यातून माझी निर्मिती केली . मी एक मुलगी, बहीण, पत्नी, आई, आजी अशा अनेक भूमिका करत करत , स्वतः चे आयुष्य मात्र जगायचेच विसरून जाते .
            शंभर ,दीडशे वर्षांपूर्वी  माझे आयुष्य खूप वेगळे होते .माझे घरच माझे विश्व असायचे . घराची लक्ष्मणरेषा ओलांडून बाहेरच्या जगात वावरणे शक्य नव्हते . शिक्षणा अभावी व्यवहारज्ञान नव्हते , आत्मविश्वास नव्हता .मुलीचे लग्न करून सासरी पाठवले की आईवडिलांच्या जीवनाची इतिकर्तव्यता व्हायची . माझी इच्छा, माझी स्वप्ने,  कुणाच्या खिजगणतीतच नसायची . लग्नापूर्वी वडील आणि नंतर नवरा , माझ्या जीवनाची दिशा ठरवायचे . 
      त्याहून भयंकर होती सामाजिक बंधने . बाल विवाह , सती , विधवांचे केशवपन ...किती म्हणून सांगू ? ज्या वयात लग्न ह्या शब्दाचा अर्थही समजत नव्हता, त्या वयात आईवडिलांचे घर सोडून अनोळखी घरात रवानगी व्हायची. दुर्दैवाने जर नवऱ्याचा मृत्यू झाला, तर जिवंतपणी मरण पत्करावे लागायचे. विधवेचे जीवन म्हणजे बिनपगारी चोवीस तासांची नोकरी. केशवपन करून, आलवण नेसून , अख्खा जन्म घराच्या उंबरठ्या आड काढायचा. पडेल ते काम निमूटपणे करायचं. शिवाय तोंडातून ब्र काढायची हिंमत नव्हती.
         मग मला हा आत्मविश्वास कुणी दिला ? माझ्या पंखात एव्हढे बळ कुणी दिले? माझा मार्ग निवडण्याचे, अन्यायाविरुद्ध लढण्याचे, सामर्थ्य कुठून आले ? 
        आज माझ्या प्रगतीचे वाटेकरी आहेत, असंख्य समाज सुधारक, स्त्रीला भारतीय संविधानात बरोबरीचा दर्जा देणारे, बॅरिस्टर आंबेडकर. आज जगात प्रत्येक क्षेत्रात स्वतः चे स्थान मिळवणारी स्त्री, कायम ऋणी राहील ह्या सर्वांची .            
         एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांनंतर , समस्त स्त्री वर्गाची ग्रहदशा बदलली . अशातच १८२७ मध्ये एका महात्म्याचा जन्म झाला . जणू परमेश्वराने स्त्री जातीच्या उद्धारा करता त्याचा दूत पाठवला होता . हो हो ..बरोबर ओळखले हं...महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी , सावित्रीबाई .
        आजच्या युगातील ब्रीदवाक्य...मुलगी शिकली, घर शिकले....हे त्यांना दीडशे वर्षांपूर्वी कळले होते .महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी पुण्यात स्त्रियां करता पहिली शाळा  सुरू केली . शिकवायला शिक्षिका मिळत नव्हत्या, तर सावित्रीबाई फुले यांनी पहिल्या स्त्री शिक्षिकेची धुरा सांभाळली. हे करतांना, समाजाकडून , घरातून खूप विरोध सहन करावा लागला. समाजाने त्यांना वाळीत टाकले . म्हणूनच आजची शिकलेली स्त्री बघता आली, ती महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांच्या अथक प्रयत्न  आणि दूरदृष्टी मुळेच . स्त्रियांना स्वावलंबी करायचे तर शिक्षणाला पर्याय नाही हे त्या द्रष्ट्यांना कळले होते                
             ह्या समाज सुधारक  दांपत्याने स्त्रियांवर होणारे अन्याय दूर करण्याकरता , जातीवाद निर्मूलन करण्याकरता खूप कष्ट घेतले. समाजातल्या अनेक चुकीच्या रूढींच्या विरोधात उभे राहिले . मुळातच त्याकाळी स्त्री पुरुष समानता नव्हती . उच्च नीच जातीभेद होता . महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी या रुढींविरुद्ध आंदोलने केली .त्यामुळे त्यांना क्रांतीसुर्य अशी पदवी मिळाली . नंतर आलेल्या अनेक समाज सुधारकां करता हे दांपत्य प्रेरणा स्त्रोत ठरले . बंगाल मध्ये ईश्वर चंद विद्या सागर, राजा राम मोहन रॉय, तर तामिळनाडू मध्ये विरसलांगम पांतुळू. या सगळ्यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, सती इत्यादी समस्यांवर झटून काम केले. शेकडो वर्षांपासून समाजावर असलेला अंधश्रद्धेचा पगडा दूर करणे काही सोपे काम नव्हते. त्यांच्या शिकवणींनी हळूहळू समाजाच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडून आला. 
         तारा बाई शिंदे, पंडिता रमाबाई , रमाबाई रानडे, राजा राममोहन रॉय  ह्यांनी समाजाला स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले               आपल्या समाजात असलेल्या पितृसत्ताक पद्धतीमुळे अजूनही काही ठिकाणी स्त्रियांचे आयुष्य खडतरच असते . पण आता आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध निर्भिड पणे ऊभे राहायची शक्ती आम्हाला मिळाली आहे. हे शक्य झाले आहे, केवळ शिक्षणामुळे . दुर्दैवाने जर आयुष्यात काही विपरीत घडले तर आज मी एव्हढी सक्षम झाले आहे की माझ्या पायावर उभी राहू शकते आहे ,माझा आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मी करू शकते .
       त्याकाळी रोगराई, महामारी इत्यादींमुळे मृत्यू दर फार जास्त असायचा . आजच्या सारख्या वैद्यकीय सोयी नव्हत्या . अश्यात नशिबात वैधव्य आलेल्या तरुण मुलींचे अतोनात हाल व्हायचे . त्यांच्या समस्यांचा विचार करणारे  कुणीच नव्हते . त्यांचे पुनर्वसन , त्यांचे शिक्षण , त्यांचे समाजातले स्थान , एव्हढेच नाही तर त्यांचे दैनंदिन आयुष्य  सुकर करण्याकरता झटल्या... रमाबाई रानडे . पुण्यात सेवा सदन नावाच्या आश्रमाची स्थापना केली . विधवा स्त्रियांना वेगवेगळे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवले .मुलींच्या शिक्षणाकरता शाळा सुरू केल्या.
        विधवा पुनर्वसन प्रचलित करण्यात सिंहाचा वाटा होता महर्षी कर्वे यांचा . विधवा पुनर्विवाहाला समाजात मान्यता मिळवून देण्यासाठी , महर्षी कर्वे नी स्वतः च एका विधवेशी विवाह केला . बुरसटलेल्या समाजाने हे अजिबात मान्य केले नाही . कर्वेना खूप अवहेलना सहन करावी लागली . पण हळूहळू समाज बदलायला लागला .
               पूर्वी सतीची प्रथा होती . नवऱ्याच्या चितेवर स्वतः लाही जाळून घ्यायची ही प्रथा भयंकर होती . हे कधी स्वखुशीने असायचे तर कधी जबरदस्तीने .राजा राम मोहन रॉय यांनी पौराणिक ग्रंथांचा अभ्यास करून , सतीच्या प्रथेला काहीही धार्मिक आधार नसल्याचे प्रमाणित केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि कायद्याने सतीची प्रथा बंद झाली.
         गेल्या दीडशे वर्षात समाजातील आम्हा स्त्रियांचे स्थान खूप बदलले आहे . आम्हाला मिळणारे मानमरातब, सन्मान बघितला की त्यामागे समाज सुधारकांनी केलेले परिश्रम , त्याग आठवतात. आम्हाला मोकळा श्वास घेता यावा म्हणून महर्षी कर्वेंनी सहन केलेली उपेक्षा आठवते. आज आम्ही स्त्रिया अगदी अंतराळात जाऊन कामगिरी बजावून येतो . प्रत्येक क्षेत्रात पुरुषा इतकी, किंवा त्याहूनही जास्त प्रगती करत आहोत. कुटुंबाची, मुलांची काळजी घेणे हे तर आम्हाला जन्मजातच येते . 
       स्त्रियांचा , त्यांच्या इच्छा, आकांक्षांचा मान ठेवणारा समाज , हा नेहमी सशक्त समाज असतो . समाज सुधारकांनी समाजाला दिलेली सगळ्यांत महत्त्वाची शिकवण आहे ही. त्यांच्या प्रयत्नांनी फक्त स्त्रियांचीच प्रगती झाली आहे असे नाही, तर पुरुषांचीही मानसिकता सुधारली . त्यांचाही दृष्टिकोन बदलला आहे .
       समाज सुधारकांनी सशक्त समाज घडवला. स्त्रिया आणि पूर्ण समाज  ह्या समाज सुधारकांचा कायम ऋणी राहील 

क्रांतिसूर्य उदयास आला
स्त्री जातीचा त्रास संपला....
अंधश्रद्धा लोपल्या....केवळ तुमच्यामुळे.
सती प्रथा संपली,
बालविवाह ही थांबला
मिळालं मानाचे स्थान...केवळ तुमच्यामुळे.
स्त्री शिकली,
समाज शिकला ,
उन्नत झाला समाज.... केवळ तुमच्यामुळे .

सर्व समाज सुधारकांना मानाचा मुजरा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *