–अंजली संगवई —
चार भिंतीचे घरटे असो
वा असो वाडा चिरेबंदी…
भिंतीवर खिडकीची एक चौकट…
त्या घरास घरकूल बनवी!
… एकदा एका क्रूर आणि अभिमानी राजाने स्वतःच्या मुलीला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. राजवाड्या पासून दूर एकांतात. राजकन्येचा गुन्हा एवढाच की खुद्द राजाच्या विरोधात जाऊन तिने सत्याची साथ दिली. ‘ हम करे सो कायदा’ असे मानणाऱ्या राजाला हे सहन होणे शक्यच नव्ह्ते. याची कठोर शिक्षा म्हणून तिला एक वर्ष एका निर्मनुष्य ठिकाणी ठेवण्याचे आदेश दिले. या कालावधीत कुणाशीही बोलणें किंवा कुणाची मदत घेणे वर्ज होते.
कुणी तिची मदत करणे तर दूरच, तिच्या दृष्टीस देखील कुणी पडत नसे कारण राजाचा प्रजेला खूपच धाक होता. जिथे राजकन्येलाच शिक्षा केली तिथे इतरांचे काय! राजाच्या आज्ञेचे उल्लंघन करायचा कुणी धाडस करीत नसे…
जेव्हा राजकन्येची सुटका झाली तेव्हा ती खूप शांत आणि सामान्य वाटत होती. न राहून तिच्या सख्यांनी तिला विचारले वर्षभर निर्मनुष्य ठिकाणी एकटी राहूनही तू सामान्य कशी काय?
ती म्हणाली….
हे काही सोपे नव्हते पण मला साथ द्यायला कारागृहात एक खिडकी होती. ती खिडकी जणू माझी सखीच झाली. खिडकीतून बाहेरचे जग थोडेसेच का होईना पण दिसत होते. सुंदर पक्षांची त्यांच्या अवाजांची ओळख या खिडकी ने करून दिले. वृक्ष वेली माझ्या अजून जवळ झाल्या.
या महाभयंकर शिक्षेत खऱ्या अर्थाने या तेथील खिडकीने बाहेरील जगाशी माझी नाळ जोडून ठेवली. तेव्हा या खिडकीच्या बाहेर एक जग आहे आणि आपण तिथे परत जाणार आहे हा एक विचारही खूप दिलासा देणारा होतो. या विचारामुळे सकारात्मकतेचा पूरक असा प्राणवायू मिळायचा. या खिडकीनेच मनाची खिडकी देखील उघडायला आणि योग्य वेळी बंद करायला शिकवले. खिडकीने एकटेपण कधी जाणवू दिलाच नाही. जगणे मात्र सुसह्य केले……..
घराचे आंगण, ओसरी/व्हरांडा, माजघर, बैठक, स्वयंपाकघर या साऱ्यांचे एक आपले एक वेगळे स्थान असत…
प्रत्येक भिंतीचे एक वेगळे अस्थित्व असत…
काही भिंतीं खिडकीशी निगडीत असतात…
प्रत्येक खिडकीची देखील एक आपलीच कथा….
तिचेही आपले एक वेगळेच महत्व….
खिडकी उघडलेली असली की,
आतील हवेचे शुध्दीकरण, प्रकाश नियोजन, म्हणजेच काय तर मस्त दिलखुलास वातावरण निर्मिती ही हमखास ठरलेली…
मनाच्या खिडकीचेही तसेच आहे, ती जर छान मनमोकळे पणाने उघडली की उत्साहाची झुळूक आणि चैतन्याचा उजेड आत येऊन मनाचे प्रफुल्लीकरणही ठरलेले…
खिडकीचे अस्तित्वच मुळी यासाठीच आहे.
……..जर खिडकी नसती तर….. बापरे!!
असा विचार देखील करवत नाही…
असे म्हणतात…
झुळूक येण्यास खिडकी नसेल तर…
घराची/मनाची भिंत अपुरीच राहते!
तिमिराला दूर सारून सूर्य आपली किरणे पसरवीतो तेव्हा ती खिडकीतून आत शिरून घरभर पसरतात….
बाहेर कितीही रखरखती गर्मी असली तरी देखील घरातील खिडकी जवळच्या एखाद्या झाडाशी संगनमत करुन हवेची एक छानशी झुळूक आत आणून हवाहवासा गारवा देऊन जाते….
गोठविणाऱ्या थंडीत खिडकीतून येणारी उन्हाची उबदार तिरीप छान ऊब देऊन जाते….
तसेच मनाच्या खिडकीचे देखील आहे…
नको असलेल्या विचारांचा कल्लोळ मनात गर्दी करू लागला की हीच मनातील खिडकी आतील सारा कोंदटपणा बाहेर काढते. तसेच छान नव्या विचारांची झुळूक देखील याच खिडकीतून आत शिरते.
घरात हवा खेळती राहण्यासाठी क्रॉस वेंटीलेशन आवश्यक आहे तसेच मनाचे देखील आहे.
एखादा कुचका संकुचीत विचार किंवा जुना राग-द्वेष जर आत डेरा घालून बसला असेल तर सारासार विवेकबुद्धीचे क्रॉस वेंटीलेशन त्याला बाहेर पडायला हे खूप उपयोगी होत.
बर, एवढ्यावरच खिडकीची महती संपते काय… तर नाही !
कधी कधी (तशी नेहमीचं)आलेली मरगळ घालवीण्यासाठी खिडकी आपली भुमिका छान बजावते. म्हणजेच काय तर मनोरंजनाचे आणि मनाला दुसरीकडे गुंतविण्याचे काम देखील ती करते. खिडकीत बसलो की बाह्य जगातील (आपल्या घररुपी जगाशिवाय) घडामोडी बघता येतात. जाणारी येणारी वाहने, लोकांची वर्दळ नेहमी नवीन काहीतरी दाखवून जाते.
प्रत्येक वाहनाची-व्यक्तींची गती, चाल त्यांची कहाणी सांगते.
निघायला उशीर झालेल्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव… पोहचण्याची घाई व चिंता आपसूकच त्यांची गती वाढवते…
कधी एकदाचे नियोजीत स्थळी पोहचतो आणि हुश्य करतो हा त्यांचा विचार न बोलता पण चेहऱ्यावर झळकतो….
कुणाच्या चेहऱ्यावर निवांत आणि आत्मविश्वासाची छटा जर असेल, म्हणजे वेळेचे आणि कामाचे नियोजन त्या व्यक्तीने योग्य पद्धतीने केले आहे हे देखील आपसुकच कळत..
छोटी छोटी पिटूकली बोटे जेव्हां आईबाबांच्या बोटांना घट्ट धरून शाळेत जातांना दिसतात, तेव्हा त्यांच्या निरागस चेहऱ्यावर एक भीती दिसते, तसेच “आज नाहीनां जात शाळेत” हा तगादा खिडकीत बसून ऐकायला येत नसला तरी देखील समजतो…
गाडीवर बसून आई किंवा बाबांना घट्ट पकडून बसलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक सुरक्षिततेचा भाव स्पष्टपणे जाणवतो.
चेहऱ्यावरील लगबगीचे, निवांतपणाचे, सुरक्षिततेचे, निरागसतेचे, भीतीचे असे विविध भाव अभ्यासतांना बघतांना मन काही वेळासाठी का होईना गुंतून राहत आणि आलेली मरगळ दूर होते…
ध्वनीमनोरंजन (हल्ली कर्कशच जास्त असत) देखील याच खिडकीतून डोकावत…
पूर्वी गायी वासरांचे गोठ्यातून हमबरणे, पक्ष्यांचा किलबिलाट, सकाळी सकाळी कोकिळेची साद ही घरातील प्रत्येक खिडकीतून आत यायची. आता गायींचे हमबरने नाहीतच जमा आहे. पक्ष्यांचा किलबिलाट येतो अजूनही पण आजही तो पूर्वी सारखाच आनंद देऊन जातो….
भाजीवाले, फेरीवाले त्यांची पोटाची खळगी भरण्यासाठीची धडपड त्यांच्या आवाजाने याचं खिडकीतून ऐकायला येते…
कधी रटाळवाणे वाटले किंवा मित्र मैत्रिणी सोबत वेळ घालवायचा असेल तर अजून एक खिडकी छान भूमिका निभावते, ती म्हणजे नाट्यगृहची किंवा सिनेमा गृहाची खिडकी! या खिडकीतून मनोरंजनाचे तिकीट मिळत तसेच कधी कधी ज्ञाप्रबोधनचेही.
प्रत्येक खिडकीची आपली एक वेगळी भुमिका असते…
रेल्वे स्थानकावरील आणि बस स्थानकावरील खिडकी, कधी प्रवाश्यांचा उत्साह आनंद बघते, तर कधी विरहाची साक्षीदार बनते…
दवाखान्यातील खिडकी औषधांसोबत डॉक्टरांकडून लवकरच बरे वाटेल याचा जणू विश्र्वासच देते….
बँकेतील खिडकी तिथे होणाऱ्या आर्थिक उलाढालींची साक्षीदार असते… ग्राहकांच्या चेहऱ्यावर, ठेवींवर मिळालेल्या व्याजाचे समाधान व कर्जावरील व्याजामुळे चिंतेचे ओझे ती एकाच निर्विकार भावाने बघते…
तशीच एक महत्वाची एक साहित्याची खिडकी.
विचार आणि आचार समृध्द बनवनारी….. विचारांना चालना देणारी..
या खिडकीतून नेहमी प्रगल्भतेची झुळूक मनात शिरते.
विचारांचे अनेक वादळे शांत करण्याचे सामार्थ्य साहित्याच्या खिडकीत आहे. या खिडकीतून सुसंस्कृपणा देखील आपसुकच आत डोकावतो…
विविध आयामी विविध उपयोगी ही खिडकी कधी कधी बंद पण करावी, म्हणजे ती योग्य वेळी बंद पण करता आली पाहिजे. वारा कितीही सुखवाह असला तरी सोसाट्याने आलेला वारा आत सारी उलथा पालथ करू शकतो. अशा वेळी त्याचा सुसाटपणा आत येण्यापासून रोखण्यासाठी खिडकी बंद करावीच लागते.
दरवळणारा सुगंध खिडकीतून येतो तसा कधी असह्य होणारा दुर्गंध देखील त्याच खिडकीतुन येतो अश्या वेळी खिडकी बंद करावीच लागते.
मनाची खिडकी देखील अशीच बंद करता आली पाहिजे जेव्हा नको असलेलं आत येण्याचा प्रयत्न करीत असेल त्यावेळी!
हे जर जमले तर घरात आणि मनात अविचार येणार नाही… आनंदी आणि खेळीमेळीचे वातावरण नांदत राहील..
आता तशी पूर्वीसारखी बैठी घर कालबाह्य होत चालली आहे,(सर्वसामान्यांना न परवडणारी) आता उंच उंच टॉवर चे युग आले आहे. आता भिंतीवरील खिडकी देखील उंचावर गेली आहे. तिथून आकाश, तारे थोडे अजून जवळ आले आहे असे भासतात. (हा मानलेला सकारात्मक बदल)
मनाच्या खिडकीने देखील अशीच उंची वाढवली की उत्साह आणि चैतन्याची चमक अजून वाढेल.
आणि आनंदाचे तारांगण मनात खेळते राहील….
खिडकी
Categories: