प्रेम कि हक्क?

— मानसी तांबेकर —

आज लग्नाचा पहिला  वाढदिवस.  मोहितने जय्यत तयारी केली होती. मंद संगीताचे सूर ऐकत तो शांतपणे सोफ्यावर बसून तिची वाट पाहत होता. लालचुटुक रंगाच्या त्या भरजरी साडीत ‘मोहित ‘ अशी हाक मारत मधुरा आली .तो एकटक तिच्याकडे पाहू लागला. तिला जवळ खेचत, तिचे नखशिखांत सौंदर्य न्याहाळत तो तिला बाल्कनीत घेऊन गेला. त्या मंद संगीतावर दोघांची पाऊले थिरकू लागली. रात्रीची शांतता ,निरभ्र आकाश, आभाळात शुक्राची चांदणी तेजाने चमकत होती. तिचे तेज अधिक का आपल्या बाहूपाशातील चांदणीचे अधिक त्याला ठरवता येईना. आपल्याच भाग्याचा हेवा त्याला वाटायला लागला. तेवढ्यात… काळ्या मेघांनी चांदण्यांना झाकून टाकले. आणि बघतो तर काय त्याच्या मिठीतही कोणीच नव्हते. तो भानावर आला. सत्य आणि आभास ह्यातली रेषा पुसट झाली होती. त्याचे पुन्हा भान हरपले… मधुराच्या आठवणींनी जीव कासावीस झाला. पंधरा दिवस उलटून गेले पण अजूनही मधुराचा पत्ता नव्हता. त्याला परत ती काळरात्र आठवली….

        रात्री दोन-अडीच वाजताची वेळ , त्याने होत्या  त्या अवस्थेत  धावत -पळत पोलीस स्टेशन गाठले. ‘ इन्स्पेक्टर साहेब , माझ्या बायकोला वाचवा’ तो म्हणाला.  हातात एक पांढरी ओढणी , त्यात लपेटलेला सुरा , विस्कटलेले केस , चेहऱ्यावर भय आणि दुःखाची झाक.. मोहितचा हा अवतार पाहून इन्स्पेक्टर भोसले चपापले. ‘कोण तुम्ही आणि हे सर्व काय आहे ?’ -इन्स्पेक्टर जाधवांनी  विचारले. ‘ साहेब …  मी मोहित आफळे,माझी बायको मधुरा आफळे . आज संध्याकाळी केतनच्या पार्टीला गेली ती घरी आलीच नाही. रात्री दीड वाजताच्या सुमारास तिच्या मोबाइलवरून हा मेसेज आला. मी क्षणाचा ही विलंब न करता त्या जागी पोहचलो पण तिथे माझी मधुरा नव्हती…. ही ओढणी आणि हा सुरा सापडला. माझ्या मधुराला वाचवा ’ असं म्हणत मोहित ओक्सबोक्शी रडू लागला. ‘शांत व्हा ,मि. मोहित…सावरा स्वतःला. आपण तुमची बायको शोधायचा प्रयत्न करू.  अरे पाटील , यांची तक्रार नोंदवून घे, त्या सर्व गोष्टी ताब्यात घे. चौकशी सुरु करा ‘ असं म्हणत इन्स्पेक्टर जाधवांनी  सब -इन्स्पेक्टर पाटिलांकडे केस सोपवली.  

  पंधरा दिवसानंतर-    

   ‘पाटील , ती मधुरा आफळे मर्डर केस कुठपर्यंत आली ? त्या बॉडीची तरओळख पटली; पोस्टमार्टेम रिपोर्ट आले का ? स्टेटमेंट फाईल द्या पाहू’ -इन्स्पेक्टर जाधवांनी फाईल चाळायला सुरुवात केली. 

  विधान १ -मोहित आफळे

          ‘साहेब ,मी मोहित रामचंद्र आफळे , वय ३० वर्षे .  मी जेमतेम १० वर्षाचा असताना आई- वडील अपघातात गेले. आजी आजोबांनी लहानाचे मोठे केले. कालांतराने आजी-आजोबांच्या निधनानंतर मी एकाकी  पडलो. स्वकर्तृत्वावर शिक्षण पूर्ण करून ‘SUNTEC’ सारख्या नामांकित कंपनीत नोकरीला लागलो. विरह, ताटातूट याची खूप भीती होती मनात आणि म्ह्णून प्रेम , लग्न यापासून दूर रहायचं असे मी ठरवले . पण मग एक दिवशी ती भेटली –‘ मधुरा देशपांडे’ गोरीपान, टपोरे डोळे, नावाप्रमाणेच मधुर  बोलणं ‘घरकुल’ या इंटिरियर डिझाईन फर्मची सर्वेसर्वा . मावशीच्या हट्टाखातर मी विवाह संस्थेतून आलेल्या  स्थळाला भेटायला कॉफी हाउस मध्ये गेलो. तिथे मधुरा आपल्या क्लायंटला भेटायला आली होती. वेटरने केलेल्या टेबलनंबरच्या चुकीमुळे आमची गाठ पडली. त्या  गाठीचं रूपांतर मैत्रीत , मैत्रीचं प्रेमात आणि मग लग्नाच्या रेशीमगाठी जुळल्या. सर्व सुरळीत चालू होते जो पर्यंत ‘केतन पारीख’  आमच्या आयुष्यात नव्हता. ‘घरकुल’ ही फर्म म्हणजे मधुराचे आणि तिची बालमैत्रीण रेवतीचे स्वप्न होते. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी त्यांनी ‘केतन पारीख’ चा हात पकडला आणि त्या नीच माणसाने  माझ्या मधुराचा घात केला. त्या संध्याकाळी  ती त्याच्या पार्टीसाठी तयार होत असताना मी तिला जाऊ नकोस म्हणून परोपरीने समजावले. पण माझ्यासोबत रेवती आहे तेव्हा काळजी करू नकोस असे म्हणून ती गेली ती परत आलीच नाही.’

विधान 2 – रेवती इनामदार

        ‘मी रेवती इनामदार .वय २८ वर्ष. मधुरा माझी बालमैत्रीण आणि आता ‘घरकुल’ फर्म पार्टनर. एकमेकांच्या घरी जाणे -येणे , अभ्यास , खूप जिवाभावाची दोस्ती  कधीही कुठच्याही विषयावर आम्ही बिनधास्त गप्पा मारायचो. माझं मन मोकळं करण्यासाठी ती एक माझी हक्काची व्यक्ती होती. मी अविवाहित आहे माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याने माझा लग्न व्यवस्थेवर विश्वास नाही .याबाबतीत  अनेकदा समजावून सांगितल्यावरही मधुरा लग्नाच्या बेडीत अडकली आणि एका संशयी नवऱ्याच्या जाळ्यात फसली.  केतनच्या फर्मची मदत घेणे मोहितला मान्य नव्हते. केतन पारीख हा स्त्रीलंपट माणूस  आहे खरा; पण  मधुरा फर्म साठी कुठच्याही थराला जाणार नाही हे मी विश्वासाने सांगू शकते . मी मधुराला खूप जवळून ओळखते .  पार्टीच्या दिवशी माझी तब्येत ठीक नसल्याने  मी पार्टीला जायचे टाळले. मोहित सोबत झालेल्या भांडणामुळे मधुरा अस्वस्थ होती म्हणून आम्ही नेहमीच्या हॉटेलवर कॉफीसाठी भेटलो.  रोजच्या कटकटी , मोहितचं संशय घेणे यामुळे ती पार त्रासली होती. त्याच मनस्थितीत ती पार्टीला गेली आणि परत आलीच नाही.

विधान ३ – केतन पारीख

   हुं केतन पारेख छू । वय ४०. माझी एक मोटी डिझाईन फर्म छे . या मिससिंग केस मंधी मला अडकवायचे काही काम नथी. मी आपलो भला मानूस छे . या मधुरा मॅडम सोबत माझे फक्त बिसिनेस रिलेशन. मॅडमचा त्याच्ये मिस्टरवर पक्का प्रेम. एकदम ‘सुखी परिणीत युगुल‘ त्या दिवशी मधुरा मॅडम  माझ्या पार्टीला येणार होत्या पण रेवती मॅडमची तब्येत ठीक नव्हती म्हणून कॅन्सल केले. ते रेवती मॅडम आहे ना, त्या मधुरा मॅडमवर खूप बॉसगिरी करायच्या . असा आपला obsevartion ‘

या व्यतिरिक्त  मधुराचे आई-वडील ,शेजारी , ऑफिस-हॉटेल स्टाफ , या सर्वांची विधाने आणि सोबत असलेले पुरावे जाधवांनी पुन्हा एकदा तपासून पाहिले. तितक्यात इन्स्पेक्टर ढोबळे आले – ‘साहेब , परवा  नदीत  मिळालेल्या मधुरा आफळे यांच्या बॉडीचे पोस्ट-मार्टेम रिपोर्ट ‘ रिपोर्ट पाहताच जाधवांचे डोळे चमकले.  ते म्हणाले -‘पाटील , गुन्हेगार सापडला , ताबडतोब सर्वांना पोलिस स्टेशनला बोलवा.’ सर्वजण पोलीस स्टेशनला जमल्यावर इन्स्पेक्टर जाधवांनी बोलायला सुरुवात केली-‘दोन दिवसापूर्वी नदीतून जी मधुरा आफळे यांची बॉडी सापडली तिचा आज पोस्ट मार्टेम रिपोर्ट आला आहे.  मधुराचा  खून कुठच्याही धारदार शस्त्राने नाही तर विषारी परफ्युममुळे झाला आहे’  इथे उपस्थित असलेल्यांपैकी उंची अत्तर, परफ्युम याची एकच व्यक्ती शौकीन आहे – ‘मिस रेवती इनामदार –  ज्यांनी आपल्या  मैत्रिणीचा खून केला. या व्यतिरिक्त तुमच्या विरुद्ध आमच्याकडे बरेच पुरावे आहेत.  तेव्हा गुन्हा कबूल करा मॅडम’ 

‘मी , मी काही केलं नाही’ -रेवती बोलू लागली– ‘हा. ..हा  मोहित जवाबदार आहे या सर्वाला. त्याने हिरकावून घेतले माझ्या मधुरेला. आमची एकत्र रहायची स्वप्ने याने धुळीस मिळवली . कॉलेजच्या फायनल वर्षापासून  माझे आणि मधुराचे संबंध होते. अनुभावापोटी या समलिंगी संबंधाची सुरुवात झाली आणि मग सवय. पण अचानक मोहित तिच्या आयुष्यात आला. तिने लग्न केले.  ती ‘मोहित’मय झाली आणि सर्व आराखडे चुकले. केवळ माझ्या आग्रहाखातर ती लग्नानंतर ही दोन-तीनदा मला हॉटेलवर भेटली पण आता तिला त्या संबंधात रस नव्हता आणि मोहितला कळेल ही भीती होती ती वेगळी . अचानक केतन पारीख आमच्या आयुष्यात आला . त्याचा फायदा घेऊन मीच मोहितला संशयाच्या जाळ्यात अडकवले . यावरून त्यांची वरचेवर भांडणं होऊ लागली. एकदा तर मोहितने तिच्यावर हातही उगारला.त्या संधीचा फायदा घेऊन मी तिला घटस्फोट देण्याचे सुचवले . पण ती मोहितच्या प्रेमात आंधळी झाली होती. मग मी माझा फायनल गेम खेळले . त्यादिवशी मधुरा  मोहितच्या मर्जीविरुद्ध माझ्यासोबत केतनच्या पार्टीला जायला निघाली. माझी तब्येत बरी नाही पण आपण कॉफीला भेटू असे सांगून मी तिला हॉटेलवर बोलावले. मी अचानक तब्येत जास्त बिघडल्याचे नाटक केले आणि तिला घेऊन हॉटेल रूममध्ये पोहोचले. माझी तब्येत ठीक नाही पाहून तिने पार्टीला जायचे रद्द केले. मी तिला घट्ट मिठी मारली . रोजची कटकट, भांडणं याला त्रासलेली ती आणि तिच्या सहवासाची  हुरहूर लागलेली मी आम्ही दोघी एका वेगळ्याच विश्वात गेलो होतो  मोहितचा फोन वाजला आणि ती भानावर आली. ती तशीच तडक घरी जायला निघाली , पण मला ते नको होते. तिला माझ्या गाडीतून घरी सोडते सांगून मी ही तिच्यासोबत निघाले. रस्त्यात गाडी आडोशाला लावून मी तिला माझ्या ओढणीवर विषारी परफ्युम टाकून बेशुद्ध केले. मग त्याच ओढणीने तिचा जीव घेतला. गाडी पुलावर नेली आणि बॉडी पाण्यात ढकलून दिली.या सर्वांमध्ये मला मोहितला अडकवायचे होते . एका निर्जन स्थळी जाऊन सुरा आणि ती ओढणी टाकली . गाडी घेऊन पार्टीत पोहोचले आणि मधुराच्या मोबाईल वरून मोहितला त्या जागी पोहोचायचा मेसेज केला आणि फोन तिथेच सोडून दिला. बाकी सर्व तर तुम्हाला माहितच आहे इन्स्पेक्टर. मोहितचं तिच्यावर प्रेम होतं पण त्या आधी …माझा तिच्यावर हक्क होता.’

 ‘त्या हक्काच्या हव्यासापोटी तुम्ही खूप चुकीचं पाऊल उचलले रेवती मॅडम’ इन्स्पेक्टर जाधव बोलले.

                                                                                         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *