सनविवि अनुभव,साहित्योन्मेष कावळ्याच्या शापाने ….

कावळ्याच्या शापाने ….

–पंकज पंडित–

कावळा हा आमच्या मुंबईचा “अनधिकृत राष्ट्रीय पक्षी” आहे , कारण  ते जागोजागी दिसतात. सगळे कावळे सारखेच दिसतात. त्यात नर आणि मादी असा फरक पण करता येत नाही. आता या कावळ्यांशी   माझे काहीच देणेघेणे नव्हते.पण एक असा काही हातघाईचा प्रसंग झाला की कावळा हा एक  सामान्यतः  आढळणारा परंतु असामान्य पक्षी आहे असे माझे मत झाले. 

सर्व प्राणिमात्र , निसर्ग यावर माझे निरतिशय प्रेम आहे. आमचे खारघर, नवी मुंबई येथे घर आहे. तेथे गच्चीत , मी  नेहेमी वाटीमध्ये पक्षाच्यासाठी , पाणी भरून ठेवतो.  तसेच आंब्याची कोय,  इतर फळांच्या साली, नेहमी कावळ्यासाठी बाल्कनीत ठेवत असे. कावळे नेहमी ते खायला येत असत. एक दिवशी पावसाळ्यापूर्वी , मी गच्ची खालील, दुसऱ्या मजल्याच्या  बाल्कनीत उतरून, काही बागकाम करत होतो. एकदम अचानक  एक कावळा , “काव काव” करीत , माझ्या अंगावर ओरडत, चाल करून आला. मी त्याला फटकारून लावले. तेव्हड्यात दुसरा कावळाही तसेच ओरडत अंगावर आला. मला समजेचना की  हा  काय प्रकार आहे. त्याकडे मी दुर्लक्ष्य केले आणि बाग काम करत राहिलो. दोन कावळे मात्र त्यांचा आक्रोश चालू ठेवत  होते आणि मी त्यांना हातवारे करून हाकलून लावत होतो.  काही काळाने मला यामागचे कारण समजले. आमच्या शेजारच्या घराच्या गॅलरीत,  कावळ्यानी एक घरटे केले होते. त्या गवताच्या काड्याच्या घरट्याला, लोखंडी वायर , विमानात  बेगेला लावणाऱ्या पांढरी प्लस्टिक टेपने,  घट्ट बांधले होते. त्यात पाच सहा छोटी अंडी होती ; पिवळसर रंगाची, त्यावर हिरवी पोलक्यावर असतात तशी टिम्ब होती ; जेव्हा मी माझ्या घराच्या बाल्कनीत उतरून काम करत होतो तेव्हा मी त्याचे घरटे काढायला आलो असा त्या कावळ्यांचा गैरसमज  झाला   आणि मी त्यांच्या शत्रू पक्षात आलो होतो.

crow1.jpgएक दिवशी मी आमच्या सर्वात वरच्या मजल्याच्या पाण्याच्या टाकीवर शिडी चढून , टाकीत पाणी किती आहे, ते बघत होतो.एकदम एक कावळा माझ्यावर चाल करून आला आणि त्याने मला शिडीवरून पाडले. यानंतर एक दिवशी मी स्कूटर वरून जात असताना , एकदम कावळ्याने हल्ला करून , मला खाली पाडले. माझ्या सुदैवाने दोन्ही वेळा मला काही दुखापत झाली नाही.आता मात्र मी कावळ्यावर फार चिडलो .त्यांना चांगला धडा शिकवायचे असं मी ठरविले.

कावळ्यांना मी  घडा शिकविला की मीच  धडा शिकलो ? कावळ्यांना रात्री दिसत नाही हे मला ऐकून माहिती होते.एका रात्री मी रबर पाइपने त्यांच्या घरट्यावर पाणी सोडले.घरट्यात  अंड्यावर बसलेली कावळ्याची मादी “काव काव”  असा चित्कार करून उडाली.तिचा नर साथीदार पण शेजारच्या झाडावरून आला.पण त्यांना दिसत नसल्याने काहीच करता आले नाही. मला वाटले आता कावळे युद्ध बंदी करतील, पण आतातर घोर युद्धाला तोंड फुटले. कावळे दंपती माझा कायम  पाठलाग करू लागले. रोज सकाळी कावळा , टेलिफोन वायर वर , चोच  घासत, जणू मला आव्व्हान देत असे, “ये बाहेर ! मी तुला बघून घेतो” !

crow2.jpgमाझ्या घरात, मी नजरकैद  : आता मला माझ्या घरातच राहणे अशक्य झाले. जरा घराच्या बाहेर निघाल्यावर , कावळे माझ्यावर आलटून पालटून हल्लाबोल करत. नोकरीसाठी सकाळी बाहेर निघताना ते , पाळत ठेवून असत आणि बॉम्ब टाकल्यासारखे माझ्या अंगावर येत. घराबाहेर पडलो, तरी असे हल्ले चालूच. कावळे नेहेमी मागून हल्ला करतात म्हेणून मी चालताना, नेहेमी विचित्र हातवारे करू लागलो; आमच्या शेजाऱ्यांची त्याने चांगली करमणूक होत असे. मग पावसाळा नसून देखील,  मी छत्री वापरायला सुरवात केली.घराबाहेर पाऊल पडल्या पडल्या, त्यांचे हल्ले होत असत . म्हणून मी धावत धावत गाडी मध्ये बसत असे या धावपळीत इन्फोसिसने भेट दिलेले , माझे आवडते घड्याळ पडले आणि हरवले .मी पंधरा वीस दिवसांनी परत घरी आलो तरी कावळ्यांना मी परतलो असल्याचे, लगेचच समजत असे. ते मला विसरत नव्हते आणि मला ही त्यांची आठवण  कायम राहील असा त्यांचा निश्चय दिसला. “नजरकैद” या शब्दाचा अर्थ मी अक्षरशः अनुभवला . आता या कावळ्यांचे काय करायचं हा प्रश्न मला भेडसावू लागला.एयरगनने त्यांना गोळी घालणे अशक्य. कारण ते सतत सतर्क असतात.दगड पण ते सहज चुकवतात.”गूगल”वरून मला समजले की कावळ्याची शिकार करणे, केवळ अशक्यप्राय असते. कारण ते सतत घोक्यापासून दूर राहतात.जाणकार मला म्हणाले , पिल्ले मोठी झाल्यावर, ते कावळे तुझा पिच्छा सोडतील.

एक दुर्दैवी अनाकलनीय घटना : मी इथं खारघरमध्ये कावळ्यांसह युद्ध करत असताना याच्याशी, वर वर पाहता काहीच संबंध नसलेली , एक दुर्घटना पुण्यात घडली माझी आई(वय ७६) , अल्पशा आजाराचे निमित्त होऊन,स्वर्गवासी झाली. दहाव्या दिवसाच्या, काकस्पर्श विधी, श्राद्ध या  सर्व क्रियाकर्मातून, मी विषणण मनाने खारघरला परतलो. मुंबईत आता जोरदार पावसाळा चालू झाला होता. घरट्यात आता पिल्ले दिसत होती.कावळा मादी कायम पिल्लाना खायला घालीत असे. आतातरी ते  युद्धबंदी करतील  अशी मी अपेक्षा केली. पण नाही . …त्याचे  हल्ले चालूच होते. 

माझा निर्णायक पलटवार :घरी साफ सफाई करतं असताना , मला एक सडलेली पाल मिळाली. माझ्या डोक्यात एक कल्पना चमकली ! त्या पालीला पोखरून , मी त्यात उंदीर मारायचे औषध ठासून भरले. पालीला सडलेला घाण वास असल्यामुळे, विषारी औषधाचा वास लपला गेला. हुळूच मी ती पाल,आमच्या  कुंपणाच्या भिंतीवर ठेवली.नंतर एक, दोन  दिवस पावसाची संततधार होती.त्यात उंदराचे विष वाहुन गेले असेल काय ? पण  शेवटी एकदा ती कावळ्याची मादी  आली आणि तिने ती पाल उचलली. यानंतर काय होईल याची मला उत्सुकता होती. तिसऱ्या  दिवशी , घरट्यातून मला कावळ्यांचा विचित्र शोकाकुल चित्कार ऐकू आला , जो सहसा कधी ऐकू येत नाही. ती सर्व पिल्लं मरण पावली होती. घरट्यात भीषण शांतता झाली होती. कावळा मादी, मात्र घरट्या शेजारी पुतळ्या सारखी थिजून बसली होती. या नंतर सतत एक आठवडा पाऊस पडत होता या संबंध सात दिवसात , कावळा मादी, काहीही हालचाल न करता, काहीही न खाता पिता , स्तब्ध बसून होती; जणू ती काही प्रायश्चित्त घेत होती . आता ही मरण पावणार असे मला वाटले. पण एक आठवड्यांत ती हालचाल करू लागली आणि एके दिवशी उडून गेली.आता मात्र आमचं भांडण संपले. . 

काही निष्कर्ष

१. “पाण्यात राहून माशाशी वैर करू नये” ही म्हण बदलून  “घरात राहून कावळ्याची वैर करू नये” अशी केली 

२.” कावळ्याच्या शापाने गाय  मरत नाही” पण माझ्या आईच्या अपघाती , दुःखद निधनामागे, कावळ्याशी हातघाईचा  काही “अशानी संकेत” होता काय ? की “कावळा बसायला आणि  फांदी तुटायला एक वेळ आली” ?

असो.

कावळा हा एक  असामान्य पक्षी आहे  हें मात्र निर्विवाद सत्य आहे. आज मानव या पृथ्वीवरील  सर्वात बलवान प्राणी आहे हें सर्व प्राण्याना ठाऊक आहे म्हणून कोणीच प्राणी , माणसाशी “पंगा” घेत नाही पण कावळे त्याला अपवाद आहेत. ते सर्व जातभाई  कावळ्यांना बोलावून समूहशक्तीचे पण प्रदर्शन करू शकतात. कावळ्याकडे , निःसंशय काही वेगळीच, अतींद्रिय शक्ती आहे. यानंतर मी आणि खारघरचे  कावळे एकमेकापासून अंतर राखून असतो. त्यांनी घरटे करण्याची जागा आता बदलली आहे पण कावळ्यांच्या फंदात मी अजिबात पडत नाही ! 

——————————————————————————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *