–निवेदिता शिरवटकर–
मार्था आणि जॉन शांतपणे चढून टेकडीच्या माथ्यावर असलेल्या बुधिस्त मॉनेस्ट्रीपाशी आले.
” बरेच दिवस झाले. आपण इथे बसलो नाही निवांत .” मार्था पायऱ्यांकडे बोट दाखवून म्हणाली.
समोर तोच विस्तीर्ण मनोहर देखावा सूर्य प्रकाशात न्हाऊन निघाला होता. किती शांत, नयनरम्य वाटत होता तो परिसर त्या वेळी !
काही काळ ते दोघंही गप्पं राहून दूर क्षितिजावर नजर खिळवून बसले. मग मार्थाने खूप वेळ मनात जपून ठेवलेला प्रश्न जॉनच्या समोर ठेवला.
” आत्मा अमर असतो का? तुला काय वाटतं? ”
त्याच्या चेहऱ्यावर हा प्रश्न ऐकुन जराही आश्चर्य दिसले नाही. जणु काही त्याला तो प्रश्न अपेक्षितच होता.
” मला कसं माहित असणार . ” त्याचं उत्तर देखील तेवढच स्वाभाविक होत.
” आज सकाळी जेव्हा सिस्टर अँजेलांचा मृतदेह तयार करून शवपेटीत ठेवला गेला, तेव्हा किती तरुण दिसत होत्या त्या ! इतक्या तरुण वयात त्यांना मरण येणं म्हणजे ?….…
त्यांना तसं पाहून असं वाटलं की हे बस एक यंत्र आहे की जे बंद पडलय.
मग जर आपलं आयुष्य एवढं क्षणभंगुर आहे तर क्षुल्लक गोष्टींना महत्त्व देऊन आपण स्वतःला अन् दुसऱ्यांना दुःखी का करतो ? आयुष्यातले चढ उतार , भोगावं लागणारं दुःख, यातना मग त्या शारीरिक असो किंवा मानसिक… हे सर्व का ? कशासाठी ? “
यावर जॉन निरुत्तर होता. त्याची नजर दूर पर्यंत पोहोचलेल्या सोन रंगात रंगलेल्या हिरव्या भातशेतीच्या गालीच्याला न्याहाळत होती.
मार्थाने पुन्हा एकदा शांततेचा भंग करत म्हटलं,
” मी सांगू शकत नाही तुला की, कॉन्व्हेन्टला भेट दिल्यावर माझ्या मनावर किती खोलवर परिणाम झाला आहे. त्या चर्चमधील सर्व सिस्टर्स आणि त्यांनी केलेला त्याग पाहून मी चकित झाले. माझं आयुष्य निरर्थक आहे असं वाटू लागलं आहे मला.
त्या सर्वजणी त्यांची माणसं, घरदार, सुखसोयी, प्रेम, सांसारिक सुख, अपत्य सुख, ऐशो आराम, स्वातंत्र्य … सर्व काही सोडून इथे आल्या. ह्या सर्व गोष्टी तर सोडाच! पण कधी मनाला दिलासा देणाऱ्या, मनोरंजन करणाऱ्या छोट्या गोष्टी देखील ……म्ह… म्हणजे अगदी पुस्तक, संगीत, खेळ, करमणूक सारं काही मागे टाकून .
एवढंच काय ? इथे तर आता त्यांच्या नशिबी निसर्गाचं सानिध्य सुद्धा नाही ! नानारंगी फुलांनी बहरून आलेले ताटवे किंवा मोकळ्या हवेत सागरकिनारी उडणारे अवखळ लाटांचे तुषार देखील नाहीत ! किती ही उदासीनता ?
भयंकर साथीच्या रोगाने आणि मृत्यूने ग्रासलेल्या ह्या छोट्याशा गावासाठी सर्व सिस्टर्सनी आयुष्य झोकून दिलं आहे.
ही गरिबी, शिस्त,नियम , अपार कष्ट , प्रार्थना, वेदना , दुःख आणि फक्त दुःख यासाठी ?
त्यांच असं आयुष्य म्हणजे निव्वळ एखाद्याला वनवासी पाठवावं तसं आहे.
का ?तर फक्त एका गोष्टीसाठी …
‘ श्रद्धा ‘ की जी क्रॉस बनून त्यांच्या हृदयावर राज्य करते आणि एकच आकांक्षा … नव्हे जबरदस्त इच्छा , होय दृढ, उत्कट इच्छा. अश्या मृत्युला समोर जाण्याची की जो त्यांच्या आत्म्याला अमर करेल. ”
” मग ? ” जॉन मार्थाच्या विस्फारलेल्या डोळ्यात पाहत होता.
” म्हणून माझ्या मनात असा विचार आला की जर आत्मा अमर होतच नसेल तर ? जर मृत्यु हे एकच सत्य असेल आणि तो सर्व काही नष्ट करत असेल तर ? मग हा त्याग , हे दुःख , यातना कशासाठी ? त्यांची ही घोर फसवणूक आहे ! ”
जॉन काही काळ विचारमग्न होता. मग शेवटी म्हणाला,
” मला नाही वाटत तसं…
की त्यांच्या जीवनाचं उद्दिष्टं म्हणजे केवळ भ्रम आहे. त्यांचं आयुष्य मुळातच सुंदर आहे . कोणास ठाऊक आपल्याला भासतं तसं आपलं विश्व तेवढं सुंदर नसेलही कदाचित ! ”
” म्हणजे ? ” बावचळलेली मार्था म्हणाली.
” मुळात त्यांचं आयुष्य निरस आणि आपलं आयुष्य रंजक आहे हे कसं ठरवू शकतो आपण ? हां … आपण अश्या बऱ्याच रंजक गोष्टींमध्ये आपले मन रमावतो हे मान्य आहे. त्या काही काळापुरता विरंगुळा देत असतीलही कदाचित !
मान्य आहे की आपलं आयुष्य बहुरंगी बहुढंगी वाटतं कारण आपण बऱ्याच रंजक गोष्टींचा आस्वाद घेतो…..
कधी कोणी चित्रकार एक सुंदर चित्र रेखाटतो , कोणी गायक सुमधुर मन मोहून टाकणारे गायन करतो, तर कोणी लेखक किंवा कवी शब्दांचा खेळ खेळत आपल्या बुध्दीला चालना देतो.
काहीजण ह्या सर्व कलाकृतीचा आस्वाद घेत स्वतःच मनोरंजन करतात तर काहीजण कलाकारांना दाद देतात …. तेही गरजेचं आहेच.
तरीही आयुष्यात चढ उतार, दुःख, वेदना असतातच की ! ते कोणाला चुकले आहेत का ?
आणि हो ! काही अशीही लोकं असतील की जे सदैव निसर्गाच्या सानिध्यात राहणे पसंद करतात.
निसर्ग! की जो सर्वात महान कलाकार आहे , ज्याच्या निर्मितीला कोणताही ठराविक आकार उकार, लांबी , रुंदी, प्रमाण , समानता -असमानता ह्या सर्व व्याख्या , मर्यादा , बंधने नाहीत तरीही सर्वोत्कृष्ट कलाकृती निर्माण करतो. जर निसर्ग व्याख्या , बंधने मानत नाही तर कोणाच्या सुख- दुःखाच्या व्याख्या बनवणारे आपण कोण ?
या सर्व निरनिराळ्या जीवन पद्धती पाहता, कोणाचं आयुष्य सार्थक आहे आणि कोणाचं आयुष्य निरर्थक आहे हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाही.
मुळात कोणतेही जीवन सुंदर आहे ….
कारण ते जीवन आहे ! ”
मार्था मन लावून ऐकत होती. पण अजुनही तिच्या मनाचं पुरेसं समाधान झालं नव्हतं.
पुढे जॉनने तिला विचारलं ,
” तू कधी संगीत ऑर्केस्ट्रा पाहायला गेली आहेस ?
” हो ! मला त्यातलं फारसं काही कळत नाही, पण ऐकायला आवडत. ”
” तेच तर ! ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला ती वाद्ये निर्माण करत असलेली संगीताची क्लिष्ट रचना समजते असं नाही. पण तरीही त्याचा मनमुराद आनंद तो घेऊ शकतो. ते संगीत कोणाच्याही भावनांना साद घालू शकेल एवढं प्रभावी असतं. का ? …….
कारण जरी त्यातल्या प्रत्येक वादकाला देखील ती संपूर्ण रचना बऱ्याचदा कळत नसली किंवा माहित नसली तरी त्याचं लक्ष फक्त त्याच्या वाद्याकडे असते की जे तो अतिशय एकाग्र चित्ताने वाजवतो. त्याचे ते वाद्य वाजवण्यात तो पूर्णपणे समाधानी असतो.
अशी अनेक वाद्ये एकत्र येऊन शेवटी मंत्रमुग्ध संगीत बनतं.
आयुष्याचं ही तसच आहे. प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्याचं संगीत मन लावून निर्माण करावं. विश्वाच जादुई संगीत आपोआपच तयार होईल.
सरलता, विनम्रता, सहनशीलता आणि दया भाव हे संपत्ती सामान आहेत. जीवनाच्या नैसर्गिक प्रवाहासोबत जर वाहता आलं तर प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणं सोपं जातं . स्थावर असं काहीच नाही. समाधान आणि संतुलन हे जीवनाचे मंत्र असावेत. “
त्याचे शब्द ऐकत असताना मार्थाची नजर मात्र खिळली होती ती समोर वाहणाऱ्या नदीच्या संथ प्रवाहावर.
नदीचा प्रवाह जरी संथ असला तरी स्थिर नक्कीच नव्हता. तो प्रवाह पुढे त्या साथीने वेढलेल्या गावाकडे वळणे घेत जाताना स्पष्टपणे दिसत होता.
मार्था त्या प्रवाहाकडे एकटक पाहत म्हणाली,
“खरंच ! स्थिर असं काही नाही .हा प्रवाह बनलेला आहे असंख्य अश्या पाण्याच्या थेंबांनी. जे एकमेकांच्या अतिशय जवळ तर आहेत पण क्षणार्धात दूर देखील जातात.
हे जग सुद्धा बनलं आहे अशाच असंख्य माणसांनी . माणसंही की जे जीवनाच्या प्रवाहात वाहत आहेत. वाहत तर सर्वानाच जायचे आहे.
इथे आल्यावर मला जे अनुभव मिळाले ते अनपेक्षित होते. एखाद्याने आपलं आयुष्य आतापर्यंत डबक्यात घालवावं अन् अचानक त्याला समुद्रात जाण्याची संधी मिळावी असं वाटतंय मला. आयुष्याच्या ह्या वळणावर मी चकित झाले आहे. ह्या सर्व कॉन्व्हेन्टमध्ये काम असलेल्या माणसांना आणि तिथे आश्रयाला असलेल्या अनाथ मुलांना पाहून.”
जॉन मार्थाचा चेहरा न्याहाळत होता. तिचे डोळे मात्र शोधत होते ते दोन पाण्याचे थेंब की जे नदीच्या संथ गतीसोबत वाहत जाऊन अथांग सागराला मिळणार होते.
