मानस-कैलास

--वर्षा सबनीस--




बर्फाच्छादित पर्वतरांगांमधून वळणं घेत घेत , आमची बस थांबली. सगळेजण कुतूहलाने आजूबाजूला बघत होते. ज्या कैलासाच्या दर्शनाकरता  इतके लांब आलो होतो तो दिसेना. आम्ही खाली उतरलो …आणि डोळ्याचे चे पारणे फिटणे म्हणजे काय हे त्या दिवशी कळलं .समोर स्फटिकासारखे चमचमतं निळसर हिरवं, शांत मानस सरोवर होतं. समुद्रसपाटीपासून १५०६० फुटावर असलेलं  गोड्या पाण्याचे  तळे .असा निळसर हिरवा रंग फक्त प्रकृतीच्याच कुंचल्यातून येऊ शकतो . आजूबाजूला असलेले बर्फाच्या टोप्या घातलेले पर्वत आणि नितांत सुंदर मानस सरोवर. मनाच्या कॅमेरात हे दृश्य साठवायला जागा कमी पडू लागली . आमच्या बरोबर गाईड होता. त्याला म्हटलं ,”अरे, कुठे आहे कैलास पर्वत ?”तर तो म्हणाला, “हे काय ,बघा मागे .” आम्ही मागे वळलो . पर्वतराजीमधून दिमाखात एखाद्या महाराजासारखा, बर्फाच्छादित कैलास दिसला.  सगळे डोळ्याची पापणीही न हलवता ,कैलास पर्वताचे दर्शन घेत होते . मी सहज माझ्या बाजूला उभ्या असलेल्या 

माझ्या जावेकडे बघितलं. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते . अजून दोघी तिघी मैत्रिणींची पण अशीच अवस्था होती. मी मात्र माझे अश्रू थांबवायचा प्रयत्न करत होते ,कारण भरल्या डोळ्यात कैलास मावायचा कसा ? ज्या कैलासाच्या दर्शनाकरता गेली ४,५ वर्ष आम्ही खूप प्रयत्न करत होतो , त्या कैलास पर्वताला समोर बघून डोळे भरून आले . देव भेटल्याचे आनंदाश्रू होते ते . समोर मानस सरोवर आणि त्याच्या उत्तरेला कैलास पर्वत असे मनोहर दृश्य होते .

       चार प्रमुख नद्यांचे उगम स्थान असलेले मानस सरोवर .सिंधू, सतलज,ब्रह्मपुत्रा आणि करनाली ह्या नद्यांमुळे तिबेट, भारत, पाकिस्तान मधील लाखो ,लोकांना उपजीविकेचे साधन, जीवनदान मिळाले आहे. 

           आज मी आमच्या कैलास मानस सरोवर या आमच्या प्रवासाचे वर्णन करणार नाही. कैलास पर्वताच्या ज्या पौराणिक कथा आहेत, आख्यायिका आहेत त्या वाचून ,नंतर मला आलेला अनुभव  मी इथे सांगणार आहे . मी कैलासाची माहिती ही देणार नाही . ती तर गुगल वर आहेच . 

            कैलास पर्वताबद्दल इतकं वाचलं होतं, इतकं ऐकलं होतं की त्याच्या भेटीचा योग कधी येणार याची 

वाट बघत होतो . आवर्जून पौर्णिमा बघून टूर ठरवला होता . पौर्णिमेच्या रात्री चांदणं खाली उतरताना दिसतं असं ऐकलं होतं ,पण आमच्या नशिबाने त्या दिवशी काळे कुट्ट ढग होते आणि त्यातून बर्फ पण पडायला सुरुवात झाली . आम्ही दुलईत गुरफटून बसलो . नीरव शांतता म्हणजे काय, ती अनुभवली .

          कैलास पर्वतापासून सृष्टीची सुरुवात झाली असे म्हणतात. कैलास पर्वत मानस सरोवरापासून लांब असूनही एक विलक्षण ऊर्जा जाणवली . दैवी शक्तीचा तिथे वास जाणवला. मानस सरोवरा पासून 3 किलोमीटर लांब ,एक खाऱ्या पाण्याचे मोठे तळे आहे.त्याला राक्षस ताल असे म्हणतात .निसर्गाची ही पण किमयाच की नाही ?

            सगळे म्हणतात, कैलासावर शिवपार्वती राहतात .कुणास ठाऊक खर काय ते …मुळात शिवपार्वती म्हणजे आपल्यासारखे दोन हात, दोन पाय, एक डोकं असणारी व्यक्ती आहे का ? माझ्या दृष्टीने तर नाही . ती एक अगम्य शक्ती आहे, ह्या सृष्टीची निर्माती आहे . ऋषीमुनींनी ह्या अगम्य शक्तीशी एकरूप होण्याकरता काही चिन्ह तयार केली . जसे स्वस्तिक, ओम . ह्या चिन्हांवर लक्ष केंद्रित करून ,ह्या सृष्टीच्या लयीशी तद्रूप होणे सुलभ होते . तसेच  ऋषीमुनींनी 

देवांची रूपही तयार केली.  आता ही रूपं मनात असली, की भास ही तसेच होतात . त्यामुळे कैलास मानस सरोवरच्या ,ज्या कथा ऐकल्या होत्या ,त्यामुळे लोकांना वेगवेगळे भास होतात ,हे जाणवलं . कुणाला कैलासावर नागाचा फणा दिसतो तर कुणाला गणपतीचा आकार दिसतो .

         कैलास पर्वतावर आणि आजूबाजूला असलेली ऊर्जा खूप विचार करायला लावते. यावर बरेच संशोधनही सुरू आहे .उपग्रहाद्वारे कैलास पर्वताचे बरेच फोटो काढून, त्यावर आपल्या पुराणांच्या आधारे, नवनवीन शोध लागत आहेत .

       खरं तर कैलास पर्वताची उंची २१७७८ फूट .म्हणजे एवरेस्ट पेक्षा कमीच. पण तरीही आज पर्यंत कुणीही कैलासावर जाऊ शकले नाही . काही तरी अपघात होऊन गिर्यारोहक परत आले नाहीत किंवा अर्ध्यातूनच परत यावे लागले . इतकेच नाही तर विमानं सुद्धा कैलास पर्वता जवळ जाऊ शकत नाहीत. फार पूर्वी मिलेरपा नावाचा बौद्ध तांत्रिक, सूक्ष्म रूपाने कैलासावर जाऊन आला अशी कथा आहे . आता तर चीन सरकार ने कैलासावर गिर्यारोहण करण्या वर बंदी घातली आहे .वर्षभर हिमाच्छादित असलेल्या कैलासावर हवामान सुद्धा अतिशय प्रतिकूल असते.

तरीही, हिंदू, बौद्ध ,जैन आणि बॉन, ह्या चार धर्माचे भाविक कैलास पर्वताच्या दर्शनाला येतात. त्या खडतर प्रवासात , प्राणवायूच्या कमतरतेतही देवाला भेटायची सगळ्यांची प्रबळ इच्छा दिसून येते .

           दुसऱ्या दिवशी आम्ही परिक्रमेला सुरुवात करणार होतो . रात्रभर झालेल्या हिमवर्षेमुळे मन साशंक होतं. आपली परिक्रमा पूर्ण होणार की नाही असे वाटत होते . हवामानाच्या बातम्याही चांगल्या नव्हत्या . म्हणून जीव धोक्यात घालण्यापेक्षा, एकच दिवस परिक्रमा करायची असे आम्ही ठरवले . त्यादिवशी मात्र कैलासाचे मनसोक्त दर्शन झाले.१७ किलोमीटर ची परिक्रमा करताना कैलास  सतत आमच्या उजव्या बाजूला होता .त्या विराट रूपाने आपण किती खुजे आहोत हे सतत जाणवत होते. नास्तिकाला सुद्धा कैलासाचे दैवी रूप भुरळ घालू शकते.

         रात्री मुक्कामाला पोचलो तिथून कैलास असा समोर उभा दिसत होता. आदल्या दिवशीच पौर्णिमा झाली होती, त्यामुळे चांदण्यात न्हाऊन निघालेला पांढराशुभ्र कैलास ,आजही मनात त्याच दिमाखात ,तसाच उभा आहे . ह्या आयुष्यात परत असे दर्शन होणे नाही हे माहिती असल्याने कैलासाची रूपे मनात कोरून, साठवून ठेवली. तिथे देवाचे वास्तव्य आहे 

की नाही हे वादातीत असले , तरी निसर्गाची ही किमया बघूनही नतमस्तक झाले.

          कैलास पर्वताचा आकार एका पिरॅमिड सारखा आहे . चार बाजू असलेला कैलास पर्वत म्हणूनच ऊर्जेचे स्रोत आहे. आमच्या समुहा पैकी चार जण दुसऱ्या दिवशी  चरण स्पर्शाला गेले . चरणस्पर्श म्हणजे कैलास पर्वताच्या पायथ्याशी जाऊन डोकं टेकून येणे. आमच्या मुक्कामापासून साधारण 4 किलोमीटर अंतर चालत गेले . त्या चौघा मध्ये माझे यजमान पण होते . तिथे जाऊन त्यांनी जे अनुभवलं ते केवळ शब्दातीत . प्रचंड ऊर्जा आणि देवाचे निकट वास्तव्य यामुळे ते खूप भावुक झाले . कधीच न विसरता येणारा क्षण होता .

            कैलासावर सूर्योदय बघणे म्हणजे पर्वणीच .पहाटे कडाक्याच्या थंडीत उठून, सूर्योदय बघायला बाहेर आलो. अजून अंधारच होता . हळूहळू कैलासाचे  शिखर उजळून सोनेरी व्हायला लागले . जणू सूर्य  अंधाराचा  पडदा हळुवारपणे सरकवून,आपली पहिली किरणे कैलासावर पसरून,वंदन करत होता . त्या पहिल्या किरणांनी कैलास, सोन्याचा गोळा असल्याप्रमाणे उजळून निघाला . नंतर हळूहळू आजूबाजूला असलेल्या पर्वतरांगा ही सूर्यप्रकाशात न्हाऊन निघाल्या. विलक्षण अनुभव होता तो .

         अश्या निसर्गाच्या अनेक लीला, अनेक चमत्कार कैलासच्या यात्रेत अनुभवायला मिळाल्या. चराचरात देव आहे हे जरी खरं असलं तरी कैलासाच्या परिसरातील देवत्व , त्याच्या दिव्यत्वाने कायमचे मनात घर करून राहिले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *