पुरुदत्त रत्नाकर
अरे ‘बाप‘रे!‘
पाल्य आणि पालक यांचे संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध?’ हा विषय वाचून मी प्रचंड म्हणजे खूपच विचारमग्न झालो. चिरंजीव म्हणाले, “बाबा, दुपार टळली तरीही अजून दाढीसुद्धा केली नाहीत ..” …आणि मी शिस्तीत रविवार सुरू केला. या वाक्यांमधून प्रतीत होणारे आमचे संबंध कसे आहेत? मैत्रीपूर्ण का शिस्तबद्ध? मुळात मैत्रीपूर्णला शिस्तबद्ध हा पर्याय ठरवला तर मैत्रीत शिस्त नसते आणि शिस्तबद्ध संबंधांमध्ये मैत्री नसते असा अर्थ निघतो. हा अर्थ बरोबर आहे का?
नावच मित्र असलेल्या सर्व चराचर सृष्टीच्या पालकाचं उदाहरण घेऊया. सूर्यदेव खरोखरच आपले सर्वोत्तम मित्र आणि सर्वोत्तम पालक आहेत. मित्र उगवला नाही तर आपण कोणीही जगणार नाही. पण शिस्तीचं दुसरं नाव म्हणजेच तो दिनकर. त्या हिरण्यगर्भाने आपल्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे म्हणजे वेगळं काय करायचं? तो शिस्तीत रोज उगावतो, तळपतो, ऊर्जा देतो आणि मावळतोही; ती शिस्त हीच त्याची आपल्याशी मैत्री आहे. मित्र म्हणून तो चंद्रासारखा आल्हाददायक होऊ शकत नाही किंवा थंड होऊन सूर्यमालेत सहलीला नेऊ शकत नाही.
फारच असंबद्ध वाटायच्या आत मूळ मुद्द्यावर येतो. मैत्रीपूर्ण आचरण म्हणजे समान पातळीवरचं किंवा छानछान आचरण असा अर्थ होत नाही. सूर्याच्या दाखल्याचा मला पोहोचवायचा अर्थ हा की पालक आणि पाल्य यांनी आपापल्या भूमिकेची शिस्त पाळली तरच ते संबंध मैत्रीपूर्ण असतात, रहातात. कित्येक प्रकाशवर्ष दुरून ऊर्जा देत सूर्य प्रकाशाने तळपतो. पाल्य पोक्त किंवा प्रौढ होईपर्यंत अनुभव, क्षमता, कर्तुत्व, माहिती, ज्ञान आणि निर्णयक्षमता या सगळ्यामध्ये जे पालक तळपतात ते पाल्याचे खरे मित्र ठरतात. यासाठी आवश्यक तेवढं अंतर असणं, ते आहे याची जाणीव पाल्याला असणं आवश्यक आहे.
आमच्या पिढीत, बहुतांश मुलांचे आईशी मैत्रीपूर्ण संबंध होते असले तरी, बाप तो बाप ही होता था! कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा दरारा असायचा. ते त्यांचं स्थान घरातल्या ज्येष्ठ सदस्यांपासून सहधर्मचारिणीपर्यन्त सगळ्यांच्या त्यांच्याशी वागणुकीतून, संवादातून निर्माण झालेलं असायचं. पाल्यावर वचक बसवायला किंवा सालस भाषेत ‘पाल्याशी शिस्तबद्ध संबंध‘ ठेवायला खरं तर त्यांना वेगळं काही करण्याची गरज नव्हती. पण ते तळपायचे. ‘असा मी असामि‘ मधल्या बेंबट्याचे तीर्थरूप आणि शिक्षक आठवतात ना? त्या दोघांमध्ये मुलाला गेंड्याच्या शेपटीने बडवणं बरं का वेताची छडी अधिक गुणकारी याविषयी चर्चा होत असे.१९९० च्या आधी जन्मलेल्या बहुसंख्य बेंबट्यांना त्या वर्णनात स्वतःच्या पालकांशी साम्यस्थळं आढळतील. म्हणजे तेव्हाचे शिक्षकही तसे होते. समाजही शिस्तबद्ध होता. एकत्र कुटुंबातल्या मुलांचे पालक असे बेंबट्याच्या तीर्थरूपांसारखे असले तरी घरातल्या अन्य सदस्यांमार्फत मैत्रीपूर्ण, प्रेमाचे, ममता-मायेचे संबंध त्यांना अनुभवायला मिळायचे. त्यामुळे पालकांशी असलेल्या शिस्तबद्ध संबंधांची पडती बाजू सावरली जात असेल. एरवी जाणवत नसलं तरी असे विषय समोर आले की कळतं की पाल्यांना म्हणजे पुढच्या पिढीला वाढवणं हे सांघिक कार्य असतं.
काळ बदलला आहे. त्यामुळे आता विरुद्ध बाजू पुढे आली आहे. जागतिकीकरणाने विभक्त कुटुंबपद्धती आंदण दिली. महानगरांमध्ये आई आणि बाबा असाय-दिसायला वेगवेगळे असले तरी दोघंही त्यांच्या दिवसाचा जास्तीत-जास्त हिस्सा पैसे मिळवणं या एका उद्दिष्टासाठीच खर्च करतात आणि घर नावाच्या खुराड्यात पाल्याचं संगोपन करायला अन्य कोणती व्यक्ति नसते. अशा परिस्थितीत रोजचे एक-दोन तासच पाल्याचा सहवास असेल तर त्यात पालकांनी मैत्रीपेक्षाही प्रेमाने, ममतेने वागलेलं जास्त बरं राहील. संबंध किमान सौदार्हपूर्ण तरी हवेत. या प्रकारात येणार्या पालकांनी पाल्यांशी बोलतांना ‘धैर्य यस्य पिता क्षमा च जननी… ह्येते यस्य कुटुंबिनो कस्माद् भयम् योगिनः…‘ हे पाठ करावं. समाजात स्वतंत्रपणे वावरू लागल्यावर त्या पाल्याला शिस्त लागेल याची हमी घेता येईल पण प्रेम मिळेल याची शाश्वती नाही. ती गरज पालकांनी भागवून ठेवायला हवी. हल्लीच्या समाजात आणि शिक्षणपद्धतीत मूल हे फक्त उत्पादन म्हणजे ‘प्रॉडक्ट‘ आहे. आता शिक्षक-विद्यार्थ्यांचे संबंधही केवळ मैत्रीपूर्ण असतात. बाल आणि कुमारावस्थेत असेतो पालक वगळता इतर सगळ्यांकडून पाल्याला हवीहवीशी वागणूक मिळत असेल तर फक्त पालकांनी नकोशा पद्धतीने शिस्तबद्ध संबंध ठेवून कसं बरं चालेल? त्याने पाल्य पालकांपासून दुरावेल.
मैत्रीपूर्ण किंवा शिस्तबद्ध काहीही ठरवलं तरी एका ठराविक पातळीवर तशा प्रकारचे संबंध कायम ठेवणं शक्य नाही. कारण जन्मापासून प्रौढ होईपर्यंत पाल्याची शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक वाढ होत असते. त्यामुळे पाल्याच्या वयाच्या टप्प्याप्रमाणे बदलत्या पातळीची, छटांची वागणूक ठेवायला हवी. यासंदर्भातलं हे सुभाषित कालातीत आहे:
लालयेत पंचवर्षाणि
दशवर्षाणि ताडयेत् ।
प्राप्ते तु षोडषे वर्षे
पुत्रे मित्रवदाचरेत् ॥
बाल्यावस्थेच्या ५ वर्षांमध्ये लाड करा, सगळ्या शी-शू माफ करा. किशोरावस्थेच्या ५ ते १० वर्ष वयात थोडं कडक वागा, कारण आता त्याला थोडी समज आलेली असते. युवावस्थेच्या १० ते १६ वयात चुका केल्या तर शिक्षा करा, कडक वागा; कारण या वयात समज वाढते आणि सहनशक्ति येते. मात्र पालकांनी भाषेचं भान ठेवायला हवं, कारण ‘वाचा दुरुक्तम् वीभत्सम् न संहरते वाक्शतम्‘. १६ वर्षे वयानंतरच्या प्रौढ पाल्याची बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक वाढ पूर्ण होत आलेली असते. आता त्याच्यात सुधारणा घडायची तर ती अंतर्मुखतेने किंवा मैत्रीपूर्ण सल्ल्याने घडू शकते. म्हणून पालकत्वाच्या १६व्या वर्षी पालकांनी पाल्याचं मित्र व्हावं. हे तर्कसंगत वाटतं. पाल्याचा व्यक्तिमत्व विकास झाल्यावर ती स्वतंत्र आणि स्वावलंबी व्यक्ती असते. अशा घनिष्ट परिचयाच्या आणि वयामुळे शारीरिक, मानसिक दृष्ट्या अधिक सक्षम व्यक्तीशी ताटातूट होऊ द्यायची नसेल तर पालकत्वाच्या या टप्प्यापासून नक्की मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत, नाही का?
संबंध कसेही ठेवले तरी ठीकच, पण कसे ठेवावे या संभ्रमावस्थेत राहू नये. हा संभ्रम केव्हा निर्माण होतो? जेव्हा पाल्याची पालकाच्या मनातली प्रतिमा, अपेक्षा आणि प्रत्यक्ष समोर घडणारा पाल्य, त्याचं वर्तन यात फरक येत जातो. हा फरक बर्याच पालकांना झेपत नाही आणि आपण तो फरक मिटवायचा प्रयत्न करतो. असा प्रत्येक क्षण, प्रसंग पालकाला संभ्रमाच्या खाईत लोटतो. पाल्याशी योग्य प्रकारचे संबंध ठेवून पालक पाल्याच्या आवाक्यातलं उत्कृष्ठ व्यक्तिमत्व घडायची शक्यता निर्माण करू शकतो; स्वतःच्या कल्पनेतलं व्यक्तिमत्व लादू शकत नाही. आपल्याला जमलं तसं किंवा आपल्यालाही जमलं नाही ते करणारी व्यक्ती निर्माण करायची महत्वाकांक्षा ठेवली नाही तर अशा क्षणिक प्रश्नांच्या गहन समस्या तयार होणार नाहीत. हे सल्ले नाहीत, तर मिळालेल्या विषयाच्या अनुषंगाने झालेलं आत्मचिंतन आहे.
