शिल्पा धर्माधिकारी
सोनाला शाळेच्या बसपासून घरी आणायचे हे आजीचे रोजचे आवडते काम. आजी आणि नात घराजवळच्या शाळेच्या बस थांब्यावरून ते घरापर्यंत भरपूर गप्पा मारत येत असत. सोनाला रोज शाळेत घडलेल्या सगळ्या गोष्टी आजीला इत्थंभूत सांगितल्याशिवाय काही चैन पडत नसे. तर आजीलादेखील सोनाशी बोलताना आपले बालपण पुन्हा एकदा जगल्याचा आनंद मिळत असे.
आजही आजी तेवढ्याच उत्साहाने आणि नातीकडून कुठली गम्मत ऐकायला मिळेल? ह्या उत्सुकतेने तिला बस थांब्यावर आणायला गेल्या.
त्या तिथे पोहोचताच पाच मिनिटात शाळेची बस आलीसुद्धा. सोनाची बॅग आपल्या खांद्यावर घेत आजीने प्रश्न विचारला, “काय सोनाबाई, आज शाळेत काय गमतीजमती घडल्या?”
सोना : “अगं आजी, आज ना आमच्या शाळेत एक मुलगी जंगल जिम खेळताना त्याच्या खालच्या बारवरून जमिनीवर जोरात पडली. तिच्या डोक्याला खोक पडली आणि त्यातून खूप रक्त आले. पण ना तिथे जवळच रुपा नावाची एक मुलगी खेळत होती. तिने त्या लागलेल्या मुलीला पटकन मेडिकल रूममध्ये नेले आणि नर्स कडून ड्रेसिंग करून घेतले. मग आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी रुपाला ऑफिसमध्ये बोलावले आणि तिला त्या लागलेल्या मुलीला योग्य वेळी मदत केली म्हणून तिची पाठ थोपटली आणि बक्षीसही दिले.”
सोना आजीला सगळे भराभरा सांगत होती. आठ वर्षाच्या नातीच्या नाजूक आवाजात हा प्रसंग ऐकता ऐकता घर कधी आले हे दोघींनाही कळलेच नाही.
हात पाय धुवून दुपारचे खाणे झाले. पण काय माहीत सोनाच्या इवल्याशा डोक्यात सारखे तेच तेच विचार येत होते.
रात्री आजीच्या शेजारी झोपायला गेल्यावर परत एकदा तिने तोच विषय काढला. “आजी रुपा किती शूर मुलगी आहे ना गं? त्या मुलीला लागलेलं पाहून घाबरली नाही. मला तर फार भीती वाटते बाबा. ए पण तिने न घाबरता दुसर्याला मदत केली म्हणूनच तिला मुख्याध्यापकबाईंनी बक्षीस दिले ना?”
सोनाच्या चेहर्यावरून कौतुकाने हात फिरवत आजी म्हणाली, “अगदी बरोब्बर ओळखलेस की तू. अगं बाईंनी बक्षीस देऊन तिच्या ह्या बहादुरीचे कौतुकच केले.”
“सोनाबाई तुम्हाला माहित आहे का? आपल्या देशात देखील अशा बहादुरी दाखविणार्या १६ वर्षांपर्यंतच्या शूरवीर मुलांना दर वर्षी २६ जानेवारीला राष्ट्रपतींच्या हातून ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ दिला जातो.
भुवया उंच करत आश्चर्याने सोना म्हणाली, “आजी खरंच?”
आजी: “हो. त्यामुळे त्यांना आपण केलेल काम किती चांगले आहे हे लक्षात येते आणि कुठल्याही परिस्थितीत न घाबरता तोंड देणे किती गरजेचे आहे हे लक्षात येते.”
सोना: “ए आजी, मग तु मला अशा एखाद्या शूरवीर मुलाची गोष्ट माहीत असेल तर सांग ना प्लीज.”
सोना आपले एवढेसे हात आजीच्या गळ्याभोवती टाकत गोष्ट सांगायची गळ घालत होती. इतक्या गोड आग्रहाला त्या नाही कशा म्हणणार?
नुकतेच असा पुरस्कार मिळालेल्या एका बहादूर मुलीबद्दल त्यांच्या वाचनात आले होते. त्यामुळे त्यांनी लागलीच छोट्या सोनाच्या हाताचा पापा घेत म्हणाल्या, “सांगते हो. नीट ऐक.”
आजी : “ही गोष्ट आहे हिमप्रिया नावाच्या आंध्र प्रदेशमध्ये राहणार्या मुलीची. २०१८ साली घडलेली ही खरी घटना आहे बरं का चिऊताई. तेव्हा तिचे वय किती होते माहित आहे ? फक्त आठ वर्ष. “
सोना: “अय्या! म्हणजे माझ्याच वयाची होती की ती.”
आजी : “ह्म्म. तिचे वडील आर्मीत होते. नुकतेच त्यांचे पोस्टिंग जम्मू मधल्या उधमपुरमध्ये झाले होते. पण त्यांना उधमपुरमध्ये क्वार्टर मिळेपर्यंत ते सगळे तिथल्या सुजवाण आर्मी कॅम्पमधल्या फॅमिली क्वार्टरमध्ये रहात होते.
जम्मू हे आपल्या देशाच्या बॉर्डरवर येणारं राज्य. इथे दहशतवाद्यांची भीती कायमच असते बरं का.”
सोना: “दहशतवादी म्हणजे?”
ह्या छोट्या आणि निष्पाप जीवाला काय समजून सांगावे? हा प्रश्न आजींना पडला. मग पटकन तिच्या वयाला पटेल असेच त्यांनी बोलायचे ठरवले.
आजी: “अगं दहशत म्हणजे भीती आणि दहशतवादी म्हणजे भीती दाखवणारा. जम्मू राज्य आपल्या देशाच्या बॉर्डरवर येते ना, त्यामुळे शेजारच्या देशातील काही लोकं जबरदस्तीने आपल्या देशात घुसतात. अशी जबरदस्तीने घुसून आपल्या देशाच्या विरोधात काम करणारी लोकं म्हणजे दहशतवादी. हे आपला मतलब साधण्यासाठी सर्वसामान्य लोक, सैनिक यांच्यावर बंदूक, बॉम्बसारख्या शस्त्रांनी बेसावधपणे हल्ला करतात. कधी कधी त्यात लोकं जखमी होतात, तर कधी मारलीही जातात. इतकेच नाही तर आपल्याकडून रूप बदलून माहितीही काढून घेतात.”
“असेच काहीसे १० फेब्रुवारीला सकाळी घडले. नेहमीप्रमाणे तिचे बाबा उधमपुरला आपल्या कामावर निघून गेले होते. जम्मूच्या अतिव थंडीमुळे लोकं कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडता घरात रहाणेच पसंत करत होते. त्यामुळे सगळा परिसर शांत होता. अशावेळी अचानक हिमप्रिया रहात असलेल्या आर्मी कॅम्पमध्ये ५ दहशतवादी घुसले आणि त्यांनी तिथे राहणार्या लोकांना घाबरवण्यासाठी फायरिंग सुरू केले. तेव्हा घरी तिच्यासोबत तिची आई आणि 2 छोट्या बहिणी होत्या.
हमला झालेला कळताच आपले भारतीय सैनिक लगेच तिकडे धावले. त्यांनी दहशतवाद्यांना शोधायला सुरवात केली.
काही सैनिक स्पीकरवरून दहशतवाद्यांना जोरजोरात सांगत होते, तुमच्याकडे असलेल्या बंदुका, शस्त्रे टाकून द्या आणि आम्हाला शरण या. नाहीतर आम्हाला तुमच्यावर गोळ्या झाडाव्या लागतील.
इकडे सैनिक आलेले कळताच आपण पकडले जाऊ नये म्हणून दहशतवादी वेगवेगळ्या दिशेने पळत सुटले. लपण्यासाठी घर, खोली काही मिळत आहे का हे शोधू लागले. पळता पळता मधेच केव्हातरी एखाद्या झाडामागे लपून ते सैनिकांवर गोळ्या झाडत होते. पण आपले शूर जवान न घाबरता उत्तर म्हणून त्यांच्यावर गोळ्यांनी पलटवार करत होते.
दोघांमध्ये अशा चकमकी बराच वेळ सुरू होत्या. घरात राहणारी लोकं ह्या गोळ्यांच्या आवाजाने घाबरली होती. लोकं घाबरून घरातून बाहेर येऊ नयेत म्हणून आपले सैनिक सगळ्या लोकांना स्पीकरवरून सांगत होते की, “इथे दहशतवादी हल्ला झाला आहे. पण घाबरू नका. आम्ही त्यांना पकडण्यासाठी आलो आहोत. तेव्हा घरातून बाहेर येऊ नका. काही झाले तरी घराची दारे बंद ठेवा. उघडू नका.”
हे सगळे ऐकून घरात रहाणाऱ्या लोकांनी आपली दारे घट्ट बंद केली. ते घरात एका सुरक्षीत ठिकाणी जाऊन लपून बसले.
बाहेर गोळ्यांचे आवाज ऐकू येत होते. ह्या चकमकीत ५ पैकी दोन दहशतवादी मारले गेले आणि दोघे स्वतःचा जीव वाचवत रिकाम्या घरात लपले.
एक दहशतवादी मात्र लपण्यासाठी जागा शोधत असताना अचानक एका घरापाशी येऊन थांबला. तिथे जवळपास कुठेही सैनिक नाहीत हे बघून त्याने ह्या घरात लपायचे ठरवले आणि तेच घर नेमके हिमप्रियाचे होते. आता तो आत लपण्यासाठी जोरजोरात धक्के देऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला.”
सोनाने भीतीने स्वतः च्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, “अरे बापरे! मग गं आजी? त्याने दरवाजा तोडला?”
आजी: “नाही बेटा. त्या मायलेकींच्या एवढं लक्षात आलं होतं की त्याला काही झालं तरी आत येऊ द्यायचं नाही. जर तो आत आला तर तिथेच लपून बसेल. कदाचित स्वतः च्या फायद्यासाठी त्यांना मारूनही टाकेल. मग त्या दोघींनी दाराजवळच्या खुर्च्या, सोफा सरकवून, तसेच जवळच्या एक दोन जड वस्तूंनी दरवाजा घट्ट बंद केला. त्यामुळे त्याला दार उघडणे अवघड जाऊ लागले. आपल्या हाताने, खांद्याने धक्के देत दरवाजा तोडायचा प्रयत्न करून करून शेवटी तो दमला.”
हे ऐकताच आता तो आत येऊ शकणार नाही असे वाटून सोना आनंदाने टाळ्या वाजवू लागली.
आजी: “अगं पण त्याच्याकडे बंदूक, छोटे बॉम्ब होते ना. त्याच्या एकदम लक्षात आले की छोट्या बॉम्बच्या मदतीने तो ते दार सहज तोडून आत जाऊ शकतो.
मग त्याने पटकन स्वतः जवळचा बॉम्ब बाहेर काढून त्या दारावर टाकला. त्याबरोबर दार तुटले आणि दाराजवळच्या भिंतींच्या काही विटांचे तुकडे इकडे तिकडे उडाले. त्यात हिमप्रिया तर जखमी झालीच पण तिच्या आईला खूप लागले आणि ती बेशुद्ध पडली. पण सहनशील हिमप्रियाने स्वतःच्या जखमांकडे दुर्लक्ष केले अन् आईला उठवायचा प्रयत्न करू लागली. इतक्यात तो आत आलाच.
पण आपली छोटुकली हिमप्रिया शूर होती ना. बाबांकडून तिने आपल्या सैन्याच्या शूरकथा ऐकल्या होत्या. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीला न घाबरता तोंड देण्याइतकी ती शूर बनली होती. तिच्या लक्षात आले की आईला लागले आहे. त्यामुळे आता आईची मदत मिळणार नाही. आता आपल्यालाच आईला आणि दोन्ही बहिणींना वाचवायला हवे. बर्याचशा दहशतवादी हल्ल्यांविषयी गोष्टी ऐकल्यामुळे तिला हे ही माहीत झाले होते की जवान त्यांना शोधत शोधत त्याला पकडायला इथे नक्की येतील. पण तोपर्यंत आपल्याला त्याला इथेच थांबवून ठेवायला हवे. त्याबरोबर तो आपल्याला, आईला आणि बहिणींना काही करणार नाही ह्याची पण काळजी घ्यावी लागणार आहे.
पण तो ही चालाख होता. हिमप्रियाच्या घरात त्याने फॅमिली फोटो पहिला होता. त्यावरूनच तिचे वडील आर्मीत आहेत हे त्याने जाणले होते. हिला बंदुकीचा धाक दाखवून आपण आपल्याला हवी ती सगळी माहिती हिच्याकडून काढून घेऊ शकतो असा दुष्ट विचार त्याच्या मनात आला. त्यामुळे तो आता तिला बंदुकीचा धाक दाखवत विचारत होता, “सांग तुझे बाबा कुठे गेले आहेत? कुठल्या कामासाठी गेले आहेत? ते आम्हाला आणि आमच्या लोकांना पकडण्यासाठी काय काय करत आहेत? ही बंदूक बघितलीस का? नाही सांगितले तर गोळ्या घालून मारून टाकेन तुला. तेव्हा सांग लवकर.”
“बापरे! किती दुष्ट आहे हा माणूस. अगदी परिकथेतल्या राक्षसासारखाच आहे ना आजी हा?” असे म्हणत सोनाने आपले अंग भीतीने आक्रसून घेतले.
आजी : “अगं पण हिमप्रियासुध्दा खूप धीट आणि बहादूर मुलगी होती. आपल्या वडीलांच्या कामाविषयीची माहिती कुणालाही सांगितली नाही पाहिजे हे तिला चांगलेच माहित होते. त्यातून दहशतवाद्यांना तर नाहीच नाही. त्याला माहिती नाही सांगितली तर तो आपल्याला मारून शकतो हे माहीत असूनदेखील आपल्या जीवावर उदार होऊन तिने त्याला काहीही सांगितले नाही. उलट धीटपणे, न घाबरता, हुशारीने त्याला बोलण्यामध्ये गुंगवून ठेवले होते.”
सोना : “वा! खरंच किती शूर आहे ना ती.”
आजी: “हो मग! एवढी छोटी मुलगी पण प्रसंग लक्षात घेऊन, योग्य विचार करून बरोब्बर तशी तशी वागत होती. जवळपास तीन तासानंतर सैनिक तिथे आले. घराचा तुटलेला दरवाजा पाहून दहशतवादी इथेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी त्या घराला पूर्ण वेढा घातला. तोपर्यंत तिने मोठ्या धिटाईने आणि हुशारीने त्याला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवले होते.
सैनिक जोरजोरात स्पीकरवरून त्या दहशतवाद्याला सांगत होते, “आम्ही ह्या घराला वेढा घातला आहे. आता तू इथून पळून जाऊ शकत नाहीस. तेव्हा आम्हाला शरण ये. “
आपण आता पुरते अडकलो आहे हे त्याच्या लक्षात आले. आपण सैनिकांच्या ताब्यात सापडलो तर ते आपल्याकडून देशाच्या विरोधातील आपले सगळे प्लॅन, माहिती तसेच आपल्याबरोबर काम करणार्या लोकांची सगळी माहिती काढून घेतील आणि त्यांनासुद्धा पकडतील असे विचार त्याच्या डोक्यात आले. मग तो लगेच घराच्या मागच्या दाराने सैनिकांना गुंगारा देऊन पळाला. तो मागच्या दाराने पळाला हे बघून हिमप्रिया धावतच सैनिकांकडे गेली . तिने त्यांना तो मागच्या दिशेने पळाल्याचे सांगितले. तसेच आत जखमी आई आणि दोन छोट्या बहिणी अडकल्या आहेत, त्यांना पण मदत करा असे सांगितले. मग काही सैनिकांनी तिच्या आई, बहिणींना सुखरूप बाहेर सोडवून आणले. तर काहींनी त्या दहशतवाद्याच्या मागे जाऊन त्याला पकडले.”
“हे … शूर हिमप्रियाने त्याला पकडून दिले.” असे म्हणत सोना टाळ्या वाजवू लागली.
आजी: “हो सोनाबाई, अशा प्रकारे बहादूर हिमप्रियाने आपल्या आई आणि बहिणींना तर वाचविलेच, त्याबरोबर दहशतवाद्यांना पकडून देण्यासाठी आपल्या सैन्याला आणि देशालाही मदत केली.
अशा ह्या बहादूर, छोटुकल्या, धिटुकल्या आणि हुशार हिमप्रियाला तिच्या शूर कामगिरीबद्दल ह्या वर्षी म्हणजे २०२२ ला ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ मिळाला.
काय कशी वाटली खऱ्या हिमप्रियाची खरी गोष्ट? आवडली ना? कुठल्याही परिस्थितीत न घाबरता त्याला तोंड दिले पाहिजे हेच तिने दाखवून दिले. हो की नाही?
उत्साही आवाजात सोना म्हणाली, “हो आजी. मला हिमप्रिया आणि तिची गोष्ट खूप खूप आवडली. आता मी पण तिच्यासारखे शूर व्हायचे ठरवले आहे.”
“शाबास रे मेरे पठ्ठे!” असे म्हणत आजीने सोनाला आपल्या कुशीत घेत तिचा पापा घेतला आणि तिला थोपटायला लागली.