सौ. उज्वला तायडे, अकोट
बालगुटी लहान मुलांना ठराविक वयापर्यंत दिली जाते. मूल मोठे झाल्यानंतर त्याची गरज उरत नाही. म्हणजे काही गोष्टी या त्या वयातच देणे गरजेचे असते.संस्काराचेही असेच आहे.यासाठी मुलांना आवडणाऱ्या गोष्टी,त्यांच्या सुपिक, मनरुपी क्षेत्रात योग्य बीज योग्य वेळी पेरणे गरजेचे असते.यासाठी त्यांना आवडणाऱ्या क्षेत्राबद्दल त्यांच्याशी मित्रत्वाचे पालकांनी वागले तर त्यांना योग्य ती दिशा मिळते.
मुलांच्या अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक घटनांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्यावर होत असतो.लहान मुलांनी एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला काही विचारले ,तर आपण त्यांना खरे तेच सांगावे. उगाच काहीतरी थातुरमातुर सांगू नये. उदाहरण द्यायचे झाले तर, चंद्रावर असलेल्या डाग, त्यावर हरीण किंवा ससा नसून चंद्रावर खोल अशी विवरे आहेत असे सांगावे म्हणजे लहानपणापासूनच मुलांचा पालकांवर विश्वासाचा मतप्रवाह निर्माण होईल .उगाच मुलांना काल्पनिक विश्वात गुरफटून टाकू नये.
मुलांना गोष्टी ऐकायला आवडतात तेव्हा आपण मुलांचे पालक म्हणून गोष्टी सांगतांना त्यांचे मित्र बनू आपल्याला कळणार देखिल नाही. पूज्य सानेगुरुजींच्या सर्व कथा संस्कारक्षम आहेत. तशाच अरेबियन नाईट्स, पंचतंत्र, सिंहासन बत्तीशी, किशोर मासिकातील कथा.
पालकांना आपल्या पाल्याला काय हवं, काय नको हे जाणता आलं पाहिजे. आपल्या मुलांच्या मनावरची गुंतागुंत ही वाचता यायला हवी.आणि त्या गुंतागुंतीची आपल्या कौशल्याने गुंफणही करता यावी, गुंता सोडवण्यासाठी मदत करायला हवी.
आजकाल काय होत आहे की पालक व्यावसायिक दृष्ट्या अतिव्यग्र असतात. पोटाच्या गरजेसाठी, बदलत्या जीवनमानाशी जुळवून घेताना, त्यांची अशी धावपळ चाललेली असते, की त्यांचे शब्दांत वर्णन करणे अवघड आहे.काही घरांमध्ये मुलांना पालक पंधरा पंधरा दिवस दिसतच नाहीत.पुष्कळदा पालक व पाल्य यांच्यात संवाद होतो; पण सुसंवाद साधला जात नाही. माध्यमांच्या अतिरिक्त व अनावश्यक वापरामुळे आजची मुले ही चंचल झाली आहेत.मुलांचे मन भरकटेल अशी दृश्य सातत्याने डोळ्यांत ओतणारी प्रसारमाध्यमे आहेत.
मुले रात्रंदिवस गुन्हेगारी चित्रपटातील कट कारस्थाने पाहताना, त्यांच्यातही भविष्यातील एक गुन्हेगार निर्माण होण्याची मोकळीक आजचा वर्तमान देत आहे.आजची तरुण पिढीची स्थिती ही भरकटलेल्या व वाट चुकलेल्या वाटसरू सारखी झाली आहे. अशा अवस्थेत त्यांना समजून घेऊन योग्य मार्गाकडे घेवून जाण्यासाठी आपुलकीच्या व मायेच्या स्पर्शाची आणि शब्दांची खरी गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
ज्याच्या घरात सुसंवाद व सुसंस्कार चे अधिष्ठान आहे ती ती मुले जीवनाच्या काठावर येतील पण मग बाकीच्यांचे काय?सध्याच्या मुलांच्या बदलत्या मानसिकतेत पालकांनी मुलांसोबत मित्रत्वाचे राहून त्यांना भरकटन्यापासून दूर ठेवू शकतो.मुलांना मनाची एकाग्रता, मोबाईल सारख्या साधनांचा वापर कसा करावा, चित्रपटातील भासमान व खोटे विश्व व सत्य यातील फरक पालकांनी पाठीवर हात फिरवून मुलांना सांगितला तर नक्कीच मित्रत्वाचे नाते निर्माण होऊन बऱ्याच प्रश्नांची उकल होईल.
खूप लोकांच्या बोलण्यातून ऐकायला मिळते नवीन पिढी ही बोलण्यात उद्धट झाली आहे.खरे तर मुलांची उद्धटता ही जाणूनबुजून वाढलेली नसून ;ती जे बघतात, सतत मोठ्यांचे जे ऐकतात त्यांचाच तो दुष्परिणाम असतो.
मुलांचे वेळोवेळी केलेले कौतुक,प्रोत्साहन, मार्गदर्शन वळणावळणावर कधी सूचक तर कधी ठळकपणे केलेल्या “सावर रे!”या भावनेच्या सूचना यातून त्या मुलाचे माणूसपण समृद्ध झालेले असते.आणि त्यांच्यातील माणूस समग्रतेने समृद्ध व्हावा ;संवेदनशील उत्कट व्हावा;सर्वांगीण विकासाने त्यातील कृतज्ञ नागरिक घडावा हेच पालकांनी उद्दिष्ट ठेवले पाहिजे.आणि त्या उद्दिष्टासाठीच डोळस मैत्रभावणेची गरज आहे.आजकाल चे माझेसारखे असंख्य पालक ह्या नात्यात मैत्रभाव संस्कारांनी जपतात.
आई वडील आणि मुले हे नाते इतर नात्यांपेक्षा अतिशय वेगळे, जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे असते. हे नाते जेवढे घट्ट व प्रामाणिक तेवढे त्या कुटुंबात सुख, समाधान, प्रेम व आनंद आपल्याला दिसून येतो. मुलांच्या लहानपणापासूनच जर आपण जागरूक पालक म्हणून सतर्क राहिलो, मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवले व संगोपन केले तर ते नाते अधिक निकोप बनते आणि नक्कीच सुसंस्कारित पाल्य तयार होऊन संस्काराची जडणघडण त्यात दिसून येते.आपली दिवसभराची धावपळ शेवटी मुलांसाठी असते तेव्हा करिअर सोबतच मुलांचे योग्य संगोपन व त्यांना वेळ देणे हेसुद्धा महत्वाचे आहे.
पूर्वी नात्यातील गोडवा एकत्र कुटुंब पद्धतीमुळे टिकून होता. जेष्टांबद्दलची आस्था व काळजी, आईवडील आणि गुरुजनांप्रति असलेला आदर त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून यायचा आज या गोष्टींचा अभाव जाणवतो.बदललेल्या परिस्थिती मुळे ,पाश्चात्य संस्कृती अधिक प्रभावी झाल्यामुळे आजच्या तरुण पिढीचे वर्तन अतिशय विदारक आहे. याला कारण आधुनिकीकरण, जागतिकीकरण .सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जीवन धावपळीचे आहे. हीच धावपळ माणसाला माणसापासून दूर नेत आहे.याला काही अपवादही आहेत.
संगणकाचा अवतार ज्या गतीने बदलत गेला त्यापेक्षाही वेगाने गेल्या पाच वर्षांत सेलफोनचे रूप अंतरंग बदलले.आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. आता प्रत्येक वस्तू, उपकरण स्मार्ट असणे चैन नसून गरज होत चालली आहे,तेव्हा ह्या युगात आपले मुलं पालकांच्या मदतीने, त्यांच्या हातात हात घालून स्मार्ट होणे गरजेचे आहे.
किशोरवयीन मुलांच्या विश्वात जर डोकावून बघितले तर दिसणारे वास्तव अतिशय भयानक आहे. मुलांकडून होणाऱ्या चुकांमुळे त्यांच्यावर न रागवता त्यांना समजावून सांगून सुधारण्याची एक संधी नक्कीच दिली पाहिजे.पुढील काळ अधिक स्पर्धेचा, गुंतागुंतीचा, आव्हानांचा आहे.मैत्रीपूर्ण वातावरणात एकमेकांशी सुसंवाद साधला गेला तर कुटुंबात आनंदी वातावरण तयार होईल व पालक आणि पाल्य यांचे संबंध वृद्धिंगत होण्यासाठी नक्कीच मदत होईल.तेव्हा फक्त पालक होण्यापेक्षा सुजाण, जागृत व सहृदयी पालक होऊन आपल्या पाल्यांशी मैत्रीपूर्ण नात्यात राहणे महत्वाचे.
