— राजेंद्र पडतुरे —
अशी आख्यायिका आहे, की अंगापूरच्या तळयात समर्थांना श्री रामाची मूर्ति गवसली, जी त्यांनी मांड नदीच्या किनारी स्थापित केली आणि त्या ठिकाणी १६४८ साली प्रभू रामचंद्रांचे संगमरवरी देऊळ बांधले.
मनाचे श्लोक कसे आणि केंव्हा लिहिले गेले, या बद्दल वेगवेगळया स्त्रोतांमध्ये अनेक मते मांडली गेली. या बद्दल अरूण गोडबोले यांनी दिलेली माहिती अशी आहे, अन्य काही आयव्यवस्था नसल्या कारणानी दर वर्षी चाफळ येथे दहा किलोमीटरच्या परगण्यातून भिक्षा गोळा करून श्री रामनवमीचा उत्सव साजरा केला जात असे. चाफळ, साताऱ्यापासून ३५ किमी आणि पुणे बंगलोर राजमार्गावर असलेल्या उंब्रजपासून १५ किमी दूर मांड नदीच्या किनार्यावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याविषयी लक्ष घालून रामनवमी उत्सव साजरा करणार्या मंडळींची ससेहोलपट संपवण्याच्या हेतूने सरकारी खजिन्यातून या उत्सवात लागणारा शिधासामुग्री पुरवण्याची व्यवस्था केल्यापासून उत्सवासाठी भिक्षा मागण्याची गरज उरली नाही. उत्सव आता दारी येऊन ठेपला, तरी एक वर्षी काही कारणास्तव सरकारी मदत न आल्याने समर्थांच्या शिष्यगणांनी उत्सवाच्या एक आठवडाआधी समर्थां जवळ त्यावर्षी श्री रामनवमीचा उत्सव साजरा करू शकण्याबाबत सचिंत शंका व्यक्त केली. त्यावर समर्थांनी काही पर्यायी योजना त्यांच्या डोक्यात तयार असल्याने आपल्या शिष्यगणांना निश्चिंत राहण्यास सांगून ग्वाही दिली की सरकारी खजिन्यातून मदत आलेली नसली आणि भक्तांनी भिक्षा गोळा केलेली नसली, तरी श्री रामनवमीचा उत्सव साजरा होण्यात काही अडचण येणार नाही. कल्याणस्वामी नावाच्या आपल्या प्रिय भक्ताला त्यांनी सायंकाळी लिखाण सामुग्री घेऊन यावयास सांगितले. रात्रभरात समर्थांनी पहाटे पर्यंत भुजंगप्रयात वृत्तात प्रत्येकी चार ओळीत २०५ श्लोकांचा श्रुतिलेख दिला. याच श्लोकांना मनाचे श्लोक म्हणतात. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे त्या श्लोकांच्या प्रती काढल्या. उपस्थित शिष्यगणांना त्या प्रती देऊन, प्रत्येक भक्ताने आपसात परगणाक्षेत्र वाटून घेऊन, घरांसमोर उभे राहून आपल्या जवळ असलेल्या श्लोकाचं उच्च स्वरात पठण करावयास सांगितले, की त्या त्या घरातून उपस्थित व्यक्ती श्लोक ऐकून बाहेर येतील व भिक्षापात्रात काही भिक्षा हमखास देतील. त्या गोळा झालेल्या भिक्षेच्या मदतीने उत्सव पार पडेल, म्हणून समर्थांनी व्यवस्था दिली. त्याप्रमाणे मुबलक भिक्षा गोळा झाली आणि त्या वर्षी श्री रामनवमीचा उत्सव दृष्ट लागण्या सारखा न भूतो न भविष्यती असा पार पडला. अशाप्रकारे रात्रभरातून लिहिले गेलेले श्री मनाचे श्लोक एकविसाव्या शतकातही मानवजातीला मार्गदर्शक ठरतात. समर्थ या भुजंगप्रयात वृत्तात प्रत्येकी चार ओळीत आयोजित २०५ श्लोकांमध्ये सांगतात, की माणसाचे मनच माणसाचा मोठा मित्र आणि मोठा शत्रू आहे. समर्थ सांगतात की सातत्याने ध्यानधारणा करून माणूस आपल्या दुःखांवर मात करू शकेल आणि श्री रामाच्या सन्निध पोहोचून आपला उध्दार करून घेऊ शकेल. समर्थ रामदास या मनाच्या श्लोकांव्दारे सर्व सामान्यपणे मानवजातीला सभ्यता म्हणजे काय व खर्या अर्थाने सुखी जगण्यासाठी कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पहिजेत व कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत, या विषयी शिकवण देत आहेत. मनाच्या श्लोकांचं हे वैशिष्ट्य आहे, की यामध्ये समर्थ कोणी व्यक्तिविशेष किंवा एका विशेष समाजाला उद्देशून आपली शिकवण देत नाहीत. समर्थ हीच गोष्ट मानवजातीला पुनःपुन्हा सांगत आहेत की मानव वेड लागल्यासारखा त्या क्षणभंगूर ऐहिक सुखाच्या मागे लागल्याने त्याला काहीच साध्य होत नाही; त्या पेक्षा माणसाने अंतर्मुख होऊन आंतरिक सामाधान मिळवण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे. मानव या मूलभूत सत्याकडे दुर्लक्ष करून क्षणभंगूर ऐहिक सुखाचा ध्यास लावून घेतो आणि पूर्ण सुखाला वंचित राहतो. क्षणभंगूर ऐहिक सुखाच्या मागे पळापळी करण्यापेक्षा माणसाने सतत नामस्मरण करून रामरायाच्या सन्निध राहण्याची आस लावून घेतल्यास मानवाचा उत्कर्ष होईल, ही शिकवण समर्थ देतात. सतत नामस्मरण केल्याने माणसाच्या मनात अडाणी, मूर्खपणाचे, दुष्ट विचार येणार नाहीत आणि कोणाबद्दल राग, व्देष, मत्सर मनात उत्पन्न होणार नाहीत. पुढे सबंध दिवस सुखकर रित्या घालवण्यासाठी दिवसाची योग्य सुरूवात होणे आवश्यक असते. दिवसाची ही योग्य सुरूवात होण्यासाठी समर्थ म्हणतात सकाळी लवकर उठावे आणि डोळे उघडता क्षणी आधी रामाचं स्मरण करावे. समर्थ म्हणतात कोणत्याही कार्यारंभापूर्वी रामरायाचे स्मरण करावे आणि कार्य चालू असतानाही सातत्याने राम नामस्मरण केल्यास कार्यसिध्दी सुकर होते.
समर्थ रामदास स्वामी अव्दैत तत्वज्ञानाचा पाठपुरावा करत असत ते येथे मानवजातीच्या सदविवेकाला आवाहन करत आहेत. श्लोक हे संस्कृत मधील महत्वाचे कडवे आहे. रामायण व महाभारता सारख्या महाकाव्यांच्या कडव्यांची रचना श्लोकां मध्ये आहे. (https://mr.nsp-ie.org>verso-818) या वेबसाईट प्रमाणे एका अशा शब्दसमुहाला श्लोक म्हणतात, जो उपाय, ताल आणि कवितेच्या रूपात विशिष्ट लयबध्द प्रभाव निर्माण करतो. एका श्लोका मध्ये आठ अक्षरांच्या दोन दीर्घ ओळी असतात. यां मध्ये दीर्घ ओळी एक सार्थ वाक्यरचना करतात. श्लोकाचा यमक साधारण पणे ◡◡◡◡ˌ◡——◡ ‖ ◡◡◡◡ˌ◡—◡◡ असा असतो. दीर्घओळीच्या घटकांना पद असे संबोधले जाते. दीर्घओळीचा यमक वेदिक अनुष्ठुभ या यमकातून उगम पावला आहे. मानवी मनाला, जे अर्थात माणसाच्या शरीरात असते, उद्देशून हे श्लोक समर्थांनी लिहिले आहेत. मन (माणसाचा सदसद्विवेक) माणसाची वर्तणूक कशी असते आणि असावी, हे ठरवित असतो. जे काही सत किंवा रजोगुण माणसात असतात, त्यांचा कोठे किती व कसा प्रभाव पडेल, ही सारी यंत्रणा ठरवत असते. ज्याप्रमाणे अरूण गोडबोले प्रतिपादन करतात, या मनाकडे हे ठरवण्याची ताकद व सत्ता असते, की कोणत्या परिस्थितीत माणसाने कसे वर्तन करावे. अशाप्रकारे समर्थ रामदास या मानवी व्यवहारास नियंत्रित करणार्या यंत्रणेस, म्हणजेच मानवी मनाला, जी माणसाकडून अशा प्रकारचे वर्तन घडवून घेते, ज्या योगे माणूस श्री रामाची प्राप्ती करून घेऊन मोक्षप्राप्तीचे आपले ध्येय सिध्द करून घेतो. बहिणाबाई चौधरी, महाराष्ट्रातील एक महत्वाच्या कवयित्री, मनाला उभ्या पिकात मोकाट सुटलेलं जनावर म्हणून संबोधिते. इथे बहिणाबाई मनात उफाळणार्या दुष्ट प्रवृत्तींबद्दल बोलतात. (त्या म्हणतात मन वढाय वढाय, जसं उभ्या पिकातलं ढोर…). संत तुकराराम महाराज मना विषयी सांगतात, मानवी मन आत्ता एका अणू एवढ्या लहान रूपात होते, ते कधी आकाशाएवढं विस्तीर्ण रूप घेते, सांगताही येत नाही. (तुकराम महाराज म्हणतात अणू रेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा).
ज्याचे मन मजबूत असते, तो माणूस एखाद्या असाध्य रोगावरही मात करू शकतो. कमकुवत मन असलेला माणूस समोर ठेवलेल्या पक्वान्नाचाही आस्वाद घेऊ शकत नाही. मन आनंदी असणे म्हणजे जर्मन भाषेत die Gemütlichkeit. एखाद्या गोष्टी किंवा घटनेमुळे मनात अपराधी भावना निर्माण होणे, याला जर्मन भाषेत म्हणतात Ein schlechtes Gewissen haben. एखादं काम चांगल्या हेतूने करणे म्हणजे जर्मन भाषेत म्हणतात Mit gutem Gewissen समर्थ रामदास या अदृश्य मनाशी, जे मानवी व्यवहाराचे पूर्ण संचालन करत असते, अशा मनाशी संवाद साधतायत.
ज्याप्रमाणे तुकाराम तुकराम महाराज मानवी मनाचं वर्णन करताना म्हणतात, मानवी मन आत्ता एका अणू एवढया लहान रूपात होते, ते कधी आकाशा एवढं विस्तीर्ण रूप घेते, सांगताही येत नाही. त्या प्रमाणे समर्थ रामदासही मनाच्या अनाकलनीय स्वरूप व मनाच्या वायुवेगाचे वर्णन त्यांनी रचलेल्या मारूतीस्तोत्रात करतात, की हे मन माणसाच्या आवाक्याबाहेर जाते, ते एखाद्या अणू एवढे सूक्ष्म आहे, ते इतके उत्तुंग आहे, की त्याच्या पुढे मेरू आणि मांदार पर्वतही छोटे भासू लागतात.
मनासी टाकिले मागे गतीसी तुऴणा नसे.
अणू पासोनी बम्हांडा एवढा होत जातसे
तयासी तुऴणा कैसी मेरू मंदार धाकुटे
आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्य मंडळा
सतरावे शतक हे छळवादी मुघल साम्राज्याचे सावट घेऊन आले होते. मुघल सम्राटांनी हिंदूंना बळजबरीने धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारायला लावला होता. हिंदू मंदिरे जबरदस्तीने बाटवली गेली होती. हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले गेले. हिंदूंवर बळजबरीने अवाच्या सव्वा कर लादले गेले. मुघल साम्रज्याचे सावट १५२६ ते १५५८ या काळात संपूर्ण भारतवर्षामध्ये भारताच्या उत्तरेस गंगा सिंधू प्रांता मध्ये दिल्ली, आग्रा, लाहोर शहरांभोवती पसरले होते. सतराव्या शतकाच्या अखेरीस मुघल साम्राज्याने भारतवर्षाखेरीज अफगानिस्तानातही आपले पाय पसरले होते.
यद्यपि मुघल व नंतर ब्रिटिश साम्राज्यात अनेक प्रकारचे विकासाचे प्रकल्प भारतवर्षामध्ये राबवले गेले होते, समर्थ रामदासांनी या मुघल सम्रांटांचे मनसुबे जाणून घेऊन लोकांना सचेत करण्याचे काम केले. रामदास स्वामींनी सैन्याला एकाच वेळी सैनिकी प्रशिक्षणा बरोबर चिंतन व ध्यान करण्यासाठी शिबिरे लावण्याचा सल्ला छत्रपति शिवाजी महाराजांना दिला. त्यांनी आपल्या लिखाणाव्दारे शिवाजी महाराजांना हे सांगितले, की जनतेची धार्मिक व नैतिक जोपासना व सुदृढ राष्ट्रनिर्माण कार्य परकीय सत्तेच्या दबावाखाली होणं अशक्य असल्याने राजांनी शक्य तेवढ्या लवकर परकीय सत्तेच्या जाळ्यातून राष्ट्र मुक्त करावे. १५२७ ते १८५७ मध्ये उत्तर व मध्य भारतामध्ये मुघल साम्राज्यात अत्याचारांचा अतिरेक झाला होता.
समर्थ रामदास स्वामी हे सतराव्या शतकातील महत्वाचे क्रांतिकारी संत कवी होते. बारा वर्षे सतत पायी भारतभ्रमण करून परकीय गुलामगिरी व दुष्काळ, पूर, उपासमारी सारख्या नैसर्गिक संकटांमुळे निराश जनतेच्या ठायी आलेल्या उदासीनतेचं समर्थांनी अवलोकन केले. राष्ट्राला परकीय सत्तेच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी जनतेला सामाजिक व नैतिक जागृती आणि अनिवार्य सैन्यशिक्षण यांची शिवाजी राजांनी बिना विलंब अंमलबजावणी करावी, असे समर्थांचे ठाम मत होते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी एक क्रांतिकारी संत होते. समर्थ तरूण असल्या पासूनच लोकांना सांगत होते, की शारीरिक बळ आणि आध्यात्मिक बैठकीमुळेच सशक्त राष्ट्रनिर्मितीचे साध्य सिध्द होवू शकते. समर्थ रामदास स्वामी त्यांच्या अन्य पूर्वकालीन आणि समकालीन संतांपेक्षा म्हणूनच वेगळे होते, की रामदास स्वामी त्या वेळच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत वैयक्तिकरित्या लक्ष घालून जनतेला व शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करत राहिले. राष्ट्राला परकीय अमलातून वाचवण्यासाठी जनतेला जातीवाद आणि धार्मिक मतभेद विसरून परस्पर सामंजस्याने एकत्र आणण्याचे काम करण्यासाठी ते समकालीन संतांनाही समजावत होते. त्यांनी लोकांनाही सांगितले, की जर सुखासमाधानानी जगायचं असेल, तर गुण्या गोविंदाने एकत्र येऊन जातीवाद, धार्मिक व लैंगिक मतभेद विसरून परस्पर सामंजस्याने एकत्ररित्या परकीय सत्तेचा विरोध केला पाहिजे. अगदी स्त्रियांनाही प्रसंगी सामाजिक बंधने झुगारून हाती शस्त्रे ही उचलायची तयारी ठेवली पाहिजे, अशी त्यांनी अत्यंत क्रांतिकारी पध्दतीने जनजागृती केली. जर मुघल सैनिक स्त्रिायांना अबला समजून त्यांच्यावर शारीरिक व लैंगिक अत्याचार करत असतील, तर त्यांनी आपले महिषासूरमर्दिनीचे रूप स्मरून प्रतिकार केला पाहिजे, अशी स्पष्ट शिकवण त्यांनी महिलांना दिली. त्या काळच्या भारतीय माणसाच्या मानसिक आणि सामाजिक परिस्थितीचे अत्यंत अभ्यासपूर्वक निरीक्षण करून त्यांनी अशा प्रकारे क्राांतिकारी विचारांचे बीज समाजात रूजवले. जनतेवर होत असलेल्या राजकीय अत्याचार आणि नैसर्गिक कहरामुळे समर्थांनी उव्दिग्नतेने आस्मानी सुल्तानी व परचक्रनिरूपण या दोन पुस्तकांतून त्या वेळच्या राजकीय, सामाजिक आणि नैसर्गिक परिस्थितीचे वर्णन केले.
