निवेदिता शिरवटकर
” त्यादिवशी आई आणि आमचे इतर नातेवाईक मंदिराजवळ पूजा विधी करायला गेले होते . मी आणि माझा चार वर्षाचा भाऊ ‘ धैर्य ‘ हॉटेलच्या खोलीत वाट पाहत होतो. बाहेर धुवांधार पाऊस कोसळत होता. मध्येच ढग गर्जत होते. पण आम्ही तर आमच्या खेळामध्ये मश्गूल होऊन गेलो…. आणि …आणि मग अचानक काय झाले ते पुढच्या क्षणी कळलेच नाही ! बाहेर एकच कल्लोळ ऐकू येऊ लागला. काही सेकंदातच माझ्याभोवती सगळीकडे पाणीच पाणी होते . चिखल, दगडगोटे आणि अंधार ! …….लाइट्स गेले. मी छातीपर्यंत थंडगार पाण्यात होते. क्षणभर असं वाटलं की मला कोणते तरी वाईट स्वप्न तर नाही ना पडले की ज्यात आजूबाजूचं जग , माणसं अशीच हवेत विरून जातात. असे कधी स्वप्न पडले तर खरच खूप भीती वाटते आणि मग आईच्या नावाचा टाsहो करत, ओक्साबोक्शी रडत मी जागी होते . पण डोळे उघडल्यावर मला कवेत घेऊन थोपटणारी आई असते की बाजूला !
पण हे असले कसले भयानक स्वप्न ? …हे तर संपतच नाही आहे. बाहेर एकच कल्लोळ , विजा कडाडल्यासारखा आवाज ….त्यातच किंकाळ्या ऐकू येत आहेत …पण कोण कुठे आहे काहीच समजत नाही आहे.
अरे ! हा तर धैर्यच्या रडण्याचा आवाज आहे. कुठेs….कुठे आहे तो ? दिसत नाही आहे ह्या चिखलाच्या पाण्यात . किती कळवळून रडतो आहे. मलाच शोधतो आहे वाटते हा. धैर्यss …थांब …मी येते तुझ्यापाशी ….…रडू नकोस !! “
ही कुणा कल्पक मनाने रचलेली रंजक कथा किंवा मनोगत नव्हे , तर एका ‘ धिटूकलीच्या ‘ आयुष्यात प्रत्यक्ष घडलेला चित्तथरारक प्रसंग आहे. त्या चिमुकलीचे नाव आहे…’ माहिका गुप्ता ‘ आणि तो काळा दिवस आजही जश्याच्या तशा तिच्या मनावर कोरलेला आहे.
१६ जून २०१३ . हजारो लोकांच्या आयुष्यावर त्या दिवशी अचानक काळाने घाला घातला. ह्या अचानक आलेल्या भीषण संकटाने फक्त केदारनाथचा परिसरच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्या पवित्र ठिकाणी मृत्यूने असे काही भयानक तांडव केले की त्या महाप्रलयात शेकडो, नव्हे हजारो जीव हां हां म्हणता बेपत्ता , बेघर झाले.
दरवर्षीप्रमाणे त्याही वर्षी हजारो भाविक केदारनाथ मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी अत्यंत उत्साहाने घोड्यावरून , पालखीतून यात्रा करीत होते. हजारो भाविक मंदिर परिसरात आश्रयासाठी थांबतात. साधारपणे १२ – १३ तारखेला मुसळधार पाऊस सुरू झाला . अर्थात यात्रेकरूंना हे काही नवीन नव्हते . त्यामुळे पुढल्या तीन दिवसांनंतर कोणते महाभयंकर संकट आ वासून उभे ठाकेल ह्याची कोणालाच सुतराम कल्पना नसेल. त्या सतत कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे केदारनाथच्या आजूबाजूच्या परिसरातील दऱ्याखो्यांत, पर्वत रांगांमध्ये असलेले बरेच जलाशय तुडुंब भरले होते.
लवकरच पावसाचा जोर इतका अफाट वाढला की शिखरांवरील बर्फसुद्धा वितळू लागला. फक्त पाऊस नव्हे तर ढगफुटी झाली. ह्या सर्वाचा एकत्रित परिणाम होऊन शेवटी १६ जूनच्या सायंकाळी प्रचंड प्रमाणात भूत्सखलन झाले आणि त्या महापुराने केदारनाथच्या दऱ्याखोऱ्यातून वसलेले संपूर्ण जनजीवन डोळ्यांदेखत उध्वस्त केले. अगदी होत्याचे नव्हते झाले. मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या मंदाकिनी , सरस्वती ह्या दोहो नद्यांनी रुद्रावतार धारण केला होता. त्यामुळे मंदिराच्या वरच्या बाजूस उंचावर असलेला ‘ चोराबारी ‘ जलाशय ओसांडून वाहू लागला….त्यात ढगफुटी सुरूच होती . आता मात्र यात्रेकरू भयभीत होऊ लागले होते.
शेवटी १६ जूनच्या संध्याकाळी अंदाजे ८ वाजता एक मोठे भूत्सखलन झाले आणि दरडी , चिखल आणि पाणी मंदिराच्या परिसरात घुसले.
तो क्षण……ते दृश्य किती भयावह असेल याची नुसती कल्पना केली तरी आपल्या अंगावर काटा येईल !….
मग आपल्या ह्या चिमुकलीने कसे बरे झेलले असेल हे सर्व ?
निव्वळ ३ ऱ्या यत्तेत शिकणारी अजाण पोरं ..… जेव्हा क्षणार्धात चिखल अन् गाळाचे पाणी हॉटेलच्या खोलीत वेगाने घुसले तेव्हा महिका तिच्या भावासोबत एकटीच होती . लाइट्स गेले..…गुडूप अंधार झाला…..सर्व दिसेनासे झाले होते त्या पाण्यात . एखाद्या वेळेस आपल्यासारखा मोठा माणूसही चांगलाच हादरला असता. पण हा इवलासा जीव हार मानण्यातला नक्कीच नव्हता !
माहीका पठ्ठी खचून तर गेली नाहीच… तर त्याही परिस्थितीत आपल्या चार वर्षाच्या भावाची आर्त किंकाळी ऐकून त्याला अंधारात शोधू लागली. स्वतःला विशेष पोहता येत नसताना देखील पाण्यातून पुढे जाऊन कसेबसे वाहून जाणाऱ्या भावाला गाठले आणि त्याला घट्ट पकडून , त्याचा पाण्यात श्वास गुदमरू नये याची काळजी घेत खिडकीच्या गजाला घट्ट पकडून चिकटून राहिली . त्याला पोटाशी गच्च पकडून ! तिथून वाहून जाण्याची शक्यता कमी होती .अशी ही अन्न पाण्याशिवाय अडकलेली चिमुरडी तिच्या भावासकट तिच्या आईला तब्बल तीन दिवसांनी सापडली. त्यानंतर सुमारे कित्येक दिवस तिला मानसिक धक्का बसल्यागत तिची अवस्था होती .
पण तरीही ज्या हिंमतीने ,शर्थीने तिने तिच्या छोट्या भावाचा जीव वाचवला , त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवले त्याबद्दल तिच्या धाडसाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.…..
त्यांच्या कुटुंबातील १६ सदस्यांपैकी ६ सदस्यांनी त्या भयानक कालरात्री जीव गमावला .
पण महिकाच्या शौऱ्यामुळे ही कथा मनाला भावली.
खरंच ! कुठून आली असेल अशी हिम्मत ?
नंतर तिला एका मुलाखतीत विचारले की , तुला हे कसे सुचले ? तेव्हा ती म्हणाली, ” माहीत नाही पण त्या क्षणी कुठून तरी अंगात कोणते तरी बळ आले होते हे खरे ! ”
अश्या अचानक ओढवलेल्या संकटाने तर भली भली मोठी माणसे पण खचून जाऊ शकतात. त्या संकटाचा सामना करून मोठ्या धीराने त्यावर मात करण्याचे बळ ह्या लहानग्या जीवात कुठून बरे आले असेल ? अतुलनीय आहे माहिकाचे शौर्य …..आणि तिचे प्रसंगावधान !
भारताच्या ६५ व्या प्रजासत्ताक दिनी २०१४ साली पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते साडे आठ वर्षाच्या माहीका गुप्ताला तिच्या चार वर्षाच्या भावाचे प्राण वाचवले त्याबद्दल ‘ राष्ट्रीय शौर्य ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . ह्या छोट्या वीरांगनेचे कितीही कौतुक करावे तेवढे कमीच आहे !
असे शौर्य , असे धैर्य जर आपल्या प्रत्येक देशवासीयाच्या तनामनात असेल तर कोणतेही संकट असो , प्रत्यक्ष मृत्यूही ओशाळला म्हणून समजा !
