---अंजली संगवई---
पाककला ही एक कला, एक शास्त्र असले तरी इथे देखील अपघात होतात. वाहतुकीच्या अपघातासारखे नसले तरी ते अपघात असतात बर! पाककला ही कला त्यालाच आपलेसे करते, ज्याला मनापासून त्याची आवड असते. तश्या सगळया गृहिणी पाककलेत निपून असतात, अनुभवाने होतात किंवा काही नाईलाजाने देखील होतात (माझ्यासारखे) पण ज्यांना आवड असते त्यांची बात काही औरच असते. तर असो!
स्वयंपाकात जेव्हा काही नवीन पदार्थ बनवतो ना तेव्हा प्रत्येक वेळी तो पदार्थ बनविनाऱ्यांची स्थिती नवीन गाडी शिकणाऱ्या सारखी असते. ज्याला आधी कितीही सांगीतले की ब्रेक क्लच कधी आणि कसा दाबायचा, तरी कुठेतरी ते चुकतच. ही स्थिती फक्त नवीन शिकणाऱ्यांचीच होते असे नाही कधी कधी मुरलेल्या म्हणजेच अनुभवी व्यक्तींची पण होऊ शकते. हे दोन्ही ठिकाणी लागू होत म्हणजे स्वयंपाक घरात आणि वाहतुकीच्या ठिकाणी. मी बरेचदा अनुभव घेते.
त्याचे झाले असे घरी कुणी तरी जेवायला येणार होते. हल्ली कुणी येणार म्हंटले की कार्यक्रमाच्या जय्यत तयारी आणि व्यवस्थीत प्लानिंग करावे लागते. अश्या वेळी स्टार्टर काय, जेवणात काय याची आधी चर्चा होते. चार जण येणार म्हंटले तरी देखील सगळ ठरवून करावे लागते. पुर्वी अस काही नसायचं घर इतकं भरलेलं असायचं की चार जण वेळेवर जरी आले तरी तयार असलेल्या स्वयंपाकात आरामात संपादायचे. आता वेळेचा तकादा म्हणा की काळाची गरज म्हणा, साध कुणाला भेटायला जायचे म्हंटले तरी आपण पूर्व सूचना देऊन जातो, तसे ते योग्य पण आहे. असो!
तर घरी सगळ्यांनी चर्चा करून पंजाबचा फेरफटका मारायचा असे ठरवले म्हणजे पंजाबची डिश करायची असे निश्चित झाले.
त्यात अमृतासरी छोले भटुरे करूया म्हणजे ते सर्वांना आवडतात आणि करायला तसे सोपी. त्याच्याच जोडीला गोड पदार्थासाठी बंगालची सैर झाली आणि भातासाठी नेहमप्रमाणेच दक्षिणेचा मार्ग निवडला. थोडक्यात काय ‘भारत माझा देश आहे आणि तेथील विविध राज्यातील खादाडी चाखने हा माझाच नाही तर सर्वांचा हक्क आहे’.
ठरल्या प्रमाणे जेवणाचा टेबल सज्य झाला. पश्चिम बंगाल, दक्षिण भारत अगदी व्यवस्थित पदार्थ रूपाने तिथे स्थानापन्न झाले. पंजाबही कुठे मागे नव्हता, छान पैकी अमृतसरी छोले बनून तयार होते. हे अमृतसरी छोले आपले अस्तित्व, त्याच्या छान पैकी मसालेदार सुगंधाने सिद्ध करीत होते. भटुरे मात्र वेवळेवर करायचे म्हणून स्वयंपाघरात वाट बघत होते.
स्टार्टर नामक सोपस्कार पार पडले आणि आता मेन डिश खायची वेळ काही वेळात येईल म्हणून भटुरे करायला सुरूवात केली. प्रथम कढईत तेल गरम करायला घेतले आणि भटुरे लाटायला घेतले. नेहमीचं करते त्यामुळे आत्मविश्वास खुपचं दांडगा होता जरा जास्तच, पण म्हणतात ना चांगला सराईत वाहन चालविणारा देखील कधीतरी चुकतो आणि अपघाताला समोर जातो तसेच काही माझ्या सोबत झाले.
भटुरे लाटताना ते चांगले लाटल्या जात नव्हते. वाटल दुसरा जमेल पण कसले काय काही बदल नाही! लाटतांना लक्षात आले की भटुऱ्याचे पीठ नेहमी सारखे वाटत नव्ह्ते. हाताला मैद्या सारखे मऊ लागत नव्ह्ते. वाटले त्यात थोडा रवा टाकला म्हणून असे लागत असेल हाताला, पण रवा तर नेहमीच घालते मग आज काय झाले. तेव्हढ्यात मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली आपण नेमका मैदाच घेतला ना, की तांदळाचे पिठ घेतले? अरे देवा, आणि शंका प्रत्यक्षात खरी ठरली…. ते तांदळाचे पीठच होते. दोन्हीं पिठे हल्लीं माझ्या फ्रिजर मध्ये सोबतच नांदतात. दिसायला देखील सारखेच. तसे गृहिणीच्या हाताला त्याचा वेगळेपणा जाणवतो. पण कधी कधी आपण कुठल्या दुसऱ्या विचारात असतो त्यावेळी असे होऊ शकत. ‘नजर हटी दुर्घटना घटी ‘ बापरे आता कसे करायचे, हा सगळयात पहिला विचार आला. क्षणभर डोळ्या समोर तारे चमकने म्हणजे काय असते ते अनुभवले. टेबलवर सारे येऊन बसले होते. सगळ्यांचे स्टार्टर पचले देखील होतें. घरच्यांनी भटूऱ्याची सगळ्यांसमोर छान पैकी जाहिरात/तारीफ देखील करून झाली. स्वयंपाक घरातून भटुरे आता कुठल्याही क्षणी येतील याची सगळ्यांना खात्री होती. वाट पाहणे केव्हाही न आवडणारी गोष्ट आहे. वेळ जाण्यासाठी मग राजकारणापासून तर हवामान खात्यापर्यंत सारे विषय बोलून झाले. तरी भटुरे आले कसे नाही. आता भूकही आपली जाणीव करून देत होती. हळूच एक एक करीत टेबल जवळील अर्धी मंडळी स्वयंपाघरात प्रगट झाली. मला कणीक भिजवतांना बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक मोठे प्रश्न चिन्ह उभे झाले. मग काय मी घडलेल्या अपघाताचे पुराण सविस्तर सांगीतले.
कुणी हसले कुणी सहणुभुती दर्शविली पण मी मात्र माझ्या over confidece मध्ये झालेल्या फजीतीमुळे खूप खट्टू झाली होती.
आता कुठल्याही गृहिणीच्या मनात येणारा प्रश्न कुणीतरी उपस्थित केलाच. आता हे इतके मळलेले पिठ वाया जाईल का? प्रश्न अगदी वाजवी होता. तसे बघितले तर गृहिणी सहसा असे होऊ देत नाही, कारण ती स्वयंपाघरातील इंजिनिअर, आणि असे म्हंटले जाते की इंजिनियर प्रत्येक गोष्टीचे जुगाड करण्यात निपूण असतो. मी लगेच म्हणाली नाही नाही वाया कसे जाईल त्याचे एकदोन वेगळे पदार्थ करता येतील. एक म्हणजे निप्पट जे कर्नाटकातील एक स्नॅक्स म्हणून खूप खाल्ला जाणारा पदार्थ आहे आणि दुसरा म्हणजे अक्की रोटी हा देखील कर्नाटकातील नाश्ता किंवा कधी कधी जेवणात खाल्ला जाणारा पदार्थ आहे. आता थोड त्या पदार्थाच्या मूळ चवीपेक्षा वेगळ होईल पण तरीही दोन्ही पदार्थ तसे चांगले होतील.(परत एकदा confidece)
एव्हेना स्वयंपाक घरात सगळेच येऊन पोहचले होते.आता कणकीच्या पुऱ्या तेलात तरंगायला लागल्या होत्या सगळ्यांना परत टेबलजवळ जाण्याची विनंती केली. माझ्या दृष्टीने वातावरणात थोडे गांभीर्य होते. कसली फजिती झाली ती पण आपण नेहमी चांगला करणाऱ्या पदार्थाच्या बाबतीत. खूप लाजल्या सारखे झाले. माझ्या चेहऱ्यावरील भाव लक्षात घेता लेकीने शांतता भंग करीत म्हंटले,
“हे म्हणजे असे झाले, जाना था जपान पोहच गये चीन अर्थात जाना था अमृतसर पोहच गये बंगलोर “
सगळ्यांनी हसून तिच्या गाण्याला आणि माझ्या सावरासावरीला दाद दिली. अशी पंजाबची कहाणी कर्नाटकात येऊन सुफळ संपन्न झाली.
