सनविवि अनुभव,साहित्योन्मेष झिरो पॉईंट – एक अविस्मरणीय प्रवास

झिरो पॉईंट – एक अविस्मरणीय प्रवास

–अजिता पणशीकर–

केवढी कडाक्याची थंडी होती! आम्हा मुंबईकरांचा कुडकुडून बर्फ व्हायचा तेवढा राहिला होता! उत्साहाने निघालो खरं एप्रिलमधे, पण गंगटोक त्यावर्षी जास्तच गारठलं होतं. साल २००८. त्यामुळे हल्लीसारखं इंटरनेटवर हवामान पहाता येत नव्हतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत सिक्कीमला जायचं ठरवलं ते ‘हिल स्टेशन’ला छान गार असेल म्हणून. एखादा स्वेटर हौसेने बरोबर घेतलेला, पण तेवढ्याने भागेना. मग आम्ही– मी, सुबोध, आमची दोन मुलं आशय-अवनी, माझी भाची स्फूर्ती – सर्वांनी नवीन स्वेटर/जॅकेट, हातमोजे, मफ्लर घेतले. १२-४५ वयोगटातील सगळेच खूष! आता आम्ही थंडीला सामोरे जायला, आणि फिरायलाही सज्ज झालो!   

आमच्या गाडीचा ड्राइवर होता किपू भुतिया. पंचविशीचा किपू गाडी चालवतांना छान आवाजात हिंदी गाणी गायचा. गाईडची भूमिका घेऊन तो त्याच्या ‘महिन्द्र स्कॉर्पिओ’ मधून अभिमानाने आम्हाला फिरवी.

निसर्गाचं निर्मळ सौंदर्य, तलावांतील निळं आकाश, साधी-सोपी माणसं, डोंगरातील विलक्षण शांतता,….सारं मनाला विसावा देणारं! आपल्या दुनियेपेक्षा ही दुनिया इतकी वेगळी असू शकते? घड्याळाचा काटा जणू सूर्याकडे सोपवून ही मंडळी निवांत रहातात, गडबड-गोंधळ न करता कामं करतात, संध्याकाळी हसत-खेळत मित्रांसोबत, घरच्यांसोबत वेळ घालवतात. मोकळा श्वास घेऊन मी हे मनात भरून घेतच होते, तरी मुंबईला परततांना हा ‘ठेहेराव’ बॅगेत भरून न्यायचं पक्कं ठरवलं! 

दोन दिवस गंगटोकची आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळं पाहून झिरो पॉईंटला जायचं ठरलं. ह्या चीनसीमेच्या पॉईंटपुढे जायला फक्त मिलिटरीला परवानगी होती. सहा तास लाचुंगला जाऊन, पुढे तीन तास यमथांगला लागणार होते. मुलांना डोंगरात गाडी लागली तर, तहान-भूक लागली तर, थंडी वाजली तर,…..सगळी तयारी करून पहाटे निघालो. वाटेत चार-पाच ठिकाणी थांबलो, कधी खायला तर कधी निसर्गाच्या किमयेला दाद द्यायला! किपूने तिथल्या अनेक कथा आणि दंतकथा ऐकवल्या, त्यामुळे मुलं एवढा प्रवास असूनही कंटाळली नाहीत.  आम्ही यमथांगला हॉटेलमधे पोहोचलो तेव्हा “मुसाफिर हूं यारों, ना घर हैं…..” किपूचे हलके स्वर कानावर येत होते. दमल्याने, जेऊन लगेचच झोपलो. 

दुसऱ्या दिवशी आम्ही गरम कपडे चढवून तयार झालो. थंडी कमालीची होती, बोलायला तोंड उघडलं की वाफा निघत होत्या! किपूने गाडी चकाचक-स्वच्छ केली होती. सुबोधने ‘वक्रतुंड महाकाय…’ म्हणून दिवसाच्या प्रवासाला सुरुवात झाली. शब्दात मांडता येणार नाही असं दृश्य भवती दिसत होतं. बघता-बघता खालचं सर्व छोटं-छोटं दिसू लागलं. कटाओचा मिलिटरी कॅम्प बघून आम्ही थक्क झालो! इतक्या खडतर परिस्थितीत आपले जवान रहातात, आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी किती कष्टांतून जातात हे मुलांनाही जाणवलं. 

बोलता-बोलता बर्फ कधी पडायला लागला ते कळलंच नाही. समोरचा रस्ता पांढरा दिसायला लागला. आधीच खूप अरुंद असलेल्या वाटेची दरीकडची कड पार दिसेनाशी झाली. मघापर्यंत गाणी गुणगुणणारा किपू गप्प झाला होता. डोळे बारीक करून त्या उंच डोंगरातल्या वळणांवर तीक्ष्ण नजर होती त्याची. गाडीचा वेग अगदी हळू झाला. समोर जेमतेम ७-८ फुटांवरचं दिसत होतं. वळण आहे की सरळ रास्ता हेही कळत नव्हतं. मुलं वर्ड गेम्स खेळ्ण्यात दंग होती. सुबोधशी नजरा-नजर झाली; त्याच्याही मनातली शंका कळली. अचानक माझ्या हाताचे तळवे ओले झाल्याचे जाणवलं….बूटाच्याआतमध्येही तळपाय थंड पडले होते…..’भीतीने बोबडी वळणे’, डोळ्यापुढे काजवे चमकणे’,….ह्या केवळ अलंकारीक म्हणी असं वाटणारी मी आज हे प्रत्यक्षात अनुभवत होते. 

आम्ही चिंतेत आहोत ह्याचा मुलांना मागमूस लागू नये म्हणून हसत गप्पा मारत होतो. तसंच किपूला, जो आम्हाला सुखरूप न्यायचा प्रयत्न करत होता, अजून टेन्शन द्यायचं नव्हतं. राहून-राहून मनात एकच येत होतं – काही बरं-वाईट झालं तर…. आम्ही चौघे एकत्र तरी आहोत, पण माझ्या भाचीलाही घेऊन आले होते नं बरोबर…नको तो विचार म्हणून डोक्यातून काढायचा म्हंटला तरी जात नव्हता. समोर आता केवळ ३-४ फुटांवरचं दिसत होतं. दरीच्या बाजूला पहायला गेले तर खाली शुभ्र चादर पसरल्यासारखं वाटलं. मी पटकन नजर गाडीत वळवली. मुलांनाही भीतीची चाहूल लागली होती, चेहेरे भेदरलेले होते, आणि ती एकमेकांचा हात घट्ट धरून बसली होती. 

पूर्ण हेडलाईट लावून, सतत हॉर्न मारत किपू ती महिन्द्र स्कॉर्पिओ शिताफीने वळवत होता. मग आम्हीच चर्चा सुरु केली…. डोंगराळ भागात असं अधून-मधून होतं, किपूला ह्या मार्गाची सवय आहे, निसर्ग आपल्याला अनेक पद्धतीने भेटायला येतो, त्यातलीच ही एक,….वगैरे. आपल्या बोलण्यातला फोलपणा कळत होता, पण बाकी काही सुचतही नव्हतं. तेवढ्यात किपूने “यू ही चला चल राही, कितनी हसीन हैं ये दुनिया…..” गुणगुणायला सुरुवात केली. रस्ता आता १२-१५ फूट पुढे दिसू लागला होता. धोका टळला म्हंटल्यावर सर्वांना आवाज फुटला; त्याच्याबरोबर गायला लागले. मी मनोमन आभार मानले….तारलं बाबा त्या विघ्नहर्त्याने! किपूच्या रूपाने तोच आमच्याबरोबर होता बहुदा.

केवळ २३ किलोमीटरचं अंतर, पण जीव मुठीत आणला! आम्ही आता जवळ-जवळ झिरो पॉइंटला पोहोचलो होतो. थोडी मोकळी, सपाट जागा पाहून किपूने गाडी थांबवली, उतरून हात-पाय मोकळे केले, जणू तणाव झटकून टाकला. सुबोधने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, हलकेच दाबला. डोळ्यांत कृतज्ञता ओतप्रोत होती.

अचानक उन्हं वर आली आणि वातावरण एकदम मोकळं झालं! आकाशातल्या चित्रकाराने पूर्ण आसमंतात अप्रतिम चित्र रेखाटलं होतं. मंत्रमुग्ध होऊन आम्ही किती वेळ जागीच खिळलो माहित नाही. ‘डर के आगेही जीत है’ चा सुखद प्रत्यय आला. जरा वेळात भूक लागल्याचं जाणवलं आणि आम्ही सर्वांनी तिथे गरम-गरम नूडल्स खाल्ल्या. त्या थंड बर्फामध्ये त्या गरम मॅगीची लज्जत काही औरच होती! आम्ही इकडे-तिकडे जरा फिरत होतो तेव्हा गाडीतून किपूचे मधुर स्वर कानी पडत होते, “जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना…..”  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *