तडजोड

–पूजा सोनवणे–

नील, अरे लवकर चल, आपल्याला पोचायला हवं. नील, अरे ऐकतोय का? नील बाथरूम मधून येत, “२ मिनिटे दे, झालचं आहे माझं.” काय यार नील वेळेकडे कधीतरी लक्ष देत जा ना यार.  तो टॉवेल आधी बेड वरून उचल नाही तर आज तू कामातून गेलास. नीलने घाई घाईत टॉवेल उचलला आणि लॉन्ड्री बॅग मध्ये फेकला आणि बेल्ट लावत लावत खाली उतरला. कावेरी दारात गाडीची किल्ली, पाकिट आणि गिफ्ट घेऊन तयारच होती निघायला. कऊ तू चिडलीस की काय भारी दिसतेस यार आणि त्यात ही साडी, सोने पे सुहागा. बास कर नील, आता ऋता आणि ईशानला जे सांगायचं ते तूच सांग. मी मध्ये पडणार नाही आणि तुझी बाजु पण घेणार नाही. चिडचिड करतच कावेरी गाडीत बसली.

कावेरी आणि नील हे लंडन मध्ये एकत्र शिकले आणि नोकरीला लागले. कावेरीच्या घरच्या काही प्रॉब्लेम्स मुळे ती काही वर्ष भारतात परतली, सगळं थोडं सावरल्यावर परत जॉबसाठी इंग्लंडला गेली. तोपर्यंत नील लंडन मध्ये स्थायीक झाला होता. काही सेविंग्स वापरून कावेरी आपल बस्तान बसवत होती.  ती जॉबच्या शोधात होती आणि खूप वर्षाने अचानक तिची भेट पुन्हा नीलशी झाली. कावेरीने त्याला जे काही झालं ते सगळं सविस्तर सांगितलं. कावेरी आणि नील आपापल्या घरी गेले आणि त्यांच्या भेटी गाठी सुरु झाल्या. 

जुने मित्र पुन्हा नव्याने भेटायला लागले. अथक प्रयत्नाने कावेरीला जॉब तर मिळाला पण काही महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्टवर. तिने ही नोकरी करायचं ठरवलं आणि कामाला सुरुवात केली. बघता बघता हा प्रोजेक्ट संपला आणि पुन्हा जैसे थे. कावेरी पुन्हा जॉब शोधायला जय्यत तयारी करत होती, मग  इंटरव्युजना सुरवात झाली.  ह्या सगळ्यात ती नीलला भेटत होती.  आता त्याचे मित्र-मैत्रिणी तिचे पण झाले होते. ह्या सगळ्यामुळे तिचं लंडन मधलं वास्तव्य सुसह्य झालं होतं. म्हणतात ना आपल्या देशाच्या बाहेर गेल्यावरच आपल्या देशाची आणि लोकांची किंमत कळते. तिची खरी ओढाताण जॉबच्या शोधामुळे होत होती. इकडे नीलचं काहीतरी वेगळंच चालू होतं.

त्याचे घरचे त्याच्या डोक्यावर बसले होते आणि त्याच्या लग्नाच्या मागे लागले होते. त्याला अजिबात असं टिपिकल लग्न करायचं नव्हतं. ह्यामुळे सगळे त्याची फिरकी घ्यायचे. कावेरीला पण जाम मज्जा यायची ह्या सगळ्या गोष्टीची.

एकदा गप्पांच्या ओघात नील कावेरीला बोलून गेला आपण एकमेकांशी लग्न करूयात.  तुझ्या विजाचा प्रश्न सुटेल आणि मा‍झ्या डोक्यावरचं लग्नाचं टेन्शन संपेल. कावेरीला काही झेपलंच नाही. ती नीलला म्हणाली,”तू घेतलीस का सकाळी- सकाळी? हे काय भलतच तुझं, ते ही अचानक?” “अगं मी खरंच मनापासून बोलतोय. तूही कधी ना कधी लग्न करणार आणि माझी परिस्थिती माहिती आहे तुला. कुठल्या तरी अनोळखी माणसाशी लग्न करण्यापेक्षा आपण एकमेकांना चांगले ओळखतो. बऱ्यापैकी एकमेकांना समजून घेतो. आपल्याला सवयी, आवडीनिवडीही माहिती आहेत आणि लग्न म्हणजे एकमेकांना समजून उमजून साथ देणे, ह्यापलीकडे अजून काय असतं. प्रेम वगैरे सगळं असेल तर ह्यापेक्षा वेगळ काय असतं.” कावेरीच्या आयुष्याकडून काही वेगळ्या अपेक्षा होत्या, तिला प्रेम आणि लग्नव्यवस्थेवर विश्वास होता. तिने नील कडे थोडा वेळ मागितला.

कावेरीच्या नवीन जॉबचा शोध चालूच होता. ती नीलच्या प्रपोजलचा विचार करत होती. ती ह्या अनस्टेडि नोकरीला वैतागली तर होती पण त्यासाठी नीलशी लग्न हा उपाय तिला योग्य वाटत नव्हता. ती परिस्थितीशी जुळवाजुळव करत होती पण इतकी मोठी तडजोड तिला करावीशी वाटत नव्हती. प्रश्न काही केल्या सुटत नव्हते. शेवटी तिने निर्णय घेतला.

तिने नील ला मेसेज  केला आणि आज संध्याकाळी भेटूयात का? असं विचारलं. त्याचा लगेच रिप्लाय आला, हो भेटूयात आपल्या नेहमीच्या जागेवर ७ वाजता. कावेरी व्यवस्थित तयार होऊन ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी गेली. नील वेळेच्या आधीच पोचला होता. तो इतका खूष आणि आतुरतेने वाट बघत होता कावेरीच्या उत्तराची. काय ठरवलंस कावेरी? आत्ता सांग, लवकर लवकर सांग. कावेरी उत्तरली मला वाटतंय की मी तयार आहे, आपण करूया लग्न. तिथून सुरुवात झाली नील कावेरी ची कहाणी. दोघांसाठी ही गोष्ट छोटी नव्हती पण दोघांचे प्रॉब्लेम्स ह्याने संपणार होते, असं त्यांना वाटत होत. 

दोघांनी आपापल्या घरी सांगितलं आणि दोन्ही घरचे खुष झाले. आता लग्नाची तयारी जोरात सुरु झाली आणि ती वेळ बघता बघता येऊन ठेपली. लग्नही नीट पार पडलं, दोघं परत लंडनला आले आणि सुरु झाली रोजमर्रा की जिंदगी. आता होती खरी परीक्षा, नवीन नवीन सगळंच छान होतं. दोघे सगळंच एकमेकांना सांभाळून करत होते. पण आपण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत हेही हळू हळू लक्षात येऊ लागल होतं. हळू हळू एकमेकांची सवयही होत होती आणि सहवासाने प्रेमालाही सुरवात झाली होती. रुसणे फुगणे, वाद-विवाद ह्यालाही हळू हळू सुरुवात. म्हणजे संसाराला खऱ्या अर्थाने  सुरुवात झाली होती.

 कावेरीच्या विजाच काम सुरु झालं तसं तिचा जीव भांडयात पडला. विजा होई पर्यंत तिला टेन्शन तर होतच पण एक पाऊल पुढे पडलं ह्यात तिला तितकाच आनंदही होता. पण एकीकडे लग्न झालेल्या जोडप्याची तारे वरची कसरत चालूच होती. जोपर्यंत लोकं २४ तास एका छताखाली रहात नाहीत तोवर माणसांची खरी ओळख होत नाही. नीलच्या घरच्यांच्या दोघांकडून खूप वेगळ्या अपेक्षा होत्या आणि त्या सगळ्या फक्त कावेरी स्पष्टपणे नाकारत होती. नील मात्र सगळ्यांना खुष करण्यात गुंगलेला. हे काही तिला पटत नव्हतं पण बोलणार कसं? ज्या मैत्रीच्या नात्याच्या भरवशावर त्यांनी लग्नाचा घाट घातला होता, तीच मैत्री कुठे तरी हरवत होती. दोघांना पटत नव्हतं पण कोणी त्यावर बोलत ही नव्हतं. नात्याच्या पसार्‍यात कुठे तरी हरवले होते दोघं.

दोघंही एकमेकांना मिस करत होते, पण पुढाकार कोण घेणार? शेवटी कावेरीने एक दिवस ठरवून बोलायचं ठरवलं. नीलनेही मन मोकळे केले. अगदी एका झटक्यात सगळं सुरळीत होणार नाही हे दोघांनाही माहिती होत, पण आता कुठलाही प्रॉब्लेम बोलून सोडवायचा हे त्यांनी ठरवलं. त्यांची मैत्री निखळ होती आणि तीच त्यांची ढाल होती. 

कावेरीचा विजा आला, थोड्याच दिवसात तिला जॉब मिळाला पण दुसर्‍या गावाला, लंडनहून ३ तासावर. मग कावेरी तिकडे राहायला गेली आणि नील लंडन मधेच. हळू हळू हरवलेलं नातं पुन्हा गवसायला सुरवात झाली. म्हणतात ना लांब राहिल्यावर आपल्या माणसाची किंमत कळते. एकमेकांना भेटायची ओढ, बोलायची इच्छा वाढायला लागली. आता खऱ्या अर्थाने प्रेमाला सुरवात झाली होती. वीकएंड कपल म्हणून लोकं त्यांना ओळखायला लागले. प्रत्येक वीकएंडला एकजण दुसर्‍याकडे जायचा. सहवासाने प्रेम होतं हे खरं जरी असलं तरी लांब गेल्यावरच माणसं खऱ्या अर्थाने जवळ येतात. नात्याची सुरवात तडजोडीने झाली होती पण आता ते आपलं नातं जपण्यासाठी तडजोड करू लागले होते.

कावेरीला नेहमीच ह्या सगळ्या गोष्टी, काळ पाहीलेल्या सिनेमासारख्या आठवायच्या. ऋताकडे पोहोचे पर्यंत तिने पुन्हा हे क्षण जगले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *