सनविवि ललित,साहित्योन्मेष मी…दिवाळीची सुट्टी

मी…दिवाळीची सुट्टी

  • — वर्षा सबनीस —

  • मुलं शाळेतून घरी आली ती नाचतच.दप्तर ,जेवणाचे डबे कसेबसे टेबल वर ठेऊन मोर्चे लगेच खेळायला निघाले. चेहरे आनंदाने नुसते फुललेले .” अरे, जरा थांबा, काय ,आज स्वाऱ्या खुशीत दिसतात !! “आई म्हणाली. खर तर तिला मुलांच्या आनंदाचं कारण माहीत होतं आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिलाही खूप समाधान वाटत होतं. “अग आई, आमची दिवाळीची सुट्टी सुरू झाली ग. ” मुलं चित्कारली.

          ओहो..! तर मी आहे ह्या मुलांच्या आनंदाचं कारण ? काय आनंद झाला हे ऐकून ! मुलांचे आनंदी चेहरे , त्यांचा उत्साह, किलबिलाट बघून आणि ऐकून माझाच आनंद गगनात मावत नव्हता . अहो, का म्हणून काय विचारता ?  मी…मी… आहे दिवाळीची सुट्टी. सगळ्यांची आवडती. शाळेचे नवे सत्र सुरू झाल्यापासून, फक्त मुलंच नाही तर शिक्षकवृंद सुद्धा माझी वाट बघत असतात . आज मी माझे मनोगत सांगणार आहे.

        खरं तर मुलांच्या शालेय जीवनात मला अनन्य साधारण महत्व आहे.पूर्वी माझ्या सुट्ट्या सुरु व्हायच्या आधी मुलांच्या परीक्षा संपलेल्या असायच्या,पण निकाल मात्र सुट्टी नंतर जाहीर व्हायचे. म्हणजे मुलं खऱ्या अर्थाने निवांत असायची. दिवाळीची मजा लुटायची. शाळेतही परीक्षांचे, सत्रांचे नियोजन, माझ्या अवतीभवती व्हायचे.

दिवाळीच्या सुट्टी पूर्वी असे करूया, नंतर तसे करूया अशी चर्चा व्हायची. एकंदरीत मला खूप भाव मिळायचा. सुट्टीत मामाच्या गावाला जाणारी, आजी आजोबांकडे जाणारी मुलं असायची, तर काही मुलांकडे येणारी पाहुणे मंडळी असायची. खऱ्या अर्थाने, पाहुणे येती घरा, तोची दिवाळी दसरा …ह्या म्हणीचा प्रत्यय यायचा.

          खरं तर सुट्टी हा शब्दच मुलांच्या आवडीचा . शाळा सुटायची वेळ झाली की कान टवकारून त्या घंटीची वाट बघत असतात. त्यातून माझी तर फारच आतुरतेने वाट बघत असतात.एकतर माझ्या सुट्टीच्या आधी परीक्षा संपलेली असते म्हणजे गृहपाठ नसतो, अभ्यासाची भुणभुण नसते,आणि समोर दिवाळीच्या सुट्ट्या. मग काय आनंदी आनंद.

         काय म्हणालात ? अजून परीक्षा व्हायची आहे ? अरे देवा….म्हणजे सगळी बालगोपाल मंडळी दिवाळीची मजाच लुटू शकणार नाहीत !! गेल्या काही वर्षात माझे स्वरूप खूप बदलले आहे.दर वर्षागणिक बदलणाऱ्या शैक्षणिक योजनांमुळे,माझ्या विद्यार्थ्यांना सुट्टीचा खरा आनंद उपभोगता येत नाही. पूर्वी साधारण पंधरा ते वीस दिवस दिवाळीची सुट्टी असायची. आता कमी होत होत जेमतेम दहा, बारा दिवस सुट्टी मिळते. अलीकडे दिवाळीच्या सुट्टीतही मुलांना प्रोजेक्ट वर्क देतात .म्हणजे  मुलांपेक्षा आईवडिलांना त्याचे टेन्शन जास्त. पूर्वी मुलं ही खुश असायची आणि आईवडील ही खुश असायचे.

          माझ्या सुट्ट्यांचे नियोजन व्हायचे, ते कुठला किल्ला बांधायचा इथपासून . मोठी भावंड , लहान भावंडांना हाताशी घेऊन किल्ले बांधायची. किल्ल्याच्या भोवती खंदक , किल्ल्याचे टेहळणी बुरुज, मावळे, तोफा ….काही विचारू नका. इतिहासाचा केलेला सगळा अभ्यास पणाला लागायचा. प्रत्येक घराच्या अंगणात किल्ला ,त्यावर केलेली दिव्यांची रोषणाई ,अंगणात काढलेल्या मोठाल्या रांगोळ्या , ओळीने लावलेल्या पणत्या असे चित्र असायचे. अलीकडे हे चित्र दिसेनासे झाले आहे. पणत्यांची जागा विजेच्या माळानी घेतली आहे. ऐतिहासिक किल्ले इतिहास जमा झालेत. मुलांचा तो उत्साह, किलबिलाट हरवला आहे.

          आकाशकंदील घरीच तयार व्हायचे . रंगीत तावाचे कागद आणून, मुलां कडून घरच्या घरी सुंदर आकाशकंदील  तयार करून घायचे .अलीकडे मात्र सगळ्या गोष्टी बाजारातून येतात.मुलांना आकाशकंदील  बनवायला शिकवायला, ना आईवडिलांना वेळ आहे, ना इच्छा.

            दिवाळी आणि फटाके हे अगदी चपखल समीकरण असायचे. दिवाळीच्या दोन दिवस आधी बाजारातून फटाके आणले की मुलांचा आनंद गगनात मावत नसे.माझ्या सुट्ट्यांचे तेंव्हा अगदी सार्थक झाले असे वाटायचे पण आता पर्यावरण आणि त्याचा समतोल राखणे ह्या गोष्टीला फार प्राधान्य दिले जाते, किंबहुना ती आजच्या काळाची गरज आहे. वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण दोन्ही कमी करण्यासाठी फटाक्यांवर बंदी आली. हे खर तर पटण्यासारखेच आहे पण त्यामुळे माझ्या आणि मुलांच्या आनंदावर मात्र विरजण घातले गेले. 

      फटाके आणि मुलांची सुरक्षा हा सुद्धा चिंतेचा विषय असायचा. निष्काळजीपणा मुळे आणि अजाणतेपणी बरेच घातक  प्रसंग घडायचे .मला अगदी नेहमी लक्षात राहील अशी घटना काही वर्षांपूर्वी घडली.

       एक अगदी सात आठ वर्षाचा मुलगा होता. त्या बाल वयात फटाके उडवताना काय काळजी घ्यायची ह्याची जराही कल्पना नव्हती. बाटलीत रॉकेट ठेऊन वात पेटवली. ते वाकडे ठेवलेले रॉकेट सरळ त्याच्या डोळ्यात गेले, नाहक एका डोळ्याची दृष्टी गमावून बसला.

        नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे फटाके फोडूनच सगळ्यांना जागे केले जायचे. सुवासिक तेल, उटणे लावून अभ्यंगस्नान व्हायचे. मग देवदर्शन करून ,आईने आठवडाभर खपून केलेल्या फराळावर ताव मारणे असा कार्यक्रम असायचा. दिवाळीच्या सुट्टीची खरी मजा तीच.

      गेली दोन वर्षं मात्र कुणाला माझी आठवणच आली नाही. बिचारी मुलं कोविडच्या भीतीने घरीच बसली राहिली. मुलांच्या किलबिलाटा शिवाय शाळा ओस पडल्या, मैदानं शांत झाली. रोज घरी राहिल्यामुळे मुलांना सुट्टीचे काही महत्वच राहिले नाही. दोन वर्ष दिवाळी आली आणि गेली. माझी खूप निराशा झाली. 

    सुट्टी संपली की सगळी मुलं परत उत्साहाने शाळेत येतात . नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात करतात. शिक्षक सुद्धा ताजेतवाने होऊन मुलांना शिकवायला सुरवात करतात आणि त्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट बघायला लागतात. एकंदरीत कुठल्या ना कुठल्या सुट्टी ची वाट बघत असतात. 

           आणि मी….? परत मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी बघायला मिळेल ह्याची वाट बघत बसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *