तो : वा .. आज काय छान दिसत्येस .. हा कलर खूप उठून दिसतोय तुझ्यावर ..
ती : मी नेहमीच छान दिसते. तूच बघत नाहीस आज काल. पण ऑफिसचं काम नसलं की मात्र तुला हे रंग दिसायला लागतात .. हसतोस काय .. खरं तेच बोलतेय .. आज जर एखादा ऑफिसचा कॉल असता तर आला असतास का असा पार्क मध्ये माझ्याबरोबर??
तो : जानेमन, आप के सिवा है ही कौन हमारा .. आज की शाम आप के नाम !
ती : का ? आहेत ना माझ्या सवती .. कॉम्प्युटर, कॉल्स, प्रेसेंटेशन .. कायम तुझा प्रेसेंट टेन्सडच .. मी असले काय नसले काय
तो : काय ग असं .. तुला असं वाटतं फक्त .. पण सिरियसली .. कधी कधी ऑफिसमध्ये मला तूझी आठवण येती, अचानक ! मग माझा होतो कमिलियन सरडा .. एका डोळ्यात ते मोनोटोनस, प्रेडिक्टेबल, आखीव ऑफिस-वर्क आणि दुसऱ्या डोळ्यात तू .. मुग्ध, धुंद, कुठल्याश्या वनराईत .. ओंजळीतल्या फुलांचा सुगंधी श्वास भरून मला खट्याळ डोळ्यांनी खुणावणारी .. किंवा .. गुलाबी थंडीत स्वतःला मऊ पांघरुणात कालवुन घेऊन एक हात उंचावुन मला त्या उबेत बोलवणारी!
ती : क्या बात है, आज एकदम शायराना अंदाज ! काही तरी सुचलेलं दिसतंय !
तो : अजुन नाही. पण तू बरोबर असलीस तर नक्की सुचेल
ती : मी आहेच रे. पण तूच खूप बिझी झालायेस. I know you have commitments but you are committed to me also, right ? देवानं बांधलेली गाठ आहे रे आपली , आता परत देवाघरी गेल्याशिवाय नाही सुटणार ती !
तो : आयला! क्या बात ! मस्त आहे वाक्य .. दे टाळी ..
ती : काय रे .. दे ना टाळी .. असं का तो अधांतरी हात
तो : बघितलंस ! .. तो watchman .. माझ्याकडं कसा विचित्र बघुन हसत गेला .. असुदे .. सध्या ह्या कमिलियनचा एकच डोळा उघडा आहे .. अगं सिरियसली .. हसु नकोस ना ..
(समोरच्या रिकाम्या बाकाकडं बघत तो टाळी देतो .. बोलत राहतो .. ऐकत राहतो .. हसत राहतो )
लघुकथेचं नाव ”कविता”
ओंकार संगोराम
-x-x-x-x-x-x-x-