— देवश्री अंभईकर-धरणगांवकर —
आदरणीय गुहांनो,
(गुंफा, घळी, कपारी, भुयारी गुहा इत्यादी.)
मनःपूर्वक नमस्कार!
पत्रास कारण की दरवर्षीप्रमाणे यंदाही या महिन्यात जागतिक पर्यावरण दिन पाच जूनला साजरा होतो आहे. खरे तर निसर्गाप्रती मनात सदैवच आदर आणि प्रेम आहे परंतु यानिमित्ताने यावर्षी निसर्गातील मला भावलेल्या काही घटकांप्रती कृतज्ञता शब्दांत व्यक्त करावी असे वाटले. ही समस्त सुंदर प्रकृती- झाडे, जंगले, समुद्र, पशुपक्षी यांच्यासह मला प्रकर्षाने आठवण आली ती तुमची… गुहांची, गुंफांची! कदाचित कुठल्यातरी पूर्वजन्मी मीही कुठल्याशा गुहेत सुखनैव वास्तव्य केले असेल त्यामुळे माझ्या मनात तुमच्याविषयी जे अपार कुतूहल, कृतज्ञता, जो आदर व जिव्हाळा आहे तो व्यक्त करण्याकरिता हा लेखनप्रपंच!
हे गुहांनो, तुमचेच महत्त्व मी तुमच्यासमोर काय वर्णावें इतके मोठे या सृष्टीत तुमचे कर्तृत्व आहे. तेवढे ज्ञानही मजकडे नाही परंतु पत्र लिहावयास घेतलेच आहे तर प्रयत्न करते…
अनादी काळापासून इतर प्राण्यांसारखा मानवही निसर्गावर अवलंबून आहे. त्याचा पहिला निवारा… पहिले घर तुम्हीच- गुहा होत्या. गुहांमध्येच मानवजात सुरक्षित राहिली. ऊन, वारा, पाऊस, वादळे यापासून तुम्हीच मानवाचे रक्षण केले. त्याला नैसर्गिक आश्रय दिला. जेव्हा शेती करायला व घर बांधायला शिकला तेव्हा कुठे माणूस कायमचा गुहेबाहेर पडला.
त्या पहिल्या माणसांची-आदिमानवांची कोरीव चित्रकला तुम्हीच तुमच्या दगडी भिंतींवर जतन केली म्हणून आज हजारो वर्षांनंतरही ती आम्हाला बघायला मिळते. तुम्ही अनेक प्रकारची खनिजे, भूजल व इतर जलसाठे जतन करता. काही अतिप्राचीन गुंफांमध्ये प्राचीन मानवी वस्तीच्या खुणा व रहस्यमय वस्तू आढळून येतात ज्यामुळे अभ्यासकांना संशोधनाची दिशा मिळते. तुम्ही इतर अनेक पशुपक्ष्यांचेही आश्रयस्थान आहात. जगातील कितीतरी गुहांमध्ये प्राचीन प्राण्यांचे अवशेष, हाडे व जीवाश्म मिळतात ज्यामुळे तेव्हाच्या जीवनाची कल्पना येते. मला इतिहासाची व जीवशास्त्राची आवड असल्याने असेल मला नेहमीच तुमच्याबद्दल कुतूहल वाटले आहे. तुम्हां गुहांमध्ये निसर्गाची काही महत्वाची गुपिते दडली आहेत, हे नक्की! तुम्ही पर्यावरणीय, जैविक व ऐतिहासिकदृष्टया महत्त्वाच्या आहात.
माणसाला तुमचा निवारा इतका आवडला की त्याने स्वतःही पर्वतांमध्ये लेणी खोदल्या. त्यांचा उपयोग साधनेसाठी केला. नैसर्गिक गुहा व मानवनिर्मित गुहा-लेणी अशी असंख्य शैलगृहे आजही दिसतात. कित्येकांचे रूपांतर आता लोकप्रिय पर्यटनस्थळांमध्ये झालेले दिसते. अनेक ऋषी-मुनींनी, साधू-तपस्वींनी ध्यानधारणेसाठी, अध्यात्मिक उन्नतीसाठी तुमचीच निवड केली. आजही हिमालयाच्या व इतर काही गुहांमध्ये असे साधक राहतात व ज्ञानप्राप्ती करतात. ज्ञानार्जनासाठी व निसर्गाच्या सन्निध राहून दैनंदिन उपासनेसाठी एखाद्या शांत सुरक्षित गुहेसारखी दुसरी जागा नाही.
हे गुहांनो, तुम्ही घळी, गुंफा, कपारी, भुयारी-गुहा अशा विविध रूपात वेळोवेळी लोकांना आश्रयासाठी मोलाची मदत केली आहे. पूर्वी परचक्र आले, शत्रूच्या फौजा मुलुखात घुसून धुमाकूळ घालू लागल्या की गावकरी सोनेनाणे, लेकीसुना घेऊन जवळच्या जंगलात लपत असत. त्यांना गुहांचाच मोठा आधार मिळे. सह्याद्रीच्या कडे-कपारी आणि गुहांच्या मदतीने राजांनी गनिमी काव्याने शत्रूला सळो की पळो करून सोडले.
हे गुहांनो, हे गुंफांनो, तुम्ही तर देवांनाही प्रिय आहात. त्यामुळे तुमच्याबद्दल मनात भक्तिभावनाही उत्पन्न होते. अनेक प्रसिध्द व सिद्ध देवस्थाने उंच व दुर्गम डोगरांवर किंवा गुहांमध्ये आहेत. प्रत्यक्ष देवाधिदेव महादेवांनाही अमरनाथची गुंफा प्रिय आहे. कितीतरी शैव व शाक्त सिद्धस्थाने गुहांमध्ये, उंच डोंगरावर किंवा भुयारी गुहांमध्ये आहेत. परमपूज्य रामदासस्वामींनीसुद्धा ‘दासबोध’ लिहिण्यासाठी शिवथर घळीची निवड केली. तिथला बाहेरून येणारा धबधब्याचा जलनाद आणि बाकी वातावरण अत्यंत प्रसन्न व पवित्र भासते.
हे गुहांनो, तुमची रूपेही किती विविध व मनोवेधक असतात. तुम्ही कधी जांभ्या दगडाच्या, कधी ज्वालामुखीचा लाव्हा थंड झाल्यानंतरच्या दगडांच्या, कधी शुभ्र किंवा रंगबेरंगी संगमरवरी, कधी वालुकाश्माच्या, कधी सच्छिद्र खडकांच्या, कधी काळ्या भक्कम कातळाच्या तर कधी अगदी शीत बर्फाच्याही असता. तुम्ही पाण्याच्या प्रवाहांनी स्वतःला झिजवत सुंदर रचना करता. अनेकदा भूमीगत खोल गुहांमध्ये-भुयारांमध्ये जरा भीती वाटते. तिथले वातावरण गूढ व गहन शांततेचे असते. तुम्ही कितीतरी भयकथा व रहस्यकथांच्या लेखकांना कथेतील वातावरण-निर्मितीसाठी प्रेरणा देता.
कधी कधी वाटतं या गर्दीच्या व प्रदूषित शहरी जीवनशैलीपासून लांब एखाद्या निसर्गरम्य वातावरणातील सुरक्षित गुहेत- तुमच्यामध्ये काही काळ व्यतीत करावा… तिथुन एखादा अथांग जलाशय दिसावा… हिरवीगार वने असावीत. त्या गुहेत बसून बाहेरचा मुसळधार पाऊस पहावा किंवा शेकोटीची ऊब घेत गुहेच्या द्वाराबाहेरचा हिमवर्षाव पहावा. सुंदर सूर्योदय-सूर्यास्त अनुभवावा. उंचावरच्या एखाद्या गुहेत घोंघावणारा वारा खावा. काजव्यांची प्रकाशक्रिडा बघावी. रात्रीची निरव शांतता अनुभवावी. गुहेच्या छतावरच्या एखाद्या भेगेतून येणारा चंद्रप्रकाशाचा कवडसा पाहावा. मधूनच हळूच गुहेबाहेर येऊन मध्यरात्रीचे माथ्यावरचे लखलखणारे तारांगण पाहावे… तुमच्यासोबत निसर्गाच्या समीप राहून आत्मबोध व आत्मशोध करण्याचा…त्या सृष्टीनिर्मात्याला, सृष्टीनियंत्याला जाणण्याचा प्रयत्न तरी करावा. हे गुहांनो, तुमच्याबद्दल जसे गूढ वाटते तशीच मनापासून तुमच्याबद्दल ओढही वाटते.
तुमच्याविषयीची ओढ आजही माणसाच्या मनात आहे पण कदाचित इतर सर्व व्यापात त्याचे तुमच्याकडे हल्ली दुर्लक्ष व्हायला लागले आहे असे वाटते. आता गुहांकडे फक्त नैसर्गिक रचना म्हणून बघणाऱ्या माणसाचे सगळ्या पर्यावरणाकडेच, निसर्गाकडेच दुर्लक्ष होते आहे आणि त्याचे दुष्परिणामही दिसताहेत. तुम्ही मात्र आजही त्याच भक्कमपणे, तटस्थपणे उभ्या आहात. मानवाने त्याच्या अंतःकरणाच्या गुहेत डोकवायला हवे. स्वार्थ सोडून निसर्गाचे, पर्यावरणाचे संवर्धन करायला हवे अन्यथा प्रकृतीचा कोप होऊन सर्वच लोप होईल, नाही का?
पत्र जरा लांबत चाललंय का? आता आटोपते घेते. हे गुहांनो, मानवजातीला तुम्ही जो आश्रय दिला, सहकार्य केले आहे, तुमच्या अस्तित्वाने सृष्टीसौंदर्यात भर घातली या व अशा अनेक गोष्टींकरता तुमचे मनःपूर्वक आभार. काही नमूद करणे राहून गेले असल्यास क्षमस्व.
असाच लोभ असू दयावा ही नम्र विनंति.
आपली कृतज्ञ,
देवश्री