–प्रतिभा बिलगी —
प्रिय अवखळ पावसा,
खूप दिवसांपासून तुला पत्र लिहिण्याचे मनात होते आणि बघ, आज हा योग जुळून आला.
पत्र लिहिण्यास कारण की तुझ्यावाचुन आम्हा सर्वांचे एकही पान हलत नाही, हे तुला माहीत आहे. पाऊस, पाऊसराया, पावस, पावसाळा, पर्जन्य, वृष्टी, वर्षा अशा विविध नावांनी ओळखला जाणारा तू अस्तित्वात नसतास तर ? जीवसृष्टीचा नाश झाला असता किंवा जीवसृष्टी अस्तित्वातच आली नसती. वृक्ष, पशुपक्षी, जलचर, मनुष्य ही संकल्पनाच कदाचित नसती. ही पृथ्वी इतकी विविधमय आणि सुंदर नसती. बघ, तुझे स्वागत फक्त आम्हीच करत नाही तर ही धरतीमाता सुद्धा आलिंगन देऊन तुझे स्वागत तितक्याच आपुलकीने करते. तुझ्या सरी जेव्हा धरतीवर अवतरतात तेव्हा धरती सुद्धा आनंदाने हुरळून जाते. तीच्या मातीचा सुगंध प्रत्येक जीवाला आनंद व सुख देऊन जातो. प्रत्येक पावसाळ्यात ही धरती हिरवाई लेऊन नव्या नवलाईने नटायला सज्ज होते. या सगळ्या उलढालींची कल्पना तुला आहेच. म्हणून तू आम्हाला असा सतावत आहेस ना ? मला तुझ्या रागवण्याचा किंचितही राग येत नाही. तुझं वागणं बरोबरच आहे. आम्ही पर्यावरणाचा नाश करतोय, या गोष्टीची शिक्षा तर मिळालीच पाहिजे. नाहीतर तू आमच्यावर नाराज होण्याचा प्रश्न येतोच कुठे ? आम्ही केलेल्या चुकांची माफी मागून मी तुला गैर ठरवण्याचा प्रयत्न बिल्कुल करणार नाही. बदल्यात मी तुला माझे मनोगत सांगणार आहे. मग तूच ठरव काय करायचं ते ?
हे पावसा, तुला माहीत आहे की नद्या, नाली, तळी, सरोवरे तुडुंब भरतात तेव्हाच सगळ्यांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. रान बहरते, शेतीवाडी फुलते. शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. प्रत्येक प्राणी सुखावतो. पण तुझ्या रागामुळे सध्या सगळे गणित विस्कटले आहे. कारण काही ठिकाणी अतिवृष्टीचे संकट ओढावत आहे तर काही ठिकाणी चक्क दुष्काळाचा सामना करावा लागतोय.
अरे पावसा, तुझा राग थोडा कमी कर. जिथे पाण्याचा मुबलक प्रमाणात साठा झाला आहे तिथे बरसने थांबव आणि जिथे जमीन उष्णतेने तापून दुभंगून जात आहे अशा ठिकाणी पडून धरतीमातेला थंड कर. उष्णतेणे बहाल झालेल्या लोकांना, वन्यसृष्टिला, प्राण्या-पक्षांना तुझ्या सहवासाने तृप्त कर. आम्हीही आता पर्यावरण संतुलनासाठी काम करत आहोत. झाडे लावत आहोत. झाडे जगवत आहोत. लोकांच्या मनात पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करत आहोत. प्रतिसादही चांगला मिळत आहे. पण हा बदल व्हायला थोडा वेळ लागेल. तेव्हा, तेवढा वेळ आम्हाला दे. आम्हाला आमच्या चुका सुधारण्याची संधी दे. जे पर्यावरणीय असंतुलन या धरतीवर तांडव घालत आहे, त्यावर आळा बसण्यास मदत होईल.
ऐक ना पावसा, तुझ्या हलक्या सरी अंगावर घेत, मस्तीत गानी गुणगुणत लोक आपले दुःख विसरून जातात, तेव्हा तुलाही स्वतःचा अभिमान वाटत असेलच ना ! तुझें अस्तित्वच किती मनमोहक असतें ! पावसाळा म्हटला की गरमागरम वडे, भजी आणि वाफाळता चहा हे समीकरण कधीच चुकत नाही. तुझ्या स्वागताची तयारी इथूनच सुरू होते. पावसाळा म्हटला की सगळीकडे कसे नवे चैतन्य फुलते. पालवी अन् पालवी ताजीतवानी दिसू लागते. हवेत एक प्रकारची वेगळीच नशा असते. अशा या नशेची गोडी जो चोखतो बहुतेक तोच या धरतीवरचा सगळ्यात नशिबवान प्राणी असेल, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. असा तू एक जादूगारचं जणू ! म्हणून तुझी किमया काही औरच आहे.
इंद्रधनुष्याचे रंग, मोराचा फुललेला पिसारा, सकाळची गुलाबी थंडी, डोलणारी फुले, फुलांवर घोंघावणारे भुंगे, मध गोळा करण्यासाठी मधमाश्यांची धावपळ, अन्नाच्या शोधात रांग धरणाऱ्या मुंग्या, मधेच सूर्याचा प्रखरपणा तर कधी चंद्राची शीतलता ! निसर्गाचा असा अनगीणत खजिना आपल्यासमोर हात पसरून आव्हान करत असतो की हे मानवा ! ये, या अनंत खजिन्याचा आस्वाद घे. परंतु अशा या निसर्गराजाचे स्वागत करण्याची संधी सगळ्यांना मिळत नाही. असे मोजकेच लोक असतात ज्यांना हे सौख्य लाभते. आणि आमच्यासाठी तर पावसाळ्याचे दिवस हे बाकी सगळ्या दिवसांपेक्षा थोडे खास असतात. कुठे पाण्याची डबकी, त्यात डरावणारी बेडकी, कुठे कमळ फुलांनी भरलेली तळी, कुठे फेसाळणारा धबधबा तर कुठे अवखळ धावणारी नदी ! असे विविध पाण्याचे प्रवाह जणू रोज नवे संगीत निर्माण करतात. या संगीताची गोडी साखरेहून गोड असते. ज्याला हे संगीत समजले त्याला निसर्ग समजला असे म्हणायला हरकत नाही. पावसा, तू येऊन गेल्याची साक्ष वृक्षांवरच्या पानांवर, फुलांवरच्या पाकळ्यांवर साचलेले पाण्याचे थेंब देऊन जातात. बघणाऱ्यांना वाटते की जणू टपोरे मोतीच सजवून ठेवले आहेत. हे मोती सगळ्यांचे लक्ष आकर्षित करून घेतात. या मोत्यांची जर माळ बनवता आली असती तर ? अरे वा ! किती सुंदर ! तुझे कितीही वर्णन केले तरी ते अपुरेच ठरते, यात दुमत नक्कीच नाही.
पावसा, तू काही एकटा येत नाहीस. येताना तुझ्याबरोबर गणपतीबाप्पालाही घेऊन येतोस. गणपतीबाप्पाच्या स्वागताला आणि विसर्जनाला आवर्जून हजेरी लावतोस, तेही चक्क विजेच्या साथीने ! किती आनंदाचे क्षण तू आम्हाला देऊन जातोस.
हे बघ पावसा, तू सगळ्या ऋतुंचा राजा आहेस म्हणून जास्त भाव खायची गरज नाही. मला जे सांगायचे होते ते मी या पत्राद्वारे कळवले आहे. आता पुढे काय करायचे हे तुझे तुलाच ठरवायचे आहे. पण प्रत्येक वेळी मनमानी करायलाच पाहिजे असे नाही ना !!
परत लवकर भेटायला ये. तुझ्याशी अजून खूप गप्पा मारायच्या आहेत. पण आता पत्राला विराम देते. जेव्हा परत भेटायला येशील तेव्हा आणखी सविस्तर बोलू.
तुझ्याच प्रतीक्षेत
एक सखी
