पत्रलेखन

— सौ.ऋचिता बोधनकर दवंडे —

                                                    श्री

 प्रिय निसर्गास

                   सप्रेम नमस्कार,

             पत्र लिहिण्यास कारण की आता जून महिना येईल आणि पावसाळा सुरु होईल. गरमीने त्रस्त झालेली धरती, माणसे, पशु, पक्षी पावसाच्या आगमनाने आनंदून जातील. तेंव्हा मनात विचार आला हीच संधी साधून तुझ्याशी संवाद साधावा. 

            झाडे, डोंगर, जंगले, समुद्र, नद्या, विविध ऋतू हे सगळे तुझेच घटक आहेत. ह्या सर्वांच्या माध्यमातून तू सतत आमच्या सोबत असतोस. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये तुझे वेगवेगळे रूप पाहायला मिळते. पावसाळ्यामध्ये तर तुझ्या रुपाला जणू चार चांदच लागतात. मे महिना संपत येताच तीन चार महिने उन्हामुळे त्रासून गेलेल्या आमच्या मनाला पावसाळ्याचे वेध लागतात. वर्तमानपत्रात तर मे महिना येत नाही तोच केरळमध्ये अमुक अमुक तारखेला मान्सून दाखल होणार अशा बातम्या यायला लागतात. त्यावरून लगेच आपल्याकडे कधी पाऊस येईल ह्याचे आराखडे बांधायला सुरवात होते. 

           जून महिना सुरु होतो आणि मग अचानक एखाद्या दिवशी आभाळ भरून येते. आकाशात काळे ढग जमा होतात आणि मागोमाग टप टप असा आवाज करत पावसाचे आगमन होते. पावसाच्या स्पर्शाने मातीचा येणारा सुगंध मनाला ताजेतवाने करतो. उन्हाळ्यानंतर येणारा पहिला पाऊस तर खासच असतो. लहान मुलेच नाही तर मोठी माणसे देखील पहिल्या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद घेतात. 

           उन्हाळ्यात झाडांची पानगळ होते. डोंगर ओके बोके दिसत असतात. जंगलांवर देखील एक प्रकारची मरगळ आलेली असते. जलाशयांमध्ये पाणी कमी होऊन ती आटायला लागतात. पण पावसाळा येताच पावसाच्या जलधारांनी सारा आसमंत चिंब होतो. झाडांवर पुन्हा हिरवी हिरवी पाने यायला सुरवात होते. डोंगर हिरवेगार दिसायला लागतात. जंगले ताजीतवानी होतात. नदी, तलाव भरून जातात. सगळीकडे जणू हिरवीगार चादरच अंथरलेली आहे की काय असे वाटायला लागते. पावसाळ्यातील तुझे हे रूप मनाला प्रफुल्ललीत करते. 

          पावसाळ्यात बाहेर फिरायला, सहलीला जाण्याची मज्जा काही वेगळीच असते. रोजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून हमखास पावसाळी सहलींमध्ये जाणे होते. प्रवासात पाऊस पडल्यामुळे ओले झालेले रस्ते, हिरव्या रंगाच्या विविध छटा ल्यायलेली झाडे, डोंगरकपारीतून वाहणारे छोटे छोटे पाण्याचे धबधबे, अंगाला स्पर्शून जाणारा थंड वारा, हिरवीगार शेतं आणि वाऱ्यामुळे डोलणारी पिके, मधूनच दिसणारा आकाशातील इंद्रधनुष्य, दऱ्याखोऱ्यातून पसरलेले धुके जणू काही ढगच उतरून खाली आले आहेत असा भास व्हावा हे सगळे पाहून तन मन टवटवीत होऊन जाते.

         ह्या ऋतूत खास मज्जा असते ती भाजलेल्या गरम गरम भुट्ट्यावर लिंबू टाकून खाण्याची. पावसाळ्यातील मनमोहक वातावरणात असा गरम गरम भुट्टा खाण्याची मज्जा काही औरच! सोबत उकडून भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा असतील तर सोने पे सुहागाच! चहा आणि गरमागरम भजी हा पावसाळ्यातील घराघरातील ठरलेला बेत. खिडकीत किंवा व्हरांड्यात बसून थंड थंड वातावरणात चहा आणि भजी म्हणजे जणू स्वर्गसुखच असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

         पावसाळा हा तर कवी लोकांच्या मनाचा हळवा कोपरा. पाऊस आणि त्यामुळे फुललेले तुझे रूप पाहून नकळतच त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडतात आणि त्याची कविता किंवा गाणे तयार होते. जवळजवळ सगळ्याच भाषांमध्ये पावसाळा आणि पाऊस ह्या विषयांवर गाणी असतील. आता आपल्या मराठीचेच घे ना “ये रे घना, ये रे घना”, “ढग दाटुनी येतात”, “आला आला वारा” अशा अगणित गाण्यांमधून आणि कवितांमधून पावसाळ्याचे यथार्थ वर्णन केलेले दिसून येते. “गारवा” हा तर पूर्ण अल्बमच पावसाला समर्पित आहे. लहान मुलांची “ये रे ये रे पावसा”, “आई मला पावसात जाऊ दे” ह्यांसारखी गाणी तर पिढ्यांपिढ्या चालत आलेली आहेत. मला नाही वाटत असे एकही मराठी घर असेल जिथे लहान मुलांसाठी ये रे ये रे पावसा हे गाणे म्हटले जात नाही. हिंदीमध्ये पण “भिगी भिगी रातों में”, “अब के साजन सावन में”, “रिम झिम रिम झिम” अशी कितीतरी पावसाची अजरामर गाणी आहेत. 

         पावसाळ्यात रक्षाबंधन, मंगळागौरी, नागपंचमी, गौरी गणपती हे सण देखील येतात. त्या त्या सणाचे पावसाशी म्हणा किंवा तुझ्याशी म्हणा काही ना काहीतरी संबंध हा आहेच. पावसाळ्यातील आल्हादायक वातावरणात हे सर्वच सण तेवढ्याच उत्साहाने साजरे केले जातात. 

         पाऊस म्हटला की चिखल, रस्त्यावर जागोजागी साचलेले पाणी हे तर राहणारच. शिवाय पावसामुळे अंगात रेनकोट घालावा लागतो किंवा छत्री घ्यावी लागते. हे सगळे केल्यावरही कितीतरी वेळा भिजतोच. कपडे ओले होतात. चीक चीक वाटते. पण घरी येऊन हातपाय धुऊन जेव्हा गरम गरम आल्याच्या चहाचा कप हातात येतो ना तेंव्हा सारा त्रास नाहीसा होतो. 

         पाऊस जेंव्हा मर्यादेत पडतो तेंव्हा खरंच छान वाटतो. पण जेंव्हा अतिवृष्टी होऊन तलाव, नदी दुथडी भरून वाहतात, पूर येतो, समुद्रावर उंचच उंच लाटा निर्माण होतात तेंव्हा मात्र धडकी भरवतो. मला आठवते माझ्या लहानपणी पावसाचा काळ हा थोडाफार फरकाने ठरलेलाच होता. जूनमध्ये सुरु झालेला पावसाळा जास्तीत जास्त ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असायचा. पण आता स्थिती  पालटलेली आहे. आजकाल कधीही कोणत्याही ऋतूत पाऊस येतो. अवकाळी येणाऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान होते. रोगराई वाढते आणि अशा वेळेस म्हटले जाते की ‘निसर्गचक्र बदलेले आहे’. पण खरंच कोण जबाबदार आहे ह्याला? खूप विचार केल्यास लक्षात येते की ह्या सगळ्याला आम्ही माणसेच जबाबदार आहोत. अमर्याद वृक्षतोड, सिमेंटची वाढत चाललेली जंगले, वायुप्रदूषण, जलप्रदूषण ह्या सर्वांचा विपरीत परिणाम तुझ्यावर होतो आणि फलस्वरूप अवकाळीपाऊस, पूर, भूकंप, सुनामी ह्यांसारखी संकटे येतात. या सगळ्यात आम्ही हे विसरतो आहे की तू आम्हाला मुक्तहस्ताने भरभरून दिलेले आहेस आणि देतो आहेस. पण झाडे, जंगले, डोंगर, समुद्र ह्या तुझ्या घटकांचे नीट जतन झाले नाही तर त्याचा परिणाम तुझ्यावर होऊन तुझे चक्र बदलेल आणि त्यामुळे नुकसान आमचेच होईल. आज ह्या पत्राच्या माध्यमातून मी तुला आश्वस्त करते की वृक्षारोपण करून, वायू आणि जल प्रदूषण टाळून तुझे संवर्धन करायचा माझ्यापरीने मी नक्की प्रयत्न करेन. तसेच माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याचे महत्व नक्की समजावून सांगेन. हे निसर्गा, तू जे मुक्त हस्ताने आम्हाला देतोस ते जपण्याचा आम्ही सर्व माणसे संघटित होऊन प्रयत्न करू. तुझा वरदहस्त असाच आम्हा सगळ्यांवर राहू दे. लोभ असावा.

   तुझीच एक निसर्गप्रेमी,

                                                                                  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *