सागरास

–वर्षा सबनीस–

प्रिय हिंदी महासागरा ,

       तुझ्या अमर्याद व्याप्तीला सलाम,

       तुझ्या औदर्याला शत शत प्रणाम.

       काल रात्री सुखरूप घरी येऊन पोहोचलो. अंथरुणावर पाठ टेकली आणि मनाने परत मी तुझ्या किनारी येऊन बसले. मनात तुझे अथांग रूप ठिय्या देऊन बसले आहे. सकाळचा सूर्योदय आठवू की संध्याकाळचा सूर्यास्त ? सूर्योदयाला मिनिटा गणीक बदलणारे सूर्याचे प्रतिबिंब आणि पाण्यात पडलेले केशरी आकाशाचे प्रतिबिंब मनात कायम घर करून राहिले आहे. मनाच्या कॅमेऱ्याने टिपलेले असंख्य फोटो डोळ्यासमोरून जातच नाहीत.

       पौर्णिमेच्या रात्रीत तर तुझे रूप नजर ठरू देत नाही. चंद्राच्या चांदण्यात चांदी सारखे चमचमते पाणी, त्यात चंद्राचे शीतल प्रतिबिंब. अहाहा, वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. पौर्णिमेच्या रात्रीचे तुझे सौंदर्य शब्दात आणि काव्यात बंदिस्त करायला सगळे लेखक आणि कवी असमर्थ ठरतात. तसेही तुझे आणि चंद्राचे फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हो ना ? भरती ओहोटीचे चक्र ह्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे घडत असतं.

          भारतमातेचे चरण धुणाऱ्या, खळखळत्या लाटांनी विवेकानंद स्मारकाला वंदन करणाऱ्या हिंदी महासागरा , तुझे रूप नेहमीच फार चित्तवेधक असते. पूर्वेकडून बंगालचा उपसागर तर पश्चिमेकडून अरबी सागर, असा सुंदर मिलाफ होऊन भारताचे दक्षिण टोक सुंदर आणि समृद्ध झाले आहे.

          खरंतर , पृथ्वीतलावरील  २/३ भागात , तू आणि तुझी भावंडं राज्य करताहात . आपल्या प्रजेची खूप काळजी घेत आहात . कुठे तुझी भावंड बर्फाच्छादित असतात तर कुठे मोठ्ठे हिमनग तयार झालेले असतात. हे सागरा, ह्या पृथ्वीला, सूर्याच्या दाहा पासून तूच तर वाचवतोस. जसे शंकराने हालाहल पिऊन समस्त विश्वाला वाचवले, तसेच सूर्याची उष्णता तुझ्यातच सामावून घेऊन पृथ्वीला थंडावा देतोस. सूर्याच्या उष्णतेने जशी जमीन तापते ,तसेच समुद्राचे पाणीही तापते. ग्रीष्म ऋतूत तापलेली  पृथ्वी , चातका सारखी पावसाची वाट पाहत असते . अखंड बाष्पीभवन होऊन , हवेतील आर्द्रता वाढते . हे ढग बनून किनाऱ्यावर येतात आणि तृषार्त वसुंधरेला सचैल स्नान घडवतात. पृथ्वीवर हा जलधरांचा वर्षाव केवळ तुझ्याचमुळे होतो आहे. 

         भारत देश ,मोसमी वाऱ्यां वर अवलंबून असतो म्हणजेच पर्यायाने तुझ्यावर अवलंबून असतो . हिंदी महासागरा , भारताला सुजलाम् सुफलाम्, करण्यात तुझा सिंहाचा वाटा आहे हे निर्विवाद आहे.

            गेल्या काही दशकांत जागतिक तापमान वाढीमुळे, तुझी उत्तर आणि  दक्षिण ध्रुवावर असलेली बर्फाच्छादित भावंड  पुन्हा पाण्यात परिवर्तित होत आहेत.त्यामुळे जगभरात तुझी पातळी वाढते आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे अनिवार्य आहे हे माणसाला कधी समजणार ?

         मैलोनमैल प्रवास करून तुला येऊन कडकडून भेटणाऱ्या नद्या,तुझ्यात रित्या होतात .त्याची परतफेड  तूही तितक्याच औदर्याने , पर्जन्यवृष्टीच्या रूपाने करतोस . कविमनाला तुझे आणि नद्यांचे हे प्रेम प्रेरणादायी ठरते. अनेक प्रेमगीते त्यातून जन्माला येतात. अनादी काला पासून अविरत सुरू असलेल्या ह्या जलचक्रामुळे पृथ्वीवरील जीव जिवाणू जिवंत आहेत.

       किनाऱ्यावर तासनतास बसून, तुझ्या उदरात काय काय दडले असावे हा विचार करत होते. अगस्ती ऋषींनी एका क्षणात तुला पिऊन टाकले ,ही गोष्ट जेंव्हा वाचली तेंव्हा त्या पाण्या बरोबर त्यांच्या पोटात काय काय गेले असावे असा बालिश विचार ही मनात आला . समुद्रमंथन करून जी दिव्य रत्ने निघाली तशीच अजून असतील का असाही विचार मनात आला . दुसऱ्याच क्षणी, आजच्या युगात , प्लास्टिक मुळे झालेली पर्यावरणाची अपरिमित हानी , तुझ्यात उत्सर्जित होत असलेला कारखान्यांचा कचरा डोळ्यासमोर आला . माणसाच्या स्वार्थीपणाची , निष्काळजीपणाची कीव करावीशी वाटते. स्वतः च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखे आहे हे. जलप्रदूषण हे समुद्रातील जीवसृष्टीकरता किती हानिकारक आहे हे वेगळे सांगायला नको .

         समुद्रमंथनातून अनेक रत्ने निघाली असे म्हणतात .हे मला तरी प्रतीकात्मक वाटते .तुझ्या पोटातील खनिजांचा साठा , खनिज तेलाचा साठा संपवायचा चंगच बांधला आहे ह्या माणसांनी .खरं तर तुझ्या औदार्याला काही सीमाच नाही .पण हे करंट्या माणसाला काही समजत नाही .निसर्गाला ओरबाडून टाकण्यात त्याला धन्यता वाटते . परिणामी, पर्यावरणाचा तोल जातो आणि मग कधीतरी तुझे रौद्र रूप बघावे लागते .अवेळी येणारा पाऊस, वादळे, त्सुनामी भयावहच आहेत .

         तुझे पाणी खारे कसे झाले असावे ? जरा शोध घेतल्यानंतर असे लक्षात आले की आज जगभरात मीठ मिळते ते केवळ तुझ्या पाण्यातून . कडी कपारी तून खळाळत वाहणाऱ्या नद्या त्यांच्याबरोबर बरेच क्षार घेऊन येतात .त्याशिवाय समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भेगातून बरेच क्षार पाण्यात मिसळतात आणि त्यामुळे पाणी खारट होते . ह्या पाण्यातूनच आपल्याला मीठ मिळते. म्हणून मला असे वाटते की माणसाने, शब्दशः खाल्या मिठाला जागावे आणि जलप्रदूषण टाळावे.

        तुझ्यावर ज्यांची उपजीविका अवलंबून आहे तो कोळी समाज तर तुला देवच मानतो . आणि ते अगदी रास्तच आहे . तुझ्याशिवाय ह्या सृष्टीची काय अवस्था होईल ह्याची कल्पनाही करवत नाही. 

          चराचरात देवाचे अस्तित्व आहे असे मी मानते. ते तुझ्यात आहे तसेच माझ्यातही आहे. हो ना ? मग एकमेकांचे देवत्व जपायचा प्रयत्नही आपणच करायला पाहिजे ना ? तुझे उत्तरदायित्व तर तू पुरेपूर निभावतो आहेस . आता माझी म्हणजेच समस्त मानवजातीची जबाबदारी आहे की तुझे रूप, तुझ्या सीमा, तुझ्या पाण्यात मुक्त संचार करणारे जलचर प्राणी, ह्या सर्वांचे रक्षण व्हावे. 

 कळावे, लोभ असावा, जेणे करून पृथ्वीवर अशीच जलधारांची बरसात होत राहो . परत लवकर तुझ्या भेटीचा योग येवो …

  तुझी कृतज्ञ,

  वर्षा

ता. क….आत्ताच मिळालेल्या ताज्या बातमी नुसार, यंदा तुझ्या कृपेने पाऊस लवकर येणार आहे . अशीच कृपादृष्टी असू दे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *