–वैशाली प्रसन्न सुळे–
पावसाळा
अंदमानच्या पावसाळ्या,
खरंतर ,पत्राचा मायना लिहितांना संबोधन लिहावं हे शाळेतच शिकले आहे. पण आज तुला पत्र लिहितांना प्रिय नाही लिहू शकत. कारण तुझा मी घेतलेला अनुभवच तसा होता. रौद्र ,भीतीदायक आणि खूप काही शिकवणारा. गांधिनगर, अगदी आखीव रेखीव ,स्वच्छ राजधानीच्या शहरातून तुझ्याकडे म्हणजे पावसाकडे,अंदमानला येण्याचं नक्की झालं आणि एकच गोष्ट सगळीकडून ऐकायला मिळाली” अंदमानचा पाऊस “.म्हटलं ,ऐकलं खूप ,आता अनुभव घेऊ या. गेलो तेव्हा एप्रिल होता. निदान दोन दिवस तरी लख्ख ऊन होतं .तिसऱ्या दिवशी पण असंच वातावरण असणार असं वाटत असतानाच अचानक ढग भरून आले .सोसाट्याचा वारा ,मागोमाग पाऊस .अवकाळी पावसाची एखादी सर असेल असं वाटलं. मागून अनुभव घेतला की इथे अशा केव्हाही कितीही सरी कोसळतात .खरा पावसाळा आणखीन वेगळाच. मे पहिल्या आठवड्यात पावसाळा सुरू झाला .आधी सोसाट्याचा वारा सुटायचा .आमचं घर पहिल्या मजल्यावर होतं .समोर उंच हिरवाकंच डोंगर .पुढयात दरी. बाजूला समुद्र. असा सगळा निसर्गाचा सहवास .वारा सुटला की दरीतून त्याचा घों घों असा खूप आवाज यायचा .डोंगरावरची मोठमोठाली झाडं घुसळल्या सारखी हलायची .आता ती पडणार नक्कीच असं वाटायचं. बघता बघता काळेकुट्ट, अगदी काजळा सारखे ढग भरून यायचे . मुसळधार पाऊस सुरू व्हायचा. पाऊस म्हणजे नळाच्या धाराच जणु. प्रचंड आवाज. समोरचं काहीच दिसायचं नाही. कधी तरी या पावसात सापडलात चुकून की लहानपणी शाळेत शिक्षकांचा आणि घरी मोठ्यांचा खाल्ला नसेल एवढा मार हा पाऊस देणार! बरं, एकदा सुरू झाला की थांबायचं नावच नाही .अशा वातावरणात वीजपुरवठा हमखास खंडित व्हायचा .बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वर्तमानपत्रातून अतिवृष्टीचा इशारा यायचा. तिथे एकमेव सरकारी वर्तमानपत्र असायचं आणि सगळे फक्त हवामानाचा अंदाज वाचायला हे घ्यायचे. अंदमानला येण्याआधी बातम्यांमध्ये मौसम सुरू झाला की मी पटकन चैनल बदलायची कारण इथे येईपर्यंत या मौसम ने जगण्यात काहीच फरक पडला नव्हता .आता मात्र ही कमी दाबाची बातमी ऐकली की माझा रक्तदाब वाढे. कारण मिल्ट्री ची हेलिकॉप्टर्स जवळपासच्या बेटांवर आवश्यक अन्नधान्य ,औषधांची मोठाली खोकी घेऊन निघत. अगदी घराच्या गच्चीवर उतरतील असं वाटावं इतक्या जवळून ती जात .मोठाल्या साखळयांनी बांधलेले, हेलकावे खाणारे ,अवजड खोके सोसाट्याचा वारा, काळे ढग आणि अंधार .जेमतेम वर्षाचा असणारा राघव त्या हेलिकॉप्टरच्या आवाजाने भेदरून रडायला लागायचा .एखाद्या भयपटातल्या सारखं वातावरण असायचं .तिसरीतली गौरी शाळेतून घरी येईपर्यंत जाड रेनकोट फाटुन पार ओलीचिंब झालेली असायची. छत्री तर इथे अगदीच कुचकामी. एकदा सुरू झालेली झड पंधरा दिवसही उघडत नसे .सूर्यदर्शन नाही ,ऊन नाही. सगळीकडे ओलसर दमटपणा. कपडे वाळत नसत .कडधान्य ,डाळी ,किराणा सामान लगेच खराब होई.अक्षरश: सामान 100 ग्रॅम च्या छोट्याशा पुडया आणून लगेच वापरून संपवावे लागे. नेहमी लागणारी औषधं, गोळ्यांचा सुद्धा पाकिटाच्या आत भुगा होई. मुंग्यांचं साम्राज्य वाढे.चेन्नईहून बोटी न आल्याने दुकानं रिकामी होत. भाजी ,फळं,फिश मार्केट सगळं ओकंबोकं .जरासा पाऊस कमी झाला की बाजारातून एक फेरी मारायची. बोट म्हणजे सामान आलय का ते बघायचं. कधीतरी कुणीतरी जोरात ओरडे” चेन्नई से शिप आता है”. कि सगळे पिशव्या घेऊन बाहेर पडत. साठवणुक करत .ती संपते तोच पुन्हा दुसरी झड सुरू. आणि असं चक्र सतत सुरु राही. घरात जाळी धरू नये, कोंदट पणा वाटू नये यासाठी सतत स्वच्छता करावी लागायची. अंदमानला असताना माझ्या असल्या नसल्या पाक कौशल्याचा अगदी कस लागला. डाळी ,कडधान्य तिथे मिळणाऱ्या फारच थोड्या ओळखीच्या आणि प्रचंड महाग अशा भाज्या यांचे विविध प्रकार करावे लागायचे .मुलं आणि मी पावसाळ्यात घरातच बंदिस्त असायचो. रस्त्यांवर मोठ मोठाले साप, विषारी गोम यांचे साम्राज्य असायचं. गौरी आणि राघव दोघांनाही मी खाली अजिबात उतरू देत नसे. मग दिवसभर आम्ही घरातच बैठे खेळ खेळायचो. नेट तर सोडाच साधी फोनची रेंज पण दोन-दोन दिवस नसे. जगाशी संपर्क तुटायचा .नकोसं वाटायचं. एकच पावसाळा मे ते नोव्हेंबर, काढला कसाबसा .एप्रिल मध्ये मी आणि मुलं परतलो. माणसाचा अनुभव त्यांनं पाहिलेल्या पावसाळ्यात मोजतात .मी गमतीने सगळ्यांना म्हणायचे की मी अंदमानचा एकच पावसाळा पाहिला आहे पण त्याचा अनुभव जन्मभर पुरेल असा आहे. खरंच अंदमानच्या चिवट पावसानं मला चिकाटी, पर्याय शोधणं ,धीर हे सगळं शिकवलं .येथे राहणाऱ्या माणसांच्या जीवनाचं हा पाऊस अविभाज्य अंग आहे .पावसाच्या अडचणींना तोंड देऊन ती मंडळी राहत आहेत. प्रगती करत आहेत. नितांत सुंदर किनारे ,समुद्र जीवसृष्टी आणि हिरवाई लाभलेल्या अंदमानचं तू म्हणजे पावसाळा एक अविभाज्य आणि दुसरं अंगआहे. तुझ्यामुळे तिथे पर्यटकांसाठी चे शो रद्द होतात .बोटी रद्द होतात. हेलिकॉप्टर्स रद्द होतात .भौतिक प्रगतीने सगळ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या माणसाला संयमशिकवणारा एक मात्र तू म्हणजे अंदमानचा पावसाळा!!
