—डॉ. सौ.अनुराधा भागवत—
‘ शतायुषी भव ‘ हा आशिर्वाद आपण खूपदा ऐकलेला आहे. आपली आयुष्याची कल्पना मुळातच शंभर वर्षांची आहे. ‘पन्नाशी ‘ म्हणजे आयुष्याच्या चित्रपटाचे मध्यंतर आहे. वय वाढू लागले की जगणं इतकं सहज,सुकर रहात नाही. शेवटपर्यंत जगण्याचा आनंद घेण्यासाठी स्वतःलाही प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न कधीपासून सुरु करावेत?इयान रॉबर्टसन् यांचा एक लेख वाचनात आला, इयान रॉबर्टसन् डबलिनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये न्यूरोसायन्स विभागाचे डीन आहेत, ते लिहतात,
” सध्याच्या काळांत म्हातारपणाची सुरुवातच ऐंशीव्या वर्षी होते. आपल्याला पन्नास ते ऐंशी वयोमानाचा जवळजवळ तीस वर्षांचा काळ मिळतो, जो तारुण्यापेक्षाही मोठा आहे. चिरतरुण, आनंदी उत्साही व्रुध्दत्व अनुभवायचं असेल तर या काळांत संपूर्ण नवीन जोवनपध्दति स्विकारायला हवी. “
आजपर्यंत व्यतीत केलेल्या, संवयीच्या झालेल्या आयुष्यात आवश्यक ते बदल करून आपलं नवीन वेळापत्रक बनवण्यासाठी त्यांनी सात मुद्दे सांगितले आहेत.
१)-Aerobic fitness
२)-Mental Stimulation.
३)-new Learning
४)-No Stress
५)-Rich Social life
६)-Healthy eating habbits and Diet
७)-Think yourself young.
पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभे असणाऱ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगते, आतां स्वतःबद्दल विचार करा. कौटुंबिक जबाबदाऱ्या, अधिक पैसे कमवायची इच्छा, आयुष्यातील स्पर्धा अजून कांही वर्षे सोबत करतीलच पण स्वतःसाठी वेळ देणं चूक नाही हे लक्षांत घ्या. वरील मुद्दे लक्षांत घेऊन दिनचर्येत काय व कसे बदल करायचे याचा विचार करा. स्वतःचे वेळापत्रक स्वतःच ठरविले कीं आचरण्यास सोपे जाते.
पन्नाशीच्या वयांत असणाऱ्या महिलांना कांही स्वतंत्रपणे सांगायचं आहे. या वयांत बायका घरसंसार,मुलामुलींची शिक्षणं,लग्नं,स्वतःची नोकरी-व्यवसाय, करीयर यांत पूर्णपणे व्यस्त व व्यग्र असतात ही तारेवरची कसरत संसार मांडल्यापासूनच सुरु असते. आपली पन्नाशी आली हे लक्षांत आणून द्यायचे काम निसर्गच करतो. हे मेनोपॉजचे म्हणजे रजोनिवृत्तीचे वय ,हे नैसर्गिकच आहे, पण ४५ ते ५५ वयाचा हा काळ पुष्कळांना खूप त्रासाचा जातो. शारिरीक त्रास असतातच पण भावनिक, मानसिक स्थितीही खूप नाजुक होते. बायका खूप हळव्या होतात. मानसिक अस्थिरता व भावनिक आंदोलने त्यांना पेलवत नाहीत, त्यामुळे निराशा व अपराधबोध फार झटकन मनाचा ताबा घेतात म्हणून महिलांना सांगणे आहे की वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या व आवश्यक ते उपचार करा.समुपदेशकाची मदत घ्या. विश्वासातल्या कुणाशी तरी मनमोकळेपणाने बोला.,चर्चा करा.स्वतःला कुठल्याही प्रकारे कमजोर समजू नका. पन्नाशीच्या वयाला बायका-पुरुष दोघांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.’आरोग्याचा ‘ विचार म्हणजे नियमित वैद्यकीय तपासणी आलीच. महिलांनी ४५व्या वर्षापासून व पुरुषांनी पन्नासाव्या वर्षापासून वर्षातून एकदा तरी आपली संपूर्ण तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. आनुवंशिक आजार असतील तर त्यानुसार आहारांत व व्यवहारांत पथ्य पाळणे गरजेचं आहे. एखाद्या आजाराची सुरुवात किंवा शक्यता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागणे हितकारक.’ जिभेवर ताबा ‘म्हणजे आरोग्य आपल्या हातात. लठ्ठपणा पुष्कळ आजारांना निमंत्रण देतो. वजन आटोक्यात ठेवणे, या गोष्टीला आपल्या वेळापत्रकात प्राथमिकता द्यावी.
वर सांगितलेल्या मुद्द्यांपैकी आहाराचा मुद्दा विचारांत घेतला तर वैद्यकीय सल्ल्यानुसार पथ्यपाणी सांभाळून दैनंदिन आहाराचा स्वतःचा तख्ता स्वतःच बनवावा व त्याप्रमाणे आहार व खाण्यापिण्याच्या संवयी बदलाव्यात.दूध, दुधाचे पदार्थ रोज खाण्यात असावेत, डाळी व मोड आलेली कडधान्ये आलटून पालटून खावीत. मौसमी फळे, भाज्या, सैलड,ज्यात चोथा असतो, मुबलक प्रमाणात घ्यावेत. आता जेवण म्हणजे ‘ उदरभरण नोहे,यज्ञकर्म हे जाणिजे ‘!मांसाहार वर्ज्य नसेल तर उत्तम दर्जाची भरपूर प्रथिने अनायासे मिळतात अर्थात् पदार्थ फार चमचमीत नसावेत, अन्न नेहमीच ताजे व सात्विक असावे.जेवणात चरबीयुक्त पदार्थ व कर्बोदक यांचे प्रमाण कमी असावे. प्रथिने, जीवनसत्वे, लोह,कैल्शियम पुरेसे हवे व अन्नातून हे घटक पुरेसे मिळत नसतील तर पूरक औषधे व गोळ्या नियमित घ्याव्यात. दिवसभरांत ठरवून पुरेसे पाणी प्यावे.
” मेंदूची कार्यक्षमता, कार्यशील शरीर, स्वस्थ व समाधानी मन “या त्रिसूत्रीवर पुढील आयुष्याची गुणवत्ता अवलंबून असते. इयान रॉबर्टसनने सुचवलेल्या मुद्द्यांवर स्वतःपुरता विचार केला व एक एक गोष्ट आचरणात आणून संवयीची करत गेलं की आपली दिनचर्या सकारात्मकरित्या बदलत जाते व ही त्रिसूत्री सहज साधते, कशी ते पाहू या. तसे हे सर्व मुद्दे एकमेकांना पूरकच आहेत.
सर्वात पहिला मुद्दा ‘ फिटनेस ‘ चा म्हणजे शारिरीक क्षमता, कार्यशीलता,लवचिकपणा व स्नायूंची शक्ति टिकवून धरण्याचा आहे. यासाठी व्यायामाला वेळ द्यायला हवा.’ चालणं ‘ हा उत्तम, सर्वमान्य व सहजी अंमलात आणण्याजोगा व्यायाम आहे,यांत धावणं, चढाव चढणं सर्व येते. सायकल चालवणे हाही याचा पर्याय आहे.’ पोहणे ‘सर्वांगसुंदर व्यायाम आहे. एरोबिक व्यायामाचे प्रकार आहेत, योगासने आहेत. योगासनांमधे संथपणा व स्थिरता आहे. एरोबिक प्रकारांत गति आहे, वेग आहे, यामुळे चपळता वाढते. वाढत्या वयाबरोबर चपळता टिकवून धरणं महत्त्वाचे आहे.’ Stretching ‘मुळे लवचिकता टिकते. शरिराला ताणण्याचे व्यायाम दिवसभरांत वारंवार करावेत. घरी किंवा आसपास मांजरं असतील तर त्यांचा आदर्श स्वतःसमोर ठेवावा. वजन उचलण्याने स्नायूंची मजबूती टिकते. श्रमांची व कष्टांची कामे टाळण्यापेक्षा स्वतः करावीत. ‘ शरीरश्रम ‘महात्मा गांधींच्या एकादश सूत्रांतही आहे. शारिरीक कार्यशीलतेचा,व क्रियाकलापांचा मेंदूच्या शक्तीवर व स्थितीवर सकारात्मक परिणाम होतो.
मेंदूला चालना मिळण्यासाठी आपण फावल्या वेळांत कांही खेळ खेळू शकतो उदा. कोडी सोडवणे, स्पर्धांमध्ये भाग घेणे इत्यादि. वाचन करावे, आपसांत विविध मुद्द्यांवर चर्चा करावी. कांही नवीन आजपर्यंत संवयीच्या नसलेल्या, न केलेल्या गोष्टी करणे. यामुळे मेंदूला चालना मिळते. एखादा छंद वेळ काढून जोपासणे. नवीन गोष्टी करण्यात नवनवीन गोष्टी शिकणं आलंच.आपल्या आवडीचा एखादा विषय किंवा कला नव्याने शिकायला सुरुवात करावी. जितके जास्त आपण शिकायचा प्रयत्न करतो तितके जास्त आपण शिकू शकतो.
मानसिक ताण-तणाव कुणालाही चुकलेला नाही. भोवतालची जीवघेणी स्पर्धा, आर्थिक समस्या याबरोबरच भूतकाळातील नकारात्मक आठवणी व भविष्यकाळाची चिंता या गोष्टी तणावाला कारणीभूत आहेत. पन्नाशीनंतर तणावमुक्त आयुष्य हे उत्तम आयुष्य. मानसिक तणावाचा मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, विशेषतः स्मरणशक्तीवर.तणावमुक्तीचे अनेक उपाय आहेत. नियमित व्यायाम, ध्यान, प्राणायाम हे त्यापैकीच. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा. नवीन कांही शिकण्यांत,छंद जोपासण्यात मन गुंतवले की तणाव कमी होतो. पुष्कळांना अध्यात्माचा मार्ग खुणावतो. मुळांतच धार्मिक प्रव्रुत्ति असेल तर अध्यात्माचा, श्रद्धा-भक्तीचा मार्ग सहज सोपा आहे, अंधश्रद्धेपासून मात्र जपावं. एकटे, एकाकी न राहतां जास्त वेळ समवयस्क, समविचारांच्या मित्रमैत्रिणींबरोबर आनंदात घालवावा. पुरेशी विश्रांति व झोप मनाला तजेलदार, हलकं ठेवते. किमान आठ तास तरी रोज झोप हवीच.
मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे. सम्रुध्द सामाजिक जीवन हा फार मोठा आधार आहे. एकत्रकुटुंब पध्दत, सणवार, उत्सव समारंभ, आपले समाजजीवन सम्रुध्द करतात. यांत मनमोकळेपणाने भाग घ्यावा, नाती जपावीत,नवीन मित्र जोडावेत, आपसांत संपर्क, गाठीभेटी वाढवाव्यात.प्रवास करावेत. तीर्थस्थळांना,देवस्थानांना भेटी द्याव्यात.
स्वावलंबी, सन्माननीय आयुष्य जगण्यासाठी आर्थिक नियोजन आतांच करावे, तज्ञांच्या सल्ल्याने करावे. उर्वरित आयुष्यात आपल्याजवळ पुरेसा निधि असेल अशाप्रकारेच ते असावे. या लेखांतून बोध घेऊन सर्वजण योग्य ते प्रयत्न करतीलच. एकमात्र स्वतःशी नक्की ठरवा.कुठल्याही परिस्थितीत कधीही निराश न होता नेहमी आनंदी रहायचं. महत्त्वाचे म्हणजे स्वतःला कधीही म्हातारे समजायचे नाही, मनाने नेहमी तरूणच रहायचे व अगदी तरुणांना हेवा वाटेल असे जगायचे.