— देवश्री अंभईकर धरणगांवकर—
‘आधी पोटोबा मग विठोबा!’ असे आपल्याकडे गंमतीने म्हणतात कारण पोटोबा शांत असेल (अर्थात छान पदार्थ पचवून) तर मनही शांतपणे विठोबाचे चिंतन करू शकते. त्यासाठी आपली रसना- जिंव्हा हो, किती मदत करते. आपण मात्र ‘जिभेचे चोचले’ म्हणून तिला बोल लावतो पण छान, स्वादिष्ट, चमचमीत खायला आपल्याला मनातून आवडते हे खरे! चांगले खायचे असेल तर ते बनवतासुद्धा यायला हवे. आता प्रत्येक जण काही ‘सुगरण’ किंवा ‘मास्टर शेफ’ नसतो पण ‘थोडंफार बरं’ जेवण बनवण्यासाठी प्रयत्न नक्कीच करायला हवेत. आपल्या जेवणाची सोय आपल्याच स्वयंपाकघरात शक्यतो ‘कुक’ नामक प्राण्याच्या भरवशावर न राहता करायला हवी असे माझे बापडीचे प्रांजळ मत आहे. तर असो. नमनाला घडीभर तेल पुरे! सांगायचे आहे ते असे की छान पदार्थ बनवायला शिकताना काही पदार्थ चांगलीच तारांबळ उडवतात. ते बिघडलेले पदार्थ नीट करताना जी धमाल येते ती कायम स्मरणात राहते…
लग्नानंतर बंगळुरूला आल्यावर काही महिने इथल्या दाक्षिणात्य पदार्थांवर ताव मारला. नंतर मात्र समोसा, कचोरी, पाणीपुरी, पावभाजी, वडापाव, ढोकळा अशा आपल्या नेहमीच्या चटपटीत पदार्थांची आठवण यायला लागली. त्यांच्या पाककृती करून पाहाव्या असे वाटू लागले. तेव्हा आम्ही दोघेही इथे नवीन होतो. बंगळुरूला कुठे काय मिळते याचे अल्पज्ञान होते. वर्ष-सहा महिन्यांनीच महाराष्ट्रात जाणे होणार म्हटल्यावर घरीच करायचे असे ठरवले.
असाच एक अगदी साधा, सोप्पा(?)पदार्थ म्हणजे ढोकळा! मऊ, स्पॉंजी (म्हणजे मराठीत सच्छिद्र म्हणतात का?) थोडासा गोडसर, वरून हिंग- मोहरी, कढीपत्ता, मिरचीची फोडणी घातलेला किंवा बिनफोडणीचा, चटकदार चटण्यांसोबत मस्त लागणारा, खमण/खमणढोकळा/ढोकळा या नामे सुपरिचित असलेला हा पदार्थ अनेकांना आवडतो तसा मलाही आवडतो.
एका संध्याकाळी मी माझ्याकडे असलेल्या पुस्तकातून पाककृती शोधली. नवऱ्याला ऑफिसमधून आल्यावर आश्चर्यचकित करू असा विचार करून तात्काळ होणारा- ‘इन्स्टंट’ ढोकळा करायचे ठरवले. एकीकडे रेडिओ लावून विविधभारतीवर गाणी ऐकत भराभरा बेसन, हळद, मीठ, साखर, पाणी व सोडा वगैरे जिन्नस घेऊन मिश्रण फेटले. वाफवायला ठेवणार इतक्यात रेडिओवर आवडते गाणे लागले. त्याचा आवाज मोठा करण्यात काही सेकंद गेले… आरामात ढोकळे वाफवायला ठेवले. तेवढ्यात नवऱ्याचा फोन आला. तेव्हा लग्न नवे नवे असल्याने फोनवर नाही म्हटले तरी जरा जास्तच वेळ प्रेमळ वार्तालाप झाला. फोन ठेऊन परत येऊन ढोकळे पाहिले तर काय… ते चक्क फसले होते. हळद व सोड्याची प्रक्रिया होऊन लाल डागही आले होते. जास्त वेळ वाफ घेऊन बिचारे ओले घट्ट झाले. पहिला प्रयत्न फसला!
मी माझ्या सख्ख्या मैत्रिणीला फोन करून झाले ते सांगितले. तीने भराभर काही सूचना दिल्या. काय बिघडले असेल त्याचे तर्क लावले. तिचे लग्न माझ्या सहा महिने आधी झाले होते म्हणून तिला स्वयंपाकघरात ‘जास्त अनुभव’ होता. मी फोनवर शक्य तितके ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्मार्टफोन व ‘यु ट्यूब’चे फारसे प्रस्थ नव्हते. रेडिओ बंद करून व भ्रमणध्वनियंत्राला शांत बसवून (मोबाईल सायलेंट करून) पुन्हा उत्साहाने ढोकळे करायला घेतले. यावेळी हळद न घालता काही वेळ छान वाफवले. आता तो पदार्थ वरून तरी ‘ढोकळा सदृश्य’ दिसत होता. जेव्हा थंड झाल्यावर चौकोनी कापायला घेतले तेव्हा कळले की अर्धेच शिजले. अर्धे तसेच कच्चे-ओले मिश्रण राहिले. या सर्वात बऱ्यापैकी वेळ गेला होता. एवढे बेसन फेकायचे कसे म्हणून ते भांडे फ्रीजमध्ये सरकवून मी ‘बरं झालं बाई, ह्यांना काही सांगितले नाही ते!’ असे म्हणत स्वयंपाकाला लागले. त्या दिवशी नेमके अहो ऑफिसमधून लवकर आले. माझ्या नकळत त्यांनी काहीतरी घ्यायला फ्रीझ उघडला व ढोकळ्यांचे फसलेले मिश्रण पाहिले.
“हे काय गं?”-अहो
“ते… ते पिठले करायचे आहे, त्याची तयारी आहे!” मी सुचले ते सांगितले.
नवऱ्याला स्वयंपाक येत नसेल तर ते तसे गैरसोयीचे असले तरी असे कधी सोयीचे पण होते. “पिठले? पण माझी आई तर वेळेवर बेसन भिजवते!” -अहो
अहोंना पिठल्याची बरीच माहिती होती.
“माझी वेगळी रेसिपी आहे!”- मी गुळमुळीत उत्तर दिले.
त्या दिवशी रात्रीच्या जेवणात बेसन-पोळी झाली.
दुसऱ्या दिवशी नवरा ऑफिसमध्ये गेल्यावर मी पुन्हा ढोकळा करून पाहायचे ठरवले. ढोकळ्यासारख्या इतक्या सोप्या(?) पदार्थाने माझा काल पराभव केला ही बोच मनात होतीच म्हणून यावेळी सगळी पाककृती नीट लिहिली. कोणत्या टप्प्यांवर चुकू शकते याचे अंदाज बांधले. मैत्रिणीने दिलेल्या टिप्पण्या आठवल्या. दूरदर्शनवरच्या रेसिपी शोमध्ये दाखवतात तसे सगळे साहित्य ओट्यावर नीट मांडून घेतले. अहोंना भ्रमणध्वनीयंत्रावरून संदेश पाठवला की आता दोन तास मी ‘वाचन करणार आहे’ आपण नंतर बोलू. एवढे सगळे करून पुन्हा तिसऱ्यांदा ढोकळे केले.
यावेळी आधीपेक्षा पाच टक्के बरोबर आले पण ते अजिबात स्पॉंजी नव्हते. बेसनाच्या घट्ट, ओल्या वड्या असे वर्णन करता येईल. तिसरा प्रयत्नही फसला होता. आता माझा उत्साहही डळमळीत झाला होता. त्या दिवशी पुन्हा बेसन-भाताचा बेत बघून अहोंनी जरा आश्चर्याने माझ्याकडे पहिले. “काल साधे बेसन होते आज टोमॅटो घातले आहेत!” मी खोटे हसत म्हणाले. नवऱ्याने मुकाट्याने सलग दोन दिवस (सोडा घातलेले) बेसन खाल्ले. लग्न नवीन होते ना, त्यामुळे ह्यांनी प्रेमाने सांभाळून घेतले. ते पिठलेही विचित्र लागत होते ती गोष्ट वेगळी.
तिसऱ्या दिवशी कार्यालयात जाण्यापूर्वी अहोंनी जातीने फ्रीझमधला भाजीचा कप्पा तपासला आणि मला अगदी गोड आवाजात ‘घरात किती छान भाज्या आहेत त्यातली एखादी कर!’ म्हणून सांगितले. मी नंदी बैलासारखी मान डोलावली. प्रत्यक्षात मात्र ह्यांची पाठ फिरल्याबरोबर मी संगणकावर- गुगलवर ढोकळा रेसिपी शोधायला बसले. गुगलने शेकडो पर्याय दाखवले. त्यातही चणाडाळ रात्री भिजवून करायचे, नुसत्या रव्याचे, रवा-बेसनाचे, तांदूळ पिठी-बेसनाचे इत्यादी अनेकानेक उपप्रकार पाहून तर माझा आणखी गोंधळ उडाला. शेवटी वैतागून मी संगणक बंद केला. एक खोल श्वास घेतला आणि ‘इन्स्टंट बेसन ढोकळा’ या मूळच्या पाककृतीलाच पुन्हा करायचे ठरवले.
पुन्हा एकदा मैत्रिणीचे, एका मामीचे आणि एका वहिनीचे फोनवर मार्गदर्शन घेतले. त्या तिघींनी वेगवेगळ्या टिप्स दिल्या. त्यानुसार मी लगेच दुकानात जाऊन नवे साहित्य आणले. पुन्हा ढोकळे वाफवयाला लावले पण “कुछ चेहरे मासूम दिखते हैं मगर होतें नही!” या धर्तीवर “कुछ पदार्थ सोपे दिखते है मगर होते नही!” असे मला वाटले. मी पण जिद्द सोडली नाही. मैत्रीण, मामी व वहिनी अशा तिघींच्याही तीन पद्धतीने ढोकळे करून पहिले पण तो पदार्थ माझ्यावर नाराज होता. तिघींच्याही रेसिपी अनुक्रमे खूप कोरडे (सोडा जास्त), खूप आंबट (लिंबू सत्व जास्त) आणि पिठलेच (दही जास्त झाल्याने) अशा प्रकारे माझ्याकडून बिघडल्या.
त्या दिवशी रात्री ‘दह्यातील पिठले’ ताटात पाहून मात्र अहो जरा चिडलेच पण लग्न नवीन होते म्हणून शक्य तितक्या ‘शांतपणे’ ह्यांनी मला “हा काय प्रकार आहे? आज पिठल्याची हॅटट्रिक झाली! नाही का?” असे विचारले मात्र मी लहान मुलीसारखे रडवेले होऊन त्रिदिवसीय ढोकळे आख्यान सांगितले. त्यावर “अगं काय हे, माझ्या मामेबहिणीला विचार. ती ढोकळा एक्सपर्ट आहे” असे म्हणून ह्यांनी माझी समजूत घातली.
नंतर नणंदेला पाककृती विचारली. नीट अभ्यास करून मी ढोकळे केले आणि काय आश्चर्य! यावेळी म्हणजे सहाव्या प्रयत्नात ते चक्क छान जमले. मला आनंदातिरेकाने ‘युरेकाss युरेकाss!’ सारखे ‘ढोकळेss ढोकळेss!’ असे ओरडावेसे वाटले. अहोंना तर पिठले खावे लागणार नाही म्हणून अत्यानंद झाला. आता इतक्या वर्षांच्या सरावाने ढोकळे छानच जमतात. अशाप्रकारे बिघडलेले ढोकळे कसे घडले ही पाचा प्रयत्नांची कहाणी सहाव्या प्रयत्नात सुफळ संपूर्ण जाहली.
–
