सनविवि ललित,साहित्योन्मेष परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी की नसावी?

परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी की नसावी?

 

—–  पुरुदत्त रत्नाकर —–

 

हा विषय मिळाल्यानंतर झालेल्या ज्ञानवृद्धीचा वाटा या लेखात मोठा आहे. मी मराठी लिखाणात आङ्ग्ल शब्द कटाक्षाने टाळत आलो. तरीही अरबीसारख्या अन्य परभाषांमधले शब्द अगत्याने येतात कारण त्यातले बरेच परभाषीय आहेत हेच मला अज्ञात आहे. भाषा चटकदार करण्यासाठी मला चटक लावणारे शब्द परभाषीय असतात असे आता मला जाणवू लागले आहे. तसे ते या लेखातसुद्धा येतील. 

 

बंगळूरच्या साहित्यकलामंचातल्या चर्चेत अलीकडेच परभाषीय शब्दांची तालिका (यादी हा ऊर्दू शब्द) आली आणि मी आश्चर्यचकित झालो. (पोर्तुगीज) बटाटा, तंबाखू, पगार, कोबी, हापूस, पपई, परात, पेरू, टिकाव, पुरावा, बंब; (अरबी) मंजूळ, मजबूत, जाहीर, साहेब, अक्कल, हलवा, मिठाई, अर्ज, खर्च, मेहनत; (फारसी) सामना, हकीकत, पोशाख, लष्कर, स्वार, गोलंदाज, तंबू, लगाम, खंदक, बुरुज, किल्ला, ईमारत, चादर, खुर्ची, पलंग, समई, बदाम, ढोल, तबला, नगारा हे परभाषीय शब्द असल्याचे ती तालिका दर्शवत होती. सत्यतापडताळणी करून यातले काही शब्द बाद केले तरीही या अशा शब्दांविना मी मराठी लिहिन याची सुतराम शक्यता नाही. तसेच यातल्या बर्‍याच शब्दांना मराठी प्रतिशब्द नाहीत किंवा आहेत ते मला माहिती नाहीत. 

मी शाळेत असतांना इंग्रजी माध्यम नगण्य होते. आता त्याचे पेव फुटले आहे. त्यातच भारतीयांचे परदेशीवारीचे प्रमाणही दिन दो गुना रात चौगुनावाढते आहे. किमान इंग्रजी येणे, वापरात असणे परदेशात आवश्यक आहे. इंग्रजी कटाक्षाने टाळणार्‍या जपान, जर्मनीसारख्या देशांमध्ये स्थानिक भाषा वापरली जाते. तिथल्या नागरिकांशी संवाद साधायला किंवा संवाद न साधता वावरायला स्थानिक भाषा जुजबी तरी आली पाहिजे. भारतीयांसाठी तशा भाषा शिकण्याचे माध्यम हे परत इंग्रजी हेच आहे. त्यामुळे इंग्रजीच्या प्रभावात येऊन स्वभाषा-परभाषा सरमिसळ तर होणारच. 

वरील कारणमीमांसेचे पृथःकरण केले तर ती वैयक्तिक, संकुचित स्वरूपाची किंवा परकीय भाषा वरचढ झाल्यानंतरच्या परिस्थितीतली किंवा विपरीत प्रदेशातली परिस्थिती हाताळण्यासंबंधी आहे हे कळते.

स्वभाष-परभाषा सरमिसळ नसावी हा भाषाशुद्धी या सामाजिक-सांस्कृतिक विस्तीर्ण विषयाचा एक घटक आहे. भाषा, समाज, संस्कृती ही आपल्या अस्तित्वाला सभोवतालच्या सृष्टीशी अनुकूल बनवणारी कवच-कुंडले आहेत. त्यात सरमिसळीची भेसळ असून काय उपयोग? मराठी राज्यव्यवहारकोष निर्माण करण्याची आज्ञा देऊन शिवाजी महाराजांनी भाषा जतनाची मुहुर्तमेढ रोवली. कालांतराने विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी इंग्लिश सरमिसळीला विरोध केला. त्याहीनंतर इसवीसन १९२४ मध्ये वीर सावरकरांनी प्रथमच प्रकटपणे भाषाशुद्धी चळवळ हाती घेतली. त्यांचे प्रयत्न, तळमळ आणि कुशलता अतुलनीय आहे. 

संस्कृतोद्भव भाषाभगिनींमधले प्रादेशिक शब्द हेही मराठीचे मूलधन आहे; स्वकीय शब्दभांडवल आहे हे भाषाशुद्धीचे पहिले तत्व. या आपल्या भांडारात जे वस्तूंचे, विचारांचे वाचक शब्द उपलब्ध आहेत ते परभाषेतले वापरू नयेत हे दुसरे तत्व सांगितलेले आहे. आक्रमक आंग्ल भाषेच्या दुप्पटीच्या आसपास वर्ण स्वकीय भाषांमध्ये आहेत. त्यात स्वर-व्यंजन, कंठय-तालव्य-मूर्धन्य (आदि), मृदु-कठोर-अनुनासिक असे वर्गीकरण आहे. वर्ण जास्त म्हणजे शब्द आणि छटाही जास्त. तांत्रिकदृष्ट्याही स्वकीय भाषा निर्विवादपणे वरचढ आहेत. तर न्यून परभाषेची भेसळ कशाकरता?

परदेशी पिके, पर्यावरण, संस्कृती आदि तसेच तिथल्या नवनिर्मित आधुनिक तंत्रज्ञानासंदर्भातली विशेषनामे आणि त्यासंदर्भातले शब्द यांना एखाद्या स्वभाषेत प्रतिशब्द नसतीलही. पण कदाचित अन्य एखाद्या भाषाभगिनिकडे ते प्रतिशब्द असतीलही. यासंबंधी सगळ्या स्वभाषाभगिनींवर संशोधन करून ते स्वकीय शब्द सार्वत्रिक करून वापरता येतील. यामुळे आपले मुळातच विपुल असलेले शब्दभांडवल आणखी समृद्ध होईल आणि भाषाशुद्धीचे दुसरे तत्व सिद्ध होईल. 

परभाषेची सरमिसळ शून्य असावी अशा निष्कर्षाप्रत नेणे हे वरील विवेचनाचे उद्दीष्ट नाही. अशी ताठर भूमिका न घेता भाषाशुद्धीकारांनी लवचिकता दाखवली आहे. जे वस्तू इत्यादि आपल्याकडे नसल्यामुळे त्यांची स्वकीय नावे सापडत नाहीत ती परकी नावे वापरायला प्रत्यवाय नसावा हे तिसरे तत्व. जगातल्या कुठल्याही भाषेतली शैली वा प्रयोग चटकदार वा सरस वाटले तर ते आत्मसात करायला हवे हे चौथे तत्व आहे. ही दुसरी बाजू तितकीच महत्वाची आहे. एक म्हणजे त्या भाषेत आहे तसे स्वभाषेत वापरणे आणि दुसरे म्हणजे यादरम्यान संशोधन करून त्यांचे स्वदेशीकरण  करून घेणे. अनेक परभाषीय शब्दांना मराठी प्रतिशब्द तयार करून, सुचवून सावरकरांनी स्वदेशीकरणासंदर्भातले पथदर्शक कामही  केले आहे. मराठीत आणि हिंदीतही ते शब्द सर्रास वापरले जातात. दिनांक, महापौर, नगरपालिका, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, नेतृत्व, इत्यादि. 

हे काम सावरकरांनंतर ध्यासाने झाल्याचे ज्ञात नाही. असले तरीही ते अव्याहत करण्याची जबाबदारी आता माझ्या पिढीची आहे. आत्ता ठरवले म्हणून पुढच्या क्षणापासून आपण ते प्रत्यक्षात आणू शकू असे नाही. आडात असेल तरच पोहर्‍यात येणार! तथापि कार्यालये, सामाजिक मंच वगैरे शक्य त्या सर्व ठिकाणी मराठीत लिहिण्याचा, बोलण्याचा आणि तेव्हा सरमिसळ टाळण्याचा प्रयत्न केला तरी आपण काही शब्द पुढे जाऊ. जपानी, जर्मन, फ्रेंच वगैरे परभाषांचे प्रशिक्षण देतांना इंग्रजी माध्यम न वापरता मराठी, कानडी अशा स्वभाषांमधूनच त्या भाषेत अनुवादीत करून शिकवण्याचा प्रयोग करता येईल. त्यासाठी जपानी-मराठी अशा शब्दार्थकोशांची निर्मिती आणि उपलब्धता वाढवायला हवी.

 

सरमिसळ नसावी म्हणण्यामागे परभाषांचा द्वेष अभिप्रेत नाही. शिवाजी महाराजांनी मराठी राज्यव्यवहारकोष निर्माण केला तो परभाषेच्या द्वेषातून का? सावरकर इंग्रजीचा द्वेष करत बॅरिस्टर होऊ शकले नसते. परकी भाषा शिकावी आणि आवश्यक तिथेच तीपण शुद्ध वापरावी. त्यातले भिन्न, नावीन्यपूर्ण असलेले आपलेसे करावे. तरीही सहेतुकपणे स्वभाषा शुद्ध वापरण्याकडे, समृद्ध करण्याकडे कल ठेवावा. माय मरो मावशी जगो हे टाळायला हवे. 

भाषाशुद्धीच्या पहिल्या दोन तत्वांना अनुसरून सरमिसळ टाळतांना तिसर्‍या आणि चौथ्या तत्वापुरती अपवादात्मक सवलत घेता येईल. तथापि अपवाद हाच नियम होऊ न देता सवलतीचे प्रमाण कमी करत न्यावे असे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *