सनविवि माहितीपूर्ण लेख पाल्य आणि पालक संबंध सकारात्मक शिस्तबद्ध असावेत

पाल्य आणि पालक संबंध सकारात्मक शिस्तबद्ध असावेत

प्रतिभा बिलगी

पालक आपल्या पाल्याला नेहमी चांगले शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करत असतात. त्याच्या सामान्य व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करत असतात. प्रत्येक पालक  आपल्या पाल्याच्या बौद्धिक क्षमतांची पर्वा न करता तसेच स्वत:च्या आर्थिक परिस्थितीची पर्वा न करता त्याला शिक्षण देतात. आपली मुले चांगली व्हावी, यशस्वी व्हावीत असे प्रत्येक पालकाला वाटत असते. मुलांचा सर्वप्रथम पहिला शिक्षक “आई” हाच असतो. प्रेमाचा आणि मायेचा स्पर्श आपण मुलांना देतो. तो ओळखायला ती अंतःप्रेरणेने शिकतात. त्याच अंतःप्रेरणेतून ती इतरही गोष्टी शिकत असतात. त्यांच्यातले कलागुण ओळखून त्यांना योग्य तऱ्हेने वाव देणे पालकांचे कर्तव्य आहे. त्यांच्या चुकांबद्दल योग्य समज देणे, चांगल्या कामगिरीबद्धल शाबासकी देणे या दोन्हींचा मेळ घालता आला पाहिजे. मुलांना आई वडिलांचा अभिमान वाटला पाहिजे. पालकांचे प्रेम आदरयुक्त असेल तर मुलेही आपोआपच पालकांना आपले आदर्श मानतात.

मुले आपल्या कृतीतूनच घडत असतात. उत्तम मुल, उत्तम विद्यार्थी, किंवा उत्तम नागरिक म्हणून कलागुण त्याचे जोपासायचे असतील तर आपल्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण ती करत असतात. आपल्या सर्व गोष्टींचे मुलं निरीक्षण करत असतात. बारकाईने आपल्या सर्व गोष्टी मुलं न्याहाळत असतात आणि त्यातूनच मुलं घडत असतात. काही अनुभव स्वत: घ्यायचे असतात तर काही गोष्टी दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकायच्या असतात. त्यामुळे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पाल्याला अनुभव मिळेल असे वातावरण उपलब्ध करून देणे हे पालकाचे काम आहे . कारण एक अनुभव हा शंभर उपदेशांपेक्षा श्रेष्ठ असतो. पालकांनी मुलांचे बालपण हिरावून घेऊ नये. कारण त्यांचे हे दिवस परत येणारे नसतात. त्यांना फक्त प्रेमानेच जिंकायचे असते. आपली संस्कृती पालकांनी आपल्या मुलांमार्फत चालू ठेवणे हे नेहमीच सूक्त. दिल्याने आनंद वाढतो हा साधा सरळ मंत्र पालकांनीच मुलांना शिकवायचा असतो. 

 

मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा असेल तर शारीरिक सुदृढता गरजेची असते. सर्व प्रकारचे अन्न घटक शरीरात गेल्यामुळे मन व शरीर सुदृढ बनते, असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे. कारण शरीर सुदृढ असेल तरच मन प्रसन्न आणि ताजेतवाने राहते.  आजच्या वर्तमान काळात आळसामुळे रोगाची मुळे शरीरात जोर धरू लागली आहेत. आज आहार-विहार आणि विचाराला धरबंध नसल्यामुळे मुलांच्या राहणीमानावर खूप परिणाम झालेला दिसून येतो. म्हणूनच आताच्या शिशूंना शिस्तीचे, स्वावलंबनाचे वेळापत्रक असणे आवश्यक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एकविसाव्या शतकातली गतिमानता नवीन नवीन रोगांना आमंत्रण देत आहे. म्हणूनच आपल्या मुलांचे शरीर निरोगी ठेवायची जबाबदारी सर्वोपरी पालकांची आहे. 

 

मुले फक्त अभ्यासात हुशार असली पाहिजे असे नव्हे, तर त्याच्यातला छंद मुलांना जोपासता आला पाहिजे. व्यवहार चतुर कशी होतील हे सुजान पालकांनी शिकवले पाहिजे. त्यांचा अपमान करू नये. त्यांना चांगल्या शब्दात समज द्यावी. मोठया माणसांशी कसे वागावे, दुसर्‍यांच्या घरी व समारंभाला गेल्यावर कसे वागावे हे त्यांना लहानपणीच शिकवावे. घरातील नात्यांमधील जिव्हाळा, एकमेकांशी सुसंवाद, सुसंस्कार, आपलेपणा, एकमेकांसाठी करत राहण्याची वृत्ती मुलांमध्ये जागवण्याचा प्रयत्न प्रत्येक पालकांनी केला पाहिजे. मुलांमध्ये लहानपणापासूनच वाचनाची आवड रुजवली पाहिजे. शिस्त, काटकसर, वेळेचे नियोजन या गुणांमुळे मुले नक्कीच यशस्वी होतील. आहे. उत्तम व्यक्तिमत्व निर्मितीसाठी तसेच योग्य मानसिक विकासासाठी सुख, शांती, समाधानासाठी, सर्वांशी उत्तम संबंध असणे आवश्यक आहे. शेजारी-पाजारी तसेच इतर नातेवाईकांशी संबंध प्रेमाने असावेत यासाठी मुलांना नात्याचे मोल समजून द्यायला हवे. शेवटी सकारात्मक दृष्टीकोन हाच सुखी जीवनाचा आहार आहे. 

 

एकविसाव्या शतकात जगत असताना आपल्या दैनंदिन जीवनात अनेक बदल झालेत. पालक आणि पाल्य हे नातं देखील बदलत आहे. तंत्रज्ञान हाताशी असल्यानं सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळेच मोबाइलचा वापर आपली मुले कोणत्या कामासाठी करत आहेत या सगळ्या गोष्टींवर पालकांची नजर असायला हवी. तसंच वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधणेही आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत मुलांच्या गरजा पूर्ण करण्याची धडपड व त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्याची स्वप्नं पूर्ण करण्याची तडजोड यामागे  पालक इतके अडकून पडतात की त्यामुळे ते एका सकस पालकत्वाला मुकतात. या सर्व कारणास्तवआपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, समस्या, कौटुंबिक बाबी, सामाजिक संदर्भ इत्यादीबद्दलचे संवाद मोकळेपणाने मुलांसमोर करावेत. त्यांना जरी कळत नसले तरी आपण या कुटुंबाचा एक भाग आहोत, ही जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होते. जीवनातील संकटं, सुख-दु:खे, अडीअडचणी मुलांना कळल्या पाहिजे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास, भावनाविश्व, निर्णय क्षमता आणि प्रगल्भता वाढायला मदत होते. पालक म्हणून आपल्या मुलांवर डोळसपणे संस्कार करीत एक जागरूक नागरिक घडविणे म्हणजेच सुजाण पालकत्वाचे योग्य लक्षण होय.

 

आजच्या या बदलत्या काळानुसार हुकूमशाही पालक बनण्याऐवजी विश्वासार्ह पालक बनणे नेहमीच फायदेशीर ठरू शकते. मुलांवर काटेकोर लक्ष ठेवण्याऐवजी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलुन, एकत्र चर्चा करून समस्येचे निराकरण करावे. मुलांवर शंका घेण्याऐवजी त्यांना स्वातंत्र्य देणे केव्हाही योग्य, परंतु त्यांना इतके मुक्त होऊ देऊ नये की ते निष्काळजी बनतील. पालकांनी आपल्या पाल्यांवर संशय न घेता त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास शिकले पाहिजे. मुलांच्या चुकीच्या वागण्याबद्दल पालकांनी त्यांना वेळीच समज दिली पाहिजे आणि त्यांच्या चांगल्या वागण्याचे वेळोवेळी कौतुक देखील केले पाहिजे.  मुलांना त्यांच्या चुकांतून शिकु दिले तर पुढे जाऊन ते योग्य निर्णय घेण्यास पात्र ठरतील. पालकांच्या  निष्काळजीपणामुळे मुलांमध्ये कमी आत्मसन्मान, कमी आत्मविश्वास निर्माण होतो जेणेकरून त्यांना आयुष्यात कमी शैक्षणिक यश मिळते आणि यामुळे ते आयुष्यातील सर्व क्षेत्रात मागे पडतात. शिस्त म्हणून शिक्षा देणे का कधीच उपयुक्त पर्याय असू शकत नाही. म्हणूनच मुलांचे गैरवर्तन टाळण्यासाठी आणि त्यांचे चांगले वर्तन दृढ करण्यासाठी सकारात्मक शिस्तीचा वापर करणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. अश्या प्रकारे आपल्या मुलांशी प्रेमळ आणि सकारात्मक संबंध निर्माण करण्यासाठी, त्यांना जबाबदार आणि आनंदी होण्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *