पुस्तक परीक्षण

रावा

रावा”  – शुभांगी गोखले 

लेखिका नाटक, चित्रपट, सिरीयलमध्ये  काम करणारी व ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेमुळे जणू आपल्या सगळ्यांच्याच घरातली झालेली अशी मराठी कलाकार.

 लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीतील त्यांच्या लेखांचे संकलन म्हणजे  “रावा” हे पुस्तक. मुकुंद टाकसाळे यांची प्रस्तावना वाचूनच सर्व लेख वाचण्याची उत्सुकता वाढली. 

मुंबई, पुणे, कोल्हापूर इथे सतत शूटिंगला असताना जाणे-येणे, महाराष्ट्रभर आणि परदेशात सुद्धा नाटकाचे दौरे, तालमी या सगळ्यात थर्टी फर्स्टची पार्टी, होळी, पाडवा, व्हॅलेंटाईन डे साजरा करायला म्हणा किंवा त्याची तयारी करायला तिला खरंच वेळ मिळत नाही व त्याहीपेक्षा घराची डागडुजी, आवराआवर यासारखी कामे तिला जास्त महत्त्वाची वाटतात. अशाच शूटिंगला जाताना व नाटकाचे दौरे संपवून परत येताना शेअर टॅक्सीमध्ये घडणाऱ्या गमतीजमती वाचायला मिळतात त्या ‘नॉट ए कूल कॅब’ या लेखात.

‘प्रॉपर्टी’ या लेखात अनेकदा नाटक- सिरीयलमध्ये वेगवेगळ्या नाट्यगृहातील जागा व सामग्रीप्रमाणे प्रत्येक सीनमध्ये  काय काय आश्चर्यजनक घडू शकते व वेळ कशी निभावून घ्यावी लागते याचे सार्थ वर्णन आहे. लेखिका म्हणते, परदेशातील एका प्रयोगात आणि तणावपूर्ण प्रसंगात पालेभाजी म्हणून मेपलची हिरवी पाने आणि भात म्हणून पॉपकॉर्न ठेवले होते तेव्हा मात्र अभिनयाची खरोखरच परीक्षा झाली. नेहमीच शूटिंगसाठी वापरण्यात येणारे बंगले, त्यातील वस्तू, पडदे, झुंबरे, पुतळे, शोभेची झाडे, फ्लॉवरपॉट या सगळ्यांना सांभाळत शॉट देताना तारेवरची कसरत करावी लागते. 

घरामध्ये कामासाठी विश्वासू आणि कामसू नोकर मिळतो, तेव्हा घरातील स्त्रीची खरी चैन असते. लेखिकेला मिळालेली कामवाली तिच्या घरात बाळ आल्यावर आपण होऊन अनेक कामे स्वतःवर घेणारी, घराला जीव लावणारी अशी. मोहन गोखलेंच्या जाण्याने धक्क्यात असणाऱ्या लेखिकेच्या बरोबर राहून स्वतःच्या वागण्याने धीर देणारी व इतकी वर्ष जी कामे साहेबांसाठी करत होती म्हणजे शूटिंगला जाताना डबा, फळे, पाणी इत्यादी भरून ठेवून सकाळी सकाळी नियमितपणे गाडीत नेऊन ठेवणारी व “सांभाळून ….सावकाश गाडी चालवा” असा प्रेमळ निरोप देणारी नंदा… तिच्या लग्नात तिने दिलेल्या निःशब्द साथीने लेखिकेला कृतज्ञतेचे अश्रू अनावर होतात तर नंदाला निरोप देताना दोघीही एकदमच सगळं चांगलं होईल असं पुटपुटतात इतक्या एकरुप झालेल्या दोघींना एकमेकांचे निरोप घेणं किती कठीण गेलं असेल नाही.

‘गाशा’ या लेखात दर दोन-तीन वर्षांनी बदलीच्या ठिकाणी जाणे त्यासाठी सामानाची आवरावर तेच सामान पुन्हा नवीन जागी लावणे. नव्या मैत्रिणी, नव्या ओळखी करणे व नवीन जागी रुळणे या सगळ्या अनुभवाचे यथार्थ वर्णन केले आहे . तिच्या मते बदललेल्या प्रत्येक गावात पुन्हा कधी जाणं होतच असं नाही पण तरीही प्रत्येक घराची, गावाची अशी एक विशिष्ट आठवण असते, ती नक्कीच लक्षात राहते. सगळ्याच आठवणी पुसल्या जातात असं होत नाही. 

दीर्घकाळ चालणाऱ्या सिरीयलचे शूटिंग, त्यातून निर्माण होणारे प्रेम, नातेसंबंध याचा ‘मिसिंग यू ‘ मध्ये लेखाजोखा मांडला आहे. त्यांची सहकलाकार, सिरीयल मधली मुलगी जिचा विवाह होतो व ती परदेशात जाते. त्यानंतर तिच्याशी फोन, ई-मेलवर संपर्क असला तरी लेखिकेला  सिरीयल मधील सगळे सीन्स, एपिसोड्स फिके वाटायला लागतात. शूटिंगमध्येही सतत चिडचिड होते. तर शूटिंगसाठी येताना घरुन सगळ्यांसाठी जेवण आणून आग्रहाने खाऊ घालणाऱ्या  भारती आचरेकर आणि सुनीता थत्ते यासारख्या मैत्रिणी, यांची ओळख  ‘ब्रेक फॉर लंच’ मध्ये होते .’हाव मी इकडेच!’ असं आश्वासन देणाऱ्या हेअर ड्रेसर्स कमलाबाई, सहकलाकार डॉक्टर लागू व दिलीप प्रभावळकर आणि शूटिंगसाठी आणलेला हत्ती यांची व्यक्तीचित्रणं झकासच आहेत. 

स्वतःच्या अनुभवी विश्वातून बारीक-सारीक तपशिलासह मांडलेले ‘शुभांगी गोखले’ यांचे हे विचार वाचनीय तर आहेतच पण काही लेख हृदयस्पर्शी आहेत.

परिचय : वैशाली तोरवी.

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *