सभासदांची लेखणी

सुशेगात 1अंतरंगी

इतके सुरेल कॉल देणारे पक्षी मान उंच, उंच करून बघितले, बघितले, बघितले पण हिरवाईच्या अनंत छटांमध्ये ते महाभाग दृष्टीला मात्र पडायला तयार नाहीत. जरा पाने हलली की वाटे इथे तर नाही ना? सुरेल ताना, गानलकेरी आळवणारा हा आहे तरी कोण? झपाटल्यासारखी शोधत राहिले, पण सर्व काही त्या पर्णसंभारात अदृष्य. पहाटगाणी गाणारा हा गवई आहे कुठे ? आणि लांबच लांब सुरेल तानांनी त्याची दिवाणी झालेली मी आपली शोधच घेतेय त्याचा.    

शिगेला पोहोचलेल्या या अवस्थेत दुर्बिणीचा आधार घेतला आणि उंच  झाडावर झाले एकदाचे स्वारीचे दर्शन. थक्क व्हायला झाले, दमदार ताना घेणारे हे महाशय होते इतकुसे. छोटेसे- पिटुकले अंग, हिरव्यागर्द पंखांवर काही शुभ्र पट्टे पोट अगदी पिवळे सोनसळी. त्या पाचूच्या पुंजक्यावर मी बेहद्द खुश!! तो होता सुभग, इंग्रजीतला कॉमन आयोरा. अगदी छान आर्जव केल्यासारखा, हाका मारल्यासारख्या, बोलणारा हा सुभग इतर पक्ष्यांच्या नकलाही करतो हे ही पुढे समजत गेलं.

       झाडांमधून फिरत असताना दचकलेच एकदम. खडबडीत फांद्यांवर जणू काही काटे उगवले असावे अशी पाने असलेले बैठे, फांद्या बाजूने पसरवून उभे असलेले ठेंगणे ठुसकेसे एक झाड आणि फांद्यांवर लटकलेली चक्क खानदेशी हिरवी मोठाली वांगी. थबकलीच पावले आणि आश्चर्यचकित मी बघू लागले या हिरव्या पोपटी अद्भुताकडे. अर्थात लगेच फोनकडे गेला हात आणि काढले या फांद्यांवर लटकलेल्या पोपटी मायेचे फोटो. काय बरे असावे हे? अस्वस्थ मनाला युरेका! म्हणावे लागले कारण ते होते “कमंडलू झाड” बोटॅनिकल नाव Crescentia cujute फॅमिली Bignoneaceae _ calabash tree.

ही माहिती अर्थातच मिळाली आंतरजालातून. ही फळे आता पूर्ण कधी पिकतील आणि आणि ती पूर्ण वाळल्यावर कशी दिसतील याचीच आता वाट बघते आहे, डोळ्यांसमोर कमंडलू घेतलेले पुराणकालातले ऋषीमुनी दिसताहेत.

      पायवाटांवरून चालताना, सभोवतीच्या वृक्षवल्लीकडे बघताना, वेळूच्या मोठाल्या वनातून येणारे विविध आवाज ऐकताना, निरनिराळे कीटक, पाखरे न्याहाळताना अचानक लक्ष गेले पायवाटेकडे आणि डोळे चमकलेच एकदम. शेंगांतून ओघळून पाऊलमातीखाली कुठे दबलेले, कुठे हिरव्या पोपटी गवतातून डोकावून बघणारे चक्क लाल लाल मणी-गुंजा नादिष्ट होऊन वाकून उचलत गेले ते त्रिकोणीसर आकाराचे मणी. कसल्या त्या लालचुटूक तेजस्वी रंगांच्या बिया. मग रोजचाच लागला नाद! डोळे भिरभिरायचे ते जमिनीवर शोधायला त्या हिरव्यागार गवतावर विराजमान देखण्या राजसी रुपाच्या रतन गुंजा/ थोरल्या गुंजा. साध्या गुंजांना काळे पांढरे ठिपके असतात आणि आकारही वेगळा असतो. या रत्तीगुंजा मात्र पूर्ण लालचुटुक. माझ्या घरातल्या रक्त चंदनाच्या बाहुलीचा हा पूर्ण वाढलेला बाबा ” रक्तचंदन वृक्ष” आणि त्याच्या या बिया. या वृक्षाचे लाकूड लाल आणि त्याच्या बियाही लालेलाल, धरणीमातेचा तो खराखुरा  “लाल”.

हलक्याशा सुगंधाने गंधित झालेली हवा आणि जमिनीवर सांडलेला टपोऱ्या लांब दांडीच्या बुचाच्या फुलांचा हस्तिदंती गुलबट सडा. पायदळी तुडवली जाऊ नये असे वाटत असतानाच टपोरी टवटवीत फुले उचलली जातात आणि होतोच की जमा हातात त्यांचा छानसा गुच्छ. उंच उंच झाडांवरून टपटपणारी लटकचमेली नेते आपल्याला बालपणात आणि आठवतात त्यांच्या केलेल्या दुपेडी तिपेडी वेण्या. आता मात्र बसतात ती पाणी भरलेल्या काचपात्रात सुगंधी पखरण करत बदकांच्यासारखी डोकी पाण्याच्या वर काढून,

भरून ओथंबलेले आभाळ कुठल्याही क्षणी टपटपायला लागणार अशी हवा, मोठाल्या वृक्षांमधून जाणाऱ्या नागमोडी पाऊलवाटांवरही काल रात्रीच्या पावसाने फिरवलेला हलकासा हात, नाकाला जाणवणारा हिरवा गंध आणि हवेतील आर्द्रता हातांवर चेहऱ्यावर जाणवतेय. हलकेच निघाला तो पक्ष्यांचा थवा आणि टपटपायला लागले पाऊस थेंब. सुखावणारा तो क्षण पकडू बघतेय मी माझ्या मनात. 

पाऊसवेड सोडवत नाहीये, परतवत नाहीये मला घरच्या वाटेकडे. अंगावर पडणारे थेंबही हलके हलकेच वाटत असतानाच आले उघड्या माळरानावर आणि मग जाणवली ती आभाळमाया जरा जोरकसच बरसतेय की. इतक्यावेळ वृक्षवल्लीनी झेलली होती माझ्यावर सांडायच्या आधी ती…त्यांच्या प्रेमळ पंखांखाली.

आश्‍वासक निसर्ग असायलाच हवा साथीला. आत्ममग्न त्याच्या मायेत आपणही व्हावे एकरूप. 

विसरून जावे बाकी सर्व काही आणि अनुभवावे त्याचे सर्व ऋतूंमधले देखणे रूप.

थंडीचा पायरव ऐकावा, पांघरून घ्यावी धुक्याची उबदार दुलई. झेलावी कधी उन्हाची ती काहिली आणि अंतरंगी जागवावे ते आसुसलेपण.सृजन पावसाळी, ओलेते सुस्नात रुपडे बघून तृप्त व्हावे मातृभावाने. असे भिनावे अंगात वारे आणि नाचावे झिम्माड, द्रुतगतीने मिसळून जावे त्या चौथ्या मितीत भान हरपून सुशेगात अंतरंगी!!! 

 

विद्या पळसुले

(सुशेगात/सुशेगाद  म्हणजे  गोवन/कोंकणी भाषेत मजेत peaceful,contented)
  1. ↩︎

ओळखा ही फुले (उत्तर) – कुंभा -कुंभीची फुले

ओळखा ही फुले (उत्तर पुढील अंकात)

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *