सनविवि माहितीपूर्ण लेख,साहित्योन्मेष प्राचीन गुरुकुल पद्धती आणि गुरु-शिष्य परंपरा

प्राचीन गुरुकुल पद्धती आणि गुरु-शिष्य परंपरा

–प्रतिभा बिलगी —

भारतीय संस्कृतीत गुरूला खूप महत्त्व आहे. कुठे गुरूला ‘ब्रह्मा-विष्णू-महेश’ तर कुठे ‘गोविंद’ म्हणतात. ‘गु’ शब्दाचा अर्थ अंधार (अज्ञान) आणि ‘रु’ शब्दाचा अर्थ प्रकाश (ज्ञान) असा आहे. जो ब्रह्मस्वरूप अज्ञानाचा नाश करतो तो गुरु होय. पूर्वी आश्रमांमध्ये गुरु-शिष्य परंपरा जपली जात असे. भारतीय संस्कृतीत गुरूला अत्यंत आदराचे स्थान आहे. भारतीय इतिहासातील गुरूची भूमिका समाजाला सुधारणेकडे नेणाऱ्या एखाद्या मार्गदर्शकासारखी दिसून येते. भारतीय संस्कृतीत गुरूला देव मानले आहे.

“गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वर: ।

गुरु: साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः”

देशाचा विकास आणि प्रगती तेव्हाच होऊ शकते जेव्हा शिक्षण व्यवस्था योग्य असेल. जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि काहीतरी वेगळे करण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन आहे. शिक्षण काळात मिळालेले ज्ञान प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनातील कठीण आव्हानांना सामोरे जाण्याची ताकत देते.

प्राचीन भारतात गुरुकुलातूनच शिक्षण दिले जात असे. या पद्धतीला ‘गुरु-शिष्य परंपरा’ असेही म्हणतात. शिक्षण हे भारतीय पद्धतीनुसार असावे, हा याचा मुख्य उद्देश होता. माणसाला सुशिक्षित बनविण्याचे काम इथे घडत असे. ज्या पद्धतीने माणसाला शिक्षण मिळते, तशीच त्याची मानसिकता बनते.  प्राचीन काळापासून आपली परंपरा जिवंत ठेवण्याचे काम केवळ गुरुकुलांनीच केले, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. राम आणि कृष्ण हे भारताचे आदर्श मानले जातात. या महापुरुषांनी सुद्धा गुरुकुलांमार्फत  शिक्षण घेतले. गुरू शिष्य परंपरेत एकलव्य आणि द्रोणाचार्य यांचा उल्लेख हा यायलाच हवा. द्रोणाचार्य यांनी एकलव्याला शिष्य म्हणून स्वीकार करायला नकार दिल्यानंतरही त्यांनाच गुरू मानून प्राप्त केलेली शिक्षा ही अद्वितीय होती.

शहरे आणि खेड्यांपासून दूर निसर्गाच्या शांत, स्वच्छ आणि नयनरम्य वातावरणात कार्यरत असलेल्या वैदिक भारतातील या गुरुकुलांचा मुख्य उद्देश केवळ पुस्तकी ज्ञानावर केंद्रित नसून शिक्षण आणि दीक्षा या दोन्हीच्या समन्वयावर केंद्रित होता. या गुरुकुलांमध्ये प्रत्येक वर्णातील विद्यार्थी एकत्र शिकत असत. या शिक्षण केंद्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात  नव्हता. विद्यार्थ्यांना अन्नासाठी भिक्षा मागावी लागायची. या गुरुआश्रमांमध्ये विद्यार्थ्यांना शाकाहार आणि ब्रह्मचर्य यांचे काटेकोरपणे पालन करावे लागत असे. या गुरुकुलीय शिक्षणाचा मूळ उद्देश विध्यार्थ्यांना  आत्मनिर्भर बनवणे हा होता. त्याचबरोबर आध्यात्मिक विकास आणि चारित्र्य घडण सहित भावी जीवनातील आव्हानांसाठी त्यांना तयार करणे हा उद्देश होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरू शिष्याची परीक्षा घेत असत. शिष्य त्यांच्या कुवतीनुसार दीक्षा देत असत.

या गुरुकुलांमध्ये सहशिक्षणाचाही प्रचार झालेला आढळून येतो. स्त्री-पुरुष समान शिक्षणासाठी ही गुरुकुले किती सक्रिय होती, याची अनेक उदाहरणे आहेत. मनुस्मृतीत मुला-मुलींच्या शिक्षणावर जास्त भर देण्यात आलेला दिसून येतो. उत्तर रामचरितामध्ये वाल्मिकींच्या आश्रमात लव-कुशसोबत अत्रेयी नावाची स्त्री शिकत असल्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे आठव्या शतकातील कवी भवभूतीच्या काळातही मुला-मुलींचे सहशिक्षण प्रचलित होते. त्याच्या मालती-माधव या ग्रंथात या गोष्टींचा समावेश असून, सहशिक्षणाची अनेक उदाहरणे पहावयास मिळतात .

भारताच्या प्राचीन इतिहासात अशा शाळांना खूप महत्त्व होते. इथे विद्यार्थी आपल्या कुटुंबापासून दूर गुरूच्या कुटुंबाचा एक भाग बनून शिक्षण घेत असे. गुरु-शिष्य परंपरेला आजच्या नवीन पिढ्यांसाठी अध्यात्मिक ज्ञानाची पायरी मानली जाते. भारतीय संस्कृतीत, गुरु-शिष्य परंपरेनुसार, गुरु (शिक्षक) आपल्या शिष्याला शिकवतात. पुढे तोच शिष्य गुरूच्या रूपाने इतरांना शिकवतो. हा क्रम निरंतर चालूच असतो. प्राचीन काळी धौम्य, च्यवन ऋषी, द्रोणाचार्य, सांदीपनी, वशिष्ठ, विश्वामित्र, वाल्मिकी, गौतम, भारद्वाज इत्यादी ऋषींचे आश्रम प्रसिद्ध होते. बौद्ध काळात बुद्ध, महावीर आणि शंकराचार्यांच्या परंपरेशी संबंधित गुरुकुल जगप्रसिद्ध होते. इथे गणित, ज्योतिष, खगोलशास्त्र, विज्ञान, भौतिकशास्त्र असे सर्व प्रकारचे शिक्षण दिले जात असे. यासाठी जगभरातून कित्येक विध्यार्थी ज्ञानार्जनासाठी येत असत.

गुरु-शिष्याची ही परंपरा अध्यात्म, संगीत, कला, वेद, वास्तू इत्यादी ज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्राशी निगडित असू शकते. प्राचीन काळी, गुरू आणि शिष्य यांच्यातील नातेसंबंधाचा आधार गुरुचे ज्ञान, मौलिकता आणि नैतिक सामर्थ्य, शिष्यांबद्दलची त्यांची आत्मीयता आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची निःस्वार्थ भावनेवर अवलंबून होती. गुरु-शिष्य परंपरेचा पाया ऐहिक ज्ञानाने सुरू होतो. आध्यात्मिक शाश्वत आनंदाची प्राप्ती, ज्याला ईश्वरप्राप्ती आणि मोक्ष असेही म्हणतात, हे मानवी जीवनाचे अंतिम आणि सर्वोच्च ध्येय मानले जाते.

प्राचीन भारतातील गुरुकुलांतर्गत तीन प्रकारच्या शैक्षणिक संस्था होत्या-

(१) गुरुकुल – जेथे विद्यार्थी आश्रमात गुरूंसोबत शिकत असत.

(२) परिषद – जिथे तज्ञांद्वारे शिक्षण दिले जात असे,

(३) तपस्थली – जिथे मोठमोठ्या परिषदा भरवल्या जायच्या आणि सभा आणि प्रवचनातून ज्ञान मिळवले जायचे. नैमिषारण्य हे असेच एक ठिकाण होते.

गुरुकुल आश्रमांमध्ये अनादी काळापासून करोडो विद्यार्थी शिक्षण घेत आले आहेत. प्राचीन भारतात तक्षशिला, पाटलीपुत्र, कन्याकुब्ज, मिथिला, धारा, तंजोर, काशी, कर्नाटक, नाशिक इत्यादी शिक्षणसंस्था आर्यावर्तात प्रसिद्ध होत्या. सार्वजनिक शैक्षणिक संस्थांची स्थापना प्रथम बौद्ध मठांमध्ये झाली. त्यापैकी नालंदा विद्यापीठ (450 AD), वल्लभी ( 700 AD), विक्रमशिला ( 800 AD) ह्या प्रमुख शैक्षणिक संस्था होत्या. या संस्थांनंतर हिंदूंनीही मंदिरांमध्ये शाळा उघडल्या, ज्यांचे नंतर मठांमध्ये रूपांतर झाले. 

शेवटी असे म्हणता येईल की मूल्य आधारित शिक्षण हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा असा न संपणारा प्रवास आहे जो आपल्याला सत्याच्या शोधात घेऊन जातो. शिक्षणाचे हे मूळ वास्तव जर सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारले, तर हे जग जगण्यासाठी सर्वोत्तम स्थान बनेल. गुरुकुल शिक्षण पद्धती ही सर्वश्रेष्ठ होती यात काही शंकाच नाही. म्हणूनच भारतीय गुरुकुल शिक्षण पद्धती हा जागतिक शिक्षणाचा पाया मानला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीला वेद आणि उपनिषदांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्राचीन भारतातील गुरुकुल पद्धती ही त्या काळातील एकमेव शिक्षण पद्धती होती, जिथे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध जीवनाचे आवश्यक धडे आत्मसात केले. गुरुकुलमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी एकाच छताखाली एकत्र राहत असत. या छताखाली माणुसकी, प्रेम आणि शिस्त नांदायची.  प्राचीन काळातील गुरुकुल शिक्षणपद्धतीत संस्कार, संस्कृती, आचार-विचार आणि सभ्यता शिकवली जात होती, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आजच्या या भौतिक युगात आशा या महान गुरुकुल शिक्षण पद्धतीची नितांत गरज आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *