हरवलेलं आजोळ

 –पूजा सोनवणे–

झुक झुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेघा हवेत काढी

पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया,

हे ऐकत ऐकत मोठे झालो आम्हीमाझी सुट्टी म्हटली की त्याचेठरलेलेप्लॅन्स असायचे. नाताळची सुट्टी आत्याकडे, दिवाळी आम्ही सगळेघरीच साजरी करायचो आदि उन्हाळ्याची सुट्टी मात्र मामाकडे. हे सगळं वर्षानुवर्ष एका प्रथेप्रमाणे चालायचे. मामाकडे जायचं म्हणजे एक सोहळा असल्यासारखं. जय्यत तयारी असायची. कपडे, बूट, चप्पला, उन्हाळा म्हणून टोप्या आणि वेगवेगळा खाऊ असं सगळं. सोहळाच म्हणावा लागेल, कारण हल्ली सारखं मुली एकाच गावात लग्न होऊन  जात नव्हत्या. आता माहेरी जाणे किंवा माहेराचे घरी येऊन राहणे हे खूप सोप्प झालय. त्यात इतक्या सहजासहजी माहेरी जाण्याची मुभा नव्हती. वर्षातून कसंबसं एकदा निवांत  राहायला मिळायचे. त्यात मा‍झ्या मामाचं गाव इतकं लांब, आजही तिथे जयाचं ठरवलं तर एसटी ने ३ बस बदलून जावं लागतं. हल्ली प्राव्हेट गाड्यांमुळे बऱ्यापैकी सोप्पं झालंय, पण कामाच्या वव्यापामुळे आम्हाला मामाकडे जायला जमतच नाही.  

मा‍झ्या मामाचं गाव हे खानदेशातील सगळ्यात छोटं आहे,आजही इकडची काडी तिकडे झाली तर तासाभरात पूर्ण गावाला खबर पोचते. लग्नाचा आमंत्रण हे बँड वाजवत गावात दिलं जातं, पत्रिका फक्त परगावी पाठवल्या जातात. जेवायला आख्ख गाव येतो. आजही आठवतं मामा आम्हाला म्हणजे पुणेकरांना आम्हाला म्हणजे पुणेकरांना घरी घेऊन जायला बैलगाडी घेऊन यायचा. तेव्हा मामाकडे चारचाकी तर सोडा साधी दुचाकीही नव्हती. बैलगाडीची मज्जा आत्ताच्या चार चाकीत नाही हो. त्याच बैलगाडीत बसून आम्ही ओपन थिएटरला सिनेमा बघायला सगळे मिळून जायचो. सिनेमा बघायला गेल्यावर पॉपकॉर्न, सामोसे, कोल्डड्रींक असले शहरी थाट खेडे गावात कसे मिळणार? मग खारे शेंगदाणे, फुटाणे, सुकी भेळ हा काय तो मध्यंतरातला खाऊ. सिनेमा बघायला खुर्च्या नसायच्या, आम्ही जमिनीवर वाळूत बसून, ओडोमॉस सिनेमा बघायचो. त्यात सिनेमा इतका जुना असायचा की आम्ही पुष्कळ वेळेला तो पाहिलेला असायचा.

माझी आई सगळ्या भावंडांमध्ये लहान, त्यात तिचे वडील ती १० वर्षाची असताना गेले, त्यामुळे सगळ्यांची लाडकी. मोठ्या मामाने वडीलांसारखेच सांभाळलेलं. उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो की माझी आई, तिच्या ३ बहि‍णी, २ मामा आणि आम्ही त्यांची मुलं म्हणजे १७ भावंडं एकत्र राहायचो उन्हाळ्याच्या सुट्टीत. तशी माझी आईच शहरात आणि तिच्या माहेरापासून १३-१४ तास लांब होती. बाकी तिच्या तिन्ही बहि‍णी २-३ तासाच्या अंतरावर होत्या. त्यामुळे त्या येऊन जाऊन असायच्या, हेच कारण असेल बहुतेक म्हणून मामला आमच्या येण्याचे खूप कौतुक असायचे.  

आजोळी मातीचं घर, भिंती आणि फरशी शेणाने लिंपलेली. घरातल्या खोल्या बऱ्यापैकी लहान पण घराचा वारांडा खूप मोठा, कारण त्यात शेतातील धान्य, कपाशी म्हणजे कापूस, बाजरी ठेवायचे. आम्ही सगळ्यात जास्त वेळ हा तिथेच घालवलाय. धान्याच्या पोत्यांवर उड्या मारायचो. घराच्या गच्चीला धाबं म्हणतात तिकडे,लाकडी शिडीने वर झोपायला जायचो आम्ही. तिथे टीव्ही किंवा रेडिओ नव्हता,घरात साधा फोनही नव्हता तर मोबाइल कुठून येईल. मग दिवसभर वेळ कसा घालवणार? मग दिवसभर वळलेल्या गवताच्या काड्यांच्या वस्तू बनवायच्या,माझा भाऊ खूप सुंदर आणि सुबक बैलगाडी बनवायचा. मला फार त्यात रस नव्हता, मला झोक्यावर सगळा वेळ बसायला आवडायचं.  विटीदांडू,लपाछपी,लगोरी,पत्ते,चौपट खेळायचो. मामा बरोबर गुरांना चारा खायला घालायला जायचं, शेतात वेगवेगळ्या ताज्या शेंगा, बोरं, ऊस, घरचे गावठी आंबे, चिंचा खायला जायचो. मामीने कापडात बांधून दिलेली शिदोरी आम्ही सगळे दुपारी झाडाखाली बसून खायचो. आजी पुढच्या दारी, मागच्या दारी, समोरच्या वाऱ्यांड्यात झोके बांधून द्यायची,त्यावर पाट बांधून दोघं-तिघं बसून खेळायचो. १७ भावंडं त्यामुळे भांडणही खूप व्हायची,पण मी लाडक्या बहि‍णीची मुलगी असल्यामुळे सूट पण खूप मिळायची. सायकल १ रुपया देऊन भाड्याने मिळते हे ही तिथेच कळलं,नाही तर आमच्याकडे आमच्या स्वत:च्या सायकली होत्या. पण त्या भाड्याने आणलेल्या सायकलींच आकर्षण असायचं.

मामा, आम्हा सगळ्या भावंडांना १-२ रुपये द्यायचा, ते घेऊन आम्ही लगेच वाण्याकडे हजरव्हायचो. १ रुपयात ८ गोळ्या मिळायच्या, त्या गोळ्यांना किसमी, एकलैर सारखी चव नसायची पण त्या ८ गोळ्यांचा अप्रूप कैक पटीने जास्त होते. शहरात लेज, कुरकुरे खाणारे आम्ही एका रुपयात १० बॉबी १० बोटात घालून खाण्यातली मजा घ्यायचो. सकाळी उन्हं डोक्यावर यायच्या आत, सडा -रांगोळी, देवपूजा झालेली असायची. कोवळ्या उन्हात बसून आपल्या गोठ्यातल्या गाईच्या पहिल्या धारेच्या दुधाचा चहा बशीतून फुरफुर करत पिण्याची मजा आताच्या स्टार बक्सच्या चाय लातेला कधीच येणार नाही. नाश्ता आमचा ठरलेला असायचा गरम गरम भाकरी आणि तिखट कांडून आणलेल्या भुकटीची चटणी. पोहे, उपमा ह्या सगळ्या नाश्त्याचे पदार्थ कधी कधी बनायचे. दुपारच्या जेवणाला पण भाकरी भाजी आणि रात्री तुरीच्या डाळीची खानदेशी खिचडी आणि पापड. लहानपणी मला आणि मा‍झ्या भावाला ह्याचा खूपच कंटाळा यायचा, पण आज शोधूनही त्या चवीचं चुलीवरचं जेवण मिळत नाही. आता तिथेही शेगडी आणि गॅस सिलेंडर आलेत आणि आमचं जेवण्याच्या आनंदाला खंड पडलाय.

गाव छोटं त्यामुळे सोयी पण कमी, दिवे गेले की कंदिलाच्या उजेडात कारभार चाले. गिजर नाही, पाणी बंबात गरम करण्यासाठी लाकडं यायची घरी. खर सांगते बंबातील पाण्याला काय सुंदर सुवास यायचा हो, एकदम राणी असल्यासारखं वाटायचं. अर्थात पाणी कमी असल्या कारणाने खूप निवांत २-४ बदल्या अंघोळीला मिळायचे नाही, पण मी आणि माझा भाऊ शहरातली मुलं त्यामुळे थोडे जास्त पाणी नक्की मिळायचे. गावाला पाण्याचे प्रॉब्लेम्स, प्यायचं पाणी शेतातल्या विहिरीतून यायचे बाकी वापरायचे पाणी ५ दिवसांनी एकदा तासभर यायचे. मग घरात अनेक भांड्यांच्यात पाणी साठवले जायचे. पण आम्हा शहरातल्या मुलांना पाणी भरायला जाम भारी वाटायचे. तेव्हा जे भारी वाटायचे ते कळत्या वयात त्रासदायक वाटायला लागले. ते पहिल्यामुळे की काय पाणी जपून वापरायला हवं हे शहाणपण कोणी न शिकवताच आलं. 

मामा मोठा तालेवार, त्यामुळे अख्या गावात आपला रुबाब असायचा. कोणी चहाला बोलवायचं तर कोणी जेवायला. साखरेच्या कारखाना असल्यासारखी किलोभर साखर घालून, अति प्रचंड गोड त्या चॉकलेटी, बुटक्या कपातील चहा बाहेर येई-येई पर्यंत थोडा बशीत सांडत-सांडत यायचा, त्याच बरोबर कोणी जरा बऱ्या परिस्थिती असलेला असेल तर पारलेची बिस्किटं. खापरावरची पुरणपोळी, मसाल्याची तिखट आमटी हा आमचा ठरलेला पाहुणचार. दुपारच्या उन्हात कुल्फीवाला, बर्फाचा गोळा विकणारा, बढढी के बाल विकणारा दारावरून घंटी वाजवत-वाजवत त्याच्या सायकल वरून जायचा.  शहरातली मुलं त्यामुळे सतत असलं काही खाऊ नका,हे करू नका,इकडे जाऊ नका,ह्याला हाथ लावू नका,त्यात डोकावू नका ह्या उपर सतत कोणी तरी लक्ष ठेवायला बरोबर. तशी मी फारशी उद्योगी मुळीच नव्हते, पण काही ना काही लागायचे हे नक्की. मी जाणार म्हणजे आईच्या अर्धा जीव टांगणी ला असायचा, कारण मला काही झालं तर माझी इकडची आजी म्हणजे बाबांची आई माझ्या आईला १००% ओरडणार. त्यामुळे आजी किंवा मोठे भाऊ बहि‍णी पैकी नेहमीच मागावर.

खूप वर्ष झाले असं निवांतपणे सगळ्या भावंडांना भेटून,गप्पा मारून. आज किती तरी भारी गाड्यांमधून फिरतो,पण त्या बैलगाडीची सर काही येत नाही. कितीही फाईव्ह स्टारला जेवलो तरी आठवते ते चुलीवरचे जेवण. आजी गेली तसा अंगणातला झोकाही दुरावला,आईचा माहेराचा ओढाही कमी झाला. थकलेला मामा आजही फोनवर बोलताना तितकाच उत्सहात बोलावतो. कधी येतेस ग भेटायला असा एकसारखा विचारतो. जरा आरामाला ये,असा मायेने सांगतो. कामात आणि सुख सोयींच्या नादात गाडून गेलेलो आम्ही,असलेल्या आजोळाला हरवून बसलो.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *