–स्मिता बर्वे–
सहल हा विषयच आबालवृद्धांना संजीवनी देणारा आहे. अगदी बालवाडीत असल्यापासून आपण त्याचा आनंद घेत आलो आहोत. सहलीला सर्वसाधारणपणे ओळखीचेच लोक बरोबर असतात, फक्त स्थळ वेगळे असल्याने मूड वेगळा असतो. सहल एकदिवसाची असो वा अनेक दिवसांची. जवळपास असो, देशात असो की परदेशात उत्सुकता नेहमीच असते. मला स्वतःला निसर्ग सान्निध्यातील सहल जास्त भावते. अलीकडे अगदी लहान मुलांची सहल सुद्धा रिसॉर्टवर असते, किंबहुना सहल म्हणजे रिसॉर्ट असे समीकरण झाले आहे. एका दृष्टीने ते चांगलेच आहे की आपल्याला काही तयारी करावी लागत नाही. आपण आरामात जाऊ शकतो आणि सहलीचा पुरेपूर आनंद लुटू शकतो. हे सगळे आठवायचे कारण म्हणजे मी नुकताच अश्या सहलीचा आनंद घेतला. महाराष्ट्र मंडळ बेंगळूरू तर्फे आयोजित केलेल्या एक दिवसीय सहलीला आम्ही जोडीने गेलो होतो.
सध्या मी मंडळाच्या समितीचा भाग असल्याने सुरवातीपासूनच मी चर्चेत सहभागी होते. पण अशाप्रकारच्या सहलीला मी प्रथमच जाणार असल्याने साशंक होते, त्यामुळे माझी बघ्याची भूमिका होती. जशी जशी सहलीची तारीख जवळ आली तशी तशी उत्सुकता शिगेला पोहचली. बेंगळुरूची वाहतूक आणि सुग्गी रेसॉर्टचे अंतर ह्यामुळे तर जास्त ताण आला होता.
घरापासून मंडळ आणि तिथून रिसॉर्ट …… दुसऱ्या गावाला जाण्यासारखेच होते. पण उत्तम नियोजनाने सगळे शिस्तबद्ध पार पडले. ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येकजण वेळेच्या आधी निर्धारित जागी उपस्थित होता. आम्ही चक्क निर्धारित वेळेच्या आधी पोहचू असेच वाटत होते, तसे झालेही असते पण आदल्यादिवशी झालेल्या पावसामुळे रस्ता खराब झाला होता. त्यामुळे वेगळ्या रस्त्याने जावे लागले, त्यात गुगल बाईंनी पण थोडा घोळ घातला. पण पुढचा दिवस इतका अविस्मरणीय झाला की हे सगळे विसरूनच गेलो.
मंडळाच्या सहलीमध्ये साधारण सत्तर, पंच्याहत्तर जण होते, वयोगट होता चार वर्ष ते …..
काहीच ओळख नसलेले आपापल्या वयानुसार गट बनवून मज्जा मस्ती करायला सज्ज झाले. सुग्गी रिसॉर्टचा परिसर अतिशय रमणीय होता. सगळीकडे आंब्याची झाडे आणि लगडलेले आंबे. जुन्या नव्याचा संगम होता. झाडाच्या सावलीत खुर्चीवर बसून आम्ही पत्ते खेळलो. साहसी खेळ, कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन अश्या सर्व सुविधा होत्या. आपल्या आवडीप्रमाणे प्रत्येक जण मज्जा करत होता. जेवणापर्यंतचा वेळ कसा गेला ते समजलेच नाही. नंतर मात्र सर्वांची ओळख करून घेण्याचा कार्यक्रम झाला. खूप जण पहिल्यांदाच मंडळात आले होते. समिती सदस्यांच्या आपुलकीने सगळे भारावून गेले होते. तंबोला हा खेळ खूप उत्साहात खेळला. आकड्यांचा खेळही मनोरंजक असतो हे मला त्या दिवशी समजले. मला एक बक्षीस सुद्धा मिळाले. ५ जून पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो, त्या अनुषंगाने फुलाच्या बिया, कंद बक्षीस म्हणून देण्यात आले. सहलीला गेले असतानाही समाज भान सांभाळले गेले.
अशी आगळी वेगळी सहल आयोजित केल्याबद्दल मंडळाचे खूप आभार. बरीच नवीन मंडळी मंडळाशी जोडली गेली. समितीच्या सर्व सदस्यांनी सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आणि सहल यशस्वी केली. विशेष कौतुक पूजा आणि ऋचिताचे!
मन पुढच्या सहलीची वाट पहात आहे हे नक्की!