२६ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र मंडळाने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. बरोबर साडेदहाला सुरू झालेला हा कार्यक्रम साहित्योन्मेष स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ, विशेषांकाचे प्रकाशन, ग्रंथालय व वाचनालय स्वयंसेवकांचा सत्कार आणि प्रेरणा पुरस्कार वितरण अशा विविध उपकार्यक्रमांनी अगदी बहारदार झाला. ह्या कार्यक्रमासाठी, बहुआयामी व्यक्तीमत्वाच्या लेखिका आणि विपुलश्री मासिकाच्या संपादिका माधुरी वैद्य प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या.
दीपप्रज्वलन आणि प्रार्थना झाल्यावर दिपक कुलकर्णी यांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरेख सुरुवात झाली. येणाऱ्या प्रत्येक पारितोषिक विजेत्याचे फुलांनी बहरलेले रोप देऊन स्वागत करण्याची कल्पना खूप आवडली. रेवती कुलकर्णी यांनी मराठी भाषा दिनानिमित्त सादर केलेली स्वरचित कविता मनाला भावली.
राधिका मराठे, स्मिता बर्वे आणि रेवती कुलकर्णी ह्या तिघींनी गेली दोन वर्षे सनविविच्या संपादकत्वाची धुरा उत्तम प्रकारे सांभाळली आहेच, शिवाय ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही अतिशय नेटक्या पद्धतीने केले.
सनविवि संपादक मंडळाने यावर्षी “साहित्योन्मेष” ह्या उपक्रमांतर्गत १२ महिने – – १२ लेख अशी आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केली होती. ह्या स्पर्धेला बेंगळूरु मधील तसेच बेंगळूरु बाहेरून अगदी पुणे, इंदूरपर्यंत उत्साही स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सुरुवातीच्या तीन महिन्यात आपल्या आवडीच्या आणि त्यानंतर पुढचे ९ महिने संपादकांनी दिलेल्या विषयांवर पत्र, कथा, कविता, लेख अशा वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धकांना व्यक्त व्हायचे होते. सतत १२ महिने विविध साहित्य प्रकार हाताळून स्पर्धकांनी त्यांचे सातत्य आणि मराठी भाषेवरील प्रेम अभिव्यक्त केले.
या स्पर्धेच्या निमित्ताने संपादक मंडळाने सनविवि – साहित्योन्मेष विशेषांक काढला. ह्या अंकाचे प्रकाशन तसेच स्पर्धेचे बक्षिस वितरण माधुरीताईंच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात सनविविच्या ह्या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे मनापासून कौतुक केले आणि स्पर्धकांच्या सातत्याला दाद दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या “संपादक” म्हणून वाटचालीतले अनेक अनुभव व किस्से श्रोत्यांना सांगितले. त्यांच्या बोलण्यातील सहजता, ओघवती भाषा सर्वांनाच भावली.
आपल्या मंडळाचे वाचनालय गेली कित्येक वर्षे चालू आहे. बेंगळूरु शहराचा वाढता व्याप लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी विभागीय वाचनालये सुरू झाली आणि आपल्या काही सदस्यांनी ती अत्यंत कसोशीने सांभाळली. ग्रंथालयात येणाऱ्या पुस्तकांची यादी बनवणे, वेळोवेळी त्यांची मोजणी आणि वर्गीकरण करणे, तसेच संगणकीकरण करणे अशी अनेक किचकट आणि वेळखाऊ कामे ग्रंथालय समितीने मंडळावरच्या प्रेमामुळे अतिशय मनापासून केली. ह्या कार्यक्रमात पुन्हा एकदा त्यांच्या ह्या नि:स्वार्थ कामाची दखल घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ह्या भागाचे सूत्रसंचालन ऋचिता दवंडे ह्यांनी केले.
मंडळाचा सर्वच कारभार व्यवस्थित चालावा, त्यांच्यामध्ये कायम ऊर्जा रहावी, येणाऱ्या प्रत्येक सदस्याला त्यांचे अंगभूत कलागुण सादर करायला तसेच विविध कार्यक्रमांचा आस्वाद घ्यायला वाव मिळावा, यासाठी सतत झटणाऱ्या मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा या कार्यक्रमात ‘ प्रेरणा ‘ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
प्रेरणा पुरस्कारामागची संकल्पना मंडळाच्या अध्यक्षा माणिकताई पटवर्धन ह्यांनी खूप छान व्यक्त केली. कुठल्याही सामाजिक संस्थेच्या प्रगतीसाठी जरूरी असते ते मनुष्यबळ! आपल्या मंडळाला नेहमीच उत्तम कार्यकर्ते व स्वयंसेवक लाभले हे आपले भाग्य!
ज्येष्ठ सदस्यांच्या कामातून “प्रेरणा” घेऊन नवीन तरूण सदस्यांनी मंडळाला उत्तरोत्तर प्रगतीच्या शिखराकडे घेऊन जावे यासाठी हा अत्यंत समर्पक नावाचा ” प्रेरणा पुरस्कार”! याप्रसंगी १५ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. वैशाली तोरवी यांनी प्रत्येक कार्यकर्त्याच्या कार्याची छोटीशी ओळख करून दिली. विशेष म्हणजे हे मानपत्र सतीश बर्वे यांनी आपल्या सुवाच्य अक्षरात लिहिले आहे.
या सुरेख कार्यक्रमाचा शेवट मंडळाचे उपाध्यक्ष ओंकार संगोराम यांच्या नेहमीच्या दिलखुलास आणि उत्स्फूर्त शैलीत केलेल्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यानंतर सर्व उपस्थितांनी श्रीखंड-पुरी, मसालेभात, अळूवडी अशा अस्सल मराठमोळ्या सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला.
अशाप्रकारे एक अतिशय देखणा आणि नीटनेटका कार्यक्रम मंडळात संपन्न झाला.