–मुग्धा आपटे कोपरकर–
माझ्या अठराव्या वाढदिवसाला माझे बाबा हातात एक फॉर्म ठेऊन उद्गारले ” चरन् वै मधु विन्दति “. ” म्हणजे काय? ” असं विचारल्यावर म्हणाले “wandering one gathers honey”. अस्मादिकांचा तरीही गोंधळलेला चेहरा पाहून हसले, “फॉर्म भर म्हणजे समजेल!”.
तो फॉर्म होता YHAI (Youth Hostels Association ऑफ India ) च्या आजीव सभासदत्वाचा. तो भरून मी पिंडारी-काफनी ग्लेशियर्सच्या ट्रेकला जाऊन आयुष्यात पहिल्यांदा हिमालयाचं दर्शन घेतलं आणि माझ्या आईच्या भाषेत मला ट्रेकिंगचा किडा चावला. आता या इंगळीला उतारा एकच : परत परत ट्रेक ला जाणे, जे गेली अनेक वर्षे अव्याहत चालू आहे आणि “आम्ही बि घडलो, तुम्ही बी घडा ना” असं म्हणत या प्रवासात माझ्याचसारखे भटके आणि विमुक्त ( अर्थात आईच्या मते) अनेक सखेसोबतीही जोडले गेलेत.
तरुण मुलामुलींनी फिरून आपला देश पाहावा या इच्छेपोटी आणि त्यांना प्रवासात सुरक्षित आणि माफक दरात राहण्याची सोय व्हावी या उद्दिष्टाने रिचर्ड शिर्मन या जर्मन शिक्षकाने १९१२ मधे ना नफा ना तोटा या तत्वावर पहिल्यावहिल्या युथ होस्टेलची स्थापना केली आणि आजमितीला हॉस्टेलिंग इंटरनॅशनलची जगात ७०० पेक्षा जास्त युथ होस्टेल्स आहेत. १९४५ च्या सुमारास भारतामध्ये या सामाजिक चळवळीने मूळ धरलं आणि १९७० मध्ये मनाली ते सोलांग नाला ट्रेक या ट्रेकपासून YHAI ने साहसी ट्रेकिंग मोहिमा आयोजित करायला सुरुवात केली. ‘युथ‘ या शब्दाला फसू नका बरं, मनाने तरुण असलेल्या, भ्रमंतीची आवड असलेल्या आणि अकरा नंबर ची बसच (म्हणजे आपले पाय हो !) मस्त असं मानणाऱ्या कोणाचंही इथे स्वागतच आहे.
काय मिळेल ट्रेकला जाऊन? अहो, काय नाही मिळणार? ट्रेकच्या मार्गावर पुढच्या केवळ काही काळासाठी आपल्या पाऊलखुणा मागे ठेऊन, परत येताना आयुष्यभर पुरतील अशा आठवणींचा खजिना घेऊन परताल. चंद्रखाणी पास , सारपास, जलोरी पास, देवतिब्बा बेस कॅम्प, ब्रह्मताल अशा मोहिमांमधे उत्तुंग हिमालयाच्या शुभ्र हिमाच्छादित पर्वतरांगांचं दर्शन झालं कि `कैलासराण्या शंकराने जगातल्या सर्वोत्तम ठिकाणी निवासस्थान पटकावलंय` याची खात्रीच पटेल. कुलु- मनालीच्या दऱ्याखोऱ्यातून बेफाम वाहणाऱ्या बियास नदीच्या काठाने ट्रेक केलात कि तिच्या खळाळत्या पाण्याची गाज घरी परतल्यावरही पुढचे कित्येक दिवस कानात घुमत राहील. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातली व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मधली रंगबिरंगी फुले नेत्रसुख म्हणजे नक्की काय त्याची व्याख्या सांगतील. लोहाजंगहुन पुढे अली आणि बेदीनी बुग्यालला जाल, तेंव्हा साडेतीन हजार फुट उंचीवरची डोंगरातली हिरवीगार गवताळ कुरणं आणि सूर्यास्ताला मागच्या त्रिशूल पर्वताची सोनेरी रंगात झळाळणारी शिखरं कॅमेऱ्यात कशी टिपायची, याचा खटाटोप तुम्ही कराल. शहरात भलेही तुम्ही देवळाबाहेर रांग धरून उभे राहत नसाल, पण रुपकुंडच्या मार्गावर गुढघाभर बर्फातून वाट तुडवून तुम्हाला साडेचौदा हजार फुटांवरच्या कालू विनायकाचं दर्शन होईल, तेंव्हा तुमचे हात तुमच्या नकळत जोडले जातील. लेहच्या ट्रेकला तुम्ही जाऊन परत याल ते हिवाळ्यामध्ये गोठलेल्या झंस्कार नदीवरचा चादर ट्रेक आयुष्यात एकदा तरी करायचाच, याचा निश्चय करूनच. भारताच्या या सर्वात उंच वाळवंटी पठाराला, साडेनऊ हजार फूटांवरच्या लडाखला जाल आणि श्वास फुलेल तेंव्हा ‘ समुद्रसपाटीपासून जसजसे आपण उंच जातो तसतसे हवेतील ऑक्सीजनचे प्रमाण कमी होते ‘ ह्या शाळेत शिकलेल्या भूगोलाची उजळणी होईल. अहो, शाळा बुडवून राजस्थानच्या कुम्भलगढच्या ट्रेकला गेलेली माझी मुलं ‘ दिल्लीतल्या मुघल सुलतानाच्या सत्तापिपासू वृत्तीपायी दोन राजपूत राजांनी एकमेकांशी लढाई करून हकनाक आपले प्राण गमावले ‘ हा इतिहास शिकून परतली, म्हणजे बघा.
आता तुम्ही म्हणाल यासाठी नुसते पर्यटन केले तरी पुरे, ट्रेकिंग करायचा आग्रह का? म्हणजे आपल्या खिशातले पैसे खर्च करायचे आणि आपणच पायपीट करायची? अहो, एकदा ट्रेकला चला, याचं उत्तर नक्की मिळेल. दिवसभराच्या चालीनंतर हॅवरसॅक उतरवली कि पाठीला लागणारी वाऱ्याची झुळूक एसीच्या झोतापेक्षा सुखावह वाटते. बाटलीबंद मिनरल वॉटरपेक्षा वाटेतल्या खळाळणाऱ्या झऱ्याचं पाणी अधिक गोड लागतं. हॉटेलच्या आरामदायी बिछान्यात येणार नाही इतकी मस्त झोप टेंटमध्ये खडबडीत जमिनीवर स्लिपिंग बॅगमध्ये घुसल्यावर येते. बरं , सकाळच्या महत्वाच्या कामांसाठी मोकळ्या निसर्गात जणांचा आनंद बोनसमध्ये मिळतो. अहो खाण्यापिण्याचे सगळे फाजिल नखरे गळून पडतात. दिवसभर तंगडतोड केल्यावर रात्री कॅम्प फायरला मिळणारा (अंमळ पांचट) बोर्नविटासुद्धा अमृतासारखा लागतो. मुख्य म्हणजे कामाच्या आणि कम्प्युटरच्या आभासी जंजाळाबाहेरचं खरं जग दिसतं. यांत्रिक, संवादहीन शहरी आयुष्यातून बाहेर पडल्यावर स्वतःशीच संवाद साधता येतो. स्वतःचे श्वास आणि हृदयाचे ठोके ऐकू येतात आणि फरहान अख्तरच्या भाषेत कळतं ” दिलोमें तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तोह जिंदा हो तुम “. बरेचदा एका पर्यटकाला ते दिसतं, जे पाहायचं तो ठरवून आलेला असतो आणि एक सच्चा ट्रेकर ते बघतो, जे निसर्ग त्याला दाखवतो.
कोण असतो सच्चा ट्रेकर? तो ट्रेकिंग आणि आयुष्यामधलं साम्य ओळखून असतो. जो ” डोंगर का चढायचे ?“ या प्रश्नाचं उत्तर ” ते तिथे असतात म्हणून” असं देतो. चढताना कितीही धाप लागली, पोटरीत कितीही गोळे आले तरी शिखरावर जाऊन सभोवतालचं विहंगम दृष्य पाहायचं ध्येय कधीच सोडत नाही. यापुढचं शिखर अधिकच उंच आहे हे पाहून नव्या जिद्दीने पुढे चालू लागतो. आपल्या पाठीवरचं ओझं आपल्यालाच वाहायचंय हे कधी विसरत नाही आणि म्हणूनच पाय पसरण्याएवढंच अंथरूण बरोबर बाळगतो. तोच खरा ट्रेकर, जो गंतव्यस्थान अजून किती दूर आहे हे विचारायच्या फंदात न पडता वाटेवरच्या खाचखळग्यातही ट्रेकिंगचा ( का आयुष्याचा? ) “मझा“ शोधतो.
” चरन् वै मधु विन्दति ” हेच खरं. या मधाची गोडी एकदा चाखली कि माणूस चटावतोच. तसा माझा मोठा लेक लहान असल्यापासूनच माझ्याबरोबर छोट्यामोठ्या ट्रेकला येतोय. गेल्या वर्षी तो अठरा वर्षाचा झाला, तेंव्हा त्याला भेट काय द्यायची याचं उत्तर मी कधीच शोधलं होतं. आता माउसच्या एका क्लिकवर मिळणारं YHAI चं लाईफ मेम्बरशिप कार्ड त्याच्या हाती देताना मी माझ्या बाबांसारखाच त्याला सल्ला दिला, “चरैवेति चरैवेति “. कार्डवरचं wandering one gathers honey हे बोधवाक्य वाचून दाखवून त्याला म्हटलं, ” ही खरी मधुशाला ! ” त्याचा चेहरा गोंधळलेला होता आणि माझ्या चेहऱ्यावर तेच हसू होतं जे मी अनेक वर्षांपूवी माझ्या बाबांच्या चेहऱ्यावर पाहिलं होतं.
