सनविवि ललित,साहित्योन्मेष माझे मित्र आणि मैत्रिणी

माझे मित्र आणि मैत्रिणी

वैशाली चौधरी

दिये जलते है,फुल खिलते है,

बडी मुश्किल से मगर दुनिया मी दोस्त मिलते है !!

हे गाणे जेव्हा ऐकते, फारच भावुक होते मी. नकळत डोळ्यात पाणी येते. माझ्या डोळ्यातल्या पाण्याला तर काही कारणच नाही लागत. सारखे सर्दी होणाऱ्याला, “किती गळके नाक आहे तुझे”, असे म्हणतात तसे माझ्या डोळ्यांना असेच काही म्हणायला हरकत नाही. मित्र मैत्रिणींच्या बाबतीत मी खूपच भाग्यवान आहे. अगदी शाळेत असल्यापासून ते आतापर्यंतच्या जीवनप्रवासात, खूप छान आणि जीव लावणाऱ्या, काळजी घेणाऱ्या  मैत्रिणी भेटल्या मला. सुरुवात करते शाळेपासूनच. तशा बऱ्याच खास मैत्रिणी होत्या शाळेमध्ये. पण एक होती तिच्याबरोबर मी जरा जास्त असायचे. म्हणजे आमच्या दोघींची घरे जवळ, त्यामुळे आम्ही शाळेत सायकल ने एकत्र जायचो. माझ्यासाठी ती शाळेतली सर्वात सुंदर आणि हुशार मुलगी होती. आम्ही एकत्र जायचे ठरवलेले असले तरी, कधी कधी तिच्या घरी पोहोचायला मला उशीर व्हायचा, त्यामुळे ती एकटीच निघून  जायची. एके दिवशी, “वैशाली, तू प्लीज लवकर येत जा,” ती जरा घाबरलेली वाटली.  “का ग, काही प्रॉब्लेम आहे का? टेन्शन मध्ये दिसतेस.” तेव्हा तिने मला सांगितले कि आजकाल रोज १ मुलगा तिचा पाठलाग करतो. त्याकाळी एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले ऐकून आम्ही आधीच घाबरून असायचो. पण यात मी काय करणार होते? मला थोडीच कराटे येत होते तिचे रक्षण करायला? “पण तू सोबत असलीस तर तो काही करणार नाही,  असा तिचा समज होता.” हे खूपच गंभीर होते. मग मी रोज तिच्याबरोबर अंगरक्षक म्हणून जाऊ लागले. तो मुलगा रोज आमच्या मागे सायकल चालवत आमचा पाठलाग करायचा. त्याला काय मिळत होते त्यातून देव जाणे. महिनाभर हा कार्यक्रम चालू होता. एके दिवशी त्याच्यात काय हिंमत आली कुणास ठाऊक, त्याने अचानक सायकल आमच्या आडवी घातली. आम्ही दोघी घाबरलो, थांबलो. त्याने पुढे येऊन तिला एक ग्रीटिंग कार्ड दिले. ती जाम पेटून उठली, त्याला चांगलेच सुनावले, त्याने दिलेले कार्ड फाडून त्याच्यासमोरच फेकले आणि, “पुन्हा माझा पाठलाग करशील तर याद राख अशी धमकी पण दिली.” त्यानंतर तो मुलगा आमच्या आसपास कधी फिरकला नाही. “वाह, काय मस्त बोललीस. तुला माझी गरज मुळात नव्हतीच.” तिच्या या प्रसंगाची शिकवण लगेच पुढल्या वर्षी माझ्या कामी आली. माझ्या मागेही एक प्रेमी,  कार्ड घेऊन आला आणि “माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणाला,” तेव्हा सुद्धा हीच मैत्रिण होती माझ्याबरोबर. खूप घाबरले असले तरी मैत्रिणीचा अनुभव कामी आला. कार्ड वगैरे काय हातात घेऊन फाडायला मला जमले नाही पण, “असल्या भानगडीत पडू नये. आपण लहान आहोत आणि अभ्यासाकडे लक्ष द्यावे. पुन्हा असे केल्यास, घरी नाव सांगितले जाईल अशी कोमल शब्दात धमकी मी त्याला दिली.” त्यानंतर हीच मैत्रीण इंजिनीरिंगसाठी मुंबईला गेली. दर सुट्टीत घरी आल्यावर एकेक किस्से सांगायची, त्यानंतर मलाही मुंबईत जॉब मिळाला. “मुंबईत कशी टिकशील ग तू? खूप स्मार्ट आणि धाडसी राहावे लागते,” असे म्हणणारी ती, २ वर्षांनी, “मस्त ग, मला नव्हते वाटले तू मुंबईत टिकू शकशील, असे मला म्हणाली.” मी म्हटले, “सखे, तुझ्या अनुभवावरून खूप काही शिकायला मिळाले ग मला.” 

त्यानंतर मुंबई पुणे अशा ठिकाणी वेगवेगळ्या रूममेट्स बरोबर राहायला मिळाले. कुणी पंजाबी, तर कुणी गोवन, कुणी  मराठी तर कुणी लखनौची. अशा वेगवेगळ्या प्रांतात राहणाऱ्या मैत्रिणींकडून, भरपूर प्रेम मिळाले आणि वेगवेगळे पदार्थही बनवायला शिकले. एकदा माझी तब्येत खूप बिघडली होती. मी ऑफिसमधील एका मित्राला तसे सांगून घरी निघाले. तसे मित्र मला मोजकेच. त्याला बिचाऱ्याला माझी खूप काळजी , सारखा मेसेज करून विचारू लागला, बस मिळाली का? रूमवर पोहोचलीस का? कुणी आहे का बरोबर? डॉक्टरकडे गेली का? पण माझी हालत इतकी खराब होती कि फोनची मेसेज टोन सारखी वाजत होती पण मला रिप्लाय द्यायला झेपतच नव्हते. मी कशी बशी बेडवर आडवी झाले होते. रूममेट्स होत्या. मला त्यांनी दवाखान्यात नेले, औषध गोळ्या आणल्या. तरी मित्राचा मेसेज येतच होता. एक मैत्रीण जाम भडकली, “अरे याला कळत नाही का? आजारी माणूस कसे याला रिप्लाय देईल?” तिच्या तो डोक्यातच गेला. तिने सरळ माझा फोन घेतला आणि “We are here to take good care of her. So don’t worry!” असा मेसेज केला. बिचारा!! त्याला काय माहित? तो काळजीपोटीच विचारात होता ना. त्याने पुन्हा आठवडाभर मला मेसेज कॉल केला नाही.

अजून एक माझी जिवलग मैत्रीण, माझी एकदा मनस्थिती ठीक नव्हती, आणि मी रूममध्ये एकटी राहू नये म्हणून डायरेक्ट तिच्या घरी घेऊन गेली, “अजिबात एकटे राहायचे नाही. उगाच नको ते विचार येतात.” तिचे घर माझ्या ऑफिसपासून खूप लांब होते. माझा बस स्टॉपपण दूर होता, तरी महिनाभर इथेच राहा. परिस्थिती बरी होईल तेव्हा परत जा रूमवर, मी सोडत जाईन तुला बस स्टॉपवर. आणि खरेच रोज सकाळी ७ वाजता मला स्टॉपवर सोडायची. तिच्याकडूनही आयुष्यात कसे खंबीर राहायचे, प्रॅक्टिकली कसा विचार करायचा हे मी शिकले.

माझी मुंबईची रूममेट, आम्ही तिघी रूमवर राहायचो. ती आमच्यात सर्वात मोठी. मुंबईत ती बरीच वर्षे राहत असल्याने, आमच्यासारख्या नवख्यांना तिने खूप मार्गदर्शन केले. नंतर आमची छान गट्टी जमली. रविवारी आमच्या मेसला सुट्टी असायची तेव्हा ती बऱ्याचदा खायला घेऊन यायची. आम्ही ते चुपचाप खावे म्हणून, प्रेमळ धमक्या चिट्ठी मध्ये लिहायची, उदाहरणार्थ,

“डब्यात डाळिंब ठेवले आहे, ते खाल्ले तर त्वचा छान होते.

तिथे २ सफरचंद आहेत, ते खाल्ले तर पायाला क्रॅम्प्स नाहीत येणार,

थोडी खीर आहे, ती संपविली तर उद्याची मीटिंग मस्त होईल

ढोकळा आणला आहे, पटकन संपवला तर अमुक अमुक तुला प्रोपोज करेल, ” अशा बऱ्याच चिट्ठ्या तिने आम्हाला लिहिल्या. तर अशी जीवनाबद्दल मार्गदर्शन करणारी आणि प्रेमळ धमक्या देऊन खाऊ घालणारी ती मैत्रीण. परवा मला म्हणाली, “तू अशी लेखिका वगैरे बनणार आहेस असे त्याकाळी माहित असते, तर तुझे पाय चेपून दिले असते,” आता काय बोलू?? 😀 

आता वळूया मित्रांकडे. तसे मला मोजकेच मित्र, त्यातल्या सर्वात जास्त छान ट्युनिंग जमले, त्या मित्राशी तर मी लग्नचं केले. त्याच्याबद्दल बोलायचे झाले तर मला एक पुस्तकचं लिहावे लागेल. त्यामुळे ते इथे मी सध्या टाळते. 

एक जुना मित्र, त्यावेळेस मी मुंबईला जॉब करत होते. पहिल्यांदाच घराबाहेर पडले होते. मुंबईची मराठी भाषा आणि माझी मराठी भाषा नक्कीच खूप फरक होता. एकदा काय झाले, मी माझ्या मित्राला म्हणाले, “हे तुम्ही सर्वांनी खावा”. त्याने माझ्याकडे आश्चर्याने पहिले, “काय म्हणालीस तू? खावा? हि कोणती भाषा?”

“अरे असे काय करतोस, मी तुम्हा सर्वांना उद्देशून म्हणाले मग खावा च ना? अनेकवचन किंवा आदरार्थी ला खावा..”

“मग ‘जा’ ला तू काय म्हणणार?” तो.

“तुम्हा जावा…” मी निरागसपणे.

तो पोट धरून हसू लागला. त्याने माझी चूक दुरुस्त केली. “तू खा, आणि तुम्ही\ आपण पण खा ..खावा नव्हे..” सुरुवातीला मला पटले नाही. मी माझ्या जिवलग मैत्रिणीला फोन लावला. तीही माझ्यासारखीच. “आपलेच बरोबर आहे, असे अरेतुरे बोलू नये मोठ्यांना,” असे मला सांगितले. पण मी खूप चांगले मराठी असलेल्या मैत्रिणीला फोन लावला. तिने मला तुझा मित्र बरोबर सांगतो आहे असे खात्रीने सांगितले. आज जर मी त्याला माझे लेख, कथा पाठवल्या तर नक्कीच त्याला माझा अभिमान वाटेल पण त्यात १०० चुकाही काढेल हे नक्की. असो. माझ्या मराठी सुधारण्यात त्याचाही काही अंशी वाटा आहे हे म्हणायला काही हरकत नाही.

परवा मी व्हाट्स अँप वर हि चारोळी पोस्ट केली होती:

       “तुझा एकेक मेसेज 

    कितीदातरी वाचते

    प्रत्येकवेळी वाचताना

    नव्याने तुझ्या प्रेमात पडते,”

यावर माझा दुसरा मित्र रिप्लाय करो ,”अरे असे मेसेज वाचण्यापेक्षा अभ्यासाची पुस्तके वाचली असतीस तर मेरिट मध्ये आली असतीस- एक पालक!” काय रिप्लाय द्यावा सुचेना. पुढचे काही दिवस कविता अन चारोळ्या पोस्ट करायचा धसका घेतला हो मी.

अजून तशी बरीच मोठी यादी आहे. पण लेखासाठी शब्द मर्यादा आहे, त्यामुळे लेख इथेच थांबवत आहे. पण त्याआधी, माझ्या आयुष्यातल्या या सर्व प्रेमळ मित्र मैत्रिणींना माझ्यावर भरभरून प्रेम केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. I miss you all!! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *