सनविवि ललित,साहित्योन्मेष शब्द बापुडे, केवळ वारा

शब्द बापुडे, केवळ वारा

—– पंकज पंडित —–

 

भाषेची शुचिता महत्वाची : शुद्धभाषा, कपडे, रंग-रूप अशा बाह्य गोष्टीना महत्व आहेच  कारण व्यक्तीच्या बोलण्यावरून, कपड्यावरून , प्रथमदर्शनी मत बनते; आकर्षक मुखपृष्ठाचे पुस्तक चाळावेसे वाटते; सुवाच्य, एकटाकी हस्ताक्षर, कोणाला वाचावंसं नाही वाटणार ? म्हणूनच अस्खलित भाषेमुळे प्रभावित करून,  फसविण्याचा धंदा “ठकसेन” करतात. ग्रामीण भाषा बोलणाऱ्यांना, नागरी लोक “आनी पानी” असं हिणवतात. अशी व्यक्ती एखाद्या विषयातील विद्वान असली तरी पूर्वग्रहांमुळे, त्या व्यक्तीला डावलले जाऊ शकते. एकदा बादशाहने, मिर्झा गालिब या उर्दू कवीला जेवण्यासाठी आमंत्रण दिले; तेव्हा त्याच्या गबाळ्या पेहेरावावरून, दरवानाने त्याला प्रवेश नाकारला नंतर चांगले कपडे घालून आल्यावर त्याच दरवानाने, गालिबला अदबीने सलाम केला !  

आत्ताची नागरी मराठी भाषा कशी तयार झाली? वेदपूर्वकालीन, विविध भाषा समूहांना, पाणिनीने व्याकरण नियमात बसवून, स्थिर स्वरूप दिले, जिला संस्कृत भाषा म्हणतात. सर्वच भाषा अशा तर्हेने विकास पावल्या; आधी बोली-भाषा म्हणून; नंतर व्याकरण-नियम केले गेले. वेगवेगळ्या प्रादेशिक, प्राकृत भाषा, बोलीभाषा म्हणून अस्तित्वात होत्या, त्यांचा विकास होत गेला आणि त्यात ग्रंथरचना होऊ लागल्या प्राचीन महारट्टी , महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश मराठी आणि आजची आधुनिक नागरी मराठी असा आपल्या भाषेचा प्रवास आहे .

भाषेला स्थळ-काळाच्या  मर्यादा दर बारा कोसावर (आणि बारा  वर्षांनी!) बोलीभाषा बदलत असते  उगमाच्या ठिकाणी, नदीचे पाणी शुद्ध असते. पुढे नदीमध्ये विविध प्रवाह, स्रोत मिळतात. नदीचे स्वरूप ठिकठीकाणी बदलते तरी नदी तीच असते. लोकजीवनातली बोली-भाषा, नदीच्या खळाळत्या पाण्यासारखी, वाहणारी असते.

“सुसंस्कृत” विद्वानांची” संस्कृत भाषा ! संस्कृत सर्व भारतीय भाषांची जननी. जर मायबोली आपली आई तर संस्कृत म्हणजे आपली आजी आहे; इतर बोली भाषा सख्या बहिणी आणि  प्रादेशिक भाषा  मावश्या!. सर्व भाषांचे उगम स्थान मानली गेलेली, शुद्ध, परिपूर्ण अशी देववाणी संस्कृत भाषा मृतप्राय का झाली? नवीन निर्मिती सोडा, साधं संभाषणदेखील आज संस्कृत भाषेत होत नाही. ठेवणीचे भरजरी कपडे, सणासुदीला, लग्न सराईला, (फेटे घालून किंवा नववारी साडी, असा “ट्रेडिशनल” पेहेराव) “सेल्फी” काढून “सोशल मीडिया”त  Likes मिळवायला “OK” पण अशा कपड्याची “झूल” उतरवल्यावर अगदी हलके वाटते , नाही का? तशी बोजड, भाषा झाली तर ? 

साहित्य निर्मितीसाठी प्राज्ञ भाषेतील  व्याकरणाचे नियम आवश्यक  नाहीत प्रतिभेचं देणे घेऊन जिवंत बोलीभाषेत लिहीणाऱ्यां प्रतिभावंत लेखक , कवी यांनी ग्रामीण, दलित साहित्य, यासारखी रशरशीत निर्मिती करून, मराठीत नवीन ऊर्जा आणली. तशीच क्रांती “हिंग्लिश”, हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या मिलाफातून, चित्रपट, जाहिरात क्षेत्रात झाली “ये दिल मांगे more” “Jab We Met” यासारख्या “catchy” वाक्यांनी, सामान्य माणसांच्या हिंग्लिश भाषेला, आणि “बम्बईया” हिंदीला, लोकमान्यता मिळवून दिली.

.संवादाद्वारा भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे हाच भाषेचा उद्देश असतो” कवी वसंत यांची एकोणिसाव्या शतकातील ही कविता आजही कालबाह्य वाटत नाही (१)

 

. संत ज्ञानेश्वर म्हणतात,”संवादाचा अनुकूल वारा सुटला की हृदयाकाश सारस्वताने भरून येते. श्रोत्यांचे मन-थाऱ्यावर नसले तरी वितळते आणि रस उत्पन्न होतो”. 

 

शब्देविण संवादु: शब्दाशब्दानें संवाद  नव्हे तर अपशब्द, वाद वाढतो. जिभेद्वारा निघालेला शब्द म्हणजे “वैखरी “. याच्या खाली , अंतर्मनाच्या तीन पायऱ्या आहेत (मध्यमा, पश्यन्ति आणि परा) शब्द जिभेद्वारा बाहेर पडण्याअगोदर,  भाव- भावनांचे तरंग खोलवरून येतात  “मध्यमा” ही सर्व मानवांची एक सामायिक संवाद-लहरी(frequency), अंतरीची खूण आहे. या भाव-लहरीचा उगम, हृदयातून होत असतो. म्हणूनच जवळच्या मित्राला “सुहृद” म्हणतात. शब्दांविना संवादाच्या “मध्यमा” या स्तरावर भाषेच्या शुद्ध-अशुद्धतेचा काहीच परिणाम होत नसतो. उदाहरणार्थ “अनुपमा” चित्रपटातील कैफी आझमी यांचे हे गीत.

 

“सखाराम गटणे” पुल देशपांडे यांच्या “व्यक्ती आणि वल्ली” मधील, शुद्ध,”प्राज्ञ मराठी” बोलणारे  एक हास्यास्पद “पात्र”(!),! छापखान्यातील खिळ्याप्रमाणे, साचेबद्ध शब्दामध्ये “सखाराममधील “रामच” हरवून गेला. पु. ल.च्याच, “ती फुलराणी”, नाटकामध्ये , एक भाषा-पंडित , ,अशुद्ध बोलणाऱ्या गरीब फुटपाथवरच्या फुलवालीला, शुद्धभाषेच्या जोरावर ,राजघराण्यातील “फुलराणी” करण्याचा विडा उचलतो. पण शेवटी त्या अशिक्षित बाईकडून माणुसकीचा धडा शिकतो ! पाण्याला ‘पाणी’ म्हणणारा माणूस, ‘पानी’ म्हणणाऱ्या माणसापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतो! शब्दांच्या शुद्ध-अशुद्ध उच्चारांवर कोणी मोठा किंवा लहान ठरत नाही. उदा.वैद्यकीय क्षेत्रातील संशोधक डॉ बावसकर, यांचा विंचूदंशावरील प्रबंध “अशुद्ध भाषेमुळे, भारतीय पाक्षिकांनी नाकारला परंतु विदेशी तज्ञानी , आशयगर्भता ओळखून , भाषा सुधारून, प्रबंध सन्मानाने प्रकाशित केला 

 

कवयित्री आश्लेषा महाजन यांच्या “भाषा -संस्कृतीची धारा”, कवितेत(*) “माय” अशा “बोली” हरविलेल्या बालकांसाठी, शोक करीत आहे. कारण आईचे तिच्या सर्वच लेकरांवर निरतिशय प्रेम असते. म्हणून भाषाशुद्धीचा अट्टाहास नको जसे बावनकशी सोने. दागिने बनविण्यासाठी निरुपयोगी, तशीच अति-शुद्ध भाषा व्यवहारात निरुपयोगी. भाषेच्या दुराभिमानि लोकांनी हिणविल्यामुळे समाजात विद्वेष वाढीला लागतो. संत ज्ञानेश्वर,तुकाराम,बहिणाबाईं, अशा अनेकांनी सोप्या बोलीभाषेतून चिरंतन सत्य सांगितल; तत्वज्ञानांवरील, उच्चवर्णीय ब्राह्मणवर्गाची मक्तेदारी मोडली. जसा कांद्या-लसूणाचा उग्र वास, काही लोकांना वर्ज्य, तसा भाषाशुद्धतेच्या राजकारणामागे संकुचित जातीयतेचा वास येतो.

भाषाशुद्धीचे उसने अवसान टिकत नाही भाषेची धारा, शतकानुशतके टिकून वाहते, तिलाच संस्कृती म्हणतात. विशिष्ट बोलीभाषा , विशिष्ट पाककला, विशिष्ट पेहेराव अशा भौगोलिक आणि ऐतिहासिक गोष्टी, पुरातन भारतीय संस्कृतीतील विविधतेचा अविष्कार करतात या सर्व वैशिष्ट्यांचे, सांस्कृतिक ठेवा म्हणून जतन करायचे? का शुद्धतेच्या,  आधुनिकीकरण आणि जागतिकीकरणाच्या चुलीवर, एकच बोली, एकच सूर, एकच रंग, एकच चव, एकच रूप,  एकच वास असे अळणी, बेचव सपक जेवण रांधायच? अशा दुराग्रहापोटी आपली संस्कृतीच नष्ट होईल. 

—————————————————————————————————————–* संदर्भ -१. कवी वसंत यांच्या कवितेतील काही ओळी संदर्भासाठी उद्धृत केल्या आहेत; २ज्ञानेश्वरी अध्याय ९ ; ओवी २८ ;. श्रीमती आश्लेषा महाजन यांनी “भाषा -संस्कृतीची धारा”, कविता उद्धृत करण्यास परवानगी दिली आहे ; Email panditpank@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *