सनविवि आठवणी,साहित्योन्मेष लक्ष्मीम्मा     

लक्ष्मीम्मा     

                                                      

–निवेदिता शिरवटकर–                           

घडाळ्याचा काटा जेमतेम १० चा आकडा गाठतो ना गाठतो तोच दाराची बेल वाजली. 

रोजची वेळ लक्ष्मीम्माची ! 

तंबाखूचा तोबरा नेहमीसारखा भरलेला होता. दार उघडताच फास्सकन् लालबुंद दात दाखवत लक्ष्मीम्मा  आत शिरली. पदर खोचून केरसुणी उचलत लगबगीने कामाला लागली. एकीकडे हात चालवत पान तंबाखूचा आवंढा गिळत तोडक्या मोडक्या हिंदीत म्हणाली,

” दीदी, आज थोडा जल्दी जानेकु है I…. आदमी गांव से आया है I बोला, आज चिकन बना आच I. “

” होय तर ! लक्ष्मीम्मा , खरंच ! चिकन पकाके खिलाना आदमी को I  खुश कर देना I” मी मिश्किलपणे  म्हटले.

” क्या दीदी !  वो तो खुश होता है बोत्तल को देखके I ” 

असं काही पुटपुटत तिने किचनकडे मोर्चा वळवला. 

मी रोजची पूजेची तयारी करू लागले.  मनात मात्र परवा वाचनात आलेल्या एका लेखाची आठवण हळूच डोकावली. 

‘ मॉडर्न इंडिपेंडंट वुमेन्स ‘

खरोखरच फक्त आजची सुशिक्षित, आधुनिक स्त्रीच ‘ इंडीपेंडंट’  असते का ?.….. 

माझा असा प्रश्न समोर आल्यावर तुम्ही सर्वजण कदाचित बुचकळ्यात पडला असाल.  

माझ्या मनात असा विचार येण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी लक्ष्मीम्मा सोबत चहा पीत निवांत गप्पा मारत असताना कळलं होतं की ती इथे बंगलोरमध्ये  भाड्याच्या घरात एकटी राहते आणि तेही स्वतः पैसे कमवून. 

अंदाजे पन्नाशिला पोहोचली असावी एव्हाना. लग्न लहान वयात जमले असावे. मुले, नातवंडे लवकरच झाली होती वाटतं कारण तिची नातवंडं चांगलीच मोठी होती. आजूबाजूच्या पाच सहा  घरात काम करून स्वतःचे पोट भरते, स्वतःच्या जीवापुरते अन्न शिजवते आणि मोठया हिमत्तीने एकटी राहते. कोणावर रागलोभ नाही की भांडण तंटा नाही. अधिक खोदून विचारता म्हणाली ,

” काय करू दीदी? देखो आदमी को शराब की बहुत बुरी लत है I इतना साल हुआ I बहुत कोसिस की,  पर उसकी शराब की लत छुटती नही I  बेटेको भी वही दारुकी आदत लग गई है I..…. 

बहु घर देखती है और नजदीक के दो घरमे खाना बनाती है I दोनो बाप बेटा नशा करता है I

क्या करने का ? दो पैसा कमाती हुं तो वो भी छिन लेता है ये आदमी I इस कारन मै इधर रहती हुं I थोडा पैसा घर भेजती है I घरमे रेहती तो बहुत तेन्सन होता है I इधर मैं अकैले ठीक हुं ,कभी कभी घर जाकर देखती हुं की सब ठीक है या नही I ” 

तिची कहाणी  ऐकून मी चाटच पडले होते. वाटलं की ही अशिक्षित,अडाणी बाई ह्या सरत्या वयात सुद्धा धाडस करून भरल्या घरातून बाहेर पडली होती आणि ते ही पूर्णपणे स्वावलंबी बनून. हे पाऊल उचलताना ना तिने लोकांचा, समाजाचा विचार केला ना नातेवाईकांना काय वाटेल ह्या गोष्टीचा! ….. 

ना कोणाशी वादविवाद, ना नशिबाला दोष देत अश्रू ढाळत बसली. ना कोणाविषयी आकस ना आपली मते दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न. स्वतःला होणाऱ्या त्रासाचा उपाय म्हणून सुनेची विनाकारण पिळवणूक करण्याची इच्छा देखील नाही !….

मला अगदी सहज आविर्भावात तिनं हे सर्व असं सांगितलं की घराबाहेर एकटं राहण्याचा  निर्णय घेणं काही फारसं कठीण नव्हतं तिच्यासाठी. 

मग आठवलं जेव्हा गेल्या वर्षी तिच्या नवऱ्याला स्ट्रोक आला होता, तेव्हा त्याचा इलाज करण्यासाठी त्याला इथल्या हॉस्पिटलमध्ये तिच घेऊन आली होती. घराबाहेर पडूनही गरज असताना एक बायको, एक आई किंवा कधी सासू बनून सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी सदैव तत्पर होती लक्ष्मीम्मा ! …..

आणि तरीही हे सर्व करत असताना नको त्या ‘ attachments ‘ पासून कधीच अलिप्त झाली होती ती.

स्वतःला दुसऱ्यांसमोर सिद्ध करण्याची अवाजवी खुमखुमी  तिच्या चेहऱ्यावर कधी दिसली नाही की आपण करत असलेल्या कष्टाचा अनाठायी पाढा तिने कधी लोकांसमोर  वाचल्याचं आठवत नाही.   

एकाअर्थी ” निष्काम कर्म ” आपसूकच तिच्या हातून घडत होतं.  जरी तिने कधी तो शब्द सुद्धा ऐकला नव्हता. मला मनोमन खूप कौतुक वाटलं तिचं ! 

त्याहूनही  ही समज  तिच्यासारख्या अडाणी बाईमध्ये  असावी ह्याचं आश्चर्य सुद्धा !! 

जी परिस्थिती बदलणे आपल्याला शक्य नाही तिला जशीच्या तशी मनापासून स्वीकारत एकीकडे तिने स्वतःचे अस्तित्व व स्वाभिमान दोन्ही शाबूत ठेवला होता.  कठीण परिस्थितीला तोंड देताना स्वतःचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य मजबूत असले पाहिजे; कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये म्हणून आवश्यक असेल तर घरापासून दूर राहून आणि आत्मनिर्भर होऊन जगता आले पाहिजे हे त्या अडाणी बाईला कोणी बरे शिकवले असेल ?  

असा कोणता ‘ व्यक्तिमत्त्व विकासाचा ‘ कोर्स तिने केला असावा  कोणास ठाऊक ?? 

थोडक्यात काय ! तर आयुष्याची शाळा कधी कधी खूप काही शिकवून जाते. 

अगदी आजच्या अत्याधुनिक जगात सुद्धा नको त्या सामाजिक दडपणाखाली  आपण आपल्या वैयक्तिक   इच्छेनुसार काही निर्णय योग्य वेळी घेऊ शकत नाही.  बऱ्याचदा एकीकडे स्वतःला सुशिक्षित, सुसंस्कृत मानत असूनही मनाने ” परावलंबी ” बनतो.

कमकुवत मानसिकता आपल्याला  निर्भिडपणे मते मांडू देत नाही. अगदी जिवलग, जवळच्या नात्यांसमोर  मोकळेपणे व्यक्त होऊ शकत नाही आणि मग सुरू होते ती  वर्षानुवर्षे होणारी आपल्याच अस्तित्वाची घुसमट !  

का तर समाजाच्या चौकटीत आपले बस्तान परफेक्ट मांडता यावे म्हणून?  वर्षांनुवर्षे  मनाविरुद्ध निर्णय घेत राहावे का तर फक्त त्या चौकटीसाठी?  

अशी चौकट काय कामाची जी आपलीच घुसमट करेल आणि एक दिवस निराशेच्या खोल गर्तेत घेऊन जाईल ?   

जर प्रसंगी सीता स्वतंत्र जगून आपल्या मुलांचे संगोपन करू शकली, तिच्या आयुष्याची ध्येयपूर्ती करू शकली तर इतर कोणत्याही स्त्रीमध्ये ती शक्ती अस्तित्वात आहे हे निश्चित !

पण त्यासाठी सर्वात आधी मुक्त करता आले पाहिजे ते विचारांना.  तर पुढे जाऊन खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि मुक्त होऊ शकू.  मान्य आहे की विरोधाचा सामना निश्चितपणे करावा लागेल.  पण निदान  परावलंबी जीवन जगत असताना होणारे मानसिक खच्चीकरण तरी टाळता येईल. 

आज मला माझ्या आईच्या तोंडून बाहेर पडलेले वाक्य पुन्हा एकदा आठवले ,

” भले तुझा होणारा नवरा हुद्द्याने, शिक्षणाने कितीही मोठा असेल, भले त्याचा पगार पाच सहा आकडी असेल, तरीही तुला तुझे अस्तित्व मिळवून देणारी छोटीशी का होईना नोकरी मिळवता आलीच पाहिजे. जर नोकरी नाही तर  निदान कोणता ना कोणता छोटासा व्यवसाय किंवा छंद तरी  जोपासता आला पाहिजे. आभाळाएवढे नाही निदान ओंजळी इतके तरी फक्त तुझे स्वतःचे विश्व असले पाहिजे.  

किती पगार, कोणती पोस्ट,  किती ‘ huge carrer ‘ हे महत्त्वाचे नाही. तुझ्या स्वतःच्या अस्तित्वाला श्वास घेण्याची मुभा असली पाहिजे. 

जर कधी आयुष्यात येणाऱ्या एखाद्या वादळाने तुला दूर कुठे पाचोळ्यागत फेकून दिले तर स्वावलंबी होऊन जगता आले पाहिजे. थोडक्यात काय !  तर  स्वतःवरही प्रेम करता आलेच पाहिजे. ” 

त्या दिवशी पुन्हा एकदा लक्ष्मीम्माच्या कहाणीने आईकडून लग्नाआधी मिळालेल्या धड्याची चांगलीच उजळणी झाली होती. 

फरक फक्त एवढाच होता की माझी आई एक स्वतः  सुशिक्षित, अर्थार्जन करणारी स्त्री होती आणि लक्ष्मीम्मा अडाणी असूनही तेवढीच आत्मनिर्भर ! म्हणून कदाचित तिचे जास्त कौतुक वाटले त्या क्षणी. 

लक्ष्मीम्मा विचारांनी अन् मनाने  स्वतंत्र होती. गळातल्या मंगळसूत्राने तिच्या पायात बेड्या अडकवलेल्या नव्हत्या की कपाळावरच्या भल्यामोठ्या कुंकवाने  व्यक्तिमत्त्व डागाळलेले नव्हते ! 

कदाचित अश्या कितीतरी लक्ष्मीम्मा आपल्या आजूबाजूला असाव्यात.  थोडं अधिक डोळस होता आलं तर निश्चितच दृष्टीस पडतील. 

माझ्या विचारांची सांगता  सिंधूताईंच्या काही भाषणात ऐकलेल्या ह्या प्रेरणादायी ओळींनी करते ,

‘ मुझसे ना तू खाने की या पीने की बात कर,

मर्दो की तरह इस दुनिया में जीने की बात कर I  ‘ 

…..

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *