सनविवि अनुभव,साहित्योन्मेष करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी

करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी

— पुरुदत्त रत्नाकर–

भाग ३

जपानी शिस्त

 सगळे फ्लोअरलीडर मोकळ्या मैदानात येऊ दिले गेले. मजल्यावरच्या कर्मचार्‍यांची यादी फ्लोअर लीडरकडे कायम तयार असते. त्या नावांवर खुणा करून हजेरी घेतली गेली. अधेमधे पावसाची सर येत होती. माझी छत्री वर  मजल्यावरच राहिल्याने माझ्या भारतीय सहकार्याने मला त्याच्या छत्रीत घेण्याचं सौजन्य दाखवलं. पण तो सरदारजी आणि माझाही ऐवज तुल्यबळ. त्यामुळे छत्री असून दोघेही भिजण्यापेक्षा, ‘मी थोडं भिजलेलो असल्याने वेगळा थांबतो’, असं सांगितलं. दरम्यान नक्की काय चाललंय आणि पुढे काय होणार आहे यासंबंधी घोषणा सुरू झाल्या. सर्व सार्वजनिक वाहतूक बंद असेल. एखाद्या मार्गावर चालू असेल तरी वापरण्याचं टाळा असं सांगण्यात आलं. रेल्वे स्टेशन्सवर गर्दी असणार होती. म्हणून तिकडे जाऊही नका. वैयक्तिक गाड्याही न वापरता घराकडे पायी निघा असं सुचवण्यात आलं. 

   काही अधिकारी प्रशासनाशी फोनवर बोलत होते आणि तिकडून संमती आली की ते आम्हाला सोडणार होते. असा मोठ्ठा धक्का येऊन गेल्यावर काही वेळेत दुसरा एक तसाच तुल्यबळ धक्का येतो त्याची वाट पाहूया, असं त्यांनी सांगितलं. आणि तो धक्का आला. साधारण ९ रिस्टर स्केलचा होता. आता पहिल्या धक्क्याच्या वेळी बाहेरून कसं दिसलं असेल ते आम्ही अनुभवत होतो. सगळ्या उंच इमारती डोलत होत्या. वस्तू पडत, तुटत होत्या, खिडक्या फुटत होत्या. दोन-अडीच मिनिटांनी तो धक्का ओसरला. आणखी १०-१५ मिनिटं मैदानात थांबवून मग आम्हाला सूचना देण्यात आल्या. आम्हाला सगळ्यांना जिन्याने इमारतीत परत जाऊन आपापलं सगळं सामान घेऊन यायला परवानगी देण्यात आली. 

सुरवर नर निशाचर झाल्या पळणी

 योकोहामाकडे जाणार्‍या भारतीयांची गाठ तिकडे जाणार्‍या जपानी सहकार्यांशी बांधण्याची धडपड सुरू झाली. माझ्या एका जपानी भाषा येणार्‍या तमिळ सहकार्याचा जपानी भागीदार योकोहामापर्यंत जाणार होता. तिथपर्यंत त्याच्याबरोबर जाऊ असं ठरलं. तिथून साकुरागिच्योचा २ मैल रस्ता मलाही माहिती होता. २.४५ ला भूकंप झाला. साधारण ४.२५ ला आम्ही कंपनीच्या आवाराबाहेर आलो. जपानी माणसांना आम्ही त्यांच्या तुलनेने चपट्या चेहेर्‍यांमुळे कधीतरी गमतीने ‘चपटे’ म्हणायचो. चपटे चालायला एकदम वस्ताद असतात. आमच्या बरोबरचा चपट्या १०० च्या गतीने निघाला. तरीही पहिले ३ किलोमिटर तसा तो ‘गाठने’बल होता. आमचे पायही ताज्या दमाचे होते. ..आणि तमिळ्याची शंका बरोबर निघाली. आम्ही उलट्या दिशेला वेगाने चाललो होतो! मग दोघांनी चालता चालता चर्चा केली. आम्ही मागे न फिरता तसंच पुढे जाऊन दोन उजवी वळणं घेऊन द्राविडी प्राणायाम टोक्योमध्ये केला. 

   आता चपट्याचा वेग इतका वाढला की मला पळायलाच लागत होतं. आजूबाजूला पडझड दिसत होती. मधेच एक छोटा भूकंप आला. रस्ता थरथरत होता. बाजूच्या घराची कंपाउंड वॉल थोडी ढासळली आणि काही तुकडे आमच्या पायासमोर येऊन पडले. काही अंतर गेल्यावर एका पूलावरून जातांना बाजूच्या पूलावर एक शिनकानसेन झुकझुकगाडी थिजवून उभी ठेवलेली आढळली आणि चपट्या हळहळला. चपट्या शिनकानसेनसारखा पळत सुटला होता, झुकझुक न करता! त्याच्यामागून लंबू आणि दोघांच्या मागून मी. सात वाजेपर्यंत ही पायपीट चालू राहिली. चपट्याने अचानक लंबूला सरळ वाटेकडे अंगुलिनिर्देश केला, दोन-तीन वाक्यं पुटपुटली. शेवटचं ‘की वो त्सुकेते’ मला समजलं. तोवर तो डावीकडच्या वाटेवर अदृश्य झालासुद्धा. लंबू आणि मी मग जरा रमत गमत चालू लागलो. वरून पाऊस, खालून थरथराट आणि ब्रिस्कवॉक.. उफ्फ! पायांची कापडं झाली होती. विजारीबरोबर पायही पिळला असता तरी समजलं नसतं. लंबू म्हणाला की आपली रहायची इमारत आणि खोली शाबूत असेल तर यापुढे तिथे आतमध्येच जास्त सुरक्षित आहे. मग आम्ही आपापल्या खोल्या किमान रहाण्यायोग्य आहेत, नळाला पाणी येतंय वगैरे तपासून टाटा केला आणि खोलीत गुडुप झालो. पुढची रात्र कशी गेली ते तुम्ही पहिल्या भागात वाचलं आहेच. 

तुमचेनि प्रसादे न भी कृतांता

  नवा उषःकाल! शनिवार म्हणून कार्यालयाला साप्ताहिक विराम होता. जपानच्या समुद्रकिनार्‍यांवर त्सुनामी येऊन सिंधुजळ गगनि गेल्याचं कळलं. कार्यालयीन इमारतीची किरकोळ पडझड झाल्यामुळे पुढच्या गुरुवारपर्यंत कार्यालयीन सुट्टी असणार होती. सगळं संपलं नव्हतं, असा मी याचा अर्थ घेतला. मला पुढच्या महिन्याचं भाडं भरायचं की नाही त्याचा निर्णय घ्यायचा होता. पर्याय मिळाला तर, मी इथेच थांबून चार दिवसांनी कामावर हजर होईन असं ठरवलं. ‘कर्मण्येवाधिकारस्ते माफलेशु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोस्त्व कर्मणि’ या फलनिरपेक्ष कर्माच्या शिकवणीप्रमाणे मी भाडं भरायला सेव्हन-इलेव्हन मधे गेलो. पुलंचं ‘इकडे बंबवाले आग विझवतायत आणि तिकडे पोस्टमन पत्र टाकतोय..’ हे प्रहसन आठवेल अशीच ही परिस्थिती होती. नोटांचं यंत्र खाली जमिनीत गाडलं जातंय आणि वरून मी त्यात नोटा टाकतोय. गम्मत जाऊ दे पण हे तिथल्या व्यवस्थेवरच्या विश्वासामुळे घडलं. आधीच उध्वस्त झालेली फडताळं, त्यात डझनावारी आफ्टरशॉक्स येत असतांनाही सेव्हन-इलेव्हन चालू होतं आणि सगळे जपानी लोक रांगेत उभं राहून शिस्तीत वागत होते. मी परदेशी म्हणून कोणी मला मागे ढकलत नव्हतं किंवा सामानाचा प्रचंड तुटवडा असतांनाही कोणी घाई, संताप, द्वेष, भेदभाव करत नव्हतं. 

   मी भाडं भरल्यानंतरच्याच संध्याकाळी आमच्या व्यवस्थापनाने आम्हाला भारतात परत आणायचा निर्णय घेतला. पुढची एक रात्र आम्हाला शिंजुकू मध्ये एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. माझी खोली १५व्या मजल्यावर होती. त्या रात्री ६ पेक्षा जास्त क्षमतेचे २ धक्के येऊन गेले आणि ते इतक्या उंचावरून अनुभवायला मिळाले. नरिता विमानतळ जपान सोडून जाणार्‍या पाश्चिमात्यांनी आधीच हाऊसफुल्ल केलं होतं. त्यामुळे आम्हाला हनेदा तळावरून निघणार्‍या विमानासाठी थोडं तिष्ठावं लागलं. हनेदावर असतांनाही एक ४ ते ५ क्षमतेचा धक्का बसलाच! तेव्हा विमानतळ कसं हलतं ते पहायला मिळालं. एवढ्या कालावधीत लहानसहान २०० च्यावर धक्के येऊन गेले होते! आणखी काही मिंनिटांमधे आम्हाला घेऊन विमान गगनी झेपावलं. 

 आम्ही सुखरूप भारतात आलो. आल्यावर पाहिल्याच रात्री मी मोठ्ठा भूकंप होऊन उठून बसलो. बायकोला भूकंप झाला तरी (श्रमामुळे) जाग येणार नाही हे माहीत होतं. पण निर्जीव वस्तूही सगळ्या जागच्या जागी उभ्या होत्या. जाणीव जेवढ्या क्षमतेची होती त्या क्षमतेला आपल्या इमारती टिकणं अशक्य. हे लक्षात आल्यावर परत झोपलो. त्या रात्रीत असे ३-४ भास झाले. हे भास पुढेही होत राहिले पण वारांवरीता कमी होत गेली. मी भास होत असतांना स्वयंसूचना देत त्या अनुभूतिच्या भौतिक प्रतिक्रियेवर ताबा ठेवायला शिकलो. पुढे २०१४ मध्ये एक खरा भूकंपाचा धक्का बंगळुरूमधे जाणवला. तेव्हा मी एंबसि गोल्फ पार्क, डोमलूरमधल्या कार्यालयात होतो. सगळे कर्मचारी काही मिनिटं इमारती खाली येऊन उभे राहिले आणि धक्का ओसरल्यावर परत रुजू झाले. भारतात असतांना जाणवलेल्या त्या एकमेव धक्क्यानंतर भूकंपाचा भास कधीही झालेला नाही!

1 thought on “करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी”

  1. खरोखरच भूकंपाचा अनुभव दिला, वाचता वाचता भूकंपाचे खरोखरच धक्के बसल्यासारखे वाटतात लेखकाच्या लिखानावरून,अप्रतिम 👌👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *