–सौ. विद्या चिडले.–
मधुमेहावर (diabetes) असरदार ठरणारे छोटे पण बहुगुणी झाड म्हणजे इन्सुलिनचे झाड. बाराही महिने हिरवे राहणारे हे झाड पर्यावरण पूरक आहे. हे झाड प्राणवायूचे उत्सर्जन करते व वातावरण शुद्ध करते. साधारणतः दोन ते तीन फूट वाढणाऱ्या ह्या झाडाची पाने चार ते आठ इंच मोठी असतात. ह्याची पाने एकदा उजवीकडे एकदा डावीकडे अशी वर्तुळागत लागतात (स्पायरल). हे रोप एकदा लावले की बरीच वर्षे टिकते.
हे झाड घरच्या बागेत सहज लावता येते. पावसाळ्यात हे रोप लावले तर उत्तम परंतू कुठल्याही ऋतूत लावले तरी चालते. माती आणि सेंद्रिय खत मिसळून कुंडी भरायची व त्यात ह्या रोपाचे कंद दोन तीन इंच खोल लावायचे. त्यानंतर त्या रोपाला पाणी घालायचे. रोज थोडे थोडे पाणी घातले की मातीत आर्द्रता राहते. थोडे ऊन थोडी सावली असेल अशा जागी छान वाढते. ऊन जास्त असले तरी हरकत नाही. दक्षिण व मध्य अमेरिकेत हे हर्ब जास्त दिसते. पण भारतातही, विशेषतः दक्षिण भारतात हे झाड शोभेचे म्हणून खूप ठिकाणी लावले जाते. ह्याला तांबडी लाल फुलं येतात. आता Herbal care म्हणून आपल्याकडेही ह्या वनस्पतीचे महत्त्व वाढत आहे.
Costus Igneus ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या ह्या हर्बच्या बर्याच जाती आहेत. ह्या वनस्पतीला महत्त्व आहे ते अनेक दृष्टिने. सरळ प्रभाव होत नसला, तरी ह्यातील नैसर्गिक तत्व रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित करण्यास मदत करते. Sugar plant म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या वनस्पतीला आपल्याकडे कीकंद, कुमुल, पुष्करमुला अशी नावं आहेत.
ह्यात भरपूर प्रमाणात प्रोटिन्स, आयर्न असते. तसेच anti oxidants ही आहेत. नैसर्गिक इन्सुलिन सोबतच B carotene बर्याच मात्रेत आढळते. फुलांमध्ये तर पोषक तत्व प्रचूर मात्रेत उपलब्ध आहेत.
१]इन्सुलिनच्या पानाच्या सेवनाने अन्नाच्या चयापचयाची क्रिया सुचारित होते.
२] ह्यात इन्सुलिन मिळत नाही किंवा ही पाने खाल्ल्यास शरीरात इन्सुलिन तयारही करीत नाहीत. पण ह्यातील नैसर्गिक इन्सुलिन तत्व ( phytocompounds) शरीरातील शुगर, glycogen मध्ये परिवर्तीत करते. त्यामुळे डायबेटिस असणाऱ्या व्यक्तीस फायदा होतो.
३] सर्दी खोकल्यावर इन्सुलिनची पाने उपयोगी ठरतात.
४] त्वचेच्या इन्फेक्शनवर फायदेशीर ठरते.
५] फुफ्फुसाच्या आजारावर देखील इन्सुलिनच्या पानाचे सेवन करतात.
६] अस्थमावर इन्सुलिन पानाच्या सेवनाचे चांगले परिणाम दिसून येतात.
७] तसेच डहाळ लागलेले असो वा बद्धकोष्ठता इन्सुलिन पानाचे सेवन परिणामकारक ठरते.
८] टाईप 2,डायबेटिस वर फायदेशीर ठरते.
९] ॲन्टीकॅन्सरस म्हणूनही ही पाने काम करतात.
१०] आयुर्वेदिक औषधांमध्ये पानाचा उपयोग करतात.
केंद्रीय खनन एवं इंधन अनुसंधान संस्था, ( सिंफर), धनबादचे निदेशक डाॅक्टर पी. के. सिंह म्हणतात- “पर्यावरण पूरक अशा ह्या वनस्पतीचे मानवी शरीरावर कुठले वाईट परिणाम दिसून आलेले नाहीत. पण काळजीपूर्वक उपयोग करणे जास्त योग्य.”
सिंफरने इन्सुलिन पानाच्या विक्रीसाठी इ-बाजार पोर्टल विकसित केलं आहे.
ताजी हिरवी दोन पाने चावून चावून खाणे किंवा वाटून पाण्यात मिसळून ते पाणी पिणे अशा दोन्ही पद्धतीने सेवन करतात. तसेच ही पाने तोडून सावलीत वाळवतात. नंतर त्या वाळलेल्या पानांची पूड करून ठेवतात. ही पूड पाण्यात मिसळून घेतात.
परंतू ह्याचेही सेवन करताना एकदा डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण ह्याच्या जास्त सेवनाने serious cardiac problem उद्भवू शकतो.