–सौ. विद्या चिडले.–
सर्व-विदित, सर्व-श्रुत अशा अनेक वनौषधीपैकी कोरफड (aloe vera) ही एक वनस्पती.
डॉ. लक्ष्मीकांत शुक्ला सांगतात– ‘कोरफड हे एक रहस्यमय रोप आहे’.
तिला संस्कृतमध्ये घृतकुमारी किंवा कुमारी म्हणतात. आयुर्वेदात याचे बरेच वर्णन आढळते.
आयुर्वेदिक असो वा पाश्चात्य, प्रत्येक पारंपरिक औषधप्रणालीमध्ये कोरफडीची एक विशिष्ट जागा आहे. जाड पण मऊ रसमय पाने असलेले हे रोप आज बहुतेक घराघरापर्यंत पोहोचले आहे. पानावर वॅक्ससारखी चकाकी असते. चकाकदार कडवट जेल असलेल्या ह्या पानाचे आयुर्वेदात लाभकारी वर्णन केले आहे.
ह्या चमत्कारी वनस्पतीचे आरोग्यविषयक अनेक फायदे आहेत. त्वचा विकार, सनबर्न, त्वचेचा दाह, पोटाचे विकार, बद्धकोष्ठता, केशसंवर्धन, ह्यावर उपयोगात येते. त्वचेवर व केसांसाठी नैसर्गिक रुपात वापरणे बरेच सोयीस्कर ठरते.
१] कोरफड आपली त्वचा आर्द्र व मऊ ठेवण्यास मदत करते. त्वचेवरील डाग, टॅनिंगवर अलो व्हेरा जेलचा उपयोग होतो.
२] तोंडातील अल्सर बरे होतात.
३] मौखिक स्वच्छतेसाठी ह्याचा उपयोग होतो.
४] पोटाचे विकारही बरे होतात. पण डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग घ्यावे.
५] मधुमेह, कोलेस्टेरॉल, ह्यावर उपयोगी आहे. पण डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा.
६] अँटी-ऑक्सिडेट, अँटी-बॅक्टेरिल गुणधर्म कोरफडीत आहेत.
७] कोरफडीमुळे हेअर फाॅलिकल्सचे पोषण होते व केस चांगले होतात.
८] ह्यात vitamin A, C, B1, B2, B3, B4 तसेच मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली अनेक पोषक तत्वे आहेत.
९] आयुर्वेदाचे डाॅक्टर पेशंटच्या रक्तातील व पचनक्रियेतील विषारी घटक काढून टाकण्यास कोरफडीचा वापर करतात.
१०] श्वसनाचा त्रास, तसेच सायनस, सर्दी-पडसे ह्यासाठी डाॅक्टर कोरफडीचा उपयोग सांगतात.
११] आमवात व त्यामुळे होणार्या वेदना व स्नायूंचा ताठरपणा कमी होण्यास कोरफड उपयुक्त ठरते.
१२] अन्नपचन व पित्त ह्यावरही कोरफड डाॅक्टर रिकमेंड करतात.
कोरफडीचे आज व्यावसायिक महत्त्वही खूप वाढले आहे. सौंदर्य प्रसाधन, फेस पॅक, फेस क्रिम,साबण, लोशन, पावडर ह्यात कोरफडीने जागा घेतली आहे.
अशी ही बहुगुणी वनस्पती आपल्या छोट्या बागेत लावणे खूप सोपे आहे. आपण नेहमीच्याच पद्धतीनुसार कुंडी तयार करावी. त्यात रेतीचे प्रमाण जास्त ठेवावे व पाण्याचा चांगला निचरा होईल ह्याची काळजी घ्यावी. कोरफडीला जास्त पाणी लागत नाही. कोरफड लावण्यास मडक्याचा वापर केल्यास जास्त चांगले.
कोरफडीचे रोप नर्सरीतून आणून कुंडीत लावावे.
घरीच रोप असेल, तर मुख्य रोपाच्या मुळापासून आलेले छोटे रोप चाकूने अलगद कापून लावतात. तसेच ह्या रोपाचे जाडे पान,तीन चार इंचभर कापून दोन तीन दिवस वाळवून नंतर त्या वाळलेल्या पानाचा जाडा भाग ओल्या मातीत चांगला खोचावा. काही दिवस किंवा आठवडाभर रोज थोडे थोडे पाणी घालावे. नंतर मात्र जास्त पाणी लागत नाही. खूप ऊन असल्यास तीन चार दिवसांनी पाणी द्यावे लागते. कुंडीतील माती गच्च ओली नसावी. कुंडी चार पाच तास ऊन्हात ठेवावी. हे झाड कोरड्या हवेत चांगले वाढते. पाण्याचा योग्य निचरा झाला नाही तर किंवा माती पूर्णतः कोरडी झाली तरी रोप मरते.
पानावरही पाणी साचून राहणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते.
कोरफड साधारणतः जुलै-ऑगस्ट महिन्यात लावतात.
महिन्यातून वा दोन तीन महिन्यातून एकदा स्वयंपाक घरातील वेस्टची पेस्ट करून पाण्यात मिसळून ते पाणी झाडाला घातले तर उत्तम.
मध्यंतरी एक दिवस मी स्वामी रामदेव यांचा योगावर असलेला कार्यक्रम बघितला. त्यांनी कोरफडीची भाजी व तिची उपयुक्तता सांगितली. पण ती कोरफड वेगळ्या जातीची असावी. कारण अन्यतः कडू असणारा कोरफडचा गर जास्त कडू नसतो म्हणूनच त्याचा ज्यूसही करतात. आपण स्वतः बाह्योपचार वगळता कुठलेही प्रयोग डॉक्टरांनी सांगितल्याबरहुकूम करणे जास्त योग्य.
