–प्रतिभा बिलगी —
बदामी गुंफा मंदिरे ही भारतातील कर्नाटक राज्यातील उत्तरेकडील बागलकोट जिल्ह्यातील बदामी या गावी स्थित आहेत. CE 540 ते 757 पर्यंत ही चालुक्यांची राजवटीची राजधानी होती. हे बदामी गुंफा मंदिरे, तसेच भूतनाथ मंदिरे, बदामी शिवालय आणि जांबुलिंगेश्वर मंदिर यासारख्या संरचनात्मक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. हे अगस्त्य सरोवराच्या सभोवतालच्या खडबडीत, लाल वाळूच्या खडकांच्या पायथ्याशी एका खोऱ्यात वसलेले आहे. भारत सरकारच्या HRIDAY – हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट आणि ऑगमेंटेशन योजनेसाठी बदामीची हेरिटेज शहरांपैकी एक म्हणून निवड करण्यात आली आहे.
बदामी इथे हिंदू आणि जैन गुंफा मंदिरांचे एक संकुल आहे. ही लेणी भारतीय रॉक-कट आर्किटेक्चरची, विशेषत: बदामी चालुक्य स्थापत्यकलेचे एक अद्भुत उदाहरणात गणले जाऊ शकते. या गुफा सहाव्या शतकातील सर्वात जुन्या गुफा आहेत. बदामी हे एक आधुनिक नाव आहे. पूर्वी हे वातापिनगरा म्हणून ओळखले जात असे. ही सुरुवातीच्या चालुक्य राजवंशाची राजधानी होती ज्याने 6 व्या ते 8 व्या शतकापर्यंत कर्नाटकच्या बहुतांश भागावर राज्य केले. बदामी हे मानवनिर्मित तलावाच्या पश्चिम किनाऱ्यावर दगडी पायऱ्या असलेल्या मातीच्या भिंतीने वसलेले आहे. उत्तर आणि दक्षिणेला तो नंतरच्या काळात बांधलेल्या किल्ल्यांनी वेढलेला आहे. ही रॉक-कट स्मारकांसाठी प्रसिद्ध आहेत. बादामी गुंफा मंदिरांमध्ये तीन मूलभूत वैशिष्ट्यांसह रॉक-कट दिवाणखाने आहेत: खांब असलेला व्हरांडा, स्तंभ असलेला दिवाणखाना आणि खडकात खोलवर निर्मिलेले गर्भगृह. या गुंफा मंदिरांचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे अगदी सुधारलेल्या शैलीत तसेच मनोरंजक मुद्रांमध्ये गुंफलेल्या विविध दैवी प्रतिमा. इथे एकूण ४ गुहा पाहायला मिळतात. गुहा १ मधील हिंदू देवतांच्या शिल्पांमध्ये, तांडव-नृत्य करणाऱ्या शिवाचे “नटराज” या नावाने प्रसिद्ध प्रमुख कोरीवकाम आहे. ही शैव गुहा आहे. या गुहेतील महत्त्वाचे कोरीवकाम म्हणजे दोन हातांचा गणेश, महिषासुर मर्दिनी, अर्ध नरेश्वर आणि शंकरनारायण. या गुहेचे छत सर्पाकृतीबंधाने आणि इतर कोरलेल्या आकृत्यांनी सुशोभित केलेले आहे. गुहा २ ही गुहा 1 सारखीच आहे, ज्यात “त्रिविक्रम” नावाने ओळखली जाणारी भगवान श्रीविष्णू ची मूर्ती आहे. या गुहेत वैष्णव प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो. छतावर अनंतसायन, ब्रह्मा, विष्णू, शिव आणि इतर अष्टदिकपालन कोरलेले आहेत. सर्वात मोठी ३ री गुहा आहे, ज्यामध्ये श्रीविष्णू च्या जीवनावरील आधारित विविध स्थापत्यकलेची उदाहरणे पाहावयास मिळतात. ही गुहा संकुलातील सर्वात गुंतागुंतीची कोरीव गुहा मानली जाते. या तिसर्या गुहेत शैव आणि वैष्णव या दोन्ही शैलीशी संबंधित नक्षीकाम आहे. त्रिविक्रम, नरसिंह, शंकरनारायण, भुवराह, अनंतसायन आणि हरिहर यांचे शिल्प अत्यंत रेखीवपणे कोरलेले आहे. येथे सापडलेल्या शिलालेखात मंगळेशाने 578 मध्ये मंदिराची निर्मिती केल्याची नोंद आहे. या गुहेच्या खांबांवर काही बारीक कंसातील आकृती दिसून येतात. लेणी ४ ही जैन धर्माच्या तीर्थंकरांना समर्पित आहे. जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा असलेली ही एक छोटी गुहा असून या गुहेच्या गर्भगृहात भगवान महावीरांचे मोठे शिल्प आहे. येथील इतर कोरीव कामांमध्ये पद्मावती आणि इतर तीर्थंकरांची शिल्पे बघावयास मिळतात. गुहा २ आणि ३ च्या मधोमध कापलेल्या काही पायऱ्या चढून बदामी किल्ल्याच्या दक्षिणेकडे, डोंगराच्या माथ्यावर आणि टिपू सुलतानने ठेवलेल्या जुन्या तोफेकडे जाता येते. येथील सरोवराभोवती, बदामीमध्ये अतिरिक्त गुहा आहेत ज्यापैकी एक बौद्ध लेणी असू शकते, असे पुरातत्वशास्त्रज्ञांचे मत आहे. २०१५ मध्ये चार मुख्य लेण्यांपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर आणखी एक गुहा सापडली होती त्यात २७ हिंदू धर्मावर आधारित कोरीवकाम आहे.
बादामी लेणी संकुल हे युनेस्को-नियुक्त जागतिक वारसा स्थळाचा एक भाग आहे. याला “मंदिर आर्किटेक्चरची उत्क्रांती – ऐहोल-बदामी-पट्टडकल” या शीर्षकाखाली प्रसिद्धी मिळाली आहे. या लेणी मलप्रभा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या असून यांना मंदिर वास्तुकलेचे उगमस्थान मानले जाते. यांचा उपयोग नंतरच्या हिंदू मंदिरांचे मॉडेल बनवण्यासाठी केला गेला, असे मानले जाते. या प्रदेशातील लेणी १ आणि २ मधील कलाकृती या ६व्या आणि ७व्या शतकातील उत्तर-दक्खन शैलीचे प्रदर्शन करतात, तर लेणी ३ मधील कलाकृती एकाच वेळी उत्तर नागारा आणि दक्षिण द्रविड शैली अश्या दोन प्राचीन भारतीय कलात्मक परंपरांचे प्रतिनिधित्व करतात. पहिल्या ३ लेण्यांमध्ये हिंदू प्रतिमा आणि शिव आणि विष्णू यांच्यावर केंद्रित असलेल्या दंतकथांची शिल्पे आहेत, तर लेणी ४ ही पूर्णपणे जैन प्रतिमा आणि जैन धर्माशी निगडित आहेत.
सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात ही बदामी गुंफा मंदिरे आतून पूर्णपणे रंगवली गेली असण्याची शक्यता आहे. यात भारतातील हिंदू महापुरुषांची सर्वात जुनी चित्रे आहेत. या चित्रांचा समावेश सर्वात प्राचीन चित्रकलेच्या यादीत होऊ शकतो. यातील बहुतेक चित्रे आता हरवली आहेत.
बदामी गुंफा मंदिरे भारताच्या कर्नाटक राज्याच्या उत्तर-मध्य भागातील बदामी शहरात आहेत. मंदिरे बेळगावीच्या पूर्वेस सुमारे १४२ किमी आणि हम्पीच्या वायव्येस १४० किमी अंतरावर आहेत. इथून मलप्रभा नदी जवळपास ५ किमी दूर आहे. गुहा मंदिरे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ पट्टडकल पासून २३ किमी आणि आयहोळ पासून ३५ किमी अंतरावर आहेत. शंभरहून अधिक प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील हिंदू, जैन आणि बौद्ध स्मारके असलेले हे दुसरे ठिकाण मानले जाते. बदामी लेणी हा ४ गुहा मंदिरांचा समूह असून बदामी किल्ल्यासमोरील टेकडीतून कोरला गेला आहे. चालुक्य राजा, मंगळेशा (598-610) याने या गुहा मंदिरांना पूर्णत्व दिले. चारपैकी तीन गुहा ब्राह्मणवादी, तर चौथे जैन धर्माचे प्रतिधिनित्व करतात. गुहेत जाण्यासाठी जवळपास 2000 पायऱ्या चढाव्या लागतात.
किरीटवर्मनचा भाऊ मंगळेशा (598 – 610 AD) याने गुहा मंदिरांचे बांधकाम पूर्ण केले आणि विष्णू प्रतिमेच्या स्थापनेच्या निमित्ताने मंदिरे गावास भेट दिली. राजवंशातील सर्वात महान शासक पुलकेशी दुसरा (610-642 AD) होता ज्याने पल्लव राजा महेंद्र वर्मन पहिला याचा पराभव केला. पल्लवांनी नंतर त्यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी बदामीवर कब्जा केला आणि त्याचा नाश केला. यानंतर बदामी विजयनगर राजांच्या ताब्यातही होता. आदिल शाही, सावनूर नवाब, मराठा, हैदर अली यांनी बदामी वर अधिपत्य गाजवले आणि शेवटी ब्रिटिशांनी तो बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग बनवला.
या अशा अद्भुत स्थळाची भेट सगळ्यांनी एकदातरी करावी. अशी ही विशिष्ट लेणी स्थापत्य कलेचा सुंदर नमुना असून फक्त देशभरात नाही तर जगभरात प्रसिद्ध ठरली आहेत.
