— सौ. विद्या चिडले —
रोझमेरी ह्या झुडुपाचा सुगंध काय वर्णावा? नुसता हात फिरवला तरी हाताला सुगंध येतो. बारीक लांबोळी सुईसारखी पाने असलेली ही वनस्पती कुंडीत लावली की खूप सुंदर दिसते. सदाहरित, सुगंधी, सुबक-सुंदर अशी ही वनस्पती बरेच औषधी गुण लेवून अवतरली आहे. साधारणतः पाच सहा वर्षापूर्वी मी हे रोप लावलं. पण त्याची माहिती व औषधीगुण कळले ते ह्या कोरोना काळात. त्यामुळे सुरुवातीला फक्त रिफ्रेशिंग हर्ब म्हणून कधीमधी उपयोगात येत असलेली रोझमेरी आता वरचेवर वापरात येवू लागली. अगदी दोन चार पाने किंवा बोटाच्या एका कांड्याइतकी काडी चहात पुरेशी होते. कोविड काळात रोझमेरीचा चहा अथवा काढा खूपदा प्यायलो.
ह्या झुडपाच्या तीन जाती आहेत असं वाचलय. ह्या वनस्पतीला फुलं व फळही लागतात. पण माझ्या घरी असलेल्या रोपाला मात्र अजूनही फुलं व फळं आलेली नाहीत. ओरेगॅनो, थाईम, बेसिल, लवेंडर असल्या मिंट फॅमिली मधली ही वनस्पती आहे.
सदापर्णी सदाबहार अशी ही वनस्पती मुळची मेडिटेरिअन भागातील रहिवाशी आहे. दक्षिण युरोप, उत्तर आफ्रिकेत ही वनस्पती खूप दिसते. परंतू आता अनेक देशात थंड जागेच्या ठिकाणी लावतात. भारतात समशीतोष्ण भागात, हिमालयाच्या उतारावर, निलगिरीच्या टेकड्यांवर यशस्वी लागवड करण्यात आली आहे. दीर्घकाल टिकणाऱ्या ह्या वनस्पतीतून सुगंधी तेल काढतात. हिरवी ताजी किंवा वाळवलेली ह्या दोन्ही स्वरूपात रोझमेरी वापरली जाते. हिला हिंदीत गुलमेहंदी म्हणतात.
ह्या वनस्पतीचे आरोग्य संवर्धक गुणधर्म लक्षात घेण्या सारखे आहेत.
१] ह्यात Anti-inflammatory, anti-oxidants, anti-viral, anti-fungal, anti-bacterial असे अनेक गुण आहेत.
२] ह्या वनस्पतीचे सेवन केल्यास रक्ताभिसरण चांगले होते.
३] रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
४] रोझमेरी मेंदूला तरतरी आणते.
५] ह्याचे सेवनाने ट्युमर वगैरे वाढण्याची प्रक्रिया मंदावते.
६] तसेच कॅन्सर पेशींची वाढ होत नाही असेही वाचनात आले आहे.
७] कुठल्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
८] डोळ्यांची क्षमता वाढते.
९] लिव्हरचे कार्य सुरळीत होते.
१०] ह्यातील manganese शरीरावरील जखम लवकर बरी होण्यास मदत करते.
११] रोझमेरी तेलाचा ॲरोमा थेरपी साठी वापर करतात.
१२] मेंदूची कार्यशक्ती, स्मरणशक्ती, वाढवते.
१३] रोझमेरीच्या चहाने मानसिक व शारीरिक ताणतणाव दूर होतो.
१४] त्वचेची निगा राखण्यात रोझमेरीचा उपयोग होतो.
१५] रोझमेरीच्या काढ्याने क्रॅम्प जातात.
१६] रोझमेरीत vit C भरपूर प्रमाणात तर vit B थोड्या प्रमाणात आहे.
१७] हे सौम्य विरेचक असून पोट साफ करते.
१८] ह्या रोपाच्या वाळलेल्या पानाचा धूर अस्थमावर फायदेशीर ठरतो. तसेच रोझमेरी तेलाचा वाफाराही कफ नाशक आहे असं वाचलय.
१९] पाने, कोवळ्या फांद्या व फुले ह्यातून तेल काढतात. त्याचा उपयोग अनेक प्रकारची सुगंधी द्रव्ये, साबण तयार करण्यात होतो.
२०] हिला वायुनाशी म्हणतात.
२१]डोकेदुखीवर उपयोगी आहे.
तुळस, कापूर ह्या कुळातील औषधीगुणयुक्त रोझमेरी अनेक प्रकारे खाद्य पदार्थाची आकर्षकता वाढवते. थोडी तिखट किंचित कडवट चव असलेली ही पाने आज जगात सर्वत्र वेगवेगळ्या पदार्थात, स्वयंपाकात वापरली जातात. सलाडवर, सूप मध्ये टाकली की वेगळीच रंगत वाढते. Culinary condiments मध्ये, इटालियन डिशेस मध्ये तसेच अनेक पोल्ट्री व फिशच्या डिशेस मध्ये मसाला म्हणून वापरात. पास्ता, पिझा, बिर्याणीवर मसाले भातावर फक्त पाने किंवा नाजूक दांडी सकट टाकतात. कधी वाळलेली ब्राऊन झालेली पानेही क्रश करून टाकतात.
अशी ही गुणी व सुंदर रोझमेरी आपल्या बागेत नक्कीच लावावी. कुंडीत पाण्याचा निचरा होईल अशी माती भरून त्यात बी किंवा कलम लावली की रुजते. चुनखडी मिश्रित मातीही चालते. ही वनस्पती सूर्यप्रकाशात छान वाढते. पाण्याचा निचरा होणे आवश्यक असले तरी रोजच थोडे थोडे पाणी द्यावे लागते. मातीत ओलावा असावा लागतो. एप्रिल-मे महिन्यात कलम लावणे योग्य ठरते. वीस पंचवीस दिवसात मुळं फुटतात. खूप हळू वाढ होते रोपाची. पण ही वनस्पती काटक असते. दीर्घकाल टिकते. ह्या झाडाची इंचभराची हिरवीगार पाने असलेली काडी टाॅपिंग साठी पुरेशी होते. साधारणतः दोन तीन फूट झाडाची वाढ होते. कधी त्यापेक्षाही जास्त म्हणजे सहा सात फूट मोठे होते हे रोप. कुंडीत माती भरताना खत (रासायनिक नव्हे) मिसळले तर चांगलेच. उन्हाळ्यात (वसंतात व ग्रीष्मात) रोझमेरीला फुले येतात तसे उष्ण दमट हवेत वर्षभर फुले येतात. मातीत ओलावा असावा लागत असला तरी मातीचा वरचा थर वाळल्यावरच पाणी घालतात नाहीतर झाडावर फंगस येतो. कटिंग करत राहिले की भरपूर वाढते.
रोझमेरी अशी गुणी असली तरी तिचेही side effects आहेतच. त्यामुळे अती प्रमाणात सेवन आरोग्यास घातक ठरू शकते.
एकतर– जास्त खाण्यात आल्यास ॲलर्जी होवू शकते.
दुसरे म्हणजे– ह्यात blood clotting agents असल्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसारच रोझमेरीचा उपयोग करणे जास्त श्रेयस्कर ठरेल. हे लक्षात घ्यावे.